हसीना पारकर – मुंबई अंडरवर्ल्डची गॉडमदर

Haseena Parkar : हसीना, दाऊदची लाडकी लहाण बहिण. डोंगरीसारख्या भागात आणि दाऊद आणि साबिरसारख्या भावांच्या सहवासात राहुनही तिचं स्वप्न अगदी साधी होती. लग्न करायचं आणि सुखानं संसार करायचा. तिनं तसं केलंही, पण नियतीलाही ते कदाचित मान्य नसावं. सुखानं संसार करता करता तिच्या आयुष्यात अशा घटना घडल्या ज्यामुळं हसीना परकारची हसीना आपा झाली. 
[gspeech type=button]

इब्राहिम कासकर यांच्या 12 मुलांपैकी सातवी होती ती हसीना. दाऊदची लाडकी लहान बहिण. डोंगरीसारख्या भागात आणि दाऊद आणि साबिरसारख्या भावांच्या सहवासात राहुनही तिचं स्वप्न अगदी साधी होती. लग्न करायचं आणि सुखानं संसार करायचा. तिनं तसं केलंही, पण नियतीलाही ते कदाचित मान्य नसावं. सुखानं संसार करता करता तिच्या आयुष्यात अशा घटना घडल्या ज्यामुळं हसीना पारकरची हसीना आपा झाली. 

सातवी मुलगी

मुंबई पोलिसांत हेड कॉन्स्टेबल असलेल्या इब्राहिम कासकर यांच्या घरात 1959 मध्ये सातव्या मुलीचा जन्म झाला. त्यांना एकुण 12 मुलं होती. आधीच तुटपुंजा पगार त्यात एवढी खाणारी तोंडं आणि  मुलांच्या शिक्षणाकडे होणारं दुर्लक्ष या सगळ्याचा परिणाम म्हणजे भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार दाऊद इब्राहिमचा उदय. या 12 मुलांमध्ये 4 बहिणी होत्या. हसीना पारकर ही दाऊदची सगळ्यात लाडकी बहिण होती. दाऊद आणि साबीरनं गुन्हेगारीत प्रवेश केला तरीही आपल्या बाकीच्या भावाबहिणींनी यात येऊ नये अशीच त्यांची नेहमी इच्छा होती. दाऊदनंही तो मुंबईत असेपर्यंत कधीही त्याच्या भावांना गुन्हेगारीत त्याच्यासोबत सामिल करुन घेतलं नव्हतं. सगळ्याच भावंडांप्रमाणं हसीनाचं बालपण गुन्हेगारीच्याच वातावरणात गेलं. 

लग्न आणि सुखी संसार

गुन्हेगारी वातावरणात वाढली तरीही हसीनाला मात्र लग्न करुन सुखाचा संसार करायचा होता. तिचं तेवढंच स्वप्न होतं. वयाच्या 17 व्या तिचं इस्माईलशी लग्न झालं. इस्माईल हा बॉलीवुडमध्ये ज्युनियर आर्टिस्ट होता. छोटे मोठे रोल करायचा. लग्नानंतर त्यानं हॉटेल व्यवसाय सुरु केला. काही वर्षांतच त्यानं दक्षिण मुंबईत आणखी दोन हॉटेल्स सुरु केली. हसीना आणि इस्माईल पारकर यांना दोन मुलं आणि एक मुलगी झाली. गुन्हेगारी जगतापासून लांब त्यांचं आयुष्य सुखानं सुरु होतं. पण हसीना पारकरचा भाऊ दाऊद इब्राहिमनं मुंबईत सुरु केलेलं गँगवार तिचं आयुष्य उद्ध्वस्त करेल याची तिला कदाचित कल्पना नसेल. 1981 मध्ये अरुण गवळीनं हसीना आणि दाऊदचा भाऊ साबीरला ठार मारलं. त्यानंतर 1986 ला दाऊदनं अरुण गवळीचा भाऊ किशोर गवळीला ठार मारलं. आणि त्याचा बदला म्हणून अरुण गवळीनं 1991 मध्ये इस्माइल पारकरला त्याच्या हॉटेलमध्ये गोळ्या झाडल्या. आणि त्यानंतर मुंबईत उदय झाला तो माफिया क्विन हसीना आपाचा. तिला मुंबईत गॉडमदर असंही म्हटलं जायचं. 

माफिया क्विनचं साम्राज्य

हसीनानं गुन्हेगारीत प्रवेश केल्यानंतर तिनं मागे वळून पाहिलं नाही. सुरुवातीला ती फक्त दाऊदचं मुंबईतलं काम सांभाळायची. त्यानं सांगितलेल्या गोष्टी करायची. पण तिला हळूहळू सत्ता आणि पावरची चटक लागली. तिनं कामाची सूत्र स्वत :च्या हातात घ्यायला सुरुवात केली. मुंबई अंडरवर्ल्डवर तिनं पूर्ण नियंत्रण मिळवायला सुरुवात केली. हवाला,  खंडणी, ब्लॅकमेलिंग, अपहरण, असं सगळ्याच धंद्यात तिनं पाय रोवायला सुरुवात केली. असं म्हणतात की मुंबई बॉम्बब्लास्टनंतर काही वर्षांनी मुंबईत कोणताही बिल्डर हसीना पारकरच्या परवानगी आणि माहितीशिवाय एकही इमारत बांधली जाऊ शकत नव्हती. 

