आरोग्याची देखभाल आणि तातडीची चिकित्सा व निदान करणे हे खूप महत्त्वाचे आहे. सध्याच्या जीवनशैलीत, जिथे वेगाने बदलणारे वातावरण आणि धावपळीचे जीवन आहे, तिथे काही आरोग्य उपकरणे आणि प्राथमिक आरोग्य देखभाल किट आपल्या घरी असणे खूप आवश्यक आहे. ही उपकरणं आणि किट तुमच्या कुटुंबीयांच्या आरोग्याच्या समस्यांना तातडीने हाताळण्यास मदत करू शकतात आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये महत्त्वपूर्ण ठरू शकतात.
महत्त्वाची आरोग्य उपकरणे:
ग्लुकोमीटर (Blood Glucose Meter)
किंमत -1200
डायबिटीस असलेल्या रुग्णांसाठी ग्लुकोमीटर एक आवश्यक उपकरण आहे. या उपकरणाचा वापर रक्तातील साखरेची पातळी मोजण्यासाठी केला जातो. हे घरच्या घरी रक्त तपासण्याची सुविधा देते, ज्यामुळे नियमितपणे आपल्या रक्तातील साखरेची पातळी तपासणे सोपे होते. जर रक्तातील साखरेचे प्रमाण अनियमित असेल, तर त्याचा प्रभाव हृदय, मूत्रपिंड आणि इतर अवयवांवर होऊ शकतो. त्यामुळे साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.
बीपी मीटर (Blood Pressure)
किंमत -2500
उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) एक गंभीर समस्या बनली आहे. बीपी मीटर द्वारे घरच्या घरी रक्तदाब मोजता येतो. जर रक्तदाब नियंत्रणात नसेल तर हृदयविकार, स्ट्रोक आणि अन्य गंभीर समस्या होऊ शकतात. नियमितपणे बीपी तपासणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.
थर्मोमीटर (Thermometer)
किंमत -200
सर्वसाधारणपणे लोकं “अंग गरम लागतंय” या एका वाक्यावरती औषध सुरू करतात जे चुकीचं आहे.
ताप मोजण्यासाठी थर्मोमीटर आवश्यक आहे. हे उपकरण तापाची स्थिती जाणून घेते. त्याच्या मदतीने तापाच्या तीव्रतेची माहिती मिळवता येते आणि योग्य उपचार सुरू करता येतात. कोरोना सारख्या महामारीनंतर इन्फ्रारेड थर्मामीटरचे(किंमत-2500) महत्व सगळ्यांना समजलेच आहे. स्पर्श न करता जर आपल्याला टेंपरेचर मोजता आलं तर त्यामुळे रोगाचा संसर्ग किंवा प्रादुर्भाव हा आपल्याला रोखता येतो.
पल्स ऑक्सिमीटर (Pulse Oximeter)
किंमत -3000
पल्स ऑक्सिमीटर रक्तातील ऑक्सिजनच्या पातळीची मोजणी करतो. जर ऑक्सिजन पातळी कमी असेल तर, याचा थेट परिणाम श्वसन प्रणालीवर होऊ शकतो. अस्थमा, श्वसन विकार किंवा इतर शारीरिक समस्यांमध्ये या उपकरणाचा उपयोग महत्त्वाचा ठरतो. कोरोना काळापासूनच आपल्याला याची महती समजलेली आहे संसर्गजन्य रोगांमध्ये स्पर्श न करता आपल्याला याचा वापर अतिशय उत्तम रीतीने करता येतो.
प्राथमिक आरोग्य देखभाल किट
किंमत-1200-1500
फर्स्ट एड बॉक्स किंवा प्रथमोपचार पेटी हा तर आपण न विसरू शकणारा पर्याय आहे. घरामध्ये छोट्याशा जखमेपासून ते पित्त,उलटी, जुलाब, ताप, पोटदुखी,अंगदुखी या सगळ्या आजारांवरती आपल्या प्रथमोपचार पेटीतून आपण पटकन औषध काढून लक्षणांची तीव्रता कमी करू शकतो. डॉक्टरांचा किंवा वैद्यकीय सल्ला मिळेपर्यंत याचा फार उपयोग होतो. यात पुढील वस्तू असायला हव्यात.
- औषधे आणि बॅंडेज
प्राथमिक किटमध्ये विविध प्रकारची बॅंडेज, गॉझ, आणि पट्ट्या असायला हव्यात. जखमा किंवा कट झाल्यास त्वरित उपचार करण्यासाठी हे आवश्यक आहे. याशिवाय, हलके वेदनाशामक औषध, डोळ्यांतील जंतुसंसर्गाची औषधं, मळमळ किंवा उलट्यांसाठी औषधे ठेवणे महत्त्वाचे आहे.
