पाणी टंचाई ते पाणी पुरवठादार गावं

Water Conservation : मार्च महिना सुरू होताच अनेक गावात पाणी टंचाई जाणवायला लागते. यावर मात करण्यासाठी मग विहिर खोलीकरण, नवीन बोअरवेल करणे, इतरांच्या विहिरी अधिग्रहीत करणे आणि सरतेशेवटी टॅंकरने पाणी पुरवठा करणे अशा अनेक उपाययोजना राबवल्या जातात. यासाठी सरकारी पातळीवर व स्वयंसेवी संस्थांकडून राबविल्या जाणाऱ्या योजना आणि उपक्रमांबद्दल जाणून घेऊया.
[gspeech type=button]

मार्च महिना सुरू होताच अनेक गावात पाणी टंचाई जाणवायला लागते. यावर मात करण्यासाठी मग विहिर खोलीकरण, नवीन बोअरवेल करणे, इतरांच्या विहिरी अधिग्रहीत करणे आणि सरतेशेवटी टॅंकरने पाणी पुरवठा करणे अशा अनेक उपाययोजना राबवल्या जातात. यासाठी सरकारी पातळीवर व स्वयंसेवी संस्थांकडून राबविल्या जाणाऱ्या योजना आणि उपक्रमांबद्दल जाणून घेऊया.

सरकारी योजना

‘जल हेच जीवन’ या उक्तीनुसार मानवी जीवनात पाण्याचे अनन्य साधारण महत्त्व आहे. शहरी व ग्रामीण भागात योग्य प्रमाणात पाणी पुरविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने आजवर बरेच प्रयत्न केले आहेत. त्यासाठी अनेक योजनाही आखल्या. महात्मा फुले शिवकालीन पाणी साठवण योजना, पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन योजना, जलस्वराज्य प्रकल्प, जलजीवन मिशन, अटल भूजल योजना, जलशक्ती अभियान अशा विविध योजना आतापर्यंत राबवल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून पावसाचे पाणी साठवून जलसंवर्धनावर भर देण्यासाठी ‘कॅच द रेन’ मोहिम सुरू करण्यात आली.

पुढे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नियोजनबद्ध कृती आराखडा तयार करून 2019 पर्यंत महाराष्ट्र राज्य पाणी टंचाईमुक्त करण्याचे उद्दिष्ट दिले गेले. मात्र अजूनही अनेक गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटलेला नाही.

जल चळवळीची गरज

राज्यातील अनेक दुर्गम गावांमध्ये जल चळवळ, जलक्रांती याविषयी जनजागृती झालेली नाही. गावातील प्रत्येक व्यक्तिला दरदिवशी कमीत कमी 55 लिटर शुद्ध, शाश्वत पाणी मिळणं गरजेचं आहे. यासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असणं आवश्यक आहे. यासाठी गाव पातळीवर लोक चळवळ उभी करुन घरातील पाणी घरात, गावातील पाणी गावात आणि शेतातील पाणी शेतात मुरविण्यासाठी प्रत्येक ग्रामस्थाला पुढाकार घेणं गरजेचं आहे. त्यातून या समस्येवर काही अंशी उपाय निश्चित सापडू शकतो. काही गावांनी यासाठी केलेले प्रयत्न खरोखर वाखाणण्याजोगे आहेत. पाहुयात ही गावं.

बोरखेडी पॅटर्न –

नागपूर जवळच्या बोरखेडी रेल्वे या गावात तत्कालीन सरपंच राजूभाऊ घाटे यांनी गावाजवळून वाहणाऱ्या नाल्यावर श्रमदानातून वनराई बंधारे बांधले आहेत. आणि नाल्यात जागोजागी उभे आडवे बोअर केले आहेत. गावात अधिकाधिक शोषखड्डे करुन सांडपाणी, पावसाचे पाणी त्यात मुरवले जाते. विहिरी पुनर्भरण प्रक्रिया आणि माती नाला बांध यावर भर दिला. त्यामुळे गावातील पाणी पातळी वाढली. या गावाने जलसंधारणासाठी केलेल्या कार्याची दखल घेत सरकारने त्याला ‘बोरखेडी पॅटर्न’ हे नाव दिलं. आजही गावातील लोक पाणीसाठा, पाणी टंचाई, पाण्याच्या योग्य वापराविषयी जागृत आहेत. जलसंवर्धनासाठी गावातील एक थेंब भर पाणी वाया जाणार नाही, याची दक्षता घेतात.

