अजमेरमधल्या 37 वर्षीय सुफिया सुफी. हातात ॲव्हिएशन सेक्टरमधली नोकरी. दर महिन्याला खात्यात जमा होणारी मोठी रक्कम आणि चांगलं उच्च मध्यमवर्गीय आयुष्य. सगळं काही चांगलं सुरू असताना एके दिवशी बॉसने धावण्याच्या स्पर्धेसाठी जाण्यासाठी रजा दिली नाही, म्हणून थेट नोकरीचाच राजीनामा बॉसच्या हातात सोपवला. क्षणात नोकरीला बाय बाय करत आपला धावण्याचा छंद जोपासण्यासाठी ही सुफिया सुफी घराबाहेर पडली.
ॲव्हिएशन सेक्टरमधली नोकरी
तुम्हाला हे वाचून आमिर खान यांच्या ‘थ्री इडियट’ सिनेमाची आठवण झाली असेल ना? ज्यामध्ये मुख्य हिरो हा त्याच्या मित्राला पॅशन फॉलो करण्यासाठी प्रवृत्त करत असतो. असंच काहिसं या सुफिया सुफीच्या बाबतीत घडलं आहे. पण यामध्ये सुफियाला इतर कोणी प्रवृत्त करण्याची गरज भासली नाही. तिने स्वत:हून आपली आवड लक्षात घेऊन आपलं पॅशन फॉलो करायला सुरूवात केली.
32 व्या वर्षी ॲथलिट क्षेत्रात पदार्पण
ज्या वयात क्रीडा क्षेत्रातले बरेच खेळाडू निवृत्ती स्वीकारतात, त्या वयात सुफिया यांनी या क्षेत्रात प्रवेश केला. सुफिया यांना कोणतंच स्पोर्ट्सचं बँकग्राऊंड नाही. केवळ व्यायाम आणि मेडिटेशन म्हणून धावत असणाऱ्या सुफिया यांना हा व्यायामाचा वा खेळाचा प्रकाराचा छंद कसा जडला हे समजलंच नाही. पण छंद जडल्यावर त्या अनेक मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेऊ लागल्या. आज लांब पल्ल्याच्या धावण्याच्या स्पर्धेतल्या पाच वेगवेगळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या नावावर नोंदवलेले आहेत.
नुकताच त्यांनी पुण्यातील सह्याद्री पर्वतरांगामध्ये पार पडलेली SRTL ट्रेल अल्ट्रा 100 किमी माउंटंन रन स्पर्धा पूर्ण केली. यामध्ये त्यांना दुसरा क्रमांक मिळाला आहे.
मनाली ते लेह – जगातील वेगवान धावपटूचा रेकॉर्ड
सुफिया यांनी 2021 साली पहिल्यांदा मनाली ते लेह माउंटन धाव पूर्ण केली. सहनशक्तीची क्षमता आणि कौशल्य तपासण्यासाठी सुफियाने माउंटन रनची मोहीम हाती घेतली होती. हा त्यांचा पहिलाच प्रयत्न होता. एकतर हे अति उंचावरचं ठिकाण असल्याने ऑक्सिजनची कमतरता, त्यात पुरेसा अनुभव नव्हता. त्यामुळे एका ठराविक तासामध्ये हे आव्हान पूर्ण करणं, त्यांच्यासाठी आव्हानात्मक होतं. तरिही, त्यांनी 156 तासांमध्ये ही धाव पूर्ण केली. हा त्यांचा तिसरा वर्ल्ड रेकॉर्ड होता. 2023 साली त्यांनी पुन्हा पूर्ण तयारीने ही स्पर्धा सुरू केली. तेव्हा त्यांनी अवघ्या 98 तासांमध्ये ही धाव पूर्ण केली. यावेळी पुरूष आणि महिला अशा दोन्ही गटातून इतक्या कमी वेळेत ही धाव पूर्ण करणारी त्या एकमेव ठरल्याने कमी वेळात ही धाव पूर्ण करणारी खेळाडू आणि कमी वेळात ही धाव पूर्ण करणारी महिला असे दोन रेकॉर्ड त्यांच्या नावावर नोंदवले गेले.
