ऐक्याचा महायज्ञ महाकुंभ मेळावा 2025

Mahakumbh 2025 : सर्व हिंदू संत-संन्यांश्यांना एकत्र आणण्यासाठी आदी शंकराचार्यांनी कुंभमेळाव्याची संकल्पना मांडली. ख्रिस्तपूर्व 654 वर्षांपूर्वी या धार्मिक मेळ्याला प्रारंभ झाला. धार्मिक गुरू, पंडित, तपस्वी आणि 13 संत पंथीयांतील (आखाडे) साधूंनी एकत्र येत उत्सव साजरा करावा या विचाराने या उत्सवाला सुरुवात झाली. कुंभमेळ्याचा पहिला लिखित पुरावा भागवत पुराणामध्ये आहे. चिनी प्रवासी झुआनशांग याने राजा हर्षवर्धन याच्या कालावधीत म्हणजे 629-645 मधील कुंभमेळ्याची लिखित नोंद केली आहे.
[gspeech type=button]

महाकुंभ मेळावा या जगातल्या सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवाला 13 जानेवारी 2025 पासून सुरुवात होत आहे. या मेळाव्यानिमित्ताने प्रयागराजमध्ये स्वतंत्र प्रशासकीय जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे. या मेळाव्याच्या अनुषंगाने उभारलेल्या या नवीन जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा लोकार्पण सोहळा 13 डिसेंबर 2024 रोजी संपन्न झाला. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 जानेवारी 2025  पासून सुरू होणाऱ्या महाकुंभ मेळाव्याचं वर्णन ‘ऐक्याचा महायज्ञ’ असं केलं होतं. 

या लोकार्पण सोहळ्यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5,500 कोटी रुपयांच्या 167 प्रकल्पांचं लोकार्पण केलं. तसचं या संपूर्ण मेळाव्यामध्ये देशभरातून येणाऱ्या भाविकांना संपूर्ण मेळाव्याची व्यवस्थितरित्या माहिती मिळावी, संवाद साधताना भाषेची अडचण होऊ नये म्हणून ‘Sah ‘AI’ yak’ नावाचं चॅटबोट लॉन्च केलं आहे. यामध्ये देशातील विविध 11 भाषांचा समावेश केला आहे. 

तर जाणून घेऊयात, गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जगातला सर्वात मोठा धार्मिक उत्सव म्हणून नोंद झालेल्या महाकुंभ मेळाव्याची सुरुवात कधी आणि कशी झाली?

कुंभ मेळा : आदी शंकराचार्यांची संकल्पना

सर्व हिंदू संत-संन्यांश्यांना एकत्र आणण्यासाठी आदी शंकराचार्यांनी कुंभमेळाव्याची संकल्पना मांडली. ख्रिस्तपूर्व 654 वर्षांपूर्वी या धार्मिक मेळ्याला प्रारंभ झाला. धार्मिक गुरू, पंडित, तपस्वी आणि 13 संत पंथीयांतील (आखाडे) साधूंनी एकत्र येत उत्सव साजरा करावा या विचाराने या उत्सवाला सुरुवात झाली. कुंभमेळ्याचा पहिला लिखित पुरावा भागवत पुराणामध्ये आहे. चिनी प्रवासी झुआनशांग याने राजा हर्षवर्धन याच्या कालावधीत म्हणजे 629-645 मधील कुंभमेळ्याची लिखित नोंद केली आहे.

अर्ध कुंभ, कुंभ मेळा, पूर्ण कुंभ आणि महाकुंभ असे चार प्रकार आहेत. हरिद्वार, उज्जैन, नाशिक आणि प्रयागराज इथं दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरत असतो. तर दर सहा वर्षांनी प्रयागराज आणि हरिद्वार इथं अर्धकुंभमेळा उत्सव साजरा होतो. महाकुंभ मेळाव्याचं आयोजन दर 144 वर्षांनी प्रयागराज इथं केलं जातं. कारण इथं गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम होतो. यंदा 2025 मध्ये महाकुंभ मेळावा होत आहे. 

