कोकणात कला आणि लोकपरंपरा विविध सण आणि उत्सवांच्याद्वारे विशेष रूपांत जतन झाल्या आहेत. कोकणातील होळी म्हणजेच शिमगा हा असाच एक उत्सव. कोकणातून स्थलांतरित झालेल्या प्रत्येक कोकणी माणूस शिमग्याला कोकणात जातोच. कोकणच्या शिमग्याचे वैशिष्ट्य काय? फाल्गुन शुक्ल पंचमीपासून होळी पौर्णिमेपर्यंत चालणारा हा सण. या सणाला हाका घातल्या जातात किंवा बोंबा मारल्या जातात म्हणून ह्याला ‘हाक पंचमी’ असेही म्हणतात. हाक पंचमीला पहिली होळी देवळात पेटवली जाते. त्यानंतर विविध ठिकाणी होळी पेटते. यावेळेस देव देवळातून बाहेर पडतात. त्यांच्या पालख्या गावात फिरतात. त्यासोबत नमन गण गवळण अशा विविध कला साजऱ्या केल्या जातात. अशाप्रकारे उत्सव-परंपरांचा कलेसोबत संगम झालेला आढळून येतो. तर जाणून घेऊयात संकासूरची कथा.
संकासूर राक्षसाची कथा
संकासूर जरी पौराणिक असला, तरी तो देव नाही. तो एक राक्षस आहे. दशावतारातील मत्स्यावताराशी ही कथा जोडली गेली आहे. हयग्रीव नावाचा राक्षस होता. त्याने वेद चोरले आणि ते घेवून तो समुद्राच्या तळाशी गेला. तेथे तो एका शंखात जावून लपला. विष्णुने मत्स्यावतार घेवून समुद्राच्या तळाशी जावून हयग्रीव राक्षसाचा वध केला आणि वेद सोडवून आणले. म्हणून हा शंकासूर. आणि त्याचा अपभ्रंश संकासूर.
कोकणातील शिमग्याच्या वेळेस येणारा संकासूराशी निगडित हीच कथा सांगितली जाते. ह्या कथेचे लौकिक स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे दिले जाते. बहुजन समाजाला वैदिक शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्यांच्या पर्यंत हे ज्ञान पोहोचविण्याचा संकासुराने प्रयत्न केला म्हणून बहुजन समाज त्याला मानतो. शिमग्याच्या वेळेस ह्या संकासूर राक्षसाचं आदरातिथ्य होतं. त्याला मान मिळतो. या राक्षसाच्या वेठीचा मार खाणं आशीर्वादरूप समजलं जातं.
संकासूराचं रूप
संकासूराचा गळ्यापासून पायापर्यंत काळा रंगाचा वेश असतो. त्याच्या डोक्यात शंकूच्या आकाराचा टोपी असते. म्हणूनही त्याला शंकासूर म्हणतात असे सांगितले जाते. कपाळावर, दंडावर, अंगावर पांढर्या भस्माचे पट्टे असतात. काळ्या रंगाचा विशिष्ट जाड कापडी मुखवटा, त्याला जोडलेली लांबलचक पांढरी दाढी, आणि त्यातून लोंबणारी लाल जीभ संकासुराचे रूप अधोरेखित करतात. त्याच्या कंबरेला घुंगरांचा जाड पट्टा बांधलेला असतो. संकासुराच्या नृत्याच्या वेळेस त्याचा विशेष नाद निर्माण होतो. हातात दोऱ्याचा किंवा चामड्याचा वेठ असतो. गावाची वेस बदलली, की संकासूराच्या रूपातही बदल होतो. पण संकासूर पहावा तो गुहागरचाच! असे स्थानिक म्हणतात. गुहागरच्या संकासूराच्या कमरेच्या घुंगराचा पट्टाच चार किलो वजनाचा असतो. हातातली वेठी, आणि त्याचा नाच विशेष लक्षणीय असतो.
संकासुराची वेठी पाठीवर पडणे, हे भाग्याचे मानले जाते, आणि ती वेठी पाठीवर पडण्यासाठी लोक आसुसलेले असतात. ती संकासुराच्या कायम हातात असते, ती घेवूनच तो अख्खी गावभोवनी करत असतो.
हे ही वाचा : कोकणातील वेतोबा
गाव रक्षक संकासूर
कोकणात स्थानिक आपापल्या श्रध्देनुसार संकासुराला पुजतो. काही त्याला शंकराचा अवतार तर काहीजण त्याला ग्रामदेवीचा दूत असेही म्हणतात. तर काही त्याला गावाचा रक्षक असेही म्हणतात. या सर्वात त्याच्याविषयी कुठेही नकारात्मक भावना नाही. गावाचा रक्षक ही त्याच्यामागची उपाधी खूपच सुचक आहे, कारण कोकणात संकासुराचा दराराही तितकाच आहे. प्रसंगी तो लोकांना, लहान मुलांना घाबरवतो. अभ्यास न केल्यास शिक्षा करतो. तर प्रसंगी तो बाळगोपाळांमध्ये रमतो म्हणून काहीजण त्याला श्रीकृष्णाचा अवतारही समजात.
