2011 चं वर्ष होतं. दररोज कॉलेजमध्ये गेलं की नवीन काय माल आला? याचा शोध असायचा. तेव्हा एका कार्यकर्त्यानं नेहमीप्रमाणं ब्लुटूथनं एक गाणं सरकवलं. ते ऐकल्यानंतर सगळे पोट्टे पागल झालते. ते गाणं होतं ‘डोप शोप’. हनी सिंगच्या आजवरच्या गाण्यांमधलं सर्वात हिट आणि सगळ्यात जास्त लोकप्रिय झालेलं गाणं. याच गाण्यानं त्याला ओळख मिळवून दिली. तो आमच्यापर्यंत पोहोचला आणि आम्ही हनी सिंग नावाच्या माणसाचे फॅन वगैरे झालो.
कॉलेजात प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये एखादा तरी स्टड पोरगा असतो. 10-12 वर्षांपूर्वी कानात मोठाले हेडफोन्स, हातात सोनीचा वॉकमेन सिरीजचा फोन, खुरटी बोकडासारखी दाढी, कानात बाळी, गळ्यात चैन, हातात ढीगभर बँड्स, कूल वाटावं म्हणून इंग्लिश टोपणनाव असं एकंदरित त्या कार्यकर्त्याचं वर्णन होतं. आमच्याकडेही एक-दोन होते. त्यातला एक सँडी. तो कधी क्लासमध्ये दिसल्याचं आठवत नाही. पण कॉलेज कॅम्पसमध्ये कुठेच न जाणाऱ्या पायऱ्यांवर तो हमखास भेटणार. त्याच्याकडे हनी सिंगच्या गाण्यांचं कलेक्शन होतं. त्यानं ब्लुटूथने आम्हाला ते शेअर केलं होतं. तेव्हा इंटरनेट वगैरेचा विषयच नव्हता. आमच्या फोनमध्ये गाणी वाजायची हीच मोठी गोष्ट होती.
सँडी आणि त्याच्यासारख्या अनेकांसाठी हनी सिंग म्हणजे सर्वस्व. या मंडळींच्या तोंडात कायम हनी सिंगची गाणी असायची. हळूहळू आम्हीही त्यात गेलो. त्याची खूप कारणं होती. तुळजापूर तालुक्यातल्या पत्र्याच्या शाळेतून संभाजीनगर (त्यावेळी औरंगाबादच्या) सरस्वती भूवनसारख्या संस्थेत आल्यानंतर एक प्रकारचा न्यूनगंड होता. त्यात आजूबाजूला कॉन्वेन्टचे हुशार, श्रीमंत पोरीपोरं. त्यांच्याकडं बघून आधीच अर्ध व्हायला व्हायचं. त्यात त्यांची हायफाय लाईफस्टाईल म्हणजे बऱ्यापैकी हॉलीवूडछाप. ते बघितल्यानंतर तर उरलासुरला आत्मविश्वास गायब व्हायचा. या सगळ्यात आम्हाला आधार होता तो हनी सिंग.
हनी सिंग हा मनुष्य आधी आम्हाला कळालाच नाही. म्हटलं हा पंजाबी, याची गाणी पंजाबी. आपला काय संबंध आहे? वर्गातले एलिट पोरंपोरी इंग्रजी गाणी ऐकायची. ग्रुपनं गाणी म्हणायची. त्यावर गप्पा करायची. त्याकाळी आपला आणि इंग्रजी गाण्यांचा संबंध असण्याचं काही कारण नव्हतं. आताही नाहीच. अभ्यासात बरा असलो तरी या बाकीच्या गोष्टींत मागे पडतोय असं नेहमी वाटायचं. मग अशावेळी आम्हाला सँडी आणि हनी सिंगच्या गाण्यांनी तारलं. या पोरांना ठसन द्यायला आम्ही हनी सिंगची गाणी वाजवायचो. मोठ्या मोठ्यानं म्हणायचो. पंजाबी कळत नव्हती तरी हनी सिंगची गाणी पाठ झाली. मग नंतर त्यांचा अर्थ कळायला लागला. तेव्हा लक्षात आलं हा माणूस ‘लै बेक्कार’ आहे.