गुरू एका राशीत एक वर्ष राहतो. गुरू स्थिर राशीत असताना कुंभ मेळा असतो. गुरू चर राशीत असताना अर्धकुंभ असतो. गुरू 12 वर्षांनी परत वृषभ राशीत आल्यावर पूर्ण कुंभ असतो. चर म्हणजेच चल राशींमध्ये  मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, मकर यांचा समावेश होतो. तर स्थिर राशींमध्ये वृषभ, सिंह, तूळ, कुंभ यांचा समावेश होतो.   

पौराणिक कथेनुसार,  भगवान विष्णू यांनी समुद्रमंथनाच्या वेळी मोहिनीचा वेष धारण करुन अमृत कलश घेऊन जात होते. त्यावेळी त्या कलशातून चार थेंब पृथ्वीवर पडले. प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन या चार ठिकाणी हे थेंब पडले. पुढे ही ठिकाणं तीर्थस्थान म्हणून ओळखली जाऊ लागली. अमृत कलशातील चार थेंब हे नाशिक मधल्या गोदावरी नदीत, उज्जैनमधल्या क्षिप्रा नदीत, हरिद्वार मधल्या गंगा नदीमध्ये आणि प्रयागराजमधल्या संगमात  पडल्यामुळे त्या नद्या पवित्र झाल्या होत्या. त्यामुळे या नद्यांमध्ये स्नान केल्याने पापमुक्त होतो अशी आख्यायिका आणि श्रध्दा आहे. पण अजाणतेपणी झालेल्या पापांमधूनच मुक्तता होते, जाणूनबुजून केलेल्या पापांमधून नाही.

आखाडे आणि शाही स्नान

अठराव्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या पंथातील साधूंनी एकत्र येत प्रयागराजमधील संगमात शाही स्नान केलं. अंगभर राख लावून, हातात त्रिशूळ, तलवार, भाला, डमरू अशा वेषात नागा साधू या उत्सवात सहभाग घेतात. या सर्व आखाड्यातील साधू हे मिरवणूकांमधून नदीवर अंघोळीसाठी येत असतात. नदीवर येण्याचा  प्रत्येक आखाड्याचा क्रम आणि मानपान ठरलेले आहेत. 

शैव पंथीयांचे निर्वाणी, अटल, निरंजनी, आनंद, जुना, आवाहन, अग्नी हे आखाडे आहेत. वैष्णव पंथीयांचे निर्मोही, दिगंबर अनी आणि निर्वाणी हे आखाडे आहेत. दोन उदासीन आखाडे (नया आणि बडा) असेही आहेत.

सन 2019 च्या अर्ध कुंभमेळाव्यापासून किन्नर समाजातील ही साधूंचा विशेष आखाडा तयार करण्यात आला. यामध्ये महामंडलेश्वरसह राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, ओडिसा, महाराष्ट्र आणि अन्य राज्यातील 15 ते 20 किन्नर साधूंचा समावेश आहे. सुरुवातीला हे साधू जुना आखाड्यातूनच शाही स्नानामध्ये सहभागी व्हायचे. मात्र, 2019 च्या अर्ध कुंभ मेळाव्यापासून त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभी केली आहे.

नवव्या ते अठराव्या शतकापर्यंत हे सर्व आखाडे मिळून कुंभ मेळाव्याचं आयोजन करीत असत. मात्र, शाही स्नानाचा क्रम ठरविण्यावरून या विविध आखाड्यांमध्ये वाद व्हायचे. अनेकदा या वादातून हिंसक घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता सरकारकडूनच या संपूर्ण मेळाव्याचं आयोजन करण्यास सुरुवात झाली. तरी, आखाड्यांचा क्रम आणि अन्य धार्मिक बाबी या आखाड्याचे प्रमुखचं ठरवतात. 

