ठाण्याचा तो औद्योगिक पट्टा आता कुठे?

Thane : ठाणे-बेलापूर-तुर्भे हा तेव्हा इंडस्ट्रियल बेल्ट म्हणजे औद्योगिक पट्टा मानला जायचा. औद्योगिक पट्टा मानला जायचा असं म्हणण्यापेक्षा अनेक कंपन्या आणि कारखान्यांनी, अनेक उद्योगप्रकल्पांनी नटलेला, गजबजलेला असा प्रदेश होता.
[gspeech type=button]

तीस-पस्तिस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ठाणे स्टेशनवर, ठाणे कॉलेजजवळच्या सिडको स्टॉपवर, ठाणे पूर्वेकडील आनंद थिएटरकडे सकाळी आणि संध्याकाळी काही बसेसची गर्दी व्हायची. ह्या बसेस ठाण्यातल्या, तुर्भे, बेलापूरमधल्या निरनिराळ्या कंपन्यांच्या म्हणजे कारखान्यांच्या असायच्या. त्यावेळी ठाणे महानगरपालिकेची परिवहन व्यवस्था नव्हती. त्यामुळे परिवहनाची ती जबाबदारी एसटीकडे सोपवली होती. साहजिकच, ठाण्याच्या गल्लीबोळात एसटीचा सुळसुळाट असायचा. एसटीला हल्ली ‘लाल परी’ म्हणतात. जिकडेतिकडे ही लाल परी तेव्हा दिसायची. ह्याच लाल परीच्या साथीने तेव्हा ठाण्यातल्या कारखान्यांच्या बसेसही दिसायच्या.

प्रत्येकाच्या चोचीला चारा पुरवणारं तुर्भे-बेलापूर

ठाणे-बेलापूर-तुर्भे हा तेव्हा इंडस्ट्रियल बेल्ट म्हणजे औद्योगिक पट्टा मानला जायचा. औद्योगिक पट्टा मानला जायचा असं म्हणण्यापेक्षा अनेक कंपन्या आणि कारखान्यांनी, अनेक उद्योगप्रकल्पांनी नटलेला, गजबजलेला असा प्रदेश होता. मुंबई, कल्याण, डोंबिवलीतून मोठ्या संख्येने नोकरचाकर ठाण्यात लोकलने यायचे. आपलं कामधाम करून आपल्या घरी परतायचे. आपलं घरदार, आपला संसार चालवायचे. आपल्या कच्च्याबच्च्यांचं शाळाशिक्षण करायचे. आपली संसाराची इनमिन स्वप्नं पूर्ण करायचे आणि त्यात सुखीसमाधानी असायचे. सुखीसमाधानी दिसायचे. तेव्हा नोकऱ्यांचाही तसा सुकाळ असायचा. सुशिक्षित, अशिक्षित, अर्धशिक्षित अशा प्रकारात मोडणाऱ्या सगळ्यांसाठी तेव्हा तशी साजेशी नोकरी मिळणं ही काही कठीण गोष्ट नसायची. फार चिंतेचीही गोष्ट नसायची. देवाच्या दरबारात चोच आहे आणि ज्याला चोच आहे, त्याला चारा मिळणारच हा जो अध्यात्माच्या वाटेवरचा नियम सांगितला जातो; त्याचा प्रत्यय तेव्हा आपल्या नोकरीचा अर्ज घेऊन हिंडणाऱ्या प्रत्येकाला यायचा.

कधी कुणी कुणाच्या ओळखीने कामाला लागायचा, कुणी कुणाच्या वशिल्याने एखाद्या कंपनीत चिकटायचा. रोजीरोटी मिळण्यासाठी तेव्हा बऱ्याचदा बायोडेटा तयार करण्याच्या औपचारिकतेची गरज भासायची नाही. कसला रेझ्युम तयार करून आणण्याचं पथ्य पाळावं लागायचं नाही.  काम करण्याची, इच्छा असेल तर मार्ग मिळतो असं म्हणतात त्याप्रमाणे नोकरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्याला कोणत्या ना कोणत्या कारखान्याचा मार्ग मिळत होता, कोणत्या ना कोणत्या कंपनीचं दार किलकिलं होत होतं.