हनी सिंगच्या सगळ्या गाण्यांमध्ये एक ‘माज’ आहे. रग आहे. अॅटिट्यूड आहे. जो आमच्या आयुष्यात मिसिंग होता. हनीपाजीची ओळख झाली आणि त्याच्या गाण्यातला तोच माज आम्ही आमच्या आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न करत केला. हनीपाजीचं गाणं म्हणणं, गाण्यात नाचणं, कॅमेऱ्यासमोर वावरणं, आत्मविश्वासानं बोटं दाखवत रॅप करणं हे पोरांना लै भारी वाटायचं. आम्ही त्याच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करायचो. मुलींशी बोलण्याचा आत्मविश्वास नव्हता. पण त्याच्या गाण्यातून सिंगल असलेल्या आमच्यासारख्यांचा कॉन्फिडन्स जबर वाढायचा. कुणी भाव देत नसलं तरी आपण कुणापेक्षा कमी नाहीत, हे त्याची गाणी सांगायची. कॉलेजात पोरींची जेवढी वाट नाही पाहिली, तेवढी त्याच्या नवीन गाण्यांची पाहायचो. प्रत्येक गाण्यात तो काहीतरी वेगळं करायचा. त्याची स्टाईल स्टेटमेंट, कॉस्च्युम्स, डान्स, गाण्याची थीम, हेअर स्टाईल, महागड्या गाड्या, लोकेशन्स सगळं काही क्लासिक. रिपीटेशन काहीच नाही. सोबतची ललना पण दरवेळी वेगळी. पण त्याचा गॉगल मात्र सारखाच.
माझ्या पिढीला तरूण होण्यात हातभार लावला, तो यो यो हनी सिंग नावाच्या माणसानं. आमचं बालभारती कुमारभारती झालं, तेव्हा आमच्यासोबत हनी सिंग होता आणि त्याची गाणी होती. ‘डोप शोप’ तर एक उदाहरण आहे. या गाण्यावर तर पोरं पागल झाली होती. आजही आहेत. ‘लव्ह डोस’, ‘अंगरेजी बीट’, ‘ब्राऊन रंग’सारखी गाणी परत कधी झालीच नाहीत. ‘ब्लू आईज’ ऐकून एका सिनीयरला प्रपोज करायला गेलो होतो. कारण तिचे डोळे निळे होते. ‘ब्रिंग मी बॅक’ कडक आहे. कॉलेजात सगळी पोरं सिंगल होती पण ‘ब्रेकअप पार्टी’ ऐकताना सगळे ब्रेकअपचा फिल घ्यायचे.
‘हाय मेरा दिल’ तर आजही काळजात आहे. ‘वन बॉटल डाऊन’, ‘चार बोटल वोडका’, ‘अॅल्कोहोलिक’, ‘पार्टी ऑल नाईट’, ‘मै शराबी’ हे पार्टीच्या प्लेलिस्टमध्ये आहे. ‘सतन’ आणि ‘मनाली ट्रान्स’ ही आऊट ऑफ कव्हरेज झाल्यानंतरची गाणी आहेत. दीलजीत दोसांज बॉलीवूडमधून अलिकडे लोकांना माहित झाला. आम्हाला हनी सिंगच्या ‘गोलीयाँ’पासूनच माहित होता. ‘धीरे धीरे’, ‘उर्वशी’ आणि ‘गुड नाल इश्क मीठा’ ही त्याची रिक्रिएशन जमून आली आहेत. ‘दिल चोरी’, ‘सुरूर’, ‘बंजारे’ ही त्याची काही डिसेंट गाणी.
साधे सरळ शब्द हे त्याच्या रॅपचं वैशिष्ट्य. तो फार बौद्धिक खेळ करायला जात नाही. जसं जमेल तसं साधं सरळ यमक जुळवतो. फार जड काही न करता सरळसोट काहीतरी बोलतो. कधीकधी ते आपल्याला सुमारही वाटतं. पण तो त्याच्या शब्दांशी आणि संगीताशी प्रमाणिक आहे. एरव्ही त्या शब्दांचं गाणं, रॅप होईल असं आपण विचारही करु शकणार नाही. पण हनी सिंगनं ते अनेकदा करून दाखवलं. ‘पार्टी’ या शब्दाशिवाय सहसा त्याची गाणी पूर्ण होत नाहीत. किंवा झालीच तर त्यात मजा राहत नाही. साध्यासरळ शब्दांना संगीतात गुंफून तो असा काही खेळ बसवतो की त्यातून दमदार बिट्स तयार होतात आणि ऐकणाऱ्यांचे पाय थिरकायला लागतात. ‘देसी कलाकार’, लव्ह डोमधले रॅप हे याचं उत्तम उदाहरण आहेत.
