अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा, चीन आणि मेक्सिको या देशांवर कर (टॅरिफ्स) लावले आहेत. यामुळे आता मोठे व्यापारयुद्ध सुरू झाले आहे आणि याचा परिणाम सर्व देशांवर होऊ शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 फेब्रुवारीपासून कॅनडा आणि मेक्सिकोमधील वस्तूंवर 25% कर लावला आहे. त्यांचे म्हणणे आहे की यामुळे अमेरिकेत येणारे फेंटानिल आणि स्थलांतरीतांचे प्रमाण (मायग्रंट्स) कमी होईल. तसेच, चीनमधून येणाऱ्या वस्तूंवरही 10% कर लावण्यात आला आहे. पण सध्यातरी भारतावर हा कर ( टॅरिफ्स ) लावलेला नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीनवरील वस्तूंवर कर लावण्याचे आदेश दिल्यामुळे अमेरिकेच्या व्यापार भागीदार देशांना अडचण येऊ शकते. तसेच, यामुळे अमेरिकेच्या लोकांना काही आर्थिक समस्यांनाही सामोरं जावं लागू शकतं. पण हे अमेरिकेच्या हितासाठी महत्त्वाचे असल्याचं ट्रम्प म्हणाले.
कॅनडा, मेक्सिको आणि चीनचे ट्रम्प यांना प्रतिउत्तर
अमेरिकेने कर लावल्यानंतर कॅनडा, मेक्सिको आणि चीन यांनीही अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे.
ओटावाने अमेरिकन वस्तूंवर 25% कर लागू केला आहे. मंगळवार, 4 फेब्रुवारी 2025 पासून हे नियम लागू होतील असे त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे यामध्ये पेय पदार्थ, सौंदर्यप्रसाधने आणि कागदी वस्तूंचा समावेश आहे. तसेच लवकरच दुसरी यादी जाहीर होणार आहे. त्यामध्ये कार, ट्रक, स्टील, अॅल्युमिनियम , फळ-भाज्या, मांस, दुग्धजन्य पदार्थ आणि विमान उद्योगाशी संबंधित वस्तू असतील.
मेक्सिकोनेही अमेरिकेवर कर लावण्याची घोषणा केली आहे. ते प्रत्युत्तर म्हणून कर लावतील, पण दर किती असतील किंवा कोणती उत्पादने असतील हे सांगितलेलं नाही. बीजिंगनेदेखील सांगितले आहे की “आपल्या कायदेशीर हक्कांचे आणि हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी ते आवश्यक पाऊले उचलतील.”
ट्रम्प यांनी सध्यातरी भारतावर कर लावलेले नाहीत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर कर लावले, पण भारताला यातून वगळले आहे. मात्र, ट्रम्प यांनी यापूर्वी भारताच्या कर व्यवस्थेवर टीका केली होती. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी भारताला “सर्वात जास्त कर लावणारा देश “असे म्हटले होते. मिशिगनमधील फ्लिंट येथे भाषण देताना त्यांनी सांगितले, “भारत हा खूप हुशार लोकांचा देश आहे, ते कुठेही मागे नाहीत.
2019 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला “टॅरिफ किंग” असे नाव दिले होते. ट्रम्प म्हणाले, ” भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मला फोन आला होता. भारत हा जगातील सर्वात जास्त कर लावणाऱ्या देशांपैकी एक आहे. भारत अमेरिकेच्या वस्तूंवर 100% कर लावतो, ते त्यांच्या भारतीय मोटारसायकली अमेरिकेत पाठवतात, पण आम्ही त्यांच्या वस्तूंवर कर लावत नाही. मात्र, आम्ही जर हार्ले डेव्हिडसन मोटारसायकल भारतात पाठवली, तर भारत त्यावर 100% कर लावतो.”
अनेकांना वाटले होते की भारतही ट्रम्प यांच्या कर यादीत असेल, पण तसे झाले नाही. याचे एक कारण म्हणजे भारताने अमेरिकेवरील काही कर कमी केले आहेत. 1 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला यामध्ये काही वस्तूंवरील कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा करण्यात आली. मोठ्या मोटार सायकल, कार आणि स्मार्टफोन बनवण्याचे पार्ट्स यावरील कर कमी करण्यात आला आहे. आणि याचा फायदा हार्ले-डेव्हिडसन, टेस्ला आणि अॅपल यांसारख्या अमेरिकन कंपन्यांना होणार आहे.
- 1600cc पेक्षा कमी इंजिन असलेल्या मोटारसायकलींसाठी आयात कर 50% वरून 40% करण्यात आला.
- 1600cc पेक्षा जास्त इंजिन असलेल्या मोटारसायकलींसाठी कर आणखी कमी करण्यात आला आहे.
महागड्या गाड्यांवरील कर कमी
भारत सरकारने $40,000 (सुमारे 33 लाख रुपये) पेक्षा जास्त किंमतीच्या गाड्यांवरील कर 125% वरून 70% पर्यंत कमी केला आहे. भारताचे वित्त सचिव तुहिन कांता पांडे यांनी सांगितले की, 150%, 125%, 100%, 40%, 35%, 30%, 25% असे जास्त टॅरिफ्स दर आता काढून टाकण्यात आले आहेत.
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, भारत आता उच्च कर आकारणारा देश राहिलेला नाही. यामुळे भारतीय उद्योग आणि आंतरराष्ट्रीय बाजार यांना फायदा होईल. भारताचा सरासरी आयात कर 11.55% वरून 10.6% झाला आहे.
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर कर लावणार का? या संदर्भात, भारत सरकार तयारी करत आहे आणि यावर एक योजना तयार केली जात आहे.
Live Mint च्या अहवालानुसार, दोन अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमेरिकेच्या नवीन निर्णयानुसार भारत लवकरच यावर योग्य योजना जाहीर करू शकतो.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, “अमेरिका कोणत्या वस्तूंवर कर लावू शकते, याचा अभ्यास सुरू आहे आणि उद्योगांना याबद्दल माहिती दिली जात आहे.”
वित्त सचिव तुहिन कांता पांडे यांनी यावर सांगितले की, “अमेरिका भारतावर कर लावेल का, हे आत्ताच सांगणे योग्य नाही, आम्ही योग्यवेळी निर्णय घेऊ.”
पण हे स्पष्ट आहे की, नवी दिल्ली अमेरिकेशी व्यापार युद्ध टाळू इच्छित आहे. कारण अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आणि मुख्य निर्यात बाजार आहे. आणि कदाचित याच कारणामुळे नवी दिल्लीने अनेक वस्तूंवरील आयात कर कमी केले आहेत, ज्याचा फायदा वॉशिंग्टनला होऊ शकतो.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क बोर्डाचे (CBIC) अध्यक्ष संजय कुमार अग्रवाल यांनी सांगितले की, बजेटमधील घोषणा भारताच्या व्यापार भागीदारांना, विशेषतः अमेरिकेला, एक सकारात्मक संदेश देतात.
सध्यातरी ,भारताला बघ्याची भूमिका घ्यावी लागणार आहे. कारण, ट्रम्प यांनी घेतलेल्या आर्थिक धोरणांमुळे फक्त भारतच नाही, तर संपूर्ण जग चिंतेत आहे. कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांनी जागतिक व्यापारावर होणाऱ्या परिणामावर गंभीर इशारा दिला. कोटक यांनी सांगितले की, “अमेरिकेने कॅनडा, मेक्सिको आणि चीनवर नवे कर लावल्यामुळे जागतिक पुरवठा साखळीला मोठा धक्का लागू शकतो.”