अनंत अंबानी यांच्या प्री वेडिंग सोहळ्या निमित्ताने पहिल्यांदा ‘वनतारा’ या प्रकल्पाची चर्चा झाली. वनताराच्या रेस्क्यू अॅण्ड रिहॅबिलिटेशन सेंटरच्या मैदानावर प्री वेडिंग सोहळ्यातील एका दिवसाच्या जेवणाचं आयोजन केलं होतं. या सोहळ्याच्या माध्यमातून अनंत अंबानी यांच्या संकल्पनेतून साकारलेला प्राणी संवर्धन आणि पुनर्वसन केंद्र असलेल्या या प्रकल्पाची माहिती सगळ्यांसमोर आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 4 मार्च 2025 रोजी या वन्यजीवांचा बचाव, पुनर्वसन आणि संवर्धन केंद्राचं उद्घाटन केलं. जाणून घेऊयात नेमका हा प्रकल्प कसा आहे.
वनतारा प्रकल्पाची निर्मिती
वनतारा हा गुजरात जामनगर इथे 3 हजार एकर जागेत परसलेला वन्यजीव संरक्षण, पुनर्वसन आणि संवर्धन केला जाणारा प्रकल्प आहे. उद्योजक मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांनी या प्रकल्पाची संकल्पना रेखाटली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प साकारला आहे.
या केंद्रामध्ये जवळपास विविध आपत्तीजन्य परिस्थितीतून वाचवलेल्या 1 लाख 50 हजार प्राण्यांचा सांभाळ केला जातो. तर जगभरातले 2 हजारहून अधिक दुर्मिळ किंवा नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्राण्यांचं संवर्धन करुन त्या प्रजाती वाढवण्यावर लक्ष दिलं जातं.
सगळ्यात मोठा प्राणी बचाव आणि संवर्धन केंद्र
वनतारा हा जगातला सगळ्यात मोठा प्राणी बचाव प्रकल्प आहे. जगभरातून धोकादायक स्थितीत असलेल्या, अपघात झालेल्या वा अन्य आपत्तीग्रस्त परिस्थितीत अडकलेल्या प्राण्यांना बाहेर काढून त्यांच्यावर वनतारामध्ये उपचार करुन त्यांची विशेष काळजी घेतली जाते.
या केंद्रात 25 हजार जंगली प्राण्यांवर उपचार सुरू आहेत. बचाव केंद्रासह जगातलं सगळ्यात मोठं दुर्मिळ प्राणी संवर्धन केंद्र म्हणूनही या प्रकल्पाची ओळख आहे. जवळपास 48 दुर्मिळ प्रजाती या केंद्रात आहेत. या सर्व प्रजातींची विशेष काळजी घेऊन त्यांच्या प्रजनन क्रियेवर लक्ष दिलं जातं.
PM Narendra Modi inaugurated and visited the wildlife rescue, rehabilitation, and conservation centre – Vantara – in Gujarat.
Vantara is home to more than 2,000 species and over 1.5 lakh rescued, endangered, and threatened animals.
PM explored various facilities at the centre.… pic.twitter.com/a162p81Jkt
— Reliance Industries Limited (@RIL_Updates) March 4, 2025
आशियातलं पहिलं प्राण्यांचं हॉस्पिटल
वनतारा हे वन्यजीव प्राण्यांसाठी असलेलं आशियातलं पहिलं हॉस्पिटल आहे. यामध्ये एमआरआय पासून सीटी स्कॅनपर्यंत सगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. या अत्याधुनिक सुविधांमध्ये अतिदक्षता विभाग (आसीयू), वन्यजीव भूलतज्ज्ञांचा विभाग, हृदयरोग चिकित्सा विभाग, एंडोस्कोपी, डेंटिस्ट, नेफ्रोलॉजी (मूत्रपिंडा संबंधित उपचार करणारा) विभाग आणि औषध पुरवठा विभाग असे सगळ्या प्रकारच्या सुविधा उभ्या केल्या आहेत.
