पार्ले-जी : मुंबईतील एका छोट्या कारखाना ते जगात सर्वाधिक विकलं जाणारं बिस्किट

Parle-G : 1938 मध्ये 'पार्ले ग्लुकोज' हे बिस्किट बाजारात आलं. अगदी कमी वेळातच हे बिस्किट बाजारात खूप लोकप्रिय झालं. जवळपास 50 वर्षे हे बिस्किट बाजारात खूप प्रसिद्ध होते.
[gspeech type=button]

पार्ले-जी हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं? अर्थात, पिवळ्या रंगाचं एक पुडकं आणि त्यावर असलेली एक निरागस मुलगी! हे बिस्किट म्हणजे केवळ खाण्याचा पदार्थ नाही, तर आपल्या सगळ्यांच्या आठवणींचा, भावनांचा आणि नॉस्टेल्जिया चा भाग आहे.

तुम्ही लहान असताना पार्ले-जी बिस्किटं कशाप्रकारे खायचा? चहामध्ये बुडवून, दुधात कुस्करून, की मग नुसतंच? अनेकांसाठी पार्ले-जी म्हणजे शाळेत जाताना खाल्लेला खाऊ, मित्रांसोबत गप्पा मारताना शेअर केलेलं बिस्किट, किंवा प्रवासात वेळ घालवण्यासाठी घेतलेला बिस्किटचा पुडा. एन.सी.सी.त कित्येक कॅडेटस् रगडा परेड झाल्यावर ब्रेकमध्ये पार्ले-जी पाण्यात बुडवून खायचे. आजही अनेकजण चहा किंवा कॉफीसोबत पार्ले-जी बिस्किटं आवर्जून घेतात. ऑफिसमध्ये ब्रेक टाईम असो, की घरी पाहुणे आले असोत, पार्ले-जी नेहमीच सगळ्यांच्या आवडीचं असतं.

सुरुवात एका छोट्या कारखान्यातून

चहा पिताना सोबत बिस्किट नसेल तर मजाच नाही. मार्केटमध्ये अनेक वर्षांपासून एका नावाने अक्षरशः राज्य केलं आहे, ते म्हणजे पार्ले-जी.

पार्ले-जीचा प्रवास 1929 साली सुरु झाला. मोहनलाल दयाल यांनी मुंबईतील विले पार्ले इथे पहिला कारखाना सुरु केला. त्यावेळी देशात स्वदेशी चळवळ जोरात होती, त्यामुळे भारतीय बनावटीच्या वस्तूंना प्रोत्साहन मिळत होतं. याच प्रेरणेतून दयाल यांनी मिठाई बनवण्याचा व्यवसाय सुरु केला. त्यांच्यासोबत फक्त 12 कामगार होते आणि जर्मनीमधून मागवलेली 60,000 रुपयांची मशीनरी होती. याच सेटअप वर ‘पार्ले प्रॉडक्ट्सची’ सुरुवात झाली.

सुरुवातीला मिठाई बनवल्यानंतर, हळूहळू या कंपनीने बिस्किटं बनवायला सुरुवात केली. आणि 1938 मध्ये ‘पार्ले ग्लुकोज’ हे बिस्किट बाजारात आलं. अगदी कमी वेळातच हे बिस्किट बाजारात खूप लोकप्रिय झालं. जवळपास 50 वर्षे हे बिस्किट बाजारात खूप प्रसिद्ध होते.

मात्र, 1980 च्या दशकात, ब्रिटानियासारख्या इतर कंपन्यांनीसुद्धा ग्लुकोज बिस्किटे बाजारात आणली, यामुळे  स्पर्धा वाढली. स्वतःला बाजारात टिकवून ठेवण्यासाठी, पार्लेने 1985 मध्ये त्यांच्या प्रसिद्ध बिस्किटाचं नाव बदलून ‘पार्ले-जी’ असं केलं. ‘जी’ म्हणजे आधी ‘ग्लुकोज’ (Glucose) होतं, पण नंतर लोकांनी त्याचा अर्थ ‘जीनियस’ (Genius) असा लावला.यामुळे पार्ले-जी बिस्कीट हे सगळ्या वयोगटांसाठी एक चांगला पर्याय आहे हे पक्कं झालं.

