आपल्याला चांगलं आरोग्य पाहिजे असेल, तर नियमित व्यायाम, चांगला आहार आणि पुरेशी झोप हे खूप महत्त्वाचं आहे. आपण आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती तपासण्यासाठी घरच्या घरीच एक सोपी चाचणी करू शकतो. ही चाचणी म्हणजे एका पायावर उभं राहून आपण संतुलन किती वेळ राखू शकतो, हे पाहणं.
संतुलन आणि वयाचा संबंध
एका अभ्यासानुसार, एका पायावर उभं राहण्याची क्षमता वयाच्या वाढीबरोबर कमी होऊ शकते. वय वाढल्यावर शरीरातील नैसर्गिक बदलांमुळे स्नायूंची ताकद कमी होऊ लागते, यामुळे संतुलन राखणे अधिक कठीण होऊ शकते. एका पायावर स्थिर राहण्यासाठी मेंदूचं कार्य, स्नायूंची ताकद आणि रक्तप्रवाह हे सर्व सुरळीत असावे लागतात. जर हे सर्व सुरळीत नसेल, तर आपला तोल जाऊ शकतो.
चाचणी कशी करावी?
या चाचणीसाठी, तुम्ही एका पायावर उभं राहून किती वेळ तोल राखू शकता, हे पाहा. साधारणपणे 30 सेकंद तरी एका पायावर उभं राहता येणं आवश्यक आहे. जर तुम्ही 30 सेकंद उभे राहू शकत असाल, तर शरीराचे संतुलन योग्य आहे असं मानलं जातं. तर यापेक्षा कमी वेळ उभं राहू शकलो तर आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
वृद्ध लोकांसाठी धोका
वृद्ध लोकांसाठी एका पायावर उभं राहण्याची क्षमता कमी होऊ शकते. त्याचा परिणाम त्यांच्या जीवनावर होऊ शकतो. वाढत्या वयासोबत वृद्ध लोकांमध्ये तोल जाऊन पडणे, हा आरोग्यासाठी धोका ठरू शकतो. पडल्यामुळे हाड फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. आणि इतरही व्याधी उद्धभवतात.
संतुलन सुधारण्यासाठी सोपे उपाय
चांगली गोष्ट म्हणजे, वाढत्या वयासोबत आपल्याला संतुलन राखता येऊ शकतं. दररोज काही मिनिटांसाठी एका पायावर उभं राहण्याचा सराव केल्यास, आपण संतुलन सुधारू शकतो. तुम्ही दात घासत असताना, चहा बनवताना किंवा टीव्ही पाहताना देखील एका पायावर उभं राहण्याचा सराव करू शकता. जितका अधिक सराव कराल, तितकं आपलं संतुलन अधिक बळकट होईल.
वय वाढत असताना शरीराचं संतुलन असणं खूप महत्त्वाचं आहे. दररोज साधे व्यायाम आणि संतुलन साधणारी चाचणी करून आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राखता येऊ शकतं.