अनेक मोठ्या आणि नामवंत कंपन्यांचं जाळं

ठाणे हे तेव्हा सहजपणे उपलब्ध होणाऱ्या उद्योगधंद्यांचं नंदनवन होतं. त्याचाच परिणाम म्हणून ठाणे स्टेशनवर एसटी बसेसबरोबरच कित्येक कारखान्यांच्या निरनिराळ्या रंगांच्या बसेस नांदताना दिसायच्या. ग्लॅक्सो, सॅन्डोज, हेर्डेलिया केमिकल्स, टेकसन्स, बायर, एक्सलो, वायमन गार्डन, नोसिल, रेमन ॲन्ड डेम, ब्राडमा, बुश, मर्फी, रेप्टॅकोस ॲन्ड ब्रेट, देविदयाळ इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड वायर्स, रिचर्डसन हिंदुस्थान, व्होल्टास, इनार्को, रेमन्ड, जे.के. केमिकल्स, हॉइस्टो मेक, फायबर पिल्किंग्टन, सिमेन्स, कलरकेम अशा किती कंपन्यांची नावं द्यायची!

बसची सुविधा आणि कंपन्यांची ओळख

इतक्या सगळ्या कंपन्यांच्या बसेस ठाणे स्टेशनवर येऊन दाखल व्हायच्या. तेव्हा खरंतर ठाण्यातल्या रस्त्यांचं आज जसं झालेलं आहे तसं रूंदीकरण झालेलं नव्हतं. रस्ते तसे अरूंदच होते. पण तरीही वाहतुकीच्या कोंडीला निमंत्रण देणारे नव्हते, हे रस्ते सर्व प्रकारच्या वाहनांना आपल्यात सामावून घेणारे होते. कालच्या ठाण्यातलं हे चित्र आज मात्र पार विस्कटून गेलं आहे. काल कंपन्या-कारखान्यांच्या दिसणाऱ्या ह्या बसेस आज अभावानेच दिसतात, किंबहुना दिसेनाशा झाल्या आहेत. त्या बसेसच्या निमित्ताने त्यावेळी ठाण्यात किती कंपन्या-कारखाने आहेत, त्यांची नावं काय आहेत हे तरी ठाण्यातल्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना कळून यायचं. आज ह्याची माहिती मिळायला पर्याय उरलेला नाही. 

आधुनिक तंत्रज्ञानानं बदलली औद्योगिक पट्ट्याची ओळख

आज असं विस्कटलेलं चित्र व्हायची कारणंही तशीच आहेत. जागतिकीकरणाचं, उदारीकरणाचं आगमन आपल्या देशात झाल्यानंतर औद्योगिक पट्ट्याचा बाजार उठला. दुसऱ्या बाजूने कॉम्प्युटर अवतरला आणि त्याने त्याच्यासोबत आपली काळागणिक बदलणारी टेक्नॉलॉजी आणली.  लॅन्डलाइन फोन जाऊन हातात स्मार्ट फोन आले. कंपन्या-कारखान्यातल्या टेलिफोन ऑपरेटरच्या कामाचं स्वरूप बदललं. टाइपरायटर मोडीत निघाले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने उद्योगधंद्याचं क्षेत्र पूर्णपणे व्यापून टाकलं. दहा माणसांचं काम एक यंत्र करू लागलं. अशा सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम होऊन औद्योगिक पट्ट्याचा चेहरामोहरा आमुलाग्र बदलून गेला. कंपन्यां-कारखान्यांमधल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येला कात्री लागली. काही कंपन्यांमधली उत्पादनं कालबाह्य ठरू लागली. त्यांना बाजारपेठ मिळणं कठीण झालं.

हे ही वाचा : चंदू पारखीग्लॅमरच्या दुनियेतला सिधासाधा माणूस!