ब्राम्हणी –

याच बोरखेडी रेल्वे गावाच्या बाजूला ब्राम्हणी म्हणून गाव आहे. या गावातल्या विहिरी जानेवारी महिन्यापासून कोरड्या पडायला सुरुवात होते. मग बाजूच्या गावातल्या विहिरी प्रशासन ताब्यात घेते आणि या गावातल्या ग्रामस्थांना पाणी पुरवते. मात्र, हे असं किती वर्ष चालणार? गावातल्या लोकांनी एकत्र येत यावर कायमस्वरुपी उत्तर काढण्यासाठी पाऊल उचललं. लोकसहभागातून त्या गावात पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीच्या उतारावर दोन मोठे तलाव खोदले. पावसाचे पाणी त्या तलावात मुरत गेले. घरोघरी शोषखड्डे खणून त्यात पाणी मुरवलं जाऊ लागलं. हळूहळू या गावात पाणीसाठ्याची पातळी वाढू लागली. आज हे ब्राह्मणी गाव पाणी टंचाई मुक्त आहे. सोबतच आजूबाजूच्या इतर गावांनाही या गावातून पाणी पुरवलं जात आहे.

हे ही वाचा : नवरत्न संकल्पना : ग्राम सन्मानाच्या नऊ संकल्पना

खूर्सापार –

नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातल्या खुर्सापार या गावात सर्व सरकारी इमारतींवर ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ करून पाणी जमिनीत मुरविलं जात आहे. प्रत्येक घरात शोषखड्डा खणण्याची सक्ती केली जाते. गावातील तलावाचे खोलीकरण करून वाहून जाणारे पाणी तिथे अडविले जाते. टेकडीवर पुनर्भरण चर, नाल्यात रिचार्ज शाप्ट, नदीवर सिमेंट बंधारा, माती नाला बांध असे विविध प्रयोग केले आहेत. सरपंच सुधीर गोतमारे यांच्या दूरदृष्टी व लोकांना सोबत घेत केलेल्या प्रयत्नामुळे गावातील आठशे फुटावर असलेली पाण्याची पातळी आज तीनशे फुटावर आलेली आहे.

एनिकोनी –

नरखेड तालुक्यातील एनिकोनी गावात सरपंच सौ. उषा मनीष फुके यांनी लोकसहभातून गावातील पाणी बाहेर जाणार नाही याची काळजी घेतात. गॅबियन बंधारे, वनराई बांध, छतावरील पाण्याचे नियोजन करत जलसंधारणाचे विविध प्रयोग करून गावातली पाणीसाठा पातळी वाढवली आहे.

जरूड –

अमरावती जिल्ह्यातील जरूड हे कोरड्या पट्ट्यात येणारं गाव. इथे पाणीसाठा कमी होत चालल्यामुळे ग्रामस्थांना चिंता लागली होती. पण सरपंच मानकर यांनी वेळीच जलसंवर्धनाचं काम हातात घेतलं. गावातील नदीचे खोलीकरण, जागोजागी बांध, शोषखड्डे, रेनवॉटर हार्वेस्टिंग, विहिर पुनर्भरण असे प्रयोग केले. यासोबतच वॉटर बजेट, पीक नियोजनासारखे प्रयोग ही यशस्वीरित्या राबवले. आज या गावच्या पाणीपातळीत चांगली वाढ झाली आहे. पाण्याच्या योग्य नियोजनामुळे शेतीलाही मुबलक पाणी मिळालं. त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न ही वाढलं आहे.

असेच प्रयत्न विदर्भात वर्धा जिल्ह्यातील मिर्झापूर, चंद्रपूर जिल्ह्यातील मंगी, भंडारा जिल्ह्यातील बेला, गडचिरोली जिल्ह्यातील दिभना या गावांनी केले आहेत. त्यामुळे या गावातली पाणी टंचाई कमी झाली आहे.