हे ही वाचा : मिलाया इटालिया 1001’चे साहसवीर आशिष जोशी
पाच वर्ल्ड रेकॉर्ड्स
सुफिया यांनी 2017 मध्ये नोकरी सोडून या क्रीडाप्रकारात प्रवेश केला. त्यावेळी त्यांचं वय 32 होतं. तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांनी एकूण पाच रेकॉर्ड्स बनवले आहेत. यातले दोन रेकॉर्ड्स मोहिमा त्यांनी लष्करासोबत पूर्ण केल्या आहेत.
2019 साली त्यांनी काश्मिर ते कन्याकुमारी ही लांब पल्ल्याची धाव पूर्ण करत पहिला रेकॉर्ड केला. त्यानंतर 2020 मध्ये त्यांनी Golden Quadrilateral म्हणजे दिल्ली, मुंबई, कोलकत्ता आणि चैन्नई या शहरांना जोडणाऱ्या मुख्य हायवेची मोहिम पूर्ण करून दुसरा रेकॉर्ड केला. यामध्ये त्यांनी 6 हजार किमीचं अंतर 110 दिवसामध्ये पूर्ण केलं होतं. 2021 मध्ये त्यांनी मनाली ते लेह माउंटन रनमध्ये रेकॉर्ड केला. 2023 मध्ये चौथ्या रेकॉर्डमध्ये त्यांनी उत्तर कतार ते दक्षिण कतार हे अंतर 30 तास 31 मिनीटात पूर्ण केलं. त्याच वर्षी त्यांनी मनाली ते लेह ही धाव अवघ्या 98 तासात पूर्ण करुन पाचवा रेकॉर्ड केला. अशा पद्धतीने एकूण पाच गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स त्यांच्या नावावर झाले आहेत.
भारताचं प्रतिनिधीत्व करणार
2025 मध्ये सुफिया फ्रान्समध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 24 अवर्स स्टेडियम रन या कॅटेगिरीत भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे. सुफिया म्हणतात की, “या खेळात उतरल्यापासून आजपर्यंत पाच गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स मी केले आहेत. पण एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धत आपल्या देशाचं प्रतिनिधीत्व करायला मिळणं ही माझ्यासाठी जास्त अभिमानाची बाब आहे.”
या स्पर्धेसोबतच दक्षिण आफ्रिका इथे होणाऱ्या कॉम्रेडस मॅरेथॉन स्पर्धतही भाग घेण्यासाठी त्या सराव करत आहे.
धावणे या क्रीडाप्रकारतही वेगवेगळे उपप्रकार आहेत. काही खेळाडू हे फक्त रोड रन करतात, काही फक्त मॅरेथॉन तर काही खेळाडू फक्त माउंटन रन किंवा ट्रेल रन करतात. पण सुफिया यांचं वैशिष्ट्य असं की, त्या स्वत:ला एका पठडीत बांधून न ठेवता वेगवेगळ्या प्रकारामध्ये धावण्याचा सराव करत स्वत:ला आजमावून बघतात.
जगाला प्रदक्षिणा घालण्याचे स्वप्न
सुफिया यांची पुढची मोहिम आहे, 740 दिवसामध्ये जगाला प्रदक्षिणा घालण्याची. आंतराष्ट्रीय स्पर्धा झाल्यानंतर म्हणजे 2026 सालामध्ये त्यांना ही मोहीम पूर्ण करायची आहे. 40 हजार किलोमीटरचं हे अंतर सुफिया यांना 740 दिवसांमध्ये पूर्ण करायचं आहे. आजवर त्यांनी केलेले पाच रेकॉर्ड्स आणि त्याही व्यतिरिक्त सर्व प्रकारच्या धावण्याच्या पद्धती हे सगळं त्यांच्या याच जागतिक प्रदक्षिणा मोहिमेची तयारी होती, असं सुफिया म्हणतात.
हे ही वाचा : वाळवंटातला सोळाशे किलोमीटर पायी प्रवास
हे ही वाचा : माऊंट एव्हरेस्टला गवसणी घालणारी सर्वात लहान महिला, कृष्णा पाटील