पृथ्वीतलावर जसजसा तंत्रज्ञानाचा विकास झाला त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक असा दोन्ही प्रकारचा परिणाम मानवावर झाला आहे. पूर्वी कष्टाची कामं ही माणसांकडून केली जात असतं. मात्र, मोठ मोठ्या यंत्राचा विकास झाला, आणि जिथे एक काम करण्यासाठी 10 माणसं लागायची तिथे 1 कामगार पुरेसा झाला. यामुळे नोकरी-धंद्यावर परिणाम झाला. पण यांत्रिकीकरणामुळे कामं वेगाने होऊ लागली. पण हीच यंत्रे निर्माण करण्याच्या माध्यमातून रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या. थोडक्यात भूमिका बदलत गेल्या.
आज आपल्याकडे घरातली कामं करण्यासाठी आपण वेगवेगळ्या यंत्राचा वापर करतो. त्यामुळे कामं पटकन होतात. पण त्यामुळे शारीरिक हालचाली मंदावल्यामुळे दुखणीही वाढली आहेत. शारीरिक लवचिकता कमी झाली आहे.
आता तर मेंदूचा वापर करुन केली जाणारी कामंसुद्धा एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केली जात आहेत. त्यामुळे अलिकडे जगभरात कोणकोणत्या क्षेत्रातल्या नोकऱ्या एआय तंत्रज्ञान गिळंकृत करणार या आशयाचे अहवाल प्रसिद्ध झाले होते.
यातच डिसेंबर 2024 मध्ये, डॉक्टरांची जागा सुद्धा एआय घेणार असा अहवाल समोर आला. खरंच एआय डॉक्टरांची जागा घेऊ शकतात का? तर एआय तंत्रज्ञानाला हे शक्य नसल्याचं समोर आलं आहे. उलट माणसांप्रमाणे एआयची क्षमतासुद्धा कमी होत जाते असं या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे.
वैद्यकीय क्षेत्रात एआयचा अतिरेक चिंताग्रस्त
डिसेंबर 2024 रोजी ब्रिटिश मेडिकल जर्नल या आंतरराष्ट्रिय मासिकामध्ये वैद्यकीय निदानामध्ये एआय तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि त्याची विश्वाससार्हता याविषयी बीएमजे संस्थेने चिंता व्यक्त केली आहे. रुग्णांचा रिपोर्ट अभ्यासण्यासाठी जरी एआय तंत्रज्ञानाच्या गतीचा आणि क्षमतेचा वापर होत असला तरी त्यावर जास्त काळ अवलंबून राहता येणार नाही, असं स्पष्ट मत या जर्नलमध्ये मांडलं आहे. तसंच ‘येत्या काळात एआय हे डॉक्टरांची जागा घेतील’ या स्टेटमेंट विरोधात शास्त्रीय पुरावा सादर करत ते खोडून काढलं आहे.
शास्त्रीय अभ्यास काय सांगतो?
दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी एआयच्या दीर्घकाळ कार्यक्षमतेवर आधारित अभ्यास प्रकाशित झाला. या अभ्यासामध्ये एआय तंत्रज्ञानसुद्धा वृद्धत्वाकडं झुकणार असल्यास शास्त्रियदृष्ट्या स्पष्ट केलं आहे. काळाच्या ओघात एआय तंत्रज्ञानामध्ये संज्ञानात्मक कमजोरी आढळून येणार असल्याचं सांगितलं आहे.
सोप्या भाषेत संज्ञानात्मक कमजोरी म्हणून बौद्धिक क्षमतेला मर्यादा येणं. माणूस जेव्हा वृद्ध होत जातो तेव्हा त्याची बौद्धिक क्षमता जसं की, विचार करणे, गोष्टी, घटना लक्षात ठेवणे, आकलन क्षमता, समस्या सोडवणं, भाषा समजणं, लक्ष केंद्रित करणं, निर्णय घेणं अशा ज्या दैनंदिन जगण्यासाठी आवश्यक क्रिया आहेत त्याची गती कमी होत जाते. अनेक वृद्ध माणसांच्या बाबतीत ही बौद्धिक क्षमता पूर्ण निष्क्रिय होऊन जाते.
हे जसं माणसांसोबत होतं तसंच एआय तंत्रज्ञानासोबतही होणार असल्याचं या अभ्यासात सांगितलं आहे.
