यशोगाथा – येनिकोणी गावाची

Grampanchayat : येनिकोणी गावातल्या तरुणांनी नेतृत्वाची धुरा हातात घेत गावाचा कायापालट केला. गावात केवळ विकासात्मक कामं करुन गावाचा विकास केला नाही तर गावात संघटनबांधणी आणि सामाजिक सलोखाही निर्माण केला. म्हणूनच ‘गाव असं गुणी, नाव येनिकोणी’ ही या गावाची ओळख समग्र पंचक्रोशित निनादू लागली. 
[gspeech type=button]

नागपूर जिल्ह्यातलं नरखेड तालुक्यातलं येनिकोणी गाव. गावाची लोकसंख्या साधारण दीड हजार. अन्य गावांप्रमाणेच इथेही नानाविध समस्या होत्या. पण इथल्या तरुणांनी नेतृत्वाची धुरा हातात घेत गावाचा कायापालट केला. गावात केवळ विकासात्मक कामं करुन गावाचा विकास केला नाही तर संघटनबांधणी आणि सामाजिक सलोखाही निर्माण केला. म्हणूनच ‘गाव असं गुणी, नाव येनिकोणी’ ही या गावाची ओळख समग्र पंचक्रोशित निनादू लागली. 

गावाचं प्रवेशद्वार पाहताच गावामधलं नंदनवन कसं असेल याची प्रचिती येते. ग्रामविकास आणि आदर्श गाव या अंतर्गत राबवण्यात येणारे सर्व उपक्रम या गावात पूर्ण केले आहेत. गावातले मोठे आणि स्वच्छ रस्ते, रस्त्यालगतची सांडपाणी वाहून नेणारी बंदीस्त गटारे, जलव्यवस्थापन, आधुनिक शाळांच्या इमारती, गावातील शौचालये, कचऱ्याचे व्यवस्थापन अशा प्रत्येक गोष्टीवर लक्ष देवून काम केलं आहे. अर्थातच या सगळ्या कामांमध्ये लोकसहभागाची मोठी साथ लाभली आहे. 

गावविकासासाठी सर्वांगिण विकास मंचाची स्थापना

येनिकोणी गाव हे सुरुवातीला कोणाच्या ध्यानीमनी नव्हतं. अन्य गावांसारखंच सोई-सुविधांचा अभाव, दारूचे अड्डे, सट्टा आणि जुगाराचेही गुत्थे चालायचे. राजकारणामुळे गावात सलोख्याचं वातावरण नव्हतं. मात्र, गावातीलच ग्रामस्थ मनीष फुके यांनी पुढाकार घेत गावाच्या विकासासाठी सर्वांगिण विकास मंचाची स्थापना केली. या मंचाच्या मदतीने त्यांनी गावातील सगळ्या लोकांना, तरुण-तरुणींना संघटनबांधणी एकत्र केलं. गावात स्वच्छता, व्यसनमुक्ती असे अनेक कार्यक्रम त्यांनी हाताळले. तसंच गावकऱ्यांच्या छोट्या-छोट्या समस्याही सोडवायला त्यांनी सुरुवात केली. 

पुढे मनिष फुके यांनी  सर्वांगीण विकास मंचाच्या माध्यमातून ग्रामपंचायतची निवडणूक लढवली. या निवडणूकीवेळी त्यांनी गावाच्या विकासाचं चित्र कसं असेल याची स्पष्टता देणारा जाहीरनामा गावातल्या प्रत्येक घरात पोहोचवला. गावकऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत सर्वांगिण विकास मंचाच्या सर्व सदस्यांना निवडून दिले आणि फुके यांच्यावर सरपंचाची जबाबदारी सोपवण्यात आली. 

ग्रामस्वच्छता, वृक्षलागवड, रस्ते रुंदीकरण, अतिक्रमण दूर करण्याची कामे त्यांनी हातात घेतली. या कामांसाठी सुरुवातीला काही ग्रामस्थ विरोध दर्शवित. पण अन्य गावकऱ्यांच्या एकीमुळे कामं पूर्ण करता आली.  

