पॅरिस पॅरालिम्पिंकमध्ये आर्चरी (तिरंदाजी) या क्रीडाप्रकारात ब्रॉन्झ पदक मिळवत शीतल देवी ही घराघरात पोहोचली. शारीरिक व्यंगत्व असलं तरी प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनत ही माणसाला सारं काही मिळवून देते याचं हे उदाहरण होतं. शीतल देवी अशा या एकट्या नाही आहेत. आणखीन एक शीतल देवी आपल्या देशात घडत आहे. आणखीन एक प्रेरणास्थान उदयाला येत आहे आणि ती म्हणजे पायल नाग.
दिल्लीमध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये पॅरा आर्चरी क्रीडा प्रकारात शीतल देवी आणि पायल नाग यांचा अंतिम सामना झाला. या सामन्यात शीतल देवीने गोल्डन मेडल तर पायल नागने सिल्वर मेडल मिळवलेलं आहे. पायलला दोन्ही हात आणि पाय नाहीत. तरी ती आर्चरी या खेळामध्ये अप्रतिम कामगिरी करत सर्वांना अचंबित करत आहे.
वयाच्या पाचव्या वर्षी हातपाय गमावले
पायल नाग ही मुळची ओडिसातली. ओडिसातल्या बालंनगीर जिल्ह्यातल्या एका सामान्य कुटुंबामध्ये तिचा जन्म झाला. जन्मत: तिला कोणतंच शारीरिक व्यंग नव्हतं. वयाच्या पाचव्या वर्षी तिला 11 हजार व्हॉल्टचा विजेचा धक्का लागला. या अपघातात तिने पाय गमावले आणि कोपऱ्यापासूनचे हातही गमावले. ही घटना 2015 साली घडली. या धक्क्यातून तिचं कुटुंब कसंबसं सावरलं. चार वर्ष ती तिच्या कुटुंबियांसोबत राहिली. चार वर्षानंतर तिला पार्वतीगिरी बालनिकेतन या अनाथ आश्रममध्ये ठेवण्यात आलं. पुढे या आनाथाश्रमामध्येच तिचं संगोपन झालं.
तोंडानं केली रंगाशी मैत्री

अलिकडे शारीरिक व्यंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी त्याच्या आवडीनुसार विविध कौशल्य शिकवले जातात. पायलला चित्रकला आवडायची. हात-पाय दोन्ही नसल्यामुळे पायलने तोंडामध्ये पेन्सिल आणि रंगांचे ब्रश धरुन चित्रकला शिकली. ती अनेक चित्र काढून सराव करू लागली.
या चित्रकलेनेच पुढे पायलच्या भविष्याचं चित्रही रंगवलं. पायलच्या चित्रकलेतलं वेगळंपण कुलदीप वेदवाण यांनी हेरलं. कुलदीप वेदवाण यांची जम्मू-काश्मीर इथं श्री माता वैष्णोदैवी शिरीन बोर्ड आर्चरी अकादमी आहे. शीतल देवी यांनाही कुलदीप वेदवान यांनी प्रशिक्षण दिलं आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनच पायलने काढलेली चित्र पाहिली होती. त्यांची आणि पायलची ओळख कशी झाली याबद्दल पायल सांगते की, मी पूर्वी तोंडात पेन्सिल किंवा ब्रश पकडून चित्र काढायची. मला कोणाच्याही चेहऱ्याचं चित्र सहज काढता यायचं. असंच माझं एक चित्र सोशल मीडियावर प्रसिद्ध झालं. ते चित्र माझे गुरू कुलदीप सरांनी पाहिलं आणि ते मला घेण्यासाठी या अनाथाश्रमामध्ये आले. ते मला त्यांच्या काश्मीरमधल्या आर्चरी प्रशिक्षण केंद्रात घेऊन गेले आणि मला आर्चरीचं प्रशिक्षण देऊ लागले.”
विशेष कृत्रिम उपकरणांची निर्मिती

पायलने त्या अपघातात दोन्ही हात अन् दोन्ही पाय गमावले होते. त्यामुळे पायल आणि आर्चरी खेळ अशी कल्पना करणच कठीण होतं. पायलने जेव्हा पहिल्यांदा या आर्चरी प्रशिक्षण केंद्रात पाऊल ठेवलं तेव्हा तिकडे सगळी मुलं हातात आर्च घेऊन सराव करत होते. व्यंग असलेली मुलं सुद्धा त्यांना जो अवयव आहे त्याच्या साहाय्याने सराव करत होती. हे पाहून पायलले प्रशिक्षकाला विचारले, “हे मला कसं जमणार आहे?” तेव्हा कुलदीप वेदवान यांनी तिला सांगितले. काळजी करु नकोस. तुला हे जमेल. मी त्यासाठी मदत करीन. त्यानंतर कुलदीप वेदवान यांनी पायलला आर्चरीचं प्रशिक्षण देण्यासाठी तिच्या व्यंगत्वानुसार विशेष कृत्रिम उपकरणाची निर्मिती केली. आणि पायलच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली. सलग तीन वर्ष पायलने आर्चरीचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर जानेवारी 2025 मध्ये तिने राष्ट्रीय पॅरा आर्चरी स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेत तिने पॅरिस पॅरालिम्पिंक विजेती शीतल देवी हिचा पराभव केला.