हे ही वाचा : एआयच्या ( AI ) जास्त वापरामुळे तरुणाईच्या विचारशक्तीवर परिणाम!
एआय टूल्सची कॉग्निटिव्ह चाचणी
एआय हे एक तंत्रज्ञान आहे. त्यामुळे तो माणसांप्रमाणे वृद्ध कसा होणार हाच प्रश्न आपल्याला पडला असेल. पण हे अभ्यासाअंती स्पष्ट झालं आहे. शास्त्रज्ञांनी यासाठी लार्ज लेंग्वेज मॉडेलवर आधारीत एआय चॅटबोट्सची मॉन्ट्रियल कॉग्निटिव्ह चाचणी केली. यामध्ये ओपन एआय, चॅट जीपीटी, एनथ्रोपीक्स सोनेट आणि अल्फाबेट्स जेमिनी या चॅटबोट्सचा समावेश होता. यामध्ये एआय टूल्सच्या लक्ष केंद्रीत करणे, स्मृती, भाषा, तर्कशास्त्र पद्धतीने समस्या सोडविणे आणि काम करण्याची क्षमता या कौशल्याचा अभ्यास केला.
ही चाचणी जेव्हा प्रौढांची केली जाते तेव्हा त्यांना 30 पैकी 26 गुण हे चांगली स्थिती म्हणून मानले जातात. यामध्ये एआयच्या या वेगवेगळ्या टूल्सचे रिपोर्ट वेगवेगळे आले. चॅट जीपीटी 40 ला 26 गुण मिळाले, एनथ्रोपीक्स सोनेटला 25 गुण मिळाले, जेमिनी 1.0 ला सगळ्यात कमी 16 गुण मिळाले.
एआयमध्ये व्हिज्युअल ॲबस्ट्रॅक्शनचा अभाव
या चाचणी दरम्यान, या टूल्सनां लिखित स्वरुपातील अक्षराचा चार्ट दिला होता. त्यातून या टूल्सना विचारलेली अक्षर ओळखायची होती. या टास्कवरुन एआय टूल्सना अक्षर ओळख म्हणजे व्हिज्युअल ॲबस्ट्रॅक्शन आणि बुद्धीचा विचार करुन काम करता येत नसल्याचं समजलं. व्हिज्युअल ॲबस्ट्रॅक्शन म्हणजे आपल्या समोर एखादा फोटो दिला असेल तर विषयानुसार आपल्याला हव्या असलेल्या गोष्टीच त्यामध्ये ठेवून अन्य अनावश्यक गोष्टी त्या फोटोतून काढून टाकणे.
वैद्यकीय क्षेत्रामध्ये व्हिज्युअल ॲबस्ट्रॅक्शन आणि एक्झिक्युटिव्ह फंक्शन टास्क म्हणजे मानवी बुद्धिचा विचार करुन एखाद्या गोष्टीचं नियोजन करणं, आकलन करुन घेणं, स्व – नियंत्रण, आठवण ठेवणं, लक्ष केंद्रित करणं, नवीन गोष्टी समजून घेऊन त्यावर अंमल करणं अशा कौशल्याची आवश्यकता असते. मानवी मेंदू हा या सगळ्या बौद्धिक क्रियेसाठी विकसीत झाला आहे. मात्र, एआय तंत्रज्ञानामध्ये कौशल्याचा अभाव असल्याचं आढळून आलं. त्यामुळे एआय तंत्रज्ञान हे डॉक्टरांना पर्याय ठरणार नाहीत असं स्पष्ट मत बीएमजेमध्ये मांडलं आहे.
हे ही वाचा : मेंदू तल्लख ठेवायचा आहे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला!
वैद्यकीय साहाय्यक म्हणून एआय उत्तम
दरम्यान, एआय हा डॉक्टर बनू शकत नाही. मात्र, एआयमधील तंत्रज्ञान हे उच्च कार्यक्षमता असलेलं तंत्रज्ञान आहे. त्यामुळे याचा वापर माहिती प्रोसेस करणं, साठवणं यासाठी करता येऊ शकतो. शेवटी रुग्णांचा रिपोर्ट तयार करणं आणि त्यातील वैद्यकीय बाबी समजून घेणं त्यावर योग्य औषधोपचार करणं हे केवळ डॉक्टरांनाच शक्य आहे.