अमेरिकेतील अन्न आणि औषध प्रशासनाकडून (FDA) नुकतीच एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली. त्यांनी तीन नवीन नैसर्गिक खाद्य रंग वापरण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या कंपन्यांना आता त्यांच्या उत्पादनांमध्ये कृत्रिम रंगांऐवजी अधिक सुरक्षित आणि नैसर्गिक पर्याय वापरण्याची संधी मिळणार आहे.
कृत्रिम रंगांचा वापर टप्प्याटप्प्याने कमी करणे आणि लोकांच्या आरोग्यासाठी चांगले ठरणारे पर्याय समोर आणून देणं हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे.
विशेषतः लहान मुलांमध्ये कृत्रिम रंगांमुळे उद्भवणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींची शक्यता लक्षात घेता, हा निर्णय महत्वाचा आहे.
FDA मंजूर केलेले तीन नैसर्गिक रंग कोणते?
1. गाल्डिएरिया एक्सट्रॅक्ट : निळा रंग देणारा समुद्री शेवाळाचा अर्क
गाल्डिएरिया सल्फरारिया हे एक प्रकारचे लाल रंगाचे समुद्री शेवाळ आहे. या शेवाळापासून तयार होणाऱ्या अर्कातून नैसर्गिक निळा रंग मिळतो. फ्रान्समधील Fermentalg या कंपनीने हा रंग तयार केला आहे.
हा रंग वापरून विविध खाद्यपदार्थ रंगवता येतील. या रंगाचा फायदा म्हणजे तो कृत्रिम रंगांप्रमाणे हानीकारक नसून, नैसर्गिक गोष्टींतून मिळतो आणि सहजपणे अनेक खाद्यपदार्थांमध्ये मिसळता येतो.
* स्मूदी, मिल्कशेक, फ्लेवर्ड दूध
* योगर्ट आणि योगर्ट ड्रिंक्स
* कॅंडी, च्युइंग गम, फ्रॉस्टिंग
* आईस्क्रीम, पॉप्सिकल्स, बर्फाचे गोळे
* पुडिंग, कस्टर्ड, जिलेटिन डेसर्ट्स
इत्यादी गोष्टींसाठी या रंगाचा वापर करता येईल.
हे ही वाचा : अन्नातील ‘रेड नंबर 3’ या रंगावर अमेरिकेचा बंदी घालण्याचा विचार
2. बटरफ्लाय पी फ्लॉवर एक्सट्रॅक्ट : गोकर्णच्या फुलांपासून मिळणारा निळा-जांभळा रंग
बटरफ्लाय पी म्हणजेच आपलं गोकर्ण हे अतिशय लोभस निळसर फूल आहे. या फुलांच्या वाळलेल्या पाकळ्यांपासून पाण्याच्या सहाय्याने हा नैसर्गिक रंग काढला जातो. आणि या अर्काचा उपयोग करून निळा, जांभळा आणि हिरवट छटांचा रंग तयार करता येतो. सेंट लुईसमधील Sensient Colors या कंपनीने या रंगाला परवानगी मिळवून दिली आहे. भारतात गोकर्णाच्या फुलांपासून चहा, सरबत करतात. या रंगाचा वापर परदेशात काही पेयांमध्ये केला जातो उदाहरणार्थ,
* स्पोर्ट्स ड्रिंक्स, फळांचे आणि भाज्यांचे रस
* दुधाचे पेये, योगर्ट
* गम, कोटेड नट्स, कॅंडी
* रेडी-टू-ड्रिंक चहा आणि पौष्टिक पेये
पण आता FDA ने या रंगाचा वापर खालील पदार्थांमध्येही करण्यास मान्यता दिली आहे:
* क्रॅकर्स, स्नॅक मिक्स, प्लेन चिप्स
* प्रीट्झेल्स, रेडी-टू-ईट नाश्त्याचे धान्य
* कॉर्न चिप्स, टॉर्टिला चिप्स, मल्टीग्रेन चिप्स
3. कॅल्शियम फॉस्फेट : नैसर्गिक पांढरा रंग
कॅल्शियम फॉस्फेट हे एक खनिज आहे आणि याचा उपयोग करून खाद्यपदार्थांना आकर्षक पांढरा रंग दिला जातो. हा रंग देखील आता अधिकृतपणे FDA ने सुरक्षित म्हणून मान्य केला आहे. InoPhos Inc. या न्यू जर्सीमधील कंपनीने हा रंग तयार केला आहे. या रंगाचा
वापर आता खालील गोष्टींसाठी केला जाईल.
* रेडी-टू-ईट चिकन पदार्थ
* पांढऱ्या रंगाचे कॅंडी मेल्ट्स
* डोनटसाठी वापरली जाणारी साखर
* कॅंडीच्या वरची कुरकुरीत साखर
FDA चा हा निर्णय ‘Make America Healthy Again’ या आरोग्य अभियानाचा एक भाग आहे. या योजनेचा उद्देश हा अमेरिकेतील अन्नपदार्थांमधून पेट्रोलियमपासून बनवलेले कृत्रिम रंग टप्प्याटप्प्याने कमी करायचे आणि त्यांच्या जागी सुरक्षित, नैसर्गिक रंग वापरायचे असा आहे.
अनेक अभ्यासांमध्ये असं दिसून आलं की काही कृत्रिम रंगामुळे लहान मुलांच्या वागणुकीवर, त्याच्या मेंदूच्या विकासावर आणि आरोग्यावरही वाईट परिणाम होतात. तर काही रंग हे इतके घातक आहेत की त्यामुळे कर्करोगासारखा आजार होऊ शकतो. त्यामुळे आता जगभरात नैसर्गिक रंगांच्या वापरावर भर दिला जात आहे.
उद्योगासाठी आणि ग्राहकांसाठी फायदेशीर पाऊल
FDA च्या या निर्णयामुळे खाद्यउद्योगात काम करणाऱ्या कंपन्यांना आता त्यांच्या उत्पादनात सुरक्षित रंग वापरण्याचे अधिक पर्याय मिळाले आहेत. ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेत उत्पादनांचे दर्जा सुधारण्याकडे हे महत्वाचं पाऊल ठरणार आहे.
तसेच, आजच्या काळात अनेक ग्राहक खायचा गोष्टी खरेदी करताना त्यांच्या घटकांकडे लक्ष देतात. “कृत्रिम रंग वापरले आहेत का?” हे तपासतात. अशावेळी नैसर्गिक रंगांचा वापर हा विक्रीसाठीही फायदेशीर ठरणार आहे.
नवीन रंग लवकरच बाजारात दिसतील
FDA च्या मते, हे तीन रंग वापरण्याची प्रक्रिया आता अधिकृतरित्या सुरू होणार आहे. त्यामुळे लवकरच बाजारात वेगवेगळ्या खायचा पदार्थांमध्ये हे नैसर्गिक रंग वापरले जातील.
तसेच, FDA इतर नैसर्गिक रंगांनाही लवकर परवानगी देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे भविष्यात आपल्याला आणखीही अनेक नैसर्गिक रंगांचे पर्याय मिळतील, जे आरोग्यासाठी सुरक्षित आणि पर्यावरणास हितकारक असतील.