पाणी टंचाई ही ज्वलंत समस्या असताना अशा प्रयोगांमुळे ही गावे आज ‘पाणीदार’ ठरलेली आहेत. इतर गावांनीही लोकसहभागातून आपल्या गावात असे प्रयोग केल्यास पाणी प्रश्न सुटण्यास बरीच मदत होऊ शकते. यासाठी आपल्या पुढील गोष्टी आत्मसात करता येतील.

हे ही वाचा : योजनांच्या अभिसरणासाठी विशेष उपक्रम

आपल्या सवयी बदलणे गरजेचे

पाण्याच्या योग्य वापरासाठी प्रत्येकाला आपल्या सवयीत बदल करणं गरजेचं आहे. दैनंदिन वापरामध्ये पाण्याचा जपून वापर केला पाहिजे. एखाद्या कामासाठी आवश्यक तितकंच पाणी वापरावं. पाण्याचा नळ सुरू ठेवू नये. नळाला गळती लागली असेल तर वेळीच दुरुस्त करुन घ्यावा.

गावपातळीवर पाण्याचे अंदाजपत्रक तयार करणे

आपल्या गावाला एकूण किती पाण्याची गरज आहे, शेतीसाठी किती पाणी लागणार आहे, भूजल पातळी किती आहे याची माहिती घेऊन त्यानुसार नियोजन केलं पाहिजे. यासाठी पाण्याच्या उपलब्धतेनुसार, गावात कोणती पिके घ्यावीत, कोणत्या पिकाला अधिक पाणी लागते, यासह पाणी साठवण्यासाठी मार्ग शोधले पाहिजेत.

पाणीपुरवठा योजनेचे संचालन, देखभाल व दुरुस्ती

गावात पाणीपुरवठा करणारी जी योजना कार्यरत असेल त्याची योग्य देखभाल करावी. सर्व उपकरणांची वेळीच दुरुस्ती करून घेणे हे गावकऱ्यांचं कर्तव्य आहे. पाण्यात रासायनिक अथवा जैविक प्रदूषण आढळल्यास आरोग्य विभाग, पाणी पुरवठा विभाग यांच्याशी संपर्क साधून योग्य उपाय योजना कराव्यात. पिण्याचे पाणी नियमित मिळण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करावा.

पाणीपट्टी वेळेवर भरली गेली पाहिजे यासाठी गावात सगळ्या नळांना वॉटर मीटर बसविले पाहिजेत. यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता समितीने आग्रही राहिले पाहिजेत. या निर्णयाची अजूनही सगळ्या गावांमध्ये प्रभावी अंमलबजावणी होताना दिसून येत नाही.

आपल्या गावात पाणी प्रश्न तीव्र बनू नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून घरातले पाणी घरात, गावातले पाणी गावात आणि आपल्या शेतातलं पाणी शेतात मुरवून भूजल पातळी वाढवणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने त्या दृष्टीने नियोजन केलं, तर सरकारवर अवलंबून रहावं लागणार नाही. कारण जल स्वराज्यातूनच ग्राम स्वराज्य प्राप्त करता येते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

हिंदी चित्रपटसृष्टी आणि मालिकांनी साप किंवा नागांची प्रतिमा काहीशी नकारात्मक निर्माण केली. खजिन्याचा रखवालदार बदला घेणारा, इच्छादारी अशा वेगवेगळ्या रुपात
Diet For Sports : बॅडमिंटन आणि टेनिस या दोन्ही खेळामध्ये सततची रॅली, स्मॅश, सर्व्हिस आणि रिसिव्ह यामुळे लेगवर्क, रिफ्लेक्सेस, आणि
BPH, प्रोस्टेटायटिस किंवा प्रोस्टेट कॅन्सर—हे गंभीर असू शकतात, पण योग्य माहिती, वेळीच तपासणी आणि निरोगी जीवनशैलीने यावर नियंत्रण ठेवता येते.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