खेलो इंडिया स्पर्धेतला अनुभव
कृत्रिम उपकरणांच्या साहाय्याने खेळताना पायलने तिला आलेल्या अनुभवाबद्दल सांगितले. ती म्हणते की, सुरुवातीला मी या कृत्रिम पायांच्या मदतीने खेळत होती. मात्र, आता मी एकाच पायाचा वापर करते. सुरुवातीला हे उपकरण वापरताना अडचणी आल्या. पण दररोजच्या सरावामुळे आता या उपकरणाची सवय होत आहे. या उपकरणाच्या मदतीने खेलो इंडिया स्पर्धेत सिल्वर मेडल जिंकल्याचा आनंद आहे.
दरम्यान, पायलला अत्याधुनिक उपकरणं मिळाल्याबद्दल पायलचे प्रशिक्षक कुलदीप वेगवान ही आनंदित आहेत. ते सांगतात की, या उपकरणांनंतर तिच्या खेळाच्या सादरीकरणामध्ये अधिक सुधारणा झाली. पायल जगातली पहिली महिला आर्चरी खेळाडू आहे जिला दोन्ही हात आणि पाय नाहीत. त्यामुळे त्या अनुषंगाने उपकरणाची निर्मिती करणं हे मोठं आव्हान होतं. आता ती या उपकरणाच्या साहाय्याने केवळ एका पायाच्या मदतीने आर्चरी खेळत आहे. तिच्या नव्या प्रवासाला आता सुरुवात झाली आहे.
पायलसाठी नियमांवर आधारित उपकरण निर्मिती
पायलले जानेवारी 2025 मध्ये राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतलेला. तिला दोन्ही हात पाय नसल्यामुळे तिच्यासाठी जे उपकरण बनवलं होतं त्यामध्ये ती दोन्ही पायांनी बाण मारु शकत होती. मात्र, दोन्ही पायांनी बाण मारण्याविरुध्द नियम आला आहे. त्यामुळे जरी तिला दोन्ही हात पाय नसले तरी नियमांनुसार खेळताना त्याचं पालन करण्याची गरज होती. त्यासाठी कुलदीप यांनी पायलला एकाच पायाचा वापर करुन खेळता येईल असं नवीन उपकरण तयार केलं. या उपकरणामध्ये पायलने एकाच कृत्रिम पायाच्या साहाय्याने आर्चरी खेळण्याचा सराव केला. आता पायल उजव्या हाताने आर्च उचलते आणि उजव्या खांद्यानी तो ओढते. यामध्ये आर्चची दोरी ओढण्यासाठी सुद्धा वेगळं उपकरण तयार केलं आहे.
जागतिक स्पर्धांची तयारी
सध्या, पायल थायलंडमध्ये होणाऱ्या जागतिक रँकिंग स्पर्धेची तयारी करत आहे. यासोबतच तिला 2026 मधील टोकियो पॅरा आशियाई खेळ आणि 2028 मधील पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी व्हायचं आहे. त्यासाठी तिची तयारी सुरू आहे.
हे ही वाचा : बंद डोळ्यांनी पाहिलेली स्वप्नं साकारताना!!
भारतासाठी जागतिक पातळीवर खेळून मेडल मिळवायचं आहे
राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत पायल चमकदार कामगिरी करत आहे. तिला जागतिक पातळीवर खेळून देशासाठी विजय मिळवणे हे तिचं स्वप्न आहे. पायल सांगते की, देशासाठी गोल्ड मेडल मिळवणं हे माझं स्वप्न आहे. जर मी ओडिसातल्या बालंनगीर सारख्या ठिकाणातल्या अनाथाश्रमातून इथे येऊन शीतल दिदीला हरवू शकते, तर माझी स्वप्न ही देशाला गोल्ड मेडल मिळवून देण्यापेक्षा छोटी नसली पाहिजेत.
पराभवानंतर विजय नक्की मिळतो
खेलो इंडिया स्पर्धेतल्या विजयानंतर पायल सांगते की, आयुष्यातले आतापर्यंतचे संधर्ष आणि अडचणी पाहता हे हवामानातले बदल थंडी – गर्मी या काही अडचणी होऊ शकत नाहीत. या अशा अडचणी बाजूला ठेवून पुढे होणं गरजेचं आहे. कारण पराभवानंतर विजय नक्कीच मिळतो आणि ही वेळ आनंदी राहण्याची हसण्याची वेळ आहे.