ख्रिसमस आणि त्याला जोडूनच येणाऱ्या नवीन वर्ष स्वागताच्या सुट्ट्या हा काळ मनोरंजन, पर्यटन, हॉटेल या इंडस्ट्रीसाठी विशेष पर्वणी असते. डिसेंबर महिना सुरू झाला की, वर्तमानपत्रात त्या संदर्भात जाहिराती दिसू लागतात आणि “यावर्षी आपण 31st ला कुठे जायचं?” हा प्रश्न लहान मुलांकडून घरोघरी विचारला जातो. गुलाबी थंडी असलेला हा काळ काही जण खूप आधीच प्लॅन करून आवडत्या ठिकाणी साजरा करतात. तर काही जण वर्षभर केलेल्या मेहनतीचा श्रम परिहार म्हणून आपल्या कुटुंबासोबत हा वेळ साजरा करत असतात. यावर्षी ज्या लोकानी हा दुसरा पर्याय निवडला आहे, त्यांच्यासाठी ओटीटीवर उपलब्ध असलेल्या मनोरंजन खजिन्याची माहिती आम्ही या लेखात घेऊन आलो आहोत.
2024 चा ‘दिवाळी धमाका’ या नावाने जाहिरात झालेला रोहित शेट्टी दिगदर्शित ‘सिंघम अगेन’ हा सिनेमा अमेझॉन प्राईमवर उपलब्ध झाला आहे. कौटुंबिक प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात हातखंडा असलेल्या रोहित शेट्टीने यावेळी ‘आधुनिक रामायण’ हा विषय हाती घेतल्याने तो ओटीटीवर सुद्धा हिट होईल अशी सध्या वर्तवली जात आहे. अजय देवगण, करीना कपूर, रणवीर
सिंग, अर्जुन कपूर इतकी तगडी स्टारकास्ट आणि बाकी पाहणे कलाकारांच्या भूमिकेत असलेले अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, दीपिका पदुकोण सिनेमात असल्याने जी बंपर ओपनिंग थिएटरमध्ये मिळाली होती त्याची छोट्या पडद्यावर पुनरावृत्ती होणार हे नक्की आहे.
2024 मध्येच प्रदर्शित झालेला ‘देंट खिसमस’ हा इंग्रजी सिनेमा देखील पालकांना आणि मुलांना एकमेकांसोबत बघण्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. नेटफलिक्सवर उपलब्ध असलेला हा सिनेमा केवळ 92 मिनिटं इतक्या लांबीचा आहे. प्रेम, कुटुंब, मित्र आणि त्यांच्या सोबतीला असलेला सेंटा क्लॉज् हे या सिनेमाचे मुख्य पात्र आहेत. ‘रिचर्ड कर्टीस’ यांची कथा आणि पटकथा असलेला हा सिनेमा सिमोन ओट्टो यांनी दिगदर्शित केला आहे. आयएमडीबी वर 6.8 इतकी रेटिंग असलेल्या या सिनेमाला समीक्षकांची देखील पसंती मिळाली होती.
2024 च्या सुरुवातीला जानेवारी मध्ये प्रदर्शित झालेला ‘मेरी खिसमस’ हा सिनेमा देखील या वर्षाखेरच्या काळात मनोरंजनाचा एक पर्याय ठरू शकतो. विजय सेत्पथी, कतरिना कैफ आणि राधिका आपटे यांचा अभिनय असलेल्या या सिनेमात दोन अनोळखी व्यक्ती ख्रिसमसच्या रात्री एकमेकांना भेटतात. त्यांच्यात मैत्री होते. रोमॅटिक होण्याच्या मार्गावर असलेला सिनेमा अचानक एक थरारपट होतो. कतरिना कैफ आणि विजय सेत्पथी हे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित करतात. सस्पेन्स, थ्रिलर या प्रकारात मोडणारा हा सिनेमा शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आहे. नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेल्या या फॅमिली सिनेमाला आयएमडीबीवर 6.9 रेटिंग आहे.
‘द लिजेंड ऑफ हनुमान’ या डिस्ने हॉटस्टारवरील सिरीजचे आजवर 5 सिझन्स रिलीज झाले आहेत. जर आपला किंवा मुलांचा एक किंवा जास्त सिरीज बघणं राहून गेलं असेल, तर सुट्ट्यांचा हा सिझन तो ‘बॅकलॉग’ भरून काढण्यासाठी योग्य वेळ आहे. २०२१ मध्ये हा सिरीजचा पहिला सिझन प्रदर्शित झाला होता. शरद केळकर यांनी रावणचा आवाज दिलेल्या या सिरीजचं हे वैशिष्ट्य आहे की, याचं सादरीकरण हे अबालवृद्धांना एकाच वेळी कनेक्ट करतं. 25 ऑक्टोबर 2024 रोजी या सिरीजचा पाचवा सिझन प्रदर्शित झाला आहे.
