महाकुंभ 2025 : प्रयागराज विमान तिकीटाचा दर 55 हजार रूपये!

Mahakumbh 2025 : महाकुंभ या धार्मिक मेळाव्यासाठी जगभरातून कोट्यावधी लोक प्रयागराजला एकत्र येत आहेत. या मेळाव्यासाठी विमानातून येणाऱ्या भाविकांना प्रवासासाठी तब्बल 55 हजार रुपये मोजावे लागत आहेत.

महाकुंभ मेळाव्याच्या माध्यमातून श्रध्दा, सामाजिक एकता, बांधिलकीचे अधिष्ठान आहे. याच मेळाव्यात आपल्याला तंत्रज्ञान आणि आध्यात्मिकतेची सांगड पाहायला मिळते. जगभरातून अनेक भाविक, पर्यटक हा मेळावा पाहण्यासाठी प्रयागराजला येत आहेत. त्यामुळे विविध क्षेत्रातून उत्तरप्रदेश सरकारला कोट्यावधीचं उत्पन्न मिळणार आहे.  

प्रयागराजला अभूतपूर्व लोकांची गर्दी

महाकुंभ मेळाव्याच्या निमित्ताने 106 वर्षामध्ये कधी नाही पाहिली अशी लोकांची अभूतपूर्व गर्दी प्रयागराजला  पाहायला मिळत आहे. तर 93 वर्षात पहिल्यांदाच फारशी वर्दळ नसलेल्या इथल्या विमानतळावरही मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. 

दिनांक 29 जानेवारीला मौनी अमावस्याच्या निमित्त होणाऱ्या शाही स्नानासाठी  प्रयागराजला येणाऱ्या विमानाच्या तिकीट दरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. 

विमान तिकीट दरातील अवाजवी वाढ

येत्या 29 जानेवारी रोजी मौनी अमावस्येनिमित्त होणाऱ्या शाही स्नानासाठी प्रयागराजमध्ये कोट्यावधी लोकं येणार आहेत.  अनेक प्रवासी विमानप्रवासाच्या माध्यमातून प्रयागराजला दाखल होणार आहेत. त्यामुळे डोमेस्टिक विमानाच्या तिकीट दरामध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

जानेवारी 28 आणि 30 तारखेला चैन्नई ते प्रयागराज विमानाचे रिटर्न तिकीट दर हे 53 हजार रुपये दाखवले जात आहेत. कोलकाता ते प्रयागराज रिटर्न तिकीट दर हा 35 हजार रुपये आहे. मुंबई ते प्रयागराज रिटर्न तिकीट 22 हजार ते 60 हजार रुपये आहे. तर बंगळुरूवरुन प्रयागराजला जाणाऱ्या प्रवाशांचं एका फेरीचे (वन वे – प्रयागराजला जातानाचं) तिकीटाचा दर चक्क 26 हजार ते 48 हजार रुपये आहे. 

महाकुंभ मेळावा आणि त्यातही विशेष मौनी अमावस्यचं औचित्त्य साधून विमान प्रवासाच्या तिकीट दरामध्ये केलेली ही वाढ धक्कादायक आहे. कारण इतर वेळी प्रयागराजला जाणाऱ्या विमानाच्या तिकीटाचा दर हा फक्त 5 हजार रुपये असतो. जाण्या-येण्याचा 10 हजार रुपये खर्च होतो. 

मौनी अमावस्येशिवाय अन्य तीन शाही स्नानांचे दिवस दिनांक 3 फेब्रुवारी वसंत पौर्णिमा, दिनांक 12 फेब्रुवारी माघी पौर्णिमा आणि दिनांक 26 फेब्रुवारी महाशिवरात्री या दिवशीही विमान तिकीटाचे दर याचप्रमाणे आहेत. 

हे ही वाचा : महाकुंभ मेळाव्यातून उत्तरप्रदेशला मिळणार कोट्यावधीचं उत्पन्न

विमान प्रवास तिकीटावर अंकुश ठेवा, भाविकांची मागणी

स्कायस्कॅनर फ्लाइट्सच्या माहितीनुसार मंगळवार दिनांक 28 जानेवारी म्हणजे मौनी अमावस्येच्या आदल्या दिवशी प्रयागराजला येणाऱ्या भाविकांच्या संख्येत कुंभ मेळाव्याच्या इतर दिवसांपेक्षा  675 टक्क्यांची वाढ झाली आहे. 

विविध विमान कंपन्यांच्या माहितीनुसार, या महाकुंभ मेळाव्याच्या निमित्ताने प्रयागराजला येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत 1,776 टक्क्यांची वाढ झाल्याचं पाहायला मिळते. 

नेहमीच विमान प्रवासासाठी प्रवाशांची गर्दी होऊ लागली की, तिकीट दरामध्ये प्रचंड वाढ होत असते. त्यामुळे विमान प्रवासाच्या तिकीट दरा संदर्भात सरकारने नियमावली तयार करावी, अशी मागणी भाविकांनी केली आहे. 

