कोण, कधी, कसं आजारी पडेल याविषयी काहीच सांगता येत नाही. वारंवार बदलत्या वातावरणामुळे तर अनेक साथीचे आजार उद्भवतात. या सगळ्या परिस्थितीत स्वत:ची तब्येत सांभाळणे ही आपली मुख्य जबाबदारी आहे. तरिही, कधी आजारीचं पडायचं नाही असं सांगून चक्क आजारी पडणं बेकायदेशीर ठरवलं तर?
‘या’ गावात आजारी पडण्यावर बंदी!
चकीत झालात ना. पण हे खरचं घडलंय आणि ते ही इटलीमध्ये. इटलीमधल्या बॅलकॅस्ट्रो या गावामध्ये नागरिकांना आजारी पडण्यावर बंदी घातली आहे. या गावातल्या महापौर अंतोनिया टोर्चिया यांनी अलीकडेच गावकऱ्यांवर आजारी पडण्यावर बंदी घातली आहे. ‘बीबीसी’ ने याविषयीची बातमी दिली आहे.
आरोग्य सुविधांच्या अभावामुळे बंदीचा निर्णय
बॅलकॅस्ट्रो हे गाव कॅलॅब्रिया रिजनच्या उत्तरेकडे येतं. इटलीमधला सर्वात जास्त दुर्गम, गरीब भाग म्हणून या प्रदेशाची ओळख आहे. या गावामध्ये आरोग्य सुविधांचा अभाव आहे, म्हणून हा निर्णय घ्यावा लागल्याचं महापौर म्हणाले आहेत.
टोर्चिया म्हणतात की, मी घेतलेला निर्णय हा खूप विनोदी निर्णय वाटेल. पण या गावात आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी वरिष्ठ अधिकारी प्रयत्न करत नाहीत. गेल्या अनेक वर्षापासून येथील लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो. गावात आरोग्य सुविधा निर्माण व्हाव्यात, यासाठी खूप प्रयत्न केले पण अधिकाऱ्यांवर काहिच परिणाम होत नाही म्हणून हतबल होऊन हा निर्णय घेतला आहे.
45 किमी अंतरावर हॉस्पिटल
बॅलकॅस्ट्रो गावाच्या 1200 लोकसंख्येपैकी अर्धी लोकसंख्या ही वयवर्ष 65 च्या पुढची आहे. या गावापासून कोणतीही मेडिकल इमरजन्सी आल्यावर हॉस्पिटलला जाण्यासाठी 45 किमीचं अंतर कापावं लागतं. हॉस्पिटलकडे जाणारा रस्ताही चांगला दर्जेदार नाही. या रस्त्यावर गाडी चालवताना प्रती ताशी 30 किमी वेग ठेवण्याचा नियम आहे.
या गावामध्ये फोन केल्यावर डॉक्टर उपलब्ध होत असतो. पण आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी आणि कामाचे तास संपल्यावर मात्र हे डॉक्टर उपलब्ध नसतात. म्हणून या गावातील लोकांना तातडीने उपचार मिळत नाहीत.
त्यामुळे कोणतीही आरोग्य विषयक इमरजन्सी आली आणि जर वेळेत 45 किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये पोहचलो तरच आपण बचावू शकतो हे या गावातल्या लोकांना मनाशी पक्कं केलं आहे.
नागरिकांना त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन
महापौर अंतोनिया टोर्चिया यांनी लोकांना त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. गंभीर दुखापत होऊन मृत्यू होईल, असं कोणतंही कृत्य वा अपघात होणार नाही याकडे लोकांना लक्ष द्यायला सांगितलं आहे. जास्तीत जास्त वेळ घरात राहणं, प्रवास आणि शारीरिक इजा होतील अशा गोष्टी टाळणं आणि जास्तीत जास्त आराम करावा अशा सूचना गावातील ग्रामस्थांना दिल्या आहेत.
दरम्यान, या नियमांची अंमलबजावणी कशा प्रकारे केली जाणार आहे आणि लोक हे नियम किती प्रमाणात पाळतील याविषयी साशंकता आहे.
कॅलॅब्रिया भागातील गंभीर आरोग्यसुविधा
कॅलॅब्रिया हा इटलीतला अतीदुर्गम भाग आहे. या भागामध्ये माफियाचं मोठ्या प्रमाणावर वर्चस्व आहे. गेल्या 15 वर्षापासून या भागातल्या राजकीय अस्थिरतेमुळे या भागामध्ये आरोग्यसुविधांची खूपच कमतरता आहे. अनेक सरकारी हॉस्पिटल्समध्ये पुरेशा आरोग्य सुविधा नाही आहेत. डॉक्टर आणि रुग्णसेविकांची ही कमतरता आहे.
सन 2009 पासून, कॅलॅब्रिया मधले 18 हॉस्पिटल्स सक्तीने बंद करण्यात आले. तिकडच्या लोकांना त्यांच्या विभागापासून दूरवर असलेल्या हॉस्पिटल्समधून आरोग्यसेवा घ्यायला सांगितली आहे.
सन 2022 मध्ये, क्युबामधुन 497 डॉक्टर्स इटलीमध्ये आरोग्यसेवा देण्यासाठी पाठवले जाणार असल्याची घोषणा केली होती.
.
दरम्यान, महापौराच्या या निर्णयावरुन आमच्या बॅलकॅस्ट्रो गावातली ही आरोग्या विषयी असलेली सत्य परिस्थिती जगासमोर येईल आणि आतातरी इटलीचं सरकार आमच्यावर लक्ष देईल, अशी आशा या गावातील लोकांनी व्यक्त केली आहे.