2011 ते 2014 हा काळ हनी सिंगचा गोल्डन पिरीयड होता. त्या दिवसांत तो एकामागून एक हिट्स देत होता. बॉलीवूडमध्ये सिनेमा हिट करायचा असेल तर हनी सिंगचं गाणं पाहिजेच असा अलिखित नियम बनला होता. सिनेमात हिरो कोणीही असो, कथा काहीही असो, पण शेवटी प्रमोशनसाठी का होईना हनी सिंगचं गाणं हवंच. या काळात त्यानं अनेकांसोबत काम केलं. त्यांच्यासाठी गाणी केली. विशेष करून अक्षय कुमारसोबतच्या त्याच्या गाण्यांची यादी बरीच मोठी आहे. अगदी अमिताभ बच्चन यांच्या भूतनाथ रिटर्न्समध्येही जागा नसताना हनी सिंगनं गाणं दिलंय. कारण फक्त एकच. हनी सिंग तेव्हा बॉलीवूडचा एक्स फॅक्टर बनला होता.
2014 मध्ये हनी सिंगला बायपोलार डिसऑर्डर नावाचा आजार झाला आणि तो अज्ञातवासात गेला. दीड-दोन वर्ष तो गायब होता. 2015-16 मध्ये तो माध्यमांसमोर आला खरा. पण इंडस्ट्रीत कमबॅक करायला 2018 उजाडावं लागलं. 2018 मध्ये त्याचं ‘मखणा’ गाणं आलं आणि जुना हनी सिंग परत दिसला. पण यावेळी पिळदार शरीरयष्टी असलेल्या हनीसिंगचं वजन वाढलेलं होतं. पण तो एवढा बिलंदर की त्यानं पण गाण्यातच आपलं पोट पुढे आल्याचं मान्य केलं. मग ‘लोका’ वगैरे काही गाणी येत गेली. 2021 मध्ये जॉन अब्राहमच्या ‘मुंबई सागा’मध्ये अनेक वर्षांनी त्यानं बॉलीवूडसाठी गाणं केलं.
हनी सिंगची गाणी, त्याचे रॅप, त्याचे अर्थ आणि त्यातले अनर्थ ही एक वेगळीच गंमत आहे. तो मुलींबद्दल वाईट लिहितो, महिलांबद्दल अपशब्द वापरतो वगैर अनेक आक्षेप त्याच्यावर आहेत. ‘डोप शोप’चा अर्थ बऱ्याच दिवसांनी एका सिनियरनं सांगितला होता. ‘जो वी मिले चक्को, कुछ फ्रेन नैयो मिलना’ वगैरे खतरा खेळ त्यानं केलेत. पण माझ्या कित्येक मैत्रिणी हनी सिंग आवडीने ऐकतात. मध्यंतरी त्याच्या एका गाण्यात वुमनाईझर हा शब्द आला म्हणून तक्रार केल्याचं वाचण्यात आलं होतं. तेव्हाच कपाळावरच हात मारला.
कॉलेजात असताना आमच्या स्टड(सारखं) असण्याची, कूल वागण्याची आणि बिनधास्त जगण्याची हनी सिंग हा प्रेरणा होता. तो आमच्यासाठी स्टाईल आयकॉन होता. आमच्या मागच्या पिढीनं सलमानला बघून बॉडी बनवली. आमची पोरं हनी सिंगमुळे जीममध्ये गर्दी करू लागली होती. हनी सिंगच्या गाण्यांचा वेगळाच नॉस्टेल्जिया आहे. कॉलेजात असताना पाठ झालेली सगळीच्या सगळी गाणी आजही ओठांवर तशीच आहेत. आता एक तप झालंय. आमच्या फोन आणि प्लेलिस्टमध्ये हनी सिंगला मानाचं स्थान आहे. फोन बदलले, माध्यमं बदलली. पण ही हनी सिंगची गाणी आणि या गाण्यांच्या आठवणी कायम आहेत.