घरं घेण्याचं वेड

हसीना पारकरला घरं घेण्याचं वेड होतं. तिनं मुंबईत असंख्य घरं घेतली. एखाद्या बिल्डरला जर बिल्डींग बांधताना काही मदत केली, तर हसीना पारकर त्याबदल्यात त्या इमारतीत घर घेत असे. दाऊदनं ज्या क्रौर्याची सुरुवात केली होती, तेच क्रौर्य हसीना पारकर पुढे नेत तिचा धंदा चालवत होती. तिनं सांगितलेल्या गोष्टीला कुणीही नकार दिलेला तिला चालत नसे. एक काळ तर असा होता, की मुंबईतल्या प्रत्येक गुन्ह्यात, प्रत्येक काळ्या पैशांच्या व्यवहारात आणि प्रत्येक काळ्या धंद्यात तिचा सहभाग होता. ती खऱ्या अर्थानं माफिया क्विन होती. 

पोलिसांमध्येही धाक

हसीना पारकरनं कधीही स्वत : कोणताही गुन्हा केला नाही. तिनं कधीही बंदूक चालवली नाही. पण तरीही तिनं तिचं दहशतीचं साम्राज्य उभं केलं आणि सांभाळलं. म्हणूनच गुन्हेगार तिला गॉडमदर म्हणायचे. एवढ्या वर्षांत कधीही तिच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्याची कुणाची हिंमत झाली नाही. 

मुंबईच्या एसआरए प्रोजेक्टमध्ये शिरकाव

2004 च्या दरम्यान हसीना पारकरनं एक एसआरए प्रोजेक्ट करायचं ठरवलं आणि त्यात पार्टनर्स घेतले. त्यांच्याकडून एक एक कोटी रुपयेही घेतले. तो प्रोजेक्ट पूर्ण झाला नाही. म्हणून त्यांनी तिच्याकडून पैसे परत मागितले. हसीनानं त्यातले 70 लाख परत केले आणि 30 लाख प्रोटेक्शन मनी म्हणून ठेवून घेतले. पण त्या व्यक्तीला हे आवडलं नाही आणि त्यानं पोलिसात तक्रार दाखल करायचं ठरवलं. पोलिसांनी त्याची तक्रार दाखल करुन करुन घेतली नाही. ती व्यक्ती क्राईम ब्रान्च आणि एन्टी एक्सटॉर्शन सेलमध्ये गेली. तिथं प्रकरणाची चौकशी करतो म्हणत अनेक महिने हे प्रकरण सुरु ठेवलं गेलं. त्यानंतर चौकशीत काहीही निष्पन्न झालं नाही असं म्हणून प्रकरण संपवण्यात आलं. 

पहिला गुन्हा दाखल

2007 मध्ये नागपाड्याच्या एका बिल्डरनं हसीना पारकरविरुद्ध खंडणी मागितल्या प्रकरणी तक्रार दाखल केली. ही तिच्या विरोधात दाखल झालेली पहिली अधिकृत तक्रार होती. ज्यासाठी तिला पहिल्यांदाच कोर्टाची पायरी चढावी लागली. पण तिला तत्काळ जामिन मंजूर झाला आणि त्यानंतर मात्र ती कधीही पोलिसांच्या हाती आली नाही. तिचं नेटवर्क एवढं स्ट्रॉंग होतं, की पोलिस कधीही तिच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. 

मुलाचा मृत्यू

हसीना पारकरनं तिचा मुलगा दानिश पारकर याला आपल्या धंद्यात उतरवलं होतं. तिच्यानंतर तिचा आणि दाऊदचा मुंबईतला धंदा तोच सांभाळणार होता. पण जुलै 2006 मध्ये मुंबईत झालेल्या एका भीषण अपघातात त्याचा मृत्यू झाला. मुलाच्या जाण्यानं हसीना पारकर खचली होती. पण ती पुन्हा उभी राहिली आणि धंदा सांभाळू लागली. यानंतर मात्र तिनं तिच्या दुसऱ्या मुलाला या धंद्यात आणलं नाही. तिनं प्रचंड पैसा कमावला. असं म्हणतात की तिच्या मृत्यूच्या वेळी ती जवळपास 5000 कोटींची मालकीण होती. 

माफिया क्विनचा अंत

6 जुलै 2014, रमजान महिन्याच्या एका दिवशी हसीना पारकरच्या छातीत दुखायला लागल्यानं तिला हबीब रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्यावर उपचार सुरु केले, पण तिला जोरदार ह्रदयविकाराचा झटका आला होता. आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. 

हसीना पारकरच्या मृत्यूनंतर दाऊदचा मुंबईतला धंदा मात्र मंदावला होता. त्यानंतर त्याचा भाऊ इक्बाल कासकरनं हसीना पारकर आणि दाऊदच्या धंद्याची सूत्र हाती घेतली.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

आजही जिथे शाळेची गुणवत्ता प्रश्नचिन्हांकित आहे, डिजिटल माध्यमांचा वापर कमी आहे. बसची सुविधा नाही की प्रेरणादायी आदर्शांची कमतरता आहे, अशा
Diabetes : डायबिटीज म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) नेहमीपेक्षा जास्त असणे. ही वाढलेली साखर शरीरात इतर अवयवांवर अनेक दुष्परिणाम
iron calcium deficiency : भारतात बहुतांश स्त्रियांमध्ये लोह (Iron) आणि कॅल्शियम (Calcium) ची कमतरता आढळते. यामुळे त्यांना थकवा, अशक्तपणा आणि

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