ओस पडलेल्या कारखान्यांच्या जमिनीवर बिल्डर लॉबी

अशा वेळी ओस पडू लागलेल्या कारखान्यांकडे असलेल्या त्यांच्या जागा त्यांना हरिणाच्या बेंबीत असलेल्या कस्तुरीसारख्या वाटू लागल्या. ह्या जागांवर बिल्डर लॉबीतल्या तगड्या लोकांच्या बऱ्यावाईट नजरा पडू लागल्या. कॉर्पोरेट स्तरावरच्या ओल्यासुक्या पार्ट्या झडू लागल्या. कालांतराने करारमदार होऊन सातबारा कागदपत्रांवर नावं चढू लागली, उतरू लागली आणि बघता बघता बुलडोझर लावून कालपरवाचे सोन्याचा धूर निघणारे वैभवशाली कारखाने जमिनदोस्त होऊ लागले. काही दिवसांत त्यावर मजल्यावर मजले चढत गगनाला डोकं टेकवणाऱ्या चकचकीत टोलेजंग इमारती उभ्या राहू लागल्या. तिथे समाजातली टोलेजंग राहणीमान  असलेली माणसं आपली श्रीमंत कुत्री घेऊन राहायला येऊ लागली. त्याच जागेवर काल आपला घाम गाळत, आपलं रक्त आटवत पापी पोट जाळण्यासाठी काम करणारी माणसं तिथून बाद होऊ लागली. मोलमजुरी करणारी माणसं आउट. आलिशान गाड्यांतली शाही माणसं इन.

हे ही वाचा :ठाण्यातील पहिली सरकारी इंग्रजी शाळा : बी.जे.हायस्कूल

कामगारांचं हरवलेलं ठाणं

आलिशान गाड्यांना रूबाबदार इमारतींच्या आवारात एन्ट्री मिळू लागल्यावर कोणे एके काळच्या कंपन्याकारखान्यांच्या बसेस भंगारात निघाल्या. एखाद्या मोठ्या कंपनीच्या पदरी दोन-तीन बसेस असायच्या त्यांच्या सगळ्या बसेस त्यांच्या आवारातून निघून गेल्या. ठाण्यातला औद्योगिक पट्टा दिवसेंदिवस असा विरळ होत चालल्यावर ठाण्यातल्या रस्त्यांवरच्या कंपन्याकारखान्यांच्या बसेसची ही दाटीही विरळ होत गेली. कॅडबरीसारखी तिच्या अवतीभोवतीच्या पंचक्रोशीत कॅडबरी चॉकलेटचा अनोखा स्वादसुगंध पसरवणारी कंपनी आता ओसाड माळरानासारखी एका बाजुला निपचित पडलेली दिसते. देविदयाळसारखी कंपनी कधीच इतिहासात गाडली जाऊन तिथे टॉवर उभे राहिले आहेत. अनेक कंपन्यांची नामोनिशाणीच मिटून गेली आहे. अनेक कंपन्यांची मिटून जाण्याच्या मार्गावर आहे. उद्योग क्षेत्रातल्या टेक्नॉलॉजीने कात टाकली असेल, पण ठाण्यातल्या औद्योगिक क्षेत्राचा तो मोहोर गळून गेल्याला आता वर्षं लोटली आहेत. वागळे इस्टेटमध्ये एखादं आयटी हब उभं राहिलं असेलही, पण ठाण्याचे ते दिवस आता कुठे असं म्हणावंच लागेल!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Thane: संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यावरच पहिलं मराठी साहित्य संमेलन ठाण्यात झालं होतं. या संमेलनाचा एकूण अंदाजे खर्च 24 हजार रुपये
Thane : विठ्ठल सायन्ना हे अव्वल इंग्रजी काळातले एक नामवंत बांधकाम व्यावसायिक होते. ठाणे, मुंबई आणि पुणे येथे त्यांनी उभारलेल्या
Thane : 1893 साली एका घराच्या ओसरीवर सुरू झालेल्या ‘मराठी ग्रंथ संग्रहालय’ या ठाण्यातील पहिल्या ग्रंथालयानं आधुनिक पिढीशीही नाळ जोडली

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