देशात मतदानसक्ती कायदा होणार! खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या विधेयकामध्ये नेमकं काय म्हटलंय?

compulsory Voting Bill : इतर सगळ्या अधिकारासाठी आवाज उठविणारा नागरिक मतदानाचा अधिकार बजावण्यात मात्र उत्साही नसतो. हे चित्र बदलावं यासाठी भाजपाचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी अलिकडे अधिवेशनात प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदान सक्ती करण्याचा कायदा करावा यासाठी विधेयक सादर केलं. या विधेयकामागचा नेमका उद्देश काय, अंमलबजावणी कशी करावी याविषयी ‘श्रेष्ठ महाराष्ट्रा’ने डॉ. अजित गोपछडे यांच्याशी संवाद साधला. तर जाणून घेऊयात काय आहे 'मतदान सक्ती विधेयक'.
[gspeech type=button]

लोकशाही राष्ट्र ही भारताची अनन्य साधारण ओळख आहे. एवढ्या मोठ्या राष्ट्रात होणाऱ्या निवडणुका, आणि प्रत्येक निवडणुकांनंतर जनतेच्या मतांचा आदर ठेवून सत्तेत येणारं सरकार आणि एकूणच संपूर्ण मतदान प्रक्रिया हा अभ्यासाचा विषय आहे. यासाठी परदेशातून अनेक अभ्यासक निवडणुकीचं नियोजन, पद्धत अभ्यासण्यासाठी निवडणुकीच्या काळात भारतात येत असतात. पण भारताची लोकसंख्या आणि होणाऱ्या मतदानाचा टक्का यामध्ये खूप तफावत आहे. आपल्या देशामध्ये स्त्री-पुरुष यांना एकाच वेळी मतदानाचा अधिकार मिळाला. मात्र, इतर सगळ्या अधिकारासाठी आवाज उठविणारा नागरिक मतदानाचा अधिकार बजावण्यात मात्र उत्साही नसतो.

हे चित्र बदलावं यासाठी भाजपाचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी अलिकडे अधिवेशनात प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदान सक्ती करण्याचा कायदा करावा यासाठी विधेयक सादर केलं. या विधेयकामागचा नेमका उद्देश काय, आणि याचं रुपांतर कायद्यात झालं तर त्याची अंमलबजावणी कशी करावी याविषयी ‘श्रेष्ठ महाराष्ट्रा’ने डॉ अजित गोपछडे यांच्याशी संवाद साधला. तर जाणून घेऊयात काय आहे ‘मतदान सक्ती विधेयक’.

मतदान सक्ती विधेयकाचा उद्देश

आपल्या देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करत आहोत. लोकशाही जपत आता आपण महासत्तेकडे झेप घेत आहोत. या देशाचे नागरिक म्हणून आपण या देशाचं काहीतरी देणं लागतो याची जाणीव सतत आपल्याला असली पाहिजे. त्यामुळे या देशाची सत्ता कोणाच्या हाती द्यावी याचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य, अधिकार जो घटनेने आपल्याला दिला आहे. त्याची जाणीव ठेवून सूज्ञपणे मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. इतक्या मोठ्या लोकशाही देशामध्ये निवडणूक, मतदान हा एक राजकीय कार्यक्रम नसून लोकशाहीचा उत्सव असतो. आणि त्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी होणं गरजेचं आहे. देशाच्या प्रती आपलं प्रेम आपल्याला व्यक्त करण्याची ही एक संधी असते. त्यामुळे लोकशाही जपायची असेल तर प्रत्येक भारतीय नागरिकांनी मतदानाप्रती सजग राहणं, मतदान करुन आपला हक्क, अधिकार बजावावा यासाठी राज्यसभेमध्ये मतदान सक्तीचं विधेयक मांडल्याची माहिती खा. गोपछडे यांनी दिली. या विधेयकावर येत्या पावसाळी अधिवेशनात चर्चा होऊन ते मंजूर होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

लोकसंख्येच्या दृष्टीने शत-प्रतिशत मतदान शक्य आहे का?

भारताची लोकसंख्या पाहता 100 टक्के मतदान होणं शक्य आहे का हा प्रश्न पडणं साहजिकच आहे. मात्र, यावर खा. गोपछडे म्हणाले की, अशक्य असं काहिच नाही. गेल्या 10 वर्षात अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सरकारच्या नेतृत्वात भारतीयांनी शक्य करुन दाखविल्या आहेत. कोविडसारख्या काळात भारताने खूप चांगली कामगिरी केली. प्रत्येक भारतीयाला कोविडची लस देण्यात आली. महाकुंभ सारखा सर्व जगाला अचंबित करेल अशा धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन एका राज्याने करुन दाखवलं. प्रत्येक योजना ही जनतेपर्यंत उत्तमपणे पोहोचत आहे. त्यामुळे अशक्य असं काहिच नाही. मात्र, मतदान करण्यासाठी मतदारांवर थोडा दबाव टाकण्याची गरज आहे. यामध्ये तुम्ही कोणाला मत देता हे महत्त्वाचं नाही तर मतदान करता हे जास्त महत्त्वाचं आहे.

