अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे 20 जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार हाती घेणार आहेत. त्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय स्तरावर डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही देशांवर टेरिफ वाढवण्याच्या निर्णयावरून पडघम वाजायला सुरू झाले होते. आता तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांमध्येच दोन गटांमध्ये वाद सुरू झाले आहेत. या वादाचं कारण आहे, स्थलांतरित भारतीय.
या विषयावरून एलॉन मस्क आणि मेक अमेरिका ग्रेटर अगेन या चळवळीच्या कार्यकर्त्या लॉरा लूमर व मॅट गॅट्झ यांच्यामध्ये सुरू असलेल्या या वादात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
वादाचं कारण काय?
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 22 डिसेंबर रोजी व्हाईट हाऊसच्या एआय तंत्रज्ञानाच्या प्रमुख सल्लागारपदी भारतीय वंशाच्या श्रीराम कृष्णन यांची नियुक्ती केली. ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊस टीममधले भारतीय वंशांचे श्रीराम कृष्णन हे पाचवे खेळाडू आहेत.
श्रीराम कृष्णन यांनी आपल्या नियुक्तीनंतर अमेरिकन प्रशासनाने भारतीयांच्या H1B व्हिसावर लादलेले निर्बंध मागे घेण्यासंबंधीत वक्तव्य केलं. आणि तेव्हापासून या वादाला सुरूवात झाली.
“कृष्णन यांचं हे वक्तव्य ट्रम्प यांच्या ‘मागा – MAGA’ (Make America Grater Again) या चळवळीला नख लावणार आहे. मूळात त्यांची नियुक्तीचं खूप डिस्टर्बिंग आहे” असं मत लॉरा लूमर यांनी व्यक्त केलं. लूमर यांच्या या टिप्पणीनंतर एलॉन मस्क आणि विवेक रामास्वामी यांनी या वादात उडी घेतली.
“कमला हॅरीस या राष्ट्राध्यक्ष झाल्यातर व्हाईट हाऊसला करीचा वास येईल,” “स्थलांतरितांनी अमेरिकन लोकांच्या नोकऱ्या चोरल्या आहेत”, अशी वक्तव्य लूमर यांनी केली होती. तसंच “ओहयो राज्यातील हैती समुदायातील स्थलांतरीत लोक पाळीव प्राणी खातात,” अशा अफवा लॉरा लूमर यांनी ट्रम्प यांच्या प्रचारादरम्यान पसरवल्या होत्या. एकूणच लूमर यांनी प्रत्येक वेळी स्थलांतरितांविषयी प्रक्षोभक वक्तव्य केली आहेत.
H1B व्हिसा विषय केंद्रस्थानी
श्रीराम कृष्णन यांनी ट्रम्प सरकारने H1B व्हिसा धारक आणि ग्रीन कार्डधारकांच्या समर्थनार्थ भूमिका मांडली. तेव्हा लूमर यांनी सोशल मीडियावरून कृष्णन यांच्यावर टीका केली. ट्रम्प यांच्याच पहिल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकिर्दीत सुरू झालेल्या ‘मागा’ चळवळीच्या विरोधात हे कृत्य असल्याचं लूमर यांनी म्हटलं. मात्र, या वादात एलॉन मस्क यांनी कृष्णन यांची बाजू उचलुन धरली.
अमेरिकेमध्ये कुशल कामगारांचा तुटवडा
ट्रम्प यांचे सगळ्यात मोठे समर्थक आणि साऊथ आफ्रिकेतून स्थलांतरीत झालेले अशी दुहेरी ओळख अलॉन मस्क यांची आहे. त्यांनी या वादात स्थलांतरितांचं जोरदार समर्थन केलं आहे. ते म्हणाले आहेत की, अमेरिकेमध्ये कुशल इंजिनियर्सची कमतरता आहे. विशेष कौशल्यप्राप्त इंजिनियर्स हेच सिलीकॉन व्हॅलीचे मुख्य घटक आहेत. तुम्हाला अमेरिका ही जिंकलेली हवी आहे की हरलेली? जर जगातल्या उत्कृष्ठ कामगारांनी, लोकांनी दुसऱ्या देशांसाठी काम केलं तर अमेरिका या स्पर्धेत हरेल.
