भारताच्या बुधवार, 7 मे रोजी केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानला चांगलाच झटका बसल्यानं पाकिस्तान सतत भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे. पण सजग भारतीय सेना या हल्ल्यांना सक्षमपणे परतवून लावत आहे. भारतानं पाकिस्तानच्या अनेक फायटर जेट, मिसाईल आणि ड्रोनला पाडलं आहे. भारतीय नौसेनेनंही समुद्रातून पाकिस्तानच्या कित्येक ठिकाणी हल्ला केला आहे. पाहुयात गुरुवार, 8 मे रात्रीपासूनच्या घडामोडी संक्षिप्तपणे –
- 22 एप्रिलला पहलगामला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर या हल्ल्याला भारतानं बुधवारी 7 मे रोजी प्रत्युत्तर दिलं. भारतीय आर्मी, एअरफोर्स, नेव्ही या तिन्ही संरक्षणदलांनी एकत्रित कारवाई करत पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर (पीओके) आणि पाकिस्तानातील अतिरेकी अड्ड्यांवर ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे हवाई हल्ला केला.
- गुरुवारी रात्री पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या एका गटाने सांबा इथल्या भारत-पाक सीमेवरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सीमा सुरक्षा दलानं (बीएसएफ) केलेल्या कारवाईत दहा ते बारा दहशतवादी ठार झाले.
- गुरुवारी रात्री आठपासून पाकिस्तानकडून भारतातील श्रीनगर, उधमपूर, आर एस पुरा, अखनूर, जम्मू, सांबा, पठाणकोट, जालंधर, बिकानेर, जैसलमेर आणि जोधपूर या अकरा ठिकाणी ड्रोनने हल्ला केला. ही सर्व ठिकाणं भारत-पाक सीमेलगत आहेत. या हल्ल्याद्वारे भारतातील नागरी वस्तीला पाकिस्ताननं लक्ष्य केलं. त्यामुळं या संपूर्ण भागात रात्रभर ब्लॅकआउट होता.
- पाकिस्ताननं गुरुवारी रात्री जम्मू विमानतळावर आठ ड्रोन डागले. त्यानंतर जम्मू विद्यापीठावरही दोन ड्रोन डागले. त्यानंतर श्रीनगर, उधमपूर, आर एस पुरा, अखनूर, जम्मू, सांबा, पठाणकोट, जालंधर, बिकानेर, जैसलमेर आणि जोधपूर या अकरा ठिकाणी गोळीबारही केला.
- भारतीय लष्करानं पाकिस्तानचा हा प्रयत्न हाणून पाडला. इंटिग्रेटेड काउंटर यूएएस ग्रीड आणि रशियानिर्मित एस-400 सुदर्शनचक्र या हवाई संरक्षण प्रणालींद्वारे गुरुवारचे हे हल्ले निष्क्रिय केले. यात जवळपास पन्नास पाकिस्तानी ड्रोन पाडल्याचं भारतानं सांगितलं.
- प्रत्युत्तरादाखल भारतानं इस्लामाबाद, लाहोर, सियालकोट, बहावलपूर इथं थेट हल्ले केले. भारतानं पाकिस्तानची लाहोरमधील एयर डिफेन्स रडार सिस्टम उद्धवस्त केली. या कारवाईत पाकिस्तानची दोन लढाऊ विमानं पाडण्यात आली.
- भारतीय नौदलानं पाकिस्तानच्या कराची बंदरावरही जोरदार हल्ला केला.
- उरी, कुपवाडा, तंगधारमध्ये दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असून. भारतानं होथियापूरमध्ये पाकिस्तानची मिसाईल पाडली आहेत.
- गुरुवारी रात्रभर दिल्लीमध्ये राजकीय आणि लष्करी बैठका सुरू होत्या.
- अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे डी व्हान्स यांनी गुरुवारी सांगितलं की, भारत आणि पाकिस्तानचा दरम्यानचा तणाव निवळावा अशी अमेरिकेची इच्छा आहे. मात्र अमेरिका या वादात पडणार नाही, असं व्हान्स यांनी स्पष्ट केलं.
- आयपीएलचा 11 मे रोजी होणारा धर्मशाला इथं होणारा सामना आता अहमदाबादमध्ये होणार आहे. पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स दरम्यान ही लढत होणार आहे.
- महाराष्ट्र, पंजाब, हरयाणा, राजस्थान, पश्चिम बंगाल, बिहार या राज्यांतील पोलिस आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. शाळा आणि महाविद्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या राज्यांमध्ये हाय अलर्ट देण्यात आला आहे.
- पाकिस्तानसह पंजाब 532 किमी, राजस्थान 1,070 किमी, गुजरात 506 किमी सीमा आहे. तर पश्चिम बंगाल आणि बांग्लादेश यांच्यातील सीमा 2,217 किमी आहे.
- भारतानं याआधीचं स्पष्ट केल्यानुसार तणाव वाढवणारी कोणतीही कृती आमच्याकडून होणार नाही. मात्र पाकिस्तानकडून होणाऱ्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देणारी कारवाई होईल.
- भारत-पाक युद्धांची छाया गडद होत असताना भारताचे परराष्ट्रमंत्रा एस. जयशंकर यांनी इतर राष्ट्रांशी फोनवरून चर्चा सुरू केली आहे. आम्ही दहशतविरोधी कारवाई केली असून पाकिस्ताननं आगळीक केली तर जशास तसं उत्तर आम्ही देऊ असं जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय नेत्यांना सांगितलं. अमेरिका, इराण, कझाकिस्तान आणि युरोपीय देशांच्या प्रमुख आणि प्रतिनिधींशी जयशंकर यांनी संवाद साधला.