ग्रामपंचायतीचं उत्पन्न

गावात चांगल्या सोई-सुविधा निर्माण करण्यासाठी पैसा आवश्यक होता. ग्रामपंचायतीचं उत्पन्न पुरेसं नव्हतं. काही कामांसाठी लोकवर्गणी गोळा केली जायची. तर मोठ्या कामांसाठी सतत पाठपुरावा करत जिल्हा विकास निधी, आमदार आणि खासदार निधीतून अर्थसहाय्य मिळवलं. 

पायाभूत सुविधा

या येणिकोणी गावामध्ये मोठे रुंद असे सिमेंटचे रस्ते बांधले आहेत. हा रस्ता नेहमी स्वच्छ टापटीप राहील याची गावकरी काळजी घेतात. रस्त्यावरील पथदिव्यांवर एलईडी दिवे लावलेले आहेत. रस्त्या लगतची गटारं ही उघडी न ठेवता बंद केलेली आहेत. त्यामुळे रस्ते ही चांगले दिसतात आणि गावकऱ्यांचं आरोग्यही जपलं जातं. या गटारातून वाहणारं सांडपाणी हे गावाच्या बाहेर तसंच वाहतं न सोडता सांडपाणी पुनर्वापर या शाश्वत पर्यायाचा वापर करुन रस्त्यालगतच्या झाडासाठी त्याचा वापर केला जातो. याच पर्यायामुळे दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर कमी झाला. 

हे ही वाचा : नेरी मिर्झापुर ठरले सोलर गाव

जलव्यवस्थापन

गावात मुबलक पाणी रहावं यासाठी गावातील नदी आणि नाले वेळोवेळी गाळ काढून खोलीकरण केलं जातं. यावर साखळीने सिमेंट बंधारे, फाडी बंधारे, कोल्हापुरी बंधाऱ्यांची निर्मिती केली आहे. जुन्या बंधाऱ्याचीही दुरुस्ती केली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीसाठी साठवण तलाव, शेत तलावांचीही निर्मिती केली आहे. 

पाणलोट व्यवस्थापनांतर्गत शेतीच्या बंधाऱ्यावर कामे करून पाणी व्यवस्थापन करण्यात आले. भूमिगत नाल्याना गावातून वाहणाऱ्या मुख्य नाल्याशी जोडलं आहे.  पावसाचं पाणी जमिनीत मुरविण्याची व्यवस्था केली आहे. यामुळे भूजल पातळीत वाढ झाल्याने विहिरी आणि बोरवेलमधल्या पाणीसाठ्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे कधिकाळी कोरड्या पडणाऱ्या विहिरी आणि कुपनलिकांनासुध्दा आता बारमाही पाणी असतं.  येनिकोणी गावाने पिंपळगाव तलाव निर्मितीतसुद्धा सहभाग नोंदवत ग्रामस्थांनी त्यासाठी आपल्या जमिनी स्व-इच्छेने सरकारला दिल्या आहेत. 

गावात पाणीपुरवठा योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवलं जातं. 

हागणदारमुक्त गाव

येनिकोणी गाव खऱ्या अर्थाने हागणदारीमुक्त गाव झाले आहे. शौचालयांच्या स्वच्छतेसाठी यंत्राचा उपयोग केला जातो. अशाप्रकारच्या यंत्राचा उपयोग करणाऱ्या मोजक्याच ग्रामपंचायतींमध्ये येनिकोणीचा समावेश आहे. 

कचरा व्यवस्थापन

येनिकोणी गावाने  कचरा व्यवस्थापनासाठी नाडेफ टाक्या बांधल्या आहेत. गावकरी आपल्या घरातील  कचरा, या टाकीत स्वतः नेऊन टाकतात. त्यासाठी कोणत्याही कचऱ्याची वाहतूक किंवा कचरागाडी फिरवली जात नाही. सर्व घरांमध्ये कचराकुंड्या आहेत. 

ज्यांच्याकडे गुरं – शेळ्या आहेत ती लोकं गुरांचं शेणमुत्र आणि अन्य कचरा गावाबाहेर तयार केलेल्या खत खड्यात आणि नाडेप टाक्यामध्येच नेऊन टाकतात. तसंच गावातल्या ओल्या कचऱ्याचं योग्य पद्धतीने संकलन करून त्यातून कंपोस्ट खतांची निर्मिती केली जाते. या कंपोस्ट खतामुळे शेतीचं आरोग्य सुधारायला मदत झाली आहे. 

