चेन्नईमध्ये वास्तव्य करणारी आणि मूळची मराठमोळी असलेली भावना इस्वी हिने आर्किटेक्चर क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर आता संगीत क्षेत्रातसुद्धा यशस्वी पाऊल टाकल आहे. तिच्या आवाजाची जादू प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे.
लहानपणापासून गाण्याची आवड
भावनाला लहानपणापासूनच गाण्याची खूप आवड होती. आर्किटेक्चरचा अभ्यास करत असतानाही तिने आपली गाण्याची आवड जपली. शिक्षण आणि करिअरच्या गडबडीत तिने गाण्याचा सराव थांबवला नाही. तिच्या या सातत्यामुळेच तिला मराठी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायनाची संधी मिळाली. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या एका मराठी चित्रपटामध्ये तिने गायलेल्या गाण्यांना श्रोत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. यामुळे तिला विशेष ओळख मिळाली.
चेन्नईशी भावनिक नातं
चेन्नई शहराबद्दल बोलताना भावना सांगते, “चेन्नईमध्ये माझ्या गाण्यांचे रेकॉर्डिंग झालं आणि या अनुभवातूनच माझं या शहराशी एक अनोखं नातं जुळलं. मी जेव्हा चेन्नईमध्ये नसते, तेव्हा मला या शहराची खूप आठवण येते. या शहरातील ऐतिहासिक स्थळे, इथली संस्कृती आणि इथले संगीत वातावरण मला खूप आकर्षित करते.
स्वतःचा रेकॉर्डिंग स्टुडिओ
भावना केवळ पार्श्वगायिका किंवा आर्किटेक्ट एवढ्यावरच थांबली नाही. तर तिने चेन्नईमध्ये स्वतःचा ऑडिओ इंजिनिअरिंग आणि रेकॉर्डिंग स्टुडिओ सुरू केला आहे. हा स्टुडिओ संगीतकार, गायक आणि इतर कलाकारांसाठी एक महत्त्वाचे केंद्र बनला आहे. या स्टुडिओमध्ये अनेक प्रोजेक्ट्सवर काम चालू आहे. आपल्या कामाबद्दल बोलताना भावनाने सांगितलं की “कष्ट आणि प्रामाणिक प्रयत्न याला पर्याय नाही. तुम्ही जर निश्चित ध्येय ठेवून काम करत राहिलात तर यश नक्कीच मिळते.”
हे ही वाचा : लेबर ऑफिसर ते सह आयुक्त कामगार शिरिन लोखंडे
कुटुंबाची साथ आणि प्रेरणा
भावना इस्वीच्या या यशामागे तिच्या कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे असं ती सांगते. कुटुंबातील लोकांनी तिला आर्किटेक्चर आणि संगीत दोन्ही क्षेत्रात पुढे जाण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. ती म्हणते, “वेळेचे योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण परिश्रम केल्यास कोणतेही ध्येय शक्य होते.”
इंटरनेटच्या युगात वेळेचे व्यवस्थापन गरजेचं
सध्याच्या इंटरनेट युगात आर्किटेक्ट म्हणून अनेक प्रोजेक्ट्सवर काम करताना भावनाला त्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. त्यामुळे गायनासाठी वेळ काढणे कधीकधी तिच्यासाठी एक आव्हान असते. मात्र तिची गाण्याची प्रचंड आवड आणि चिकाटीमुळे ती हे दोन्ही सांभाळू शकते.
हे ही वाचा : ज्ञान चक्षूंनी दिलं बळ आणि आत्मनिर्भरता!
आगामी प्रकल्पांबद्दल उत्सुकता
भावना लवकरच आपली नवीन गाणी घेऊन प्रेक्षकांसमोर येणार आहे. तिने प्रसिद्ध संगीतकार हॅरिस जयराज यांच्या ऑर्केस्ट्रासोबत एक गाणं रेकॉर्ड केलं आहे. तसेच दुसरे गाणं राम संपत यांच्या टीमसोबत तयार केलं आहे. तिची ही गाणी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लवकरच ऐकायला मिळतील. याव्यतिरिक्त, काही दिग्दर्शकांनी तिला चित्रपटांमध्ये गाण्यासाठी विचारले आहे आणि त्याबद्दल ती सकारात्मक विचार करत आहे.
तसंच भावनाची इच्छा आहे की तिने आपलं स्वतःचं गाणं प्रदर्शित करावं. त्यासाठी ती सध्या मेहनत करत आहे. स्वतःचा आवाज, स्वतःचं संगीत आणि स्वतःची शैली यांचं मिलन असलेलं हे गाणं प्रेक्षकांसाठी एक नवा अनुभव ठरेल, असा तिचा विश्वास आहे.
भावनाची आर्किटेक्चर आणि संगीत या दोन्ही क्षेत्रांतील यशस्वी वाटचाल अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. एकाचवेळी दोन वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करताना येणाऱ्या अडचणींवर मात करत, तिने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.