महाराष्ट्र सरकारने वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमधून होणाऱ्या नवजात बालकांच्या चोऱ्या रोखण्यासाठी विशेष नियमावली तयार केली आहे. अपहरण झालेल्या बालकांना शोधण्यासाठी सरकारने ‘कोड पिंक’ सक्रिय केला आहे. सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये रुग्णालयाच्या विविध क्षेत्रांचा समावेश आहे. या अंतर्गत डीन किंवा वैद्यकीय अधीक्षकांनी रुग्णालय सुरक्षेचा मासिक आणि तिमाही अहवाल सरकारला देणं अनिवार्य केलं आहे.
नवजात बालकांची चोरी रोखण्यासाठी सरकारचं पाऊल
अलीकडे रुग्णालयातून नवजात बालकांची चोरी होण्याचं प्रमाण वाढलं आहे. या चोरीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांना आणि त्यांच्याशी संबंधित रुग्णालयांना विशेष नियम लागू केले आहेत. सरकारी रुग्णालयांतून अपहरण झालेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी ‘कोड पिंक’ सक्रिय केला जाणार आहे. या कोड पिंक अंतर्गत रुग्णालयामधील प्रसूतीपूर्व तपासणी विभाग, प्रसूती कक्ष, शस्त्रक्रिया कक्ष, प्रसुतिपूर्व युनिट आणि नवजात अतिदक्षता विभागांना या मार्गदर्शक तत्वाचं पालन करणं अनिवार्य आहे. तसेच रुग्णालयाचे अधीक्षक आणि डीन यांना या विभागांसह संपूर्ण रुग्णालयाच्या सुरक्षेसंबंधित मासिक आणि तिमाही आढावा घेत अहवाल तयार करायचा आहे.
पिंक कोड अंतर्गत येणारे विभाग
महाराष्ट्र सरकार या उपाययोजनांद्वारे बाळांच्या अपहरणातील वाढत्या घटनांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करीत आहे. वैद्यकीय शिक्षण आणि आयुष आयुक्तांवर या प्रोटोकॉलच्या अंमलबजावणीवर देखरेख करण्याची जबाबदारी दिली आहे. तर वैद्यकीय अधीक्षकांनी नियमितपणे सुरक्षा उपायांचा आढावा घेत अहवाल देणे आवश्यक आहे.
या प्रोटोकॉलमध्ये प्रसूती विभागाशी संबंधित सर्व क्षेत्रांचा समावेश आहे. तरी ज्या सरकारी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णांची ये-जा असते अशा रुग्णालयांत हे प्रोटोकॉल कसे पाळले जातील याविषयी साशंका व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा : आरोग्य खर्चात सरकारी अर्थसाहाय्य…
पिंक कोड कसं काम करणार
जेव्हा रुग्णालायातून एखादं बाळ हरवल्याची तक्रार नोंदवली जाईल तेव्हा ‘कोड पिंक’ सक्रिय होईल. पहिल्यांदा परिचारिका चोरीची तपासणी करतील. नंतर मुख्य परिचारिकांना याची माहिती कळवतील आणि संबंधित डॉक्टर आणि वैद्यकीय अधीक्षकांना सतर्क करतील. त्यानंतर ‘कोड पिंक’ ची सूचना येईल. फोन ऑपरेटर रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांना ही बातमी देतील.
फोन ऑपरेटर कडून एखादं बाळ चोरीला गेल्याची माहिती मिळताच सुरक्षा कर्मचारी शोधमोहिम सुरू करतील. रुग्णालयाच्या सर्व प्रवेशद्वारांवर तपासणी केली जाईल. संशयास्पद वाटणाऱ्या व्यक्तींना ताबडतोब ताब्यात घेतलं जाईल. रुग्णालयाच्या परिसरातून बाहेर जाणाऱ्या सर्व रुग्णांची, भेटण्यासाठी येणाऱ्या व्यक्तिंची, त्यांच्या सर्व बॅगा आणि वाहनांची कडक तपासणी केली जाईल. त्याचबरोबर जवळच्या पोलिस स्टेशनला ही माहिती दिली जाईल.
हे ‘कोड पिंक’ दोन तास किंवा मूल सापडेपर्यंत सक्रिय राहणार आहे. ज्यावेळेला बाळ सापडेल त्यावेळेल सुरक्षा कर्मचारी ‘कोड पिंक ऑल क्लियर’ अशी घोषणा करतील.