16 व्या शतकात म्हणजे सुमारे सहाशे वर्षांपूर्वी ठाण्यावर होऊन गेलेल्या पोर्तुगिज राजवटीच्या काही खुणा आजही ठळकपणे पाहायला मिळतात. त्या जशा ठाणे शहरात पाहायला मिळतात तशाच आता ठाणे महानगरपालिकेच्या हद्दी बाहेरही पाहायला मिळतात. यातली प्रमुख खूण म्हणजे आता ठाण्याच्या सीमेवर असलेला घोडबंदरचा किल्ला.
हजार वर्षांच्या इतिहासाच्या बदलत्या खूणा
एखाद्या शहराचे अस्तित्व जेव्हा हजार एक वर्षे चालत आलेलं असतं तेव्हा साहजिकच त्या शहराच्या सीमा कायम बदलताना पाहायला मिळतात.याचं उत्तम उदाहरण म्हणजे ठाणे शहर. शिलाहारांच्या राजधानीचं शहर म्हणून सुरू झालेला ठाणे शहराचा प्रवास आता स्मार्ट सिटी ठाणे पर्यंत झाला आहे. इतिहासात काळात भरभराटीचं बंदर असलेल्या या शहरात आता लवकरच मेट्रॊ रेल्वे धावणार आहे. या सगळ्या वाटचालीत शहर म्हणून ठाण्याच्या सिमारेषा मागे-पुढे होणं आणि शहर म्हणून त्याचा विस्तार कमी-अधिक होत जाणं अगदी स्वाभाविकच आहे.
शहराबाहेर असलेले भाग आज मुख्य शहर
साधारण ऐंशी-नव्वद वर्षांपूर्वी ठाण्यातली वस्ती घंटाळी देवी मंदिरापर्यंतच होती. पुढे ( आजचे विष्णू नगर,ब्राह्मण सोसायटी ) शेते आणि माळरानं होती.पन्नास वर्षांपूर्वी ठाण्यातील पाचपाखाडी भागात एक प्राचीन ताम्रपट सापडला होता, तेव्हा तो ताम्रपट ठाण्याबाहेर असलेल्या पाचपाखाडीत मिळाला असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे शेकडो वर्षांपूर्वीच्या ठाणे शहराची हद्द आणि आजच्या ठाण्याचा विस्तार यात अंतर पडणं स्वाभाविकच आहे.पूर्वी जिथे वसती नव्हती तिथे आज शहराचा मध्यवर्ती भाग तयार झालेला पाहायला मिळतो. तसंच पूर्वी जो भाग ठाण्याचा मानला जात असे,तो भाग आता शेजारच्या नव्याने विकसीत झालेल्या शहराला जोडला गेल्याचं पाहायला मिळतं. घोडबंदर किल्ला हा ठाण्याच्या सीमेवर डागडुजीनंतर पुन्हा दिमाखात मिरवत आहे.
दोनदा लूट आणि तिसऱ्यांदा पूर्ण ताबा
इतिहासाचा कालक्रम सांगतो की शिलाहारांच्या नंतर ठाण्यावर काही वर्षे दिल्लीच्या सुलतानाचे राज्य होतं. त्यानंतर गुजराथच्या मेहमूद बेगडाच्या अधिपत्याखाली ठाणे होते. तेव्हा ठाणे उत्तम व्यापारी बंदर होते, ठाण्यातून रेशमी वस्त्रे,मसाले परदेशात निर्यात केली जात असत. 1535 मध्ये पोर्तुगिजांनी ठाणे आपल्या ताब्यात घेतलं तेव्हा ठाण्याची अवस्था जरा वाईटच होती. कारण आधीच्या तीन वर्षांमध्ये ठाण्यावर पोर्तुगिजांनीच दोन वेळा हल्ला चढवून ठाणं लुटलं होतं.1882 सालच्या ठाणे शहराच्या पहिल्या गॅझेटियरमधील नोंदींनुसार पोर्तुगिजांनी ठाणे शहर ताब्यात घेतलं तेव्हा ठाण्यात साठ प्राचीन मंदिरे होती आणि साठ सुंदर तलावही होते.
पोर्तुगिजांच्या भितीनं दोन हजारावर विणकरांनी ठाणं सोडलं
पोर्तुगिजांची राजवट येण्यापूर्वी ठाणे प्रसिध्द होते ते‘विणलेल्या रेशमी कापडा’ साठी. पोर्तुगिजांच्या आधी ठाणे शहरात सुमारे 900 विणकर होते जे रेशमी वस्त्रे विणत असत तर 1200 विणकर सुती वस्त्रे विणत असत. मात्र पोर्तुगिजांच्या धर्मप्रसारामुळे हे सगळे विणकर ठाणे सोडून निघून गेले होते.पोर्तुगिजांनी ठाण्याचा कारभार पाहायला सुरवात केल्यावर शहरात जशी अनेक चर्चेस उभारली त्याचप्रमाणे ठाण्याच्या संरक्षणासाठी ठाण्याच्या किनाऱ्यावर छोट्या गढ्या,टेहळणी मनोरे आणि चौक्या बांधल्या.