जसं की, शेतकऱ्यांनी जर मतदान केलं नाही तर त्याला मिळणारं त्यावेळेचं अनुदान थांबवावं. एखाद्या डॉक्टरने मतदान केलं नाही तर त्याला इन्कम टॅक्समध्ये मिळणारी सवलत त्यावेळी रद्द केली जाईल. आमच्या महिला भगिनीने जर मतदान करण्याचं टाळलं तर तिला सरकारी योजनेतून मिळणारे त्यावेळचे पैसे थांबवले जातील, अशा ज्या कल्याणकारी योजना आहेत त्याचा एक वेळचा लाभ थांबवल्यास मतदारांमध्ये जागृती निर्माण होईल.

जनजागृती महत्त्वाची

खा. गोपछडे म्हणतात की, हे सगळं एकदम हुकुमशाही पद्धतीने होणार नाही. समाज आणि सरकार जोपर्यंत एकमेकांच्या हातात हात घालून समन्वयाने काम करत नाही आणि लोकांमध्ये सुद्धा जागरूकता निर्माण होत नाही, तोपर्यंत मतदानाच्या बाबतीतली अनिवार्यता ही शक्य होणार नाही.

जे मतदार अंथरुणाला खिळून आहेत, ज्या भगिनी बाळंतपणात आहेत, वृध्द वा विकलांग आहेत अशा बांधवाची परिस्थिती समजण्याजोगी आहे. तरी, सरकारने या घटकातील मतदारांनाही आपल्या हक्क बजावता यावा यासाठी 2024 च्या निवडणुकीमध्ये घरोघरी मतदान हा उपक्रम राबवला. या उपक्रमाच्या माध्यमातून जे मतदार शारीरिक वा वयोमानामुळे घराबाहेर पडू शकले नाही त्यांनाही मतदानाचा हक्क बजावता आला.

मतदाराला दंडाची भिती दाखवून मतदान करायला भाग पाडण्याऐवजी मतदाराने स्वत:हून उत्साहाने मतदान करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने जेव्हा देशातल्या एखाद्या राज्यावर, राज्यातल्या एखाद्या जिल्हावर, तालुक्यावर, गावावर नैसर्गिक आपत्तीचं संकट येतं तेव्हा आपण संपूर्ण समाज एकदिलाने एकत्र येत मदत करत असतो. त्यावेळी जी आपल्यामध्ये एकात्मतेची भावना असते, तिच भावना मतदानाच्या वेळी आपल्या मनात निर्माण होणे गरजेचं आहे. कारण आपलं मत हे राष्ट्राच्या उभारणीसाठी महत्त्वाचं असल्याची जाणिव आपल्याला असायला हवी.

शत प्रतिशत मतदानासाठी चळवळ उभारु

अंतोदय या घोषणेचा अर्थ आहे की, शेवटच्या घटकातील माणसापर्यंत विकास पोहोचला पाहिजे. पण तो विकास केव्हा पोहोचेल? जेव्हा या समाजातला शेवटचा नागरिक मतदान करेल. यासाठी खा. गोपछडे म्हणतात की, ‘मतदानाविषयी सजगता निर्माण करण्यासाठी जनजागृती सारख्या कार्यक्रमांचे आयोजन करुन आम्ही एक व्यापक चळवळ उभी करु. यासाठी एक खासदार म्हणून जबाबदारीने या चळवळीत सहभाग घेऊन नेतृत्व करु.’ त्यामुळे आगामी काळात जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावं यासाठी आम्ही चळवळ उभी करु. या चळवळीला पाठिंबा देत मतदानाचा टक्का 100 टक्के व्हावा आणि हे आपलं राष्ट्रिय कर्तव्य आहे याची जाण ठेवत स्वत:हून पुढाकार घ्यावा, अशी आशा खा. डॉ अजित गोपछडे यांनी व्यक्त केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Internationalisation of Rupee : आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपयाचं स्थान मजबूत व्हावं यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारताच्या शेजारील राष्ट्रांसोबत रुपयामधून व्यवहार
आज दिनांक 1 ऑक्टोबरपासून युपीआय, रेल्वे प्रवास आणि आधार अपडेटशी संबंधित काही नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे. हे बदल
NASA Women lead : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA ने नुकतीच त्यांच्या नव्या अंतराळवीर तुकडीची म्हणजेच 'एस्ट्रोनॉट क्लास' ची घोषणा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