“उत्तम शेती, माध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी” अशी शेती उद्योगाची महती सांगणारी म्हण पूर्वापार चालत आलेली आहे. शेती उत्तम प्रकारे होण्यासाठी उत्तम दर्जाच्या कृषी निविष्ठा आवश्यक आहेत. त्यापैकी सर्वात पहिली निविष्ठा म्हणजे उत्तम बी–बियाणे. “आधी बीज एकले” अशी जीवनदृष्टी देणारी अध्यात्मिक मांडणी आपल्या संत-साहित्यात सापडते. तसेच “शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी” असे आध्यात्मिक आणि भौतिक पातळीवरील तथ्य सार रूपाने संतांनी सांगून ठेवले आहे. उत्तम बीज हा उत्तम शेतीचा पाया आहे. एक महत्त्वाची कृषी निविष्ठा म्हणून बियाण्याचे महत्त्व आणि त्याची वैशिष्ट्ये थोडक्यात समजून घेऊया.
कृषी निविष्ठा म्हणून बी-बियाण्यांची वैशिष्ट्ये आणि आव्हाने
बी-बियाणे हे आधुनिक तंत्रज्ञानाचे वाहक (carrier of technology) मानले जातात, कारण जैवतंत्रज्ञान किंवा तत्सम कुठल्याही आधुनिक पद्धतीने विकसित केलेल्या पिकांच्या उत्तम गुणधर्मांचा प्रसार आणि प्रत्यक्ष वापर बियांमार्फतच होत असतो. शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी जे विविध प्रकारचे संशोधन केले जाते, ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आणि शेतीत प्रत्यक्षात वापरण्याचे सर्वात किफायतशीर आणि वापरायला एकमेव आणि सुलभ साधन म्हणजे बी-बियाणे.
बियाण्यांची विक्री प्रक्रिया
असे असले तरी बियाण्यांची विक्री करणे मात्र इतर कृषी निविष्ठांच्या तुलनेत काहीसे गुंतागुंतीचे ठरते. कारण बी-बियाणे ही एकमेव अशी कृषी निविष्ठा आहे जी जिवंत असते, आणि तिचा जीवनकाल मर्यादित असतो. त्यामुळे त्यांची हाताळणी व साठवणूक करताना योग्य तापमान राखावे लागते. तसेच निर्मितीपासून साधारण 8-9 महिन्यांच्या कालावधीत त्यांची विक्री पूर्ण करावी लागते. कारण त्यानंतर त्यांची उगवणक्षमता कमी होऊ लागते. त्या तुलनेत कृषी रसायने, खते इत्यादी निविष्ठा मात्र गोदामात साठवणूक केल्यास साधारणपणे तीन वर्षे टिकतात. त्यामुळे इतर कृषी निविष्ठांच्या तुलनेत बियाण्यांची विक्री करणे ही अधिक आव्हानात्मक आहे.
शेतीच्या एका हंगामात कृषी रसायने, खते, यंत्रसामुग्री व अवजारे या इतर कृषी निविष्ठांच्या तुलनेत बी-बियाणे मागणी ही पेरणीच्या वेळी म्हणजे हंगामाच्या अगदी सुरुवातीलाच असते. अतिशय कमी कालावधीत म्हणजे केवळ एका महिन्याच्या कालावधीत विक्री प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
हे ही वाचा : कृषी निविष्ठा उत्पादनांची विक्री व्यवस्था
मागणीनुसार बियाण्यांचा पुरवठा
हवामान, पाऊसपाणी, शेतकऱ्यांची पसंती, सरकारी धोरणे आणि बाजारभाव यानुसार कोणत्या पिकाला, पिकांच्या कोणत्या जातीच्या बियाण्याला मागणी असणार हे ठरते. त्या मागणीनुसार पुरवठा करावा लागतो. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बी-बियाण्यांचा वापर हा irreversible असतो, तसेच त्यांचा वापर एकदाच करता येतो, पुनर्वापर करता येत नाही. एकदा पेरलेले बियाणे पुन्हा पूर्ववत करता येत नाही. त्यामुळे जर पेरणीनंतर ओला किंवा कोरडा दुष्काळ पडला तर बियाणे वाया जाते. शेतकऱ्याला दुबार पेरणी करावी लागते. तसेच इतर काही कारणाने शेतकऱ्याला ज्या प्रकारचे बियाणे अपेक्षित होते तसे ते निघाले नाही, तर त्याला फारसे काही करताही येत नाही, कारण पेरणीचा हंगाम निघून गेलेला असतो. त्यामुळे बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाले – उगवण व्यवस्थित झाली नाही किंवा नको त्या प्रकारचे बियाणे निघाले – तर शेतकरी मोठ्या संकटात सापडतो. पिक उत्पादनाचा त्याचा संपूर्ण हंगाम वाया जातो. बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीला या गोष्टीचे उचित भान ठेवून जबाबदारीने काम करावे लागते.
