गुढी उभारली की घराघरात आंब्याचा सुवास दरवळायला लागतो. एप्रिल महिन्याची अखेर होताहोता तर चांगले दर्जेदार आंब्यांच्या पेट्यांची ऑर्डर द्यायची लगबग सुरु होते. यामध्ये जर आंब्याचं उत्पादन कमी असेल तर खिशाला जोरदार फटका बसतो. त्यात आंबाही आकाराने लहान असेल तर मन ही हिरमुसते. फळाचा राजा आंब्याची आस सीझन संपेपर्यंत ओसरतचं नाही. लोकांना उत्तमोत्तम आंबे खायला मिळावेत म्हणून शेतकरीही मेहनत घेतात.
आंब्याची गुणवत्ता चांगली राहावी आणि अधिक उत्पादन मिळावं यासाठी पारंपारिक पद्धतीने तर या बागांची काळजी घेतली जातेच. पण यामध्ये आणखीन एक अभिनव कल्पना उदयाला आली आहे ती म्हणजे आंब्याला आच्छादन घालणं.
आंध्रप्रदेशमधल्या चित्तुर तालुक्यात जरी तुम्ही आता गेलात तर तुम्हाला तिकडच्या सगळ्या आंब्यांच्या बागांमधील आंबे हे एका संरक्षणामध्ये झाकुन ठेवलेले दिसतील.
चित्तुर जिल्ह्यात आंब्याचं चांगलं उत्पादन घेतलं जातं. या उत्पादनात वाढ व्हावी आणि फळाची गुणवत्ताही सुधारावी या उद्देशाने चित्तुरच्या प्रशासनाने या तंत्राचा अवलंब केला आहे.
चित्तुर जिल्ह्यामध्ये तोतापुरी, बेनिशान, मल्लिका, आल्फान्सो अशा विविध जातीच्या आंब्याचं उत्पादन घेतलं जातं. आंध्रप्रदेश राज्यात आंब्याचे उत्पादन आणि त्यापासून बनवण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांमध्ये चित्तुर जिल्ह्याचा वाटा जास्त आहे. चित्तुर जिल्ह्यातलं आंब्याचं वार्षिक उत्पन्न 7.5 लाख टन आहे ज्यातून वर्षाला 1 हजार कोटीची उलाढाल होते.
कीटक, रोग, वादळी वारे, अवकाळी पाऊस अशा वातावरणीय बदलांमुळे गेल्या दशकभरापासून आंब्यांच्या उत्पादनावर नकारात्मक परिणाम झाला आहे. उत्पादनात आणि गुणवत्तेतही घट झाली आहे.
यामुळे या पीकाचं उत्पादन वाढावं यासाठी इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी आंब्याला आच्छादन घालण्याची कल्पना विकसीत केली आहे. यानुसार, इथल्या आंब्यांना एक पातळ आणि जैवविघटनशील लोखंडी तारांच्या जाळीचं आवरण घातलं जातं. या आवरणामुळे ऊन, वारा, पाऊस आणि कीटक व अन्य रोगांपासून फळाचं रक्षण होतं. जिल्हाधिकारी सुमीत कुमार यांनी याविषयीची माहिती दिली.
दरम्यान, जिल्हा फलोत्पादन अधिकारी डी. मधुसूदन रेड्डी म्हणाले की, आंब्याच्या आवरणांचा वापर अनेक शेतकरी करु लागले आहेत. बाजारात प्रति नग 2 रुपये किंमतीचं प्रत्येक आवरण शेतकऱ्यांना 1 रुपये या अनुदानित दरानं दिलं जाईल. फलोत्पादन विभाग अनुदानाचा खर्च उचलेल, ज्यामुळे शेतकऱ्यांची बचत वाढेल.”
सध्या आंब्याचा हंगाम सुरु आहे म्हणून चित्तूर जिल्ह्यामध्ये प्रशासनातर्फे 1.92 कोटींहून अधिक आवरणं वितरित केले आहेत. यामुळे 2 हजार एकरपर्यंच बाग असलेले शेतकरी आपल्या उत्पादनाची योग्य ती काळजी घेऊ शकतात. या पद्धतीमुळे उत्पादनाची गुणवत्ता आणि उत्पादनाचं प्रमाणही वाढेल ज्यामुळे देशांतर्गत आणि परदेशातही दर्जेदार फळाची निर्यात करता येईल.
 
				 
											 
								 
								 
								


