उन्हाळ्याची तगमग सुरू झाली की सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न येतो, उन्हाळ्यात कोणते कपडे घालावेत? कॉटन की लिनेन? हे दोन्ही कापड खूप प्रसिद्ध आहेत. पण अनेक लोकांना त्यांच्यातला नेमका फरक माहित नसतो. दोन्ही दिसायला साधारण एकसारखे वाटत असले तरी या कपडांमध्ये फरक असतो.
चला तर मग जाणून घेऊया कॉटन आणि लिनेन या दोन प्रकारच्या कापडात काय फरक आहे आणि उन्हाळ्यासाठी कोणता पर्याय जास्त योग्य ठरतो.
कॉटन आणि लिनेनमध्ये काय फरक आहे?
कॉटन आणि लिनेन हे दोन वेगळ्या प्रकारचे कापड आहेत. लिनेन हे फ्लेक्स नावाच्या एका खास प्रकारच्या वनस्पतीपासून तयार होतं. तर, कॉटन हे आपण नेहमी पाहतो त्या कापसाच्या झाडापासून मिळतं. लिनेन तयार करण्याची प्रक्रिया ही कॉटनच्या तुलनेत जास्त वेळखाऊ आणि मेहनतीची असते. म्हणूनच लिनेनचे कपडे तुलनेत महाग असतात. त्यामुळे हे दोन्ही कापड बनवण्याच्या पद्धतीत मोठा फरक आहे.
कपड्याचा पोत आणि स्पर्श
कॉटनचे कपडे पहिल्यांदाच वापरले तरी मऊ वाटतात. त्यामुळे ते लगेच आरामदायक वाटतात. लिनेनचे कपडे मात्र सुरुवातीला थोडेसे खरखरीत वाटू शकतात. पण जसजसे ते वापरले जातात, तसतसे ते अधिक मऊ आणि आरामदायक बनतात. म्हणून जे लोक खूप मऊ कपडे पसंत करतात, त्यांना सुरुवातीला लिनेन कापड थोडं वेगळं वाटू शकतं
थंडावा आणि घाम शोषण
उन्हाळ्यात थंडावा देणारे कपडे हवे असतात, आणि या बाबतीत दोन्ही कापड उपयोगी पडतात. पण लिनेन हे कॉटनच्या तुलनेत जास्त ब्रिथेबल कापड आहे. त्यामुळे शरीरावर घाम आल्यानंतर तो पटकन वाळतो आणि त्वचेवर थंडावा जाणवतो. कॉटन देखील घाम शोषतो, पण कधी कधी तो ओलसर राहतो आणि त्यामुळे कपडे चिकटल्यासारखे वाटतात.
कापडाचा टिकाऊपणा
लिनेनचा कपडा जास्त मजबूत असतो आणि टिकाऊ असतो. तो लवकर फाटत नाही किंवा खराब होत नाही.
कॉटनचा कपडा लिनेनइतका मजबूत नसतो वेळोवेळी वापरल्यास त्याची मजबुती कमी होऊ शकते. म्हणून जर तुम्ही कपडे दीर्घकाळ वापरण्याचा दृष्टीने विचार करत असाल, तर लिनेन कापड जास्त चांगला पर्याय ठरतो.
सुरकुत्या आणि इस्त्री करणे
लिनेनचा कपड्याला लवकर सुरकुत्या पडतात. त्यामुळे इस्त्री करणे थोडेसे कठीण जाते. मात्र कॉटनचा कपडा जास्त लवचिक असतो आणि त्याला लिनेन कपड्यासारख्या लवकर सुरकुत्या पडत नाहीत. कॉटनला इस्त्री केल्यावर तो लगेच चांगला दिसतो. लिनेनच्या तुलनेत कॉटनला इस्त्री करणं जास्त सोपं जातं. म्हणून जर तुम्हाला कपडे कायम नीटनेटके पाहिजे असतील, तर कॉटन निवडणं सोयीचं ठरेल.
किंमत
लिनेन तयार करण्याची प्रक्रिया कॉटनपेक्षा कठीण आणि वेळखाऊ आहे. तसेच बनवण्यासाठी जास्त लोकांची गरज लागते. या कारणामुळे लिनेनचे कपडे थोडे महाग असतात, तर कॉटन सहज उपलब्ध असल्यामुळे ते कपडे तुलनेने स्वस्त असतात.
उन्हाळ्यासाठी कोणता पर्याय निवडाल?
जर तुम्हाला दिवसभर उन्हात बाहेर राहायचं असेल, घाम जास्त येत असेल आणि थंडावा हवासा वाटत असेल, तर लिनेन हा सर्वोत्तम पर्याय आहे. आणि जर तुम्ही दिवसभर घरात किंवा एसीच्या थंड वातावरणात राहणार असाल, तर तुम्ही कॉटनचे कपडे निवडू शकता.
शेवटी, कॉटन आणि लिनेन या दोन्ही प्रकारचे कापड उन्हाळ्यासाठी उपयोगी आहेत. कोणता निवडायचा हे तुमच्या वापरावर आणि गरजांवर अवलंबून आहे.