मकर संक्रांत, पौष पोर्णिमा, मौनी अमावस्या, वसंत पंचमी, माघी पौर्णिमा आणि महाशिवरात्री या सहा महत्त्वाच्या दिवशी आखाड्याचे प्रमुख महामंडलेश्वर हे हत्ती किंवा घोड्यांच्या पालखीतून पहाटे पहिल्या प्रहरात शाही स्नानासाठी नदी काठावर येत असतात. 

तर अन्य भाविक हे कुंभमेळाच्या कालावधीत कोणत्याही वेळी येऊन नदीमध्ये स्नान करत धार्मिक कार्य पूर्ण करतात. 

स्वातंत्र्य सेनानींचा  कुंभमेळा 

अठराव्या शतकात सुरू झालेल्या या कुंभ मेळाव्यामध्ये आजतागायत खंड पडलेला नाही आहे. ब्रिटिशांनी भारतावर ताबा मिळवल्यावरही ब्रिटिश प्रशासनानेही कुंभ मेळाव्याच्या व्यवस्थेवर पूर्ण लक्ष दिलं होतं. ब्रिटिश प्रशासनामुळे आखाड्यांमध्ये होणारे वाद संपुष्टात आले होते. 

ब्रिटिश प्रशासनाच्या 1868 सालच्या एका अहवालामध्ये कुंभ मेळाव्याच्या उल्लेख आढळतो. या अहवालामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, 1870 साली अलाहबाद येथे होणाऱ्या कुंभ मेळाव्यासाठी वाहतूक व्यवस्था, स्वच्छता व्यवस्था आणि दूरवरून येणाऱ्या साधू आणि भाविकांची राहण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. 

ब्रिटिशांच्या राजवटीत या कुंभ मेळाव्याचा उपयोग स्वातंत्र्य लढ्याच्या जनजागृतीसाठी केला गेला. साधू- संतांसह अनेक सामान्य नागरिक कुंभ मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येत स्वातंत्र्य लढ्याची तयारी करत होते.  केंद्रीय सांस्कृतिक संसाधने आणि प्रशिक्षण केंद्राच्या माहितीनुसार महात्मा गांधी यांनी 1918 साली कुंभ मेळाव्याला भेट दिली होती. आपल्या या भेटीत त्यांनी तिथे जमलेल्या भाविकांशी संवाद साधला होता. 

या ब्रिटिश राजवटीमध्ये कुंभमेळाव्यासाठी येणाऱ्या यात्रेकरुंवर कर आकारला जाऊ लागला. यात्रेकरुंसाठी रेल्वे सुविधाचं जाळं जलदगतीनं विस्तारलं गेलं. शाही स्नानाचं योग्य पद्धतीने व्यवस्थापन होऊ लागले. मेळाव्यासाठी येणाऱ्या भाविकांची राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था होऊ लागले. तसेच स्वच्छता आणि सुरक्षेचीसुद्धा काळजी घ्यायला सुरूवात झाली.

1954 ते 2025 पर्यंतच्या महाकुंभ मेळाव्याचं आयोजन

स्वातंत्र्यानंतर पहिला महाकुंभ मेळावा 1954 साली झाला. या महाकुंभ मेळाव्याचं नियोजन हे लष्कर आणि सार्वजनिक विभागाकडून करण्यात आलं होतं. त्यावेळी गंगा नदी सतत पाण्याचा प्रवाह बदलत असल्यामुळे त्यावर तरंगते पूल बांधून त्याचं देखभाल करताना खूप अडचणी आल्या.  

‘द हिंदू’ च्या बातमीनुसार, सन 1966 साली झालेल्या महाकुंभ मेळाव्याच्या वेळी 7 लाख भाविकांनी माघी पौर्णिमेच्या दिवशी स्नान केल्याची नोंद आहे. 