जागतिक बियाणे उद्योगाचा आढावा
जागतिक पातळीवर बी-बियाणे उद्योगाची वाढ होत आहे. गेल्या दहा वर्षांत या उद्योगाची वार्षिक उलाढाल 2014 मध्ये 52 अब्ज (5200 कोटी) अमेरिकन डॉलरवरून वाढून 2023-24 मध्ये 70 अब्ज (7000 कोटी) अमेरिकन डॉलर म्हणजेच 6,10,838 कोटी रुपये इतकी झाली आहे. या दरम्यान या उद्योगाचा वार्षिक वाढीचा दर साधारणपणे 4 ते 5 टक्क्यांच्या दरम्यान होता. अलिकडच्या 4-5 वर्षांमध्ये या बियाणे उद्योगामध्ये 7-8 टक्क्यांची वार्षिक वाढ झाली आहे.
अभिमानाची गोष्ट म्हणजे या जागतिक बाजारपेठेत अमेरिका, चीन, फ्रांस आणि ब्राझील या देशांच्यानंतर भारताचा क्रमांक पाचवा आहे. परंतु बी-बियाणे निर्यात करण्याच्या बाबतीत मात्र एकूण जागतिक बियाणे निर्यातीची बाजारपेठ वार्षिक 15 अब्ज (1500 कोटी) अमेरिकन डॉलर असून त्यापैकी नेदरलँड्स (320 कोटी), फ्रांस (230 कोटी), अमेरिका (180 कोटी) आणि जर्मनी (110 कोटी) या मुख्य निर्यातदार देशांच्या तुलनेत भारताची वार्षिक बियाणे निर्यात अगदीच कमी म्हणजे केवळ 15 कोटी अमेरिकन डॉलर इतकी आहे.
येत्या दशकात (2024 ते 2034) भारतातील बियाणे उद्योग अधिक जोमाने वाढून देशांतर्गत उलाढाल 6 अब्ज अमेरिकन डॉलर आणि निर्यात 1 अब्ज अमेरिकन डॉलर म्हणजेच एकूण 7 अब्ज अमेरिकन डॉलर या पातळीपर्यंत जाऊ शकतो, अशी आशादायक शक्यता NSAI – National Seed Association of India या संस्थेच्या तज्ञांनी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा : कृषी निविष्ठांची वैशिष्ट्ये
बियाण्यांचा अन्य वापर
बियाण्यांचा अन्नधान्य म्हणून वापर होण्यासोबतच अनेक धान्यांचा वापर जैविक इंधन – बायोफ्युएल म्हणून होऊ लागला आहे. तसेच अनेक देशांमध्ये जैवतंत्रज्ञानाला असलेला विरोध हळूहळू कमी होऊन त्याद्वारे निर्माण केलेल्या बियाण्याला मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर बियाणे उद्योग इथून पुढे अधिक सक्षमपणे वाढत जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
युवकांसाठी करियरची संधी
अशा या वेगाने वाढणाऱ्या बियाणे उद्योगाच्या क्षेत्रात कृषी (Agriculture) तसेच जैवतंत्रज्ञान (Biotechnology) विषयांच्या पदवीधर युवकांना करियरच्या अनेक उत्तम संधी उपलब्ध आहेत. यामध्ये, संशोधन व विकास कार्य (Research & Development) आणि विक्री व विपणन व्यवस्थापन (Sales & Marketing Management) ही प्रमुख क्षेत्रे आहेत. त्याशिवाय बियाणे निर्मिती, कृषी सेवा केंद्रामार्फत किरकोळ विक्री, कृषी सल्ला केंद्र इत्यादी अनेक प्रकारे स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.
बी-बियाणे उद्योगसंबंधी लेखांच्या यापुढील भागांमध्ये आपण या उद्योगाची आर्थिक तसेच कायदेशीर बाजू, वादग्रस्त ठरलेले बीटी जैवतंत्रज्ञान तसेच बियाणे उद्योगाची अन्य वैशिष्ट्ये समजावून घेऊ.