गुरांचा कचरा आणि घरातल्या ओला कचऱ्याचा तर गावकऱ्यांनी खूप चांगला उपयोग केलाच. पण प्लास्टीक कचऱ्याचा सुद्धा उपयोग गावकऱ्यांनी रस्तानिर्मिती करण्याचा अभिनव उपक्रम राबवला. 

आरोग्यदायी गाव

गावाचा सर्वांगिण विकास करताना गावकऱ्यांचे आरोग्य सांभाळण्यावरही भर दिला आहे. या गावात कुपोषणाची समस्या 100 टक्के सुटलेली आहे. गावात एकही कुपोषणग्रस्त बाळ नाही. गावात लहान मुलांसाठी सातत्याने लसीकरण सुरू असते. गर्भवती महिलेचं बाळंतपण हे रुग्णालयामध्येच केलं जातं. यातही 100 टक्के यश मिळालेलं आहे.  

सांडपाणी, कचरा, गटारांची वेळोवेळी स्वच्छतेमुळे गावात साथीचे आजार आणि डासांमुळे कोणती रोगराई निर्माण होत नाही. वेळोवेळी आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबीरं आयोजित केली जातात. 

ग्रामस्थांप्रमाणे पाळीव जनावरांचीही काळजी घेतली जाते. त्यांच्या आरोग्यासाठी पशु चिकिस्तालयामार्फत नियमित चाचण्या केल्या जातात.  गावातच गुरांसाठी सुसज्ज दवाखाना  आहे. गोठे स्वच्छ ठेवण्यासाठी जनजागृती करण्यात येते. प्राण्यांना पाणी पिण्यासाठी ठिकठिकाणी हौदांची आणि चाऱ्यासाठी कुरणाची व्यवस्था केली आहे.       

प्रशासकीय इमारती

ग्रामपंचायतची स्वतंत्र प्रशस्त इमारत बांधण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची सुद्धा चांगली इमारत बांधली आहे. गावातील स्मशान भूमीचा परिसर वृक्षांनी बहरून गेला आहे. पांदनरस्ते, स्मशानभूमी, क्रीडांगण, खुली व्यायामशाळा, आधुनिक जीम, आरोग्य उपकेंद्र, चौकांचे सुशोभिकरण केलेलं आहे. 

याशिवाय सुसज्ज अशी शाळा आणि अंगणवाडीची इमारत बांधली आहे. यामध्ये डिजिटल तंत्राचा वापर केला जातो. प्रयत्नपूर्वक शाळेची पटसंख्या वाढविण्यात आली. विद्यार्थ्यांना गणवेष आणि शालेय साहित्याचे वितरण केलं जाते. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून शाळेत आरओ यंत्रणा आहे. 

महिला सक्षमीकरण 

गावात महिला शक्तीची जाण ठेवत त्यांच्या सक्षमीकरणासाठी सुद्धा यशस्वी प्रयत्न केले आहेत. महिला बचत गट तयार करून त्यांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामपंचायतीतर्फे नियमित महिला सभा घेतली जाते. महिलांसह दिव्यांग युवकांना स्वावलंबी करण्यासाठी झेरॉक्स मशीन वितरित केल्या आहेत.  

पर्यटन 

गावातील बौध्द विहाराला पर्यटन स्थळाचा ‘ क ‘ दर्जा प्राप्त झाला आहे. वर्षावास कार्यक्रमास राजगिरी बौध्द विहारात हजारोंच्या संख्येने भाविक जमतात. त्यामुळे या स्थळाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याचं काम सध्या सुरु आहे. 

तसंच गावात बिरसा मुंडा चौक उभारुन तेथे दरवर्षी आदीवासी बांधवांसाठी कार्यक्रम आयोजित केले जातात. 