इंटरनेटवर प्रयागराज संबंधित सर्चिंग जास्त

महाकुंभ मेळाव्या निमित्ताने जगभरातून इंटरनेटवर प्रयागराज विषयी सर्च केलं जात आहे. एवढंच नव्हे तर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही प्रयागराजला जाण्यासाठी विविध मार्गांसंबंधी ऑनलाइन माहिती अनेकजण  मिळवत आहेत.  

दिनांक 13 जानेवारीला महाकुंभ मेळाव्याला सुरुवात झाल्यावर प्रयागराज येथील विमानतळाविषयी, तिथे ये-जा करणाऱ्या विमानांविषयी अधिक माहिती इंटरनेटवर शोधली गेली आहे. जसं की, हैदराबाद – प्रयागराज विमानं, पुणे – प्रयागराज विमानं, प्रयागराज ते मुंबई विमान अशी माहिती प्रामुख्याने शोधली गेली आहे.

त्याचप्रमाणे, शाही स्नानांच्या सहा दिवसांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयागराजला विमान प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत सुद्धा मोठी वाढ झाल्याचं आढळून आलं आहे. 

आंतरराष्ट्रीय पातळीवर दुबई, लंडन, अबु दाबी, सिंगापूर आणि दोहा या पाच देशातून प्रयागराजला येणाऱ्या विमानांविषयी सगळ्यात जास्त माहिती शोधल्याचं समोर आलं आहे. 

हे ही वाचा : महाकुंभमेळ्यात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, सुरक्षा आणि सोयीसाठी नवे उपाय

विमान तिकीटांच्या दरवाढी संदर्भात सरकारची बैठक

महाकुंभ मेळाव्यातील शाही स्नानांच्या निमित्ताने विमान प्रवासाच्या तिकीट दरात केलेल्या अवाजवी वाढी निमित्ताने केंद्रीय विमान वाहतूक सचिव वुमलुनमंग वुअलनाम यांनी बैठक बोलावली होती. 

या बैठकीत सरकारने विमान कंपन्यांनी किती तिकीट, कोणत्या किंमतीनं विकली यांचा तपशील मागवून त्यासंदर्भात स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनीही या दरांमध्ये सातत्याने होणाऱ्या वाढीची तपासणी करणार असल्याचं आश्वासन भाविकांना दिलं आहे. देशभरातील सर्व भाविकांना सहजपणे या महाकुंभ मेळाव्यात सहभागी होता यावं आणि सर्वांना विमान प्रवासाची सुविधेचा लाभ घेता यावा यावर लक्ष देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

स्वस्त तिकीट दरासाठी ज्यादा विमानांची आवश्यकता

महाकुंभ मेळाव्यासाठी नागरी विमान वाहतूक संचालयाकडून देशांतर्गत 81 विमानांमध्ये वाढ करत 132 विमानांची व्यवस्था केली होती. मात्र, प्रवासी संख्या पाहता हे व्यवस्था कमी पडली असल्याचं दिसून येतं. 

प्रवासी संख्या, मागणी अधिक असून विमानांची उपलब्धतता कमी आहे. देशांतर्गतच नाहीतर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची संख्याही खूप आहे. त्यामुळे विमान प्रवासासह राहण्याच्या सुविधेतील दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, अशी माहिती ट्रॅव्हल एजंट फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष अनिल कलसी यांनी मनीकंट्रोल या वृत्तवाहिनी दिली आहे.

कोट्यावधी भाविकांनी दिली महाकुंभाला भेट

दिनांक 13 जानेवारीला या महाकुंभाला सुरुवात झाली. या मेळाव्यासाठी प्रयागराजमध्ये येणाऱ्या भाविकांची नोंद ठेवण्यासाठी, त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या तंत्रज्ञानाच्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे 12 कोटी भाविकांनी प्रयागराजला भेट दिली आहे. तर रविवार दिनांक 26 जानेवारीच्या दुपारपर्यंत 1.17 कोटी भाविकांनी पवित्र संगमामध्ये स्नान केल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारने प्रसिद्ध केली आहे.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Mahakumbh 2025 : नासाचे अंतराळवीर डॉन पेटिट यांनी अंतराळातून प्रयागराजचा फोटो घेतला आहे. जगातल्या सगळ्यात मोठ्या जनसमुदयांचा सहभाग असलेला हा
Mahakumbh 2025 Stampede : बुधवारी 29 जानेवारीच्या पहाटे प्रयाग संगमावर मौनी अमावस्येनिमित्त भाविकांच्या प्रचंड संख्येमुळं चेंगराचेंगरी झाली. यात 17 जणांचा
Mahakumbh 2025 : आदी शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या चार आखाड्यापासून आज 13 आखाडे स्थापन झाले आहेत. या 13 आखाड्याचे मूळ तीन

विधानसभा फॅक्टोइड

मुंबई – औद्योगिक प्रयोजनासाठी एनए सनद आवश्यक नाही; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश