महाकुंभ मेळाव्याच्या माध्यमातून उत्तरप्रदेश सरकारला तब्बल 2 लाख कोटी रुपयाचं उत्पन्न मिळणार आहे. या महाकुंभ मेळाव्यासाठी उत्तरप्रदेश सरकार 7 हजार कोटी रुपयाचा खर्च केला आहे. या मेळाव्यासाठी जवळपास 40 कोटी भाविक प्रयागराजमध्ये दाखल होणार आहेत.
2024 मध्ये कोट्यावधी भाविकांनी दिली अयोध्येला भेट
धार्मिक पर्यटन स्थळावरुन उत्तरप्रदेश सरकारला चांगलं उत्पन्न मिळत आहे. 2024 मध्ये 16 कोटी भाविकांनी वाराणसीमध्ये काशी विश्वनाथला भेट दिली. तर जानेवारी 2024 ते सप्टेंबर 2024 दरम्यान 13.55 कोटीहून अधिक भाविकांनी अयोध्येला भेट दिली आहे.
अर्ध कुंभमेळाव्यात 1.2 लाख कोटीचं उत्पन्न
सन 2019 मध्ये उत्तरप्रदेशमध्ये अर्ध कुंभमेळावा पार पडला होता. या अर्ध कुंभमेळाव्यामधून उत्तरप्रदेशला 1.2 लाख कोटी रुपयाचं उत्पन्न मिळालं होतं. या अर्धकुंभमेळाव्यामध्ये जवळपास 6 लाख लोकांना रोजगार मिळाला होता.
हे ही वाचा : महाकुंभमेळ्यात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, सुरक्षा आणि सोयीसाठी नवे उपाय
महाकुंभमेळावा 2013 आणि 2025 मधील फरक
महाकुंभ मेळावा 2025 हा भव्य-दिव्य आणि टेक्नोसेव्ही असणार आहे. यावर्षी महाकुंभमेळाव्याचं आयोजन केल्या जाणाऱ्या प्रयागराज इथं 45 दिवसांसाठी विशेष प्रशासकीय जिल्ह्याची निर्मिती केली आहे. या जिल्ह्यामध्ये 25 सेक्टर्स आणि 56 पोलिस स्थानकं उभी केली आहेत.
सन 2013 च्या महाकुंभ मेळाव्यासाठी 16 हजार चौरस किमीचा परिसर हा भाविकांसाठी लागणाऱ्या विविध सुविधांनी तयार केला होता. तर यंदाच्या महाकुंभ मेळाव्यासाठी 40 हजार चौरस किमीचा परिसरामध्ये भाविकांची व्यवस्था केली आहे.
सन 2013 सालच्या महाकुंभ मेळाव्यातून 12 हजार कोटी रूपये उत्पन्न मिळालं होतं तर यंदा होणाऱ्या महाकुंभ मेळाव्यातून 2 ते अडीच लाख कोटी रुपयाचं उत्पन्न मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सोईसुविधांचा स्तर उंचावला
यंदाचा महाकुंभमेळावा हा पर्यावरणपूरक व परिसर स्वच्छता राखणारा व्हावा, यासाठी या संपूर्ण परिसराच्या स्वच्छतेसाठी इस्त्रो आणि भाभा संस्थेकडून विकसीत केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या संपूर्ण परिसरात अधिकाधिक शौचालय, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. प्रत्येक कॅम्पमध्ये 11 शौचालये आणि 6 पिण्याच्या पाण्याच्या नळांची व्यवस्था केली आहे. तसेच प्रत्येक सेक्टरमध्ये सांडपाण्यावर तात्काळ प्रक्रिया करणाऱ्या दोन यंत्राची व्यवस्था केली आहे.
हे ही वाचा : वर्ल्ड टूरिझम ट्रेड मध्ये झळकणार ‘महाकुंभ 2025’
प्रवासासाठी अधिकाधिक साधनांची उपलब्धता
देशभरातल्या भाविकांना प्रयागराजला येणं सोपं व्हावं यासाठी 3 हजार विशेष ट्रेनची व्यवस्था केली आहे. देशातल्या 23 शहरातून 200 चार्टर विमानाची व्यवस्था केली आहे. तसेच 7 हजार बसेसपैकी 200 बसेस या एसी बसेस असतील.
विजेची व्यवस्था
महाकुंभ मेळाव्यासाठी उभारलेल्या विशेष जिल्ह्यामध्ये वीजपुरवठ्यासाठी 391 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. या अंतर्गत या नवीन जिल्ह्यामध्ये वीज पुरवठ्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. यामध्ये इलेक्ट्रिक वायर्स, रस्त्यावरील दिवे यांचा समावेश आहे.
तंत्रज्ञानाची जोड
देशभरातून असंख्य भाविक या धार्मिक उत्सवासाठी एकत्र जमणार आहेत. तर जगभरातील अनेक पर्यटकसुद्धा हा उत्सव पाहण्यासाठी त्याचा अनुभव घेण्यासाठी प्रयागराजला भेटी देणार आहेत.
त्यामुळे याठिकाणी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यावर अधिक भर दिला आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानासोबत एआय कॅमेरा, ड्रोन आणि फेस रेक्गनिशन सुविधेचा वापर सुरक्षेसाठी केला जाणार आहे.
भाविकांना प्रयागराजमध्ये आल्यावर तेथील सगळी माहिती व्यवस्थितरित्या मिळावी, म्हणून गुगल चॅटच्या सुविधेचा वापर करण्यात येणार आहे.