आणीबाणी आणि  महाकुंभ मेळावा

सन 1977 साली गंगा नदीचा पाण्याचा प्रवाह बदलल्यामुळे दोन नैसर्गिक संगम स्थळ निर्माण झाली होती. या योगाच्या वेळी देशात मात्र राजकीय अस्थिरतेमुळे आणीबाणी जाहीर केली होती. तरिही, कुंभ मेळाव्यावर काहिही परिणाम झाला नाही. याही वर्षी भव्य-दिव्य प्रमाणात कुंभ मेळाव्याचा उत्सव साजरा केला होता. गंगा नदीच्या दोन्ही प्रवाहावर एकूण 14 पूलं बांधले होते. प्रवासासाठी 2 हजार बोटींची व्यवस्था केली होती. 8 हजार पोलिस, जवान आणि होम गार्ड्स सुरक्षेसाठी तैनात केले होते. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी संपूर्ण सरकारी व्यवस्था अलर्ट मोड वर होती. 1977 सालच्या या महाकुंभ मेळाव्यामध्ये तब्बल 1 कोटी भाविक 19 जानेवारीला प्रयागराज मध्ये जमले होते. या घटनेची नोंद ही वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा केली आहे.  

गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली नोंद

सन 1989 मध्ये महाकुंभ मेळाव्याच्या जागेचा 3 हजार एकरपर्यंत विस्तार करण्यात आला. लष्कराकडून गंगा नदीवर जास्त पूल बांधण्यात आले. सन 1977 प्रमाणे यावर्षी  पुरेशी जागा नसल्यामुळे गंगा नदीवर आंघोळीसाठी विशेष पट्ट्यांची निर्मिती करता आली नव्हती. मात्र, वर्षागणिक गर्दीचा ओघ हा वाढतच चालला होता. 1989 मध्ये सुमारे 1.5 कोटी लोक हे प्रयागराजला जमले होते. त्यावर्षी या महाकुंभ मेळाव्याची नोंद जगातला सर्वात मोठा लोकांचा मेळावा अशी नोंद गिनीज बूक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली.

सुरक्षेसाठी अत्याधुनिक साधनांचा वापर

वर्षागणिक कुंभ मेळाव्याचा विस्तार वाढू लागला. त्यानुसार सुरक्षा व्यवस्थेमध्येही अनेक बदल करण्यात आले. सुरक्षा रक्षक, पोलिस, होम गार्ड यांच्याशिवाय अनेक सुरक्षा साधनांचा वापर करण्यास सुरुवात झाली. सरकारने नौदल अधिकारी, खाण कामगार, स्निफर्स डॉग स्क्वॉर्डची व्यवस्था तैनात केली. हवाई पाहणीसाठी दोन एअर फोर्स हेलिकॉप्टर्स ही तैनात केली होती. 

2013 साली तीन कोटी भाविक प्रयागराजमध्ये दाखल

सन 2013 साली महाकुंभ मेळाव्यातील मौनी अमावस्या या महत्त्वाच्या दिवशी शाही स्नानासाठी तब्बल तीन कोटी भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले होते. या दिवसासाठी 14 सेक्टर जवळपास 18 हजार चौैरस किमी काठावर 22 घाटाची व्यवस्था केली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Aishwarya Pissay Indian motorsports athlete : पोर्तुगालमध्ये नुकताच FIM वर्ल्ड रॅली-रेड चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारतातल्या ऐश्वर्या पिसे
Tri-service sailing voyage : भारतीय हवाई दल, नौदल आणि लष्करातील महिला अधिकारी एकत्रितरित्या पहिल्या जागतिक प्रदक्षिणेला सुरूवात केली आहे. 'समुद्री
Saraswatibai Phalke : ‘राजा हरिश्चंद्र’ या सिनेमाच्या माध्यमातून भारतीय सिनेसृष्टीला सुरूवात झाली. या सिनेमाची निर्मिती आणि निर्मितीकार दादासाहेब फाळके यांना

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