प्राण्यांसाठी सगळ्यात मोठं क्वारंटाईन सुविधा पुरविणारं केंद्र
या केंद्रामध्ये जगभरातून अपघातग्रस्त प्राण्यांना उपचारासाठी आणलं जातं. अशावेळी या प्राण्यांना काही दिवस क्वारंटाईन केलं जातं. या कालावधीत त्यांच्यावर पूर्ण उपचार केले जातात. हे प्राणी पूर्ण बरे झाल्यावरच त्यांना इतर प्राण्यांसोबत ठेवलं जातं.
बिबट्या बचाव केंद्र
वनतारा हे जगातलं सगळ्यात मोठं बिबट्या बचाव केंद्र म्हणून नावारुपाला आलं आहे. या केंद्रामध्ये बिबिट्यावर उपचार करणारे अनुभवी डॉक्टर, नर्सेस आणि काळजी घेणाऱ्यांची टीम आहे. अपघातग्रस्त बिबट्या इथे आणल्यावर त्यांच्यावर पूर्ण उपचार करुन त्याला पूर्ण बरं करुन त्याचं पुनर्वसन करतात.
वनतारातला हत्ती विभाग
या ठिकाणी हत्तीच्या देखभालीसाठी वेगळा विभाग तयार केला आहे. जवळपास 250 हत्तींची या केंद्रात देखभाल केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक्स प्लॅटफॉर्मवरच्या पोस्ट मधल्या माहितीनुसार, या विभागात ॲसिड हल्ला झालेल्या हत्तीवर उपचार सुरू आहेत. तर एका आंधळ्या हत्तीची देखील काळजी घेतली जाते. त्याचप्रमाणे एका ट्रक अपघातामुळे जखमी झालेल्या हत्तीवरही इथे उपचार सुरू आहेत.
जंगली श्वापदांप्रमाणे मगरींचंही या प्रकल्पामध्ये पुनर्वसन करण्यात आलं आहे.
जागतिक संशोधन आणि संवर्धन केंद्र
वन्यजीव प्राण्यांच्या संवर्धनासाठी आणि त्यासाठी आवश्यक असलेलं संशोधन करण्यासाठी वनताराने एकुण 40 देशांशी करार केला आहे. यासोबतच ‘इंटरनॅशनल यूनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर’ आणि ‘द वर्ल्ड वाईल्डलाइफ फंड’ या आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत काम करते. त्याचप्रमाणे, वन्यजीवांच्या संवर्धनांसाठी अत्याधुनिक पद्धतीने काय काय करता येईल, या विषयावर काम करणाऱ्या जागतिक पातळीवरच्या विद्यापिठासोबतही संलग्न आहे.
कोविड 19 दरम्यान प्राण्यांच्या संरक्षणासाठी केलेलं कार्य
वनतारा प्रकल्पातील टीमने कोविड काळामध्येच सगळ्यात जास्त प्राण्यांचा बचाव करुन त्यांच्यावर उपचार केले होते. या सगळ्या प्राण्यांना चांगले उपचार देऊन त्यांचं पुनर्वसन केलं होतं.
जगभरातल्या जखमी वन्यजीव प्राण्यांना वनतारामध्ये आणण्यासाठी 75 ॲम्ब्युलन्स आणि हवाई वाहतुकीसाठीसुद्धा विशेष वाहनांचा ताफ्यांची सुविधा उपलब्ध आहे.
जागतिक पातळीवर वन्यजीव प्राण्यांच्या संवर्धन, बचाव कार्य, उपचार केंद्र, प्राण्यांच्या दुर्मिळ प्रजातींचं संवर्धन करणं, या प्राण्यांच्या प्रजननाविषयी धोरणात्मक कार्यक्रम आखणं, त्यासंदर्भात संशोधन करणं अशा सगळ्या गोष्टींसाठी एकच केंद्र स्थापन करुन या प्राण्यांची काळजी घ्यावी हेच या प्रकल्पाचं मुख्य उद्दीष्ट आहे.
संदर्भ – या लेखातील सर्व फोटो वनतारा संकेतस्थळावरुन घेतले आहेत.