ख्रिस्ती समुदायाच्या सर्वाेच्च पदावर कार्डिनल रॉबर्ट प्रीवोस्ट यांची पोप म्हणून निवड करण्यात आली आहे. भारतीय वेळेनुसार गुरुवार दिनांक 8 मे 2025 रोजी रात्री 9 च्या सुमारास याची घोषणा करण्यात आली. कार्डिनल रॉबर्ट प्रीवोस्ट यांनी पोप पदासाठी लिओ चौदावे या नावाची निवड केली आहे. त्यामुळे त्यांना लिओ चौदावे (LEO XIV) या नावाने यापुढे ओळखलं जाणार आहे. ते ख्रिस्तसभेचे 267 वे पोप आहेत.
अमेरिका खंडातील सलग दुसरे पोप
पोप फ्रान्सिस यानंतर सलग दुसऱ्यांदा अमेरिका खंडातील कार्डिनल पदावर असलेल्या व्यक्तिची निवड पोप पदावर झाली आहे. पोप लिओ चौदावे हे 69 वर्षाचे आहेत. त्यांचा जन्म अमेरिकेतल्या शिकागो राज्यात झाला. मूळचे अमेरिकेतले असले तरी त्यांनी आतापर्यत पेरु इथे मिशनरी कार्य केलं आहे. त्यानंतर त्यांनी सलग दोन टर्म ऑगस्टियन्स संस्थेचे प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळलेला आहे.
Pope Leo XIV appears on the balcony of St. Peter’s Basilica to greet the faithful for the first time as the 267th Pope. pic.twitter.com/tsA1a0XSOM
— Vatican News (@VaticanNews) May 8, 2025
पहिले ऑगस्टियन्स पोप
पोप लिओ चौदावे यांचा जन्म 14 सप्टेंबर 1955 साली शिकागोतल्या इलिनॉय इथे झाला. त्यांचे वडिल लुई मारियस प्रीव्होस्ट हे फ्रेंच आणि इटालियन वंशाचे आहेत. तर आई मिल्ड्रेड मार्टिनेझ या स्पेन वंशाच्या आहेत. त्यांना लुई मार्टिन आणि जॉन जोसेफ असे दोन भाऊ आहेत.
धर्मगुरू होण्याचा निर्णय घेतल्यावर सप्टेंबर 1977 मध्ये त्यांनी ऑगस्टिनियन मायनर सेमनरीमध्ये प्रवेश घेतला. सप्टेंबर 1978 मध्ये त्यांचा पहिला शपथविधी सोहळा झाला. त्यानंतर ऑगस्ट 1981 मध्ये त्यांना धर्मगुरूची दिक्षा देण्यात आली.
पेनसिल्व्हेनियातल्या विलानोव्हा विद्यापीठातून गणित विषयात पदवी घेतली. त्याचवेळी त्यांनी तत्वज्ञानाचाही अभ्यास केला. पुढे रोममधल्या पॉन्टिफिकल युनिव्हर्सिटीमधून त्यांनी कॅनन लॉ (ख्रिस्ती धार्मिक कायदा) चा अभ्यास केला. 1982 पासून ते रोममधल्या सेंट मोनिका ऑगस्टिनियन मध्ये धर्मगुरु म्हणून रुजू झाले. या काळात त्यांच्यावर आंतरधर्मिय संवाद विभागाची जबाबदारी देण्यात आली होती.
पुढे 1985-1986 मध्ये त्यांना त्यांचा पीएचडीचा प्रबंध पूर्ण करण्यासाठी पेरु इथे पाठवण्यात आलं. इथे त्यांनी ‘द रोल ऑफ द लोकल प्रायर इन द ऑर्डर ऑफ द सेंट ऑगस्टीन’ या विषयावरचा प्रबंध पूर्ण केला. त्यानंतर त्यांना अमेरिकेतल्या इलिनॉय इथे ‘मदर ऑफ गुड कौन्सिल’ या ऑगस्टिनियन प्रांताचे संचालक म्हणून नियुक्त केलं.
हे ही वाचा : रोमन कॅथॉलिक समुदायाच्या नवीन पोप निवडीची प्रक्रिया नेमकी कशी असते?
पेरु मधलं मिशनरी कार्य
अमेरिकेमधून पुन्हा त्यांची बदली पेरु इथे केली गेली. पेरु इथल्या ट्रुजिलो इथे ते मिशनरी कार्य करु लागले. यावेळी त्यांना चुलुकानास, इक्विटोस आणि अपुरीमाक या प्रांतातल्या धर्मगुरु होणाऱ्या उमेदवारांचे संचालक म्हणून नेमण्यात आलं. सन 1999 पर्यंत त्यांनी पेरुमध्ये विविध पदावर कार्य केलं.
पेरुच्या बिशप पदाची जबाबदारी
26 सप्टेंबर 2015 रोजी तत्कालीन पोप फ्रान्सिस यांनी पेरुच्या बिशप पदावर त्यांची नेमणूक केली. 2023 सालापर्यंत त्यांनी ही जबाबदारी सांभाळली. मार्च 2018 मध्ये त्यांची पेरुव्हियन एपिस्कोपल कॉन्फरन्सच्या उपाध्यक्ष पदावर निवड झाली. या कॉन्परन्समध्ये त्यांनी आर्थिक परिषदेचे सदस्य, संस्कृती, शिक्षण आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम केलं.
जुलै 2019 मध्ये पोप फ्रान्सिस यांनी त्यांची नियुक्ती कॉग्रिगेशन फॉर क्लर्जी संघटनेचा सदस्य म्हणून निवड केली.
2020 मध्ये त्यांची निवड रोम इथल्या बिशप संघटनेमध्ये करण्यात आली. त्याचवेळी एप्रिल 2020 मध्ये कॅलाओच्या पेरुव्हियन बिशप अपोस्टोलिक प्रशासक म्हणून सुद्धा त्यांची नियुक्ती करण्यात आली.
ऑर्चबिशप पदाची जबाबदारी
30 जानेवारी 2023 रोजी तत्कालीन पोप फ्रान्सिस यांनी त्यांना रोममध्ये बोलावून घेतलं. त्यांच्यावर रोममधल्या बिशप मंडळाचे प्रीफेक्ट आणि लॅटिन अमेरिकेसाठी पोंटिफिकल कमिशनचे अध्यक्षपदाची जबाबदारी देत त्यांना आर्चबिशप पदी बढती दिली.
कार्डिनल पदी नियुक्ती
30 सप्टेंबर 2023 रोजी तत्कालिन पोप फ्रान्सिस यांनी त्यांना कार्डिनल पदी नियुक्ती केलं. त्यांच्यावर रोममधल्या सेंट मोनिका चर्चची जबाबदारी दिली. या काळात त्यांनी पोप फ्रान्सिस यांच्या परदेश दौऱ्यामध्ये त्यांची सोबत केली. तसेच ऑक्टोबर 2023 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या बिशप्सच्या कॉन्फरन्समध्ये सक्रिय सहभाग घेतला.
6 फेब्रुवारी 2025 रोजी, ऑर्डर ऑफ बिशप्समध्ये त्यांना पदोन्नती मिळाली. त्यांना अल्बनोच्या उपनगरीय चर्चची पदवी दिली.
या अशा सगळ्या पदाची जबाबदारी उत्तमपणे सांभाळत कार्डिनल रॉबर्ट प्रीवोस्ट आता पोप पदाची धुरा सांभाळून ख्रिस्ती समुदायाला मार्गदर्शन करणार आहेत.