पोर्तुगीज काळातली नावे आजही
पोर्तुगिजांच्या ठाण्यामध्ये तेंव्हा दहा पाखाड्या म्हणजे छोटे छोटे पाडे होते. आजच्या काळातील काही नावे तेव्हापासून वापरात होती उदाहरणार्थ कळवा,टेंभी,चऱ्हाई, पाचपखाडी,वडवोली,वोवळे,उतळेश्वर. त्यातलंच एक नाव म्हणजे ‘घोडबंदर ’. आज ठाण्यातील घोडबंदर रस्ता म्हणजे आधुनिक निवासी संकुले, झगमगते शॉपिंग मॉल्स,आखिव रेखीव उद्याने हे चित्र डोळ्य़ांसमोर येतं.पण ज्या घोडबंदर गावामुळे हे नाव या रस्त्याला मिळालं ते गाव मात्र आता मिरा-भाइंदर नगरपालिकेच्या हद्दीत आहे.
घोड्याच्या व्यापारामुळं घोडबंदर
जुन्या काळात ठाणे शहराची हद्द या गावापर्यंत होती. घोडबंदर हे उल्हास नदीच्या खाडीकिनाऱ्यावरचं बंदर होतं. ठाण्यातून वसईकडे आणि गुजराथकडे जाणारी गलबते,जहाजे याच बंदरामधून पुढे जायची. याच बंदरात अरबस्तान आणि पर्शियामधून घोडे घेऊन येणारे अरबी व्यापारी उतरायचे , इथे घोड्यांचा व्यापार व्हायचा म्हणून याचं नाव पडलं घोडबंदर. पोर्तुगिजांनी मार्टिन अल्फांसो या पोर्तुगिज जहागिरदाराकडे घोडबंदर परिसराचा ताबा दिला होता.ठाणे शहराच्या अगदी तोंडावर हे ठिकाण असल्यानं इथे संरक्षणासाठी 1550 मध्ये पोर्तुगिजांनी एक लहानशी गढीवजा चौकी उभारली होती.
महाराजांना रोखण्यासाठी पोर्तुगीजांची ठाण्यात किल्ल्यांची माळ
पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे आरमार उभारल्यानंतर 1672च्या आसपास महाराजांनी घोडबंदर जिंकण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. मात्र त्यामुळे पोर्तुगिज सावध झाले आणि त्यांनी आपल्या ताब्यातील ठाणे किनारपट्टीचे संरक्षण मजबूत करण्यासाठी वसईपासून ते ठाण्यापर्यंत किल्ल्यांची जणू माळच तयार केली. त्यात ठाण्यातील घोदबंदर,गायमुख,नागला बंदर येथे लहान किल्ले उभारण्यात आले.
मराठ्यांनी अखेर ताब्यात घेतलाच
आज आपण जो घोडबंदरचा किल्ला बघतो तो 1730 मध्ये बांधण्यात आला आहे.पोर्तुगिजांनी याचे नाव ठेवले होते ‘ ककाबे द तना ’. सन 1737 च्या एप्रिलमध्ये जेंव्हा मराठ्यांनी ठाणे जिंकले तेव्हाच त्यांनी ठाण्याच्या सीमेवरचे घोडबंदर आणि इतर किल्लेही जिंकले. घोडबंदर किल्ला जिंकताना मराठ्यांनी पोर्तुगिजांची 250 माणसे मारल्याची आणि 7 गलबते ताब्यात घेतल्याची नोंद आहे. वसई मोहिमेचा भाग म्हणून ठाणे,घोडबंदर,नागला बंदर हे किल्ले मराठ्यांनी आधी जिंकले आणि मग वसईवर हल्ला चढवला होता. पुढे 1818 साली इंग्रजांनी घोडबंदरचा किल्ला जिंकून आपल्या ताब्यात घेतला.कालौघात ठाण्याचे बंदर म्हणून महत्व कमी झाले आणि आपोआप या बंदराच्या संरक्षणासाठी बांधलेल्या किल्ल्यांचे महत्वही कमी कमी होत गेले.
ठाण्याची हेरिटेज वास्तू
आज आपण जो घोडबंदर किल्ला बघतो त्यामध्ये पोर्तुगिजांनी बांधलेले बुरुज पाहायला मिळतात,आतली काही इमारतींचे अवशेष पाहायला मिळतात. या किल्ल्यालगत एक मोठे चर्च पोर्तुगिजांनी उभारले होते, त्याचेही अवशेष शिल्लक आहेत. भारत सरकारच्या पुरातत्व खात्याच्या अख्यत्यारीत असलेल्या या किल्ल्याचे नुतनीकरण करण्यात आले आहे. ठाण्याच्या सीमेवरचा, इतिहासातील ठाण्याचा रक्षक असलेला, 292वर्षांपूर्वीचा घोडबंदर किल्ला म्हणजे ठाण्याचे हेरिटेज वास्तू वैभव आहे.
1 Comment
ह्या लेखाच्या माध्यमातून ठाण्याच्या इतिहासात डोकावता आलं. चिरपरिचित असणार ठाणं नव्याने सामोरं आलं. थँक्यू मकरंद 🙏