विवेक रामास्वामी या विषयावर भाष्य करताना म्हणाले आहेत की, परदेशातून आलेल्या कुशल कामगारांशिवाय अमेरिका शून्य आहे. अनेक टॉपच्या आयटी कंपन्या या अमेरिकन लोकांपेक्षा परदेशातून आलेल्या आयटी तंत्रज्ञानांना कामासाठी पहिलं प्राधान्य देते. याचं कारण अमेरिकन लोकांचा आयक्यू, बुद्धिमत्ता कमी आहे असं नाही. तर अमेरिकन लोकांचं कल्चर, संस्कृती याला कारणीभूत आहे. अमेरिकेतील तरुण मुलं काही उत्कृष्ठ घडवण्यापेक्षा सामान्य कामामध्येच खूष असतात. त्यांची मानसिकता ही सामान्य राहण्यातच समाधान मानणारी झाली आहे. अमेरिकन मुलं, तरुण हे मॅथ ऑलिम्पियाड चॅम्पियन, कॉलेज व्हॅलिडीक्टोरियन ऐवजी प्रोम क्विन आणि जॉक सारख्या मनोरंजक गोष्टींना महत्त्व देतात. या अशा गोष्टीतून ग्रेट इंजिनियर्स घडू शकत नाहीत. जर आपण तंत्रज्ञानामध्ये कुशल मनुष्यबळ घडवलं नाही किंवा तसं मनुष्यबळ परदेशातून मिळवलं नाही तर चीन आपल्या पुढे निघून जाईल.
एलॉन मस्क आणि विवेक रामास्वामी यांनी स्थलांतरितांना दिलेल्या पाठिंब्यामुळे या वादात आणखीनच भर पडली आहे.
आम्ही स्थलांतरितांना हटविण्यासाठी मतदान केलं
या सर्व विषयावर लॉरा लूमर यांनी कडक शब्दात टीका केली आहे. त्या म्हणाल्या आहेत की, “आम्ही मागा धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मतदान केलं होतं. आणि आमचं हे मत भारताविरोधी किंवा वर्णभेदाविरोधी नाही. H1B व्हिसा कमी करावेत यासाठी आम्ही मत दिलं आहे. अमेरिकेमधले टेक्नोलॉजी सेक्टरमधले अब्जाधीश हे केवळ चेकबुकमधल्या चेक्सवर सही करण्यासाठी आणि स्थलातरिंतांसंबंधीत धोरण ठरवून भारत आणि चीनमधून कामगार आयात करण्यासाठी नाहीत. ज्यांना मागा चळवळ आणि स्थलांतरित धोरणाविषयी काहिही माहिती नाही, त्यांनी या विषयावर भाष्य करु नये.”
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भूमिकेत बदल
या सर्व वादानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतरितांसंदर्भातल्या आपल्या भूमिकेत बदल केल्याचं पाहायला मिळतं.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष कारकिर्दीत H1B व्हिसावर निर्बंध लादले होते. 2024च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या प्रचारादरम्यानही त्यांनी स्थलांतरितांविषयी कठोर भूमिका घेतली होती.
स्थलांतरिक कामगारांविषयी ट्रम्प यांची विचारसरणी वेगळी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. अधिकृत कौशल्य प्राप्त असलेलं स्थलांतरण आणि अनधिकृत स्थलांतरण असे दोन भाग पडतात.
अमेरिकेतल्या विद्यापीठामधून उच्चशिक्षण (स्टेम सेक्टर आणि पीएचडी डिग्री) पूर्ण केलेल्या स्थलांतरितांना अमेरिकन राष्ट्रीयत्व देण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला आहे. यासंदर्भात जून महिन्यात झालेल्या पॉडकास्टमध्ये त्यांनी वक्तव्य केलं होतं.
यानुसार, अमेरिकेला ग्रेट बनवण्यासाठी त्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या स्टेम (STEM) सेक्टरमधल्या जगातील उत्तमोत्तम कुशल कामगारांना अमेरिकेत सामावून घेणं हे ट्रम्प यांचं धोरण आहे.
भारतीय-अमेरिकनचा वाढता प्रभाव
अमेरिकेमध्ये 20व्या शतकात ज्यू लोकांचं वर्चस्व अधिक होतं. तसा आता भारतीय वंशांच्या अमेरिकन नागरिकांचा प्रभाव वाढत आहे. तंत्रज्ञान, आरोग्य आणि शिक्षण या महत्वपूर्ण क्षेत्रात भारतीय लोक प्रथम स्थानावर आहेत. सगळ्यात जास्त शिक्षित आणि जास्त पगाराच्या नोकरीसह उच्चस्थानावर भारतीय लोक दिसून येतात. अनेक क्षेत्रांसह प्रशासकीय कामाकाजातही, राजकारणातही भारतीय प्रतिनिधी नेतृत्व करत आहेत. सुंदर पिच्चाई, सत्या नडेला यांच्यासह अनेक भारतीय तंत्रज्ञ हे सिलीकॉन व्हॅलीचे महत्त्वाचे खेळाडू आहेत. भारतीयांच्या वाढत्या प्रभावामुळे स्थलांतरितांमध्ये भारतीय स्थलांतरित हे मागा चळवळीतील कार्यकर्त्यांचे टार्गेट बनत आहेत.