काळाच्या ओघात एखादं शहर विस्तारत जातं. त्याचं रुप तर बदलतंच पण त्या शहरातील काही जुन्या, ऐतिहासिक वास्तूंना नवीन ओळख, नवीन आयाम मिळतो. मात्र या बदललेल्या रुपातही त्या वास्तूचं महत्व कायम असतं. फक्त नव्या पिढीला तिची जुनी ओळख राहिलेली नसते. असा प्रकार पाहायला मिळतो तो ठाण्याच्या किल्ल्याबाबत. मुळात सध्याच्या ठाणेकर नागरिकांपैकी अनेकांना आपल्या शहरात एक ऐतिहासिक किल्ला आहे हेच माहित नाही. कारण गेली 192 वर्षे हा किल्ला तुरुंग म्हणून वापरला जातो. त्यामुळे या ठिकाणी ठाणे मुक्तिदिनाचा रोमहर्षक संग्राम लढला गेला होता आणि हा किल्ला ठाण्याचा रक्षक होता हेच जनस्मृतींमधून पुसलं गेलं आहे.
पोर्तुगिजांकडून ठाणे किल्ला बांधकामाला सुरुवात
सन 1730 मध्ये पोर्तुगिजांनी ठाणे शहरावर आपली पकड घट्ट करायला हा किल्ला बांधायला घेतलेला. आंद्रे रुबिनो कुटिन्हो या वास्तुविशारदाच्या आराखड्यानुसार किल्ल्याचे बांधकाम सुरू झाले. पंचकोनी ताऱ्याच्या आकारात हा किल्ला उभा राहू लागला. मूळ आराखड्यानुसार या किल्ल्याला पाच भरभक्कम बुरूज होते. पोर्तुगिजांनी या बुरुजांना सॅम पेद्रो, जेरेनिमो, जोस, दुआवो आणि मार्सल अशी नावे ठेवली होती. किल्ल्याच्या पूर्वेला ठाण्याची खाडी असल्यामुळे त्याला त्या बाजूने नैसर्गिक संरक्षण मिळाले होते. इतर बाजूंनी किल्ल्याभोवती खंदक खोदण्यात आला होता आणि त्यात पाणी भरले होते. किल्ल्याच्या प्रत्येक बुरुजावर दूर पल्ल्याच्या आणि जवळ मारा करू शकणाऱ्या तोफा ठेवलेल्या होत्या. तेव्हा लुई बतेल्लो हा किल्लेदार होता आणि त्याच्या हाताखाली 80 पोर्तुगिज, 100 स्थानिक सैनिक होते.

मराठ्यांनी किल्ला जिंकून बांधकाम केलं पूर्ण
किल्ल्याचे बांधकाम सुरू असतानाच मराठ्यांनी हल्ला चढवला आणि 27 मार्च 1737 रोजी किल्ला जिंकला. ठाणे पोर्तुगिजांच्या तावडीतून मुक्त केले. त्यानंतर किल्ल्याचे अपुरे राहिलेले काम मराठ्यांनी पूर्ण केले आणि ठाणे खाडीच्या किनाऱ्यावर पाच भक्कम बुरुजांचा किल्ला उभा राहिला. मराठ्यांनी या बुरुजांना फत्ते बुरुज, हणमंत बुरुज आणि गगन बुरुज अशी नावे दिली.
ठाणे किल्ल्याचा पहिला कैदी
सन 1774 च्या डिसेंबरमध्ये मुंबईहून जनरल रॉबर्ट गॉर्डन याने आरमार घेऊन ठाण्याच्या किल्ल्यावर हल्ला केला आणि मराठ्यांकडून ठाणे जिंकून घेतले. तेव्हा या पंचकोनी किल्ल्याचे बुरुज आणि तटबंदी भक्कम असून त्यावर शंभरपेक्षा जास्त तोफा असल्याची नोंद केलेली पाहायला मिळते. पुढे काही वर्षे किल्ला म्हणूनच या वास्तूची देखभाल आणि निगराणी ब्रिटिश करत होते.सन 1816 मध्ये पेशवाईचे कारभारी त्र्यंबकजी डेंगळे यांना बडोदा संस्थानाचे प्रतिनिधी गंगाधर शास्त्री यांच्या खुनासाठी जबाबदार ठरवून याच किल्ल्यात बंदिवान ठेवण्यात आले. ते बहुदा या किल्ल्यातील पहिले कैदी म्हणता येतील. मात्र त्र्यंबकजी डेंगळेंनी अतिशय हुशारीने या कैदेतून पळ काढला (त्याची रोमहर्षक कथा ठाण्याच्या गॅझेटमध्ये अवश्य वाचाची). त्यामुळे या किल्ल्यातील कारागृहातून पळणारे पहिले कैदी म्हणूनही डेंगळेचे नाव घ्यावे लागते.
हे ही वाचा : ठाण्याचं ग्रामदैवत श्री कौपिनेश्वर मंदिर
1844 मध्ये कैद्यांकडून जिल्हा न्यायाधीशांना मारण्याचा प्रयत्न
सन 1833 मध्ये मात्र ब्रिटिशांनी या किल्ल्याचे रुपांतर पूर्णपणे कारागृहात केले. त्यासाठी किल्ल्यातील अंतर्गत रचना बदलण्यात आली. कैद्यांसाठी कोठड्या निर्माण करण्यात आल्या. सन 1844 मध्ये जिल्हा न्यायाधीश तुरुंगाची पाहाणी करण्यासाठी आलेले असताना, कैद्यांनी त्यांना पकडून मारण्याचा प्रयत्न केला जो अयशस्वी ठरला.