आपल्या घराच्या मनोरंजनाच्या गरजेनुसार ज्यांना माहितीपट बघायला आवडतात, त्यांना सोनी लिव्ह वरील ‘कोटा फॅक्ट्री’ ही सिरीज हा एक उत्तम पर्याय असू शकतो. या सिरीजमधून प्रेक्षकांना हे कळेल की, आयआयटीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना किती संघर्षाचा सामना करावा लागतो ? आपल्या सिस्टीममध्ये किती त्रुटी आहेत हे लक्षात येतं.
सोनी लिव्हवरील ‘रॉकेट बॉईज’ सुद्धा याच श्रेणीतील सिरीज म्हणता येईल ज्यामध्ये संशोधन क्षेत्रात करिअर करू पहाणाऱ्या काही विद्यार्थ्यांना किती बारकाईने प्रयत्न करावे लागतात हे दाखवलं आहे. “हे करणं म्हणजे काही रॉकेट सायन्स नाहीये” असं आपण नेहमी म्हणत असतो. प्रत्यक्षात ‘रॉकेट सायन्स’ म्हणजे काय असतं? हे ही सिरीज बघतांना आपल्याला लक्षात येऊ शकतं.
नेटफ्लिक्सवरील ‘सिलेक्शन डे’ ही एक अशीच वेबसिरीज आहे ज्यामध्ये क्रिकेटमध्ये निवड होण्यासाठी धडपडणाऱ्या एका मुलाची आणि त्याला प्रयत्न करणाऱ्या वडिलांची कथा चित्रित करण्यात आली आहे. वडील आपल्या मुलाकडून कशी तयारी करून घेतात ? त्या वडिलांच्या मनात ‘किंग रिचर्ड’ या सिनेमात दाखवलेल्या सेरेना, व्हीनस विल्यम्सच्या वडिलांसारखा आपल्या मुलाच्या टॅलेंटवर कसा विश्वास असतो ? आणि त्यासाठी ते किती प्रयत्न करतात? हे खूप प्रेरणादायी प्रकारे दाखवण्यात आलं आहे.
ज्या परिवारांना कोणताही संदेश किंवा माहिती नको आहे त्यांच्यासाठी खालील काही फॅमिली कंटेंटच्या सिरीज देखील उपलब्ध आहेत ज्या बघतांना निखळ मनोरंजनाचा आनंद मिळू शकतोः –
1. गुल्लक – सोनी लिव्ह वरील या वेबसिरीजने मध्यमवर्गीय घरातील प्रेक्षकांना ते दाखवलं जे अगदी त्यांच्या घरात रोज घडत असतं. जसे घरात बोलले जातात तसेच संवाद, जसे घरात घडतात तसेच छोटे छोटे पण महत्वाचे प्रसंग, साधे एक्सप्रेशन्स, नात्यातील गोडवा हे सगळं प्रेक्षकांना प्रचंड आवडलं.
2. माईंड द मल्होत्राज् – प्राईमवरील या सिरीजने मुलांमधील बॉण्ड किती स्ट्रॉग असू शकतो हे दाखवून दिलं. आपल्या मनात आपल्या पालकांबद्दल असलेले गैरसमज हे आपण वेळीच क्लिअर केले पाहिजेत, हे या सिरीजमधून दिगदर्शकाने सांगायचा प्रयत्न केला आहे.
3. ये मेरी फॅमिली – ऍमेझॉन मिनी टीव्हीवरील ही सिरीज हर्ष नावाच्या 12 वर्षाच्या मुलीच्या भावविश्वाची ही कथा आहे. 1998 चा काळ या सिरीजमध्ये दाखवण्यात आला आहे, जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या, गावाला जाणे, सुट्ट्यांची अतिरिक्त शिकवणी वगैरे आपण सर्व जगलेलो आहोत.
४. घर वापसी- डिस्ने हॉटस्टारवरील या सिरीजने देखील एका मध्यमवर्गीय घरातील व्यक्तीला घराबद्दल असलेली ओढ आणि सुखी, शांत जीवन जगण्यासाठी त्याची सतत सुरु असलेली धडपड ही प्रेक्षकांना खूप रिलेट झाली.