पार्ले-जी गर्ल: बिस्कीट च्या पाकिटावरील मुलगी कोण?

कित्येक वर्षांपासून पार्ले-जीच्या पाकिटावरील गोंडस मुलीबद्दल अनेक अंदाज लावले गेले आहेत. ही मुलगी आहे कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या मुलीबद्दल अनेक तर्कवितर्कही लावले गेले आहेत. कुणी म्हणालं, “ही मुलगी खरी आहे!” तर कुणी म्हणाले, “नाही “. काहींना वाटलं की ती लहान मुलगी  प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती आहेत, किंवा आणखी कोणतीतरी प्रसिद्ध व्यक्ती आहे. पण हे खरं नाहीये!

पार्ले-जी कंपनीने स्वतः याबद्दल खुलासा केला आहे. पार्ले प्रॉडक्ट्सचे ग्रुप प्रोडक्ट मॅनेजर मयंक शाह यांनी सांगितलं की पार्ले-जीच्या पाकिटावरची मुलगी खरी नाही, तर ते एक चित्र आहे, 1960 च्या दशकात मगनलाल दहिया नावाच्या एका कलाकाराने हे चित्र एव्हरेस्ट क्रिएटिव्हमध्ये बनवलं होतं आणि याच चित्रामुळे पार्ले-जीच्या बिस्किटांना एक खास ओळख मिळाली.

पार्ले-जीची अफाट लोकप्रियता

2013 मध्ये, पार्ले-जी हा 5000 कोटी रुपयांची विक्री करणारा पहिला भारतीय एफएमसीजी (FMCG) ब्रँड बनला. फक्त भारतातच नाही, तर जगातही पार्ले-जीचा बोलबाला आहे. 2011 मध्ये, नीलसन रिपोर्टनुसार, जगातील सर्वाधिक विकलं जाणारं बिस्किट म्हणून पार्ले-जीने ओरेओ, मेक्सिकोमधील गमेसा आणि वॉलमार्टच्या बिस्किटांनाही मागे टाकलं.  चीनमध्येही पार्ले-जी स्थानिक ब्रँड्सपेक्षा अधिक विकलं जातं.  2019-20 मध्ये, पार्ले-जीचं वार्षिक उत्पन्न 800 कोटी रुपयांपर्यंत वाढलं.

कोरोना काळात पार्ले-जी चा मदतीचा हात!

कोविड-19  लॉकडाऊनमध्ये, लोकांनी जीवनावश्यक वस्तूंचा साठा करायला सुरुवात केली आणि यावेळी पार्ले-जी ची विक्रमी विक्री झाली. तसेच अनेक समाजसेवी संस्था (NGOs) आणि सरकारी संस्थांनी लाखो पार्ले-जी चे पॅकेट स्थलांतरित कामगार आणि गरीब वस्त्यांमध्ये वाटले. यावेळी पार्ले प्रॉडक्ट्सने स्वतःहून 3 कोटी पॅकेट दान केले. अनेक किलोमीटर चालत आपल्या गावी परतणाऱ्या मजुरांसाठी, फक्त 5 रुपयांचं परवडणारं पार्ले-जी पॅकेट जगण्याचा आधार बनलं.

पार्ले-जी चे उत्पादन

दर महिन्याला सुमारे 1 अब्ज पार्ले-जीचे पॅकेट तयार होतात. आणि ही बिस्किटं देशभरातील आणि जगभरातील दुकानांमध्ये विकली जातात. पार्ले-जी बिस्कीटाची लोकप्रियता केवळ भारतातच मर्यादित नाही तर, यूएस, यूके, कॅनडा, न्यूझीलंड, मध्य पूर्व आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्येही मोठ्या प्रमाणात याची विक्री होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Government new rules for two-wheelers : तुम्ही नवीन बाईक किंवा स्कूटर खरेदी केली, तर तिच्यामध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS) असणं
Women's employment rate : कामगार मंत्रालयाने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सात वर्षांत भारतातील महिलांच्या रोजगार दरात मोठी वाढ झाली आहे.
CIBIL score : संसदेच्या 2025 पावसाळी अधिवेशनादरम्यान, अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे की, बँका फक्त CIBIL स्कोअर

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