तुरुंगांच्या कायापालटाकरता 1876 मध्ये 4 लाख रुपये
सन 1876 मध्ये 4 लाख 8 हजार रुपये खर्च करुन तुरुंगाचा कायापालट करण्यात आला. किल्ल्याच्या पश्चिम द्वाराजवळील मनोऱ्याचे रुपांतर पहारेकऱ्यांची खोली आणि सुपरिटेंडंटचे निवासस्थानामध्ये करण्यात आले. किल्ल्यात स्वतंत्रपणे महिला वॉर्ड आणि हॉस्पिटल तयार करण्यात आले. तेव्हा या कारागृहात एक हजार कैदी आरामात सामावू शकत होते.
हे ही वाचा : ठाणे – एक समृध्द बंदर !
क्रांतीकारक राघोजी भांगरेंना फाशी
भारताच्या स्वातंत्रलढ्याला जोर आल्यानंतर या तुरुंगाचा वापर वेगवेगळ्या काळात महाराष्ट्रातील अनेक नामवंत स्वातंत्रसैनिकांना बंदिवासात ठेवण्यासाठी करण्यात आला. नाशिक जिल्ह्यात राघोजी भांगरे यांनी आपल्या शूर साथिदारांसह ब्रिटिश सरकारविरुध्द सशस्त्र उठाव केला. त्यांच्या धाडसी कारवायांनी सरकार जेरीस आले होते. अखेर सन 1847 मध्ये त्यांना पकडण्यात सरकारला यश आले आणि क्रांतीकारक राघोजी भांगरे यांना ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आले. नोव्हेंबर 1879 ते जून 1880 या काळात आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना याच तुरुंगात ठेवण्यात आले होते.
ठाणे तुरुंगातील हुतात्मा स्मारक
सन 1909 मध्ये गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश न्यायालयाने काळ्यापाण्याची (अंदमान) शिक्षा ठोठावली. अंदमानला पाठवण्याआधी बाबारावांना ठाण्याच्या कारागृहात ठेवण्यात आले होते. बाबारावांवरील अन्यायाचा निषेध म्हणून अनंत कान्हेरे, अण्णा कर्वे, विनायक देशपांडे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध केला. या तिघांना 11 एप्रिल 1910 रोजी ठाण्याच्याच तुरुंगात फाशी देण्यात आली. आता ठाण्याच्या तुरुंगात या हुतात्म्यांचे स्मारक आहे. सन 1911 मध्ये स्वातंत्रवीर सावरकरांनाही अंदमानला पाठवण्या आधी ठाण्याच्या कारागृहात ठेवण्यात आले होते.
राजबंदींचं ठाणे कारागृह
पुढे स्वातंत्र्य आंदोलन ऐन भरात आले. तेव्हा ठाण्याचे किल्ला कारागृह राजबंद्यांनी खच्चून भरले. त्यांच्याशी संपर्क ठेवण्यासाठी ठाण्यात ‘राजबंदी सेवा समिती’ स्थापन करण्यात आली. या काळात स्वामी आनंद, बाळासाहेब खेर, एस.एस.जोशी, केशव गोरे, माधव लिमये, द.म.सुतार, नाथा ताम्हाणे यांनी या तुरुंगात कारावास भोगला. 1942 च्या चळवळीत महिलांच्या बराकीत जागा नसतानाही महिलांना डांबण्यात आले, तेव्हा तीस महिलांनी बैठा सत्याग्रह करुन तुरुंग प्रशासनाला नमवले होते. स्वातंत्र्यानंतरही आणीबाणी विरोधी आंदोलनात ठाणे कारागृहात राजबंदी ठेवण्यात आले होते.
‘संजय दत्त’,‘हर्षद मेहता’ असे वलयांकित (!) कैदी ही या कारागृहाने पाहिले आहेत. मात्र मुळातला ठाण्याचा संरक्षक किल्ला जो स्वातंत्रसैनिकांच्या वास्तव्याने पावन झाला, तो आज दरोडेखोर, खूनी आणि इतर गुन्हेगारांची बंदिशाळा बनला आहे. तिथे खरंतर ठाण्याच्या स्वातंत्र्य चळवळीची स्मृती जागवणारे संग्रहालय व्हायला हवे.
7 Comments
अत्यंत मोलाची माहिती…बऱ्याच जुन्या गोष्टी नव्याने कळल्या…Thanx for sharing
लेखकाने वाचकांना खूप ऐतिहासिक ठाण्याची माहिती दिली त्याबद्दल लेखकाचे मनःपूर्वक आभार मानतो.
आम्ही ठाण्यातच असतो. किल्ल्याच्या म्हणजेच जेलच्या समोरून येता जाताना मला त्या किल्ल्याबद्दल नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. आता तुमचा लेख वाचून हा किल्ला आतून बघण्याची उत्सुकता अधिक वाढली.
खूप छान लिहिलंय. धन्यवाद!
या आधीचेही लेख वाचते आता.
आम्ही ठाण्यातच असतो. किल्ल्याच्या म्हणजेच जेलच्या समोरून येता जाताना मला त्या किल्ल्याबद्दल नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. आता तुमचा लेख वाचून हा किल्ला आतून बघण्याची उत्सुकता अधिि वाढली.
खूप छान लिहिलंय. धन्यवाद!
या आधीचेही लेख वाचते आता.
खूप छान. ज्ञानात भर पडली. <> या वाक्याशी मी २००% सहमत आहे.
सुरेख लेख 👌🏻
ठाण्याचा किल्ला आणि परिसर पाहण्यासाठी अवश्य भेट द्यायला पाहिजे.
अतिशय छान माहिती. मी जेल मध्ये फाशी गेट तसेच मागील दरवाजा जो फार पुर्वी खडी लगत होता, जेथून स्वा. सावरकर यांना जेल मधून अंदमान येथे नेले होते तो दरवाजा पण बघितला आहे.