संकासूराला नवस बोलण्याची प्रथा
संकासूराला कोकणात नवसही बोलला जातो. यावर्षीच्या शिमग्यात बोललेला नवस पुर्ण झाला, तर पुढच्या वेळी तो यथाशक्ती फेडला जातो. साधारण नोकरी-धंद्यातील यश, संततीप्राप्ती, लग्नाची जुळवणूक यासाठी नवस बोलले जातात. नवसही साधेच गुळ-खोबऱ्याचे, नारळाच्या तोरणांचे किंवा जेवणांचे बोलले जातात.
संकासूराला आदराचं स्थान का?
एक प्रश्न इथे उपस्थित होतोच. एक राक्षसाला इतका मान कसा काय मिळतो. नमनात तर त्याचे स्थान गणपती आख्यानाआधी असते. गणपतीच्या आधी तो नाच करून जातो. या बाबतीत स्थानिक लोक पुढील स्पष्टीकरण देतात.
संकासूराने मूळात ब्रम्हाचे वेद पळविले नाहीच. चारही वेद अनार्यांचीच संपत्ती होती. संकासूर त्यांचा राजा होता. ते वेद ब्रम्हानेच आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आपल्या ताब्यात ठेवले होते. आणि तेच संकासुराला पुन्हा मिळवायचे होते. म्हणून त्याने ते मिळविले. परिणामी संघर्ष उपस्थित झाला. यात संकासूराचा पराभव झाला. नेहमीप्रमाणे इतिहास हा जेत्याच्या बाजूने लिहिला जातो येथेही संकासूराच्या बाबतीत तेच झाले असावे, असे स्थानिक सांगतात. ही पुराणातील प्रस्थापित कथेच्या विरुध्द कथा असली तरी कोकणवासीयांच्या मनातील संकासूराचे स्थान स्पष्ट करते.
हे ही वाचा : कोकणातील ‘तरंग’ देवता
संकासुरासोबत अन्य कलांचे सादरीकरण
कोकणात विविध ठिकाणी संकासूरासोबत काही इतरही कला सादर केल्या जातात. त्यातील एक म्हणजे काठखेळ. डोक्याला पागोटे अंगात झगा घालून काही मंडळी संकासुरासोबत नाचत टिपऱ्या खेळतात. यालाच कापडखेळे असेही म्हणतात.
काही ठिकाणी संकासूरासोबत नकट्या नाचतो. नकट्या रंगीबेरंगी कपडे घालून हातात सुप घेवून नाचतो. तो वैशिष्ट्यपूर्ण आंबाडीच्या लाकडापासून बनविलेला मुखवटा धारण करतो.
काही वेळेस संकासूर आपली सखी गोमूसोबत नाचतो. गोमु म्हणजे स्त्री वेशातील पुरूष. तिला बर्याच ठिकाणी गोमू असे म्हणत असले तरी रत्नागिरीतील काही भागात तिला कोळीण म्हणतात. ज्या ठिकाणी संकासुराला कॄष्णाचा अवतार मानतात तेथे ह्या गोमुला राधा म्हणतात. काही ठिकाणी गोमुला ग्रामदेवतेचे स्वरूप मानले जाते.
पूर्वी संकासुरासोबत मोराची पिसे घेवून नाचणारा एक नर्तकही असायचा. त्याला कुचेवाला असे म्हणत. संकासूराच्या खेळासोबत मॄदुंगवादकालाही महत्व असते. मृदुंगाच्या साथीने संकासूराच्या खेळाला लयबध्दता येते.
शेतकरी सादर करतात संकासुरांचे खेळ
कोकणातील शेती करणारा कष्टकरी समाज मुख्यत्वेकरून संकासुराचे खेळ सादर करतो. साधारण शिमग्याच्या दरम्यान शेतीची कामे आटपलेली असतात. त्यावेळी या समाजातील काही लोक गावोगावी जावून संकासुराचे खेळ करतात. त्यातून मिळालेला शिधा किंवा दक्षिणा यावर गुजराणा करतात. त्यांना नमन मंडळ असे म्हणतात.
हे ही वाचा : कला आणि सावंतवाडी
मुंबईतले चाकरमनी ते संकासुरांचे कलाकार
ही संकासूराची कला सादर करणारे अनेक लोक हल्ली मुंबईला स्थायिक झाले आहेत. हे सर्व कला सादर करायला आवर्जुन कोकणात येतात. हाक पंचमीच्या दुसऱ्या दिवसापासून खेळांची तयारी करतात. प्रथम सहा मानाच्या घरी खेळ केले जातात. नंतर सलग सकाळ ते रात्र आजूबाजूच्या गावात खेळ करण्यास सुरुवात करतात. होळीच्या दोन दिवस आधी हे कलाकार आपापल्या घरी परत येतात आणि गावात खेळ करतात. त्यानंतर मात्र गुढीपाडव्यापर्यंत आमंत्रणानुसार विविध ठिकाणी खेळ केले जातात. गुढीपाडव्याला गावच्या देवळात देवीच्या किंवा देवाच्या पालखीसमोर शेवटचा खे्ळ केला जातो. त्यानंतर मात्र त्या वर्षासाठी संकासूराचा खेळ थांबतो. आणि पुढच्या वर्षी शिमग्याला सुरू होतो.
नमन मंडळात हल्ली जुन्या कलाकारांसोबत नवीन पिढीही सहभागी होत आहे. त्यामुळे या कलेचं जतन होण्यास मदत होत आहे.