- जास्त ताप असण्यामुळे होणाऱ्या समस्यांना आपण त्वरित सामोरे जाऊ शकतो. प्राथमिक किटमध्ये ताप कमी करण्यासाठी पॅरासिटामॉल आणि ibuprofen सारखी औषधे असायला हवी.
- . रक्तस्राव थांबवण्यासाठी औषधे
प्राथमिक किटमध्ये रक्तस्राव थांबवण्यासाठी टॉर्निकेट्स, बॅंडेज, स्ट्रॅप्स आणि ॲटीसेप्टिक क्रीम असायला हवे.
- फर्स्ट-एड मॅन्युअल
एक बेसिक फर्स्ट-एड मॅन्युअल ठेवणे उपयुक्त ठरते. ह्यामुळे आपल्याला इतर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीवर वेगाने कृती करण्यास मदत मिळते.
किचन मधील वजन काटा
किंमत -850
आजकाल सगळेच कॅलरी कॉन्शस आहेत. अन्न मोजून मापून बनवणं यासाठी किचन स्केल हा पर्याय अगदी उपयोगात येतो. यामध्ये आपण आवळा पावडर ,त्रिफळा, प्रोटीन पावडर, केकचं लागणार सामान हे सगळं मापू शकतो.
वजन काटा
किंमत 1500
असं म्हणतात की वजनाचा मार्ग काट्यातून जातो. पण काट्याशिवाय वजनाचा मार्ग योग्य रस्त्यावर राहणारच नाही. वेटलॉस च्या महत्त्वाच्या प्रवासामध्ये वजन काटा हा आपला एक महत्त्वाचा साथीदार आहे ज्यामध्ये आपण घरच्या घरीच आपलं वजन करून तात्काळ योग्य ती पावलं उचलू शकतो.
वॉकिंग स्टिक
किंमत हजार रुपये
आपण लहान असताना आपला चिमुकला हात धरून ज्या मजबूत हातांनी आपल्याला आधार दिला, आज जेव्हा त्याच व्यक्तीला म्हातारपणामुळे काठीचा आधार लागतो तेव्हा वॉकिंग स्टिक शिवाय दुसरा कोणताही बेस्ट पर्याय असू शकत नाही.
उपकरणांचा कुशलतेने वापर
आरोग्याची चांगली देखभाल होण्यासाठी विविध उपकरणे आणि प्राथमिक उपचार किट घरात असणे हे आपल्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे, आपल्या कुटुंबासाठी या उपकरणांचा वापर जर कुशलतेने केला तर त्यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये तातडीने व योग्य उपचार मिळवता येतील.
गिफ्टिंगचा नवा पर्याय
आपण ज्या प्रकारे जीवनशैली बदलतोय त्या प्रकारे गिफ्टिंगचा ऑप्शनही बदलणं फार महत्त्वाचं झालेलं आहे. अनेकदा ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस किंवा लग्नाच्या वाढदिवसांना पाकिटात काही रक्कम किंवा कपडे, शोभेच्या वस्तू दिल्या जातात. त्याऐवजी त्यांना उपयोगी पडतील अशी वैद्यकीय तपासणी उपकरणे देणं, हा एक चांगला पर्याय होऊ शकतो. ‘मेडिकल गिफ्टिंग’ ही संकल्पना केवळ उपयुक्त गिफ्ट देण्यापुरती मर्यादित नाही; ती व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घेण्याची भावना व्यक्त करते. तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला ग्लुकोमीटर, बीपी मीटर, किंवा वॉकिंग स्टिक अशा गोष्टी गिफ्ट करता, तेव्हा त्या गिफ्टसह तुम्ही त्या व्यक्तीच्या आरोग्याबद्दलची तुमची काळजी आणि माया व्यक्त करत असता. गंमत म्हणजे अशाप्रकारे अत्यंत उपयोगी गिफ्ट कोणीही दुसऱ्याला पास ऑन करायचा विचारही करणार नाही. त्याचा योग्य तो वापर घरामध्ये ज्या व्यक्तीला गिफ्ट दिले तिच्यासाठी होऊ शकेल.
7 Comments
खूप सुंदर सहज सोप्या शब्दात सांगितलेली माहिती. सामान्य माणसाला समजणारी.
मेडिकल गिफ्टिंग ची कल्पना डोक्यात फिट बसली. Ra
बहुमूल्य माहिती.भेटवस्तु देण्याचा नवा पर्याय.
Useful good information about instruments & cost details. Thanks.
Useful instructions with good information & cost details. Thanks.
Good and nice innovative
Nice idea 👍 Gifting medical equipments 😊
Medical gifting very unique concept.