वनौषधी उद्यान

गावातला कचरा आणि सांडपाणी व्यवस्थेवरुन हे गाव पर्यावरणाला महत्त्व देत असल्याचं आपल्या लक्षात आलं आहे. या प्रकल्पांसह गावकऱ्यांनी वृक्षरोपणालाही महत्त्व दिलं आहे. गावातून वाहनाऱ्या मोतीनाल्याचे तीन किलोमिटर खोलीकरणकरून काठावर कडूलिंब, शिवन, सिसम, आमटा, करंजी, गुलमोहर, बांबू या झाडांसह सीताफळ, पेरू, आंबा, जांभूळ अशी फळझाडे लावली आहेत. गावातील आणि बागिच्यातल्या सर्व झाडांना ठिंबक आणि तुषार सिंचन केलं जातं. तसंच ग्रामपंचायतीकडून सात एकर जागेवर वनौषधी उद्यान तयार करण्यात येत आहे. 

हे ही वाचा : सर्वसमावेशक पंचायत व्यवस्था

सुसज्ज ग्रामपंचायत

येणिकोणी गावाची ग्रामपंचायत ही आधुनिक स्वरुपातली ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीकडे आवश्यकत्या सोई-सुविधा उपलब्ध आहेत. ग्रामपंचायतकडे स्वतःची फॉगिंगमशीन आहे. डास वाढल्याची तक्रार येण्यापूर्वीच धूरफवारणी केली जाते. यामुळे आजारांवर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळविता आलं आहे. ग्रामपंचायत कार्यालया शेजारी सुसज्ज अभ्यासिका असून तिथे स्पर्धापरिक्षेला उपयुक्त पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. गावातील नाल्यावर फिल्टर मिडीयाचा वापर करून नैसर्गिकरित्या अत्यंत कमी खर्चात शुध्द पाणीपुरवठा केला जातो. 

भविष्यातील उपक्रम 

गावात येत्या काही काळात कोणकोणते प्रकल्प राबवायचे आहेत याची ब्लू प्रिंटही तयार आहे. यामध्ये गावातील संपूर्ण शेती मायक्रो ऐरीगेशनच्या माध्यमाने ओलीताखाली आणणं, सेंद्रीय  शेती विकसित करणं, औषधी वनस्पतींची लागवड, फळबागांची निर्मिती, कोल्ड स्टोअरेजची व्यवस्था, दुग्ध उत्पादन वाढविणे, शेतमालासाठी गोडाऊन, गांडूळ खत प्रकल्प, सौरऊर्जा प्रकल्प, गावात ठिकठिकाणी मुत्रीघर व बेसीनची उभारणी, बसस्थानकावर आरओ फिल्टरसह वॉटर कूलर लावणे, महिला आरोग्याच्या दृष्टीने सॅनेटरी पॅड तयार करण्यासह वेडिंग मशीन बसविणे, सॅनेटरी पॅड शास्त्रोक्त पद्धतीने जाळून नष्ट करण्यासाठी यंत्र लावणे, गाव प्लॅस्टिकमुक्त करणे आणि सगळ्यात महत्त्वाचं गावातला एकही व्यक्तीला गावाबाहेर नोकरीसाठी जावं लागू नये यासाठी  रोजगार निर्मिती करण्यावर भर दिला जाणार आहे. 

कौतुकाचे धनी

गावातील अशा वैविध्यपूर्ण उपक्रमामुळे  गावावर पुरस्कारांची बरसात सुरू असते. अनेक स्थानिक, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारांवर येनिकोणी गावाने आपले नाव कोरलं आहे. येनिकोणी ग्रामपंचायत कार्यालय आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त आहे. लोकमततर्फे ‘सरपंच ऑफ द ईयर’ , सकाळ वृत्तपत्र समूहाचा राज्यस्तरीय पुरस्कार, जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार, आदर्शग्राम तंटामुक्त पुरस्कार, पत्रकार संघ, नरखेड पंचायत समिती, नागपूर जिल्हा परिषद, रोजगार संघ, सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र सरपंच संघटना, जिल्हा पत्रकार संघाचा पुरस्कार येनिकोणी गावाने आपल्या नावे केला आहे.

 

1 Comment

  • Pushpa

    Khupch chan Exelent work

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

One Response

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

sports nutrition : पूर्वीच्या काळी सर्वांच्या घरी महागडं कोचिंग, ब्रँडेड बूट्स, बॅट्स किंवा जिमसारखी उपकरणं उपलब्ध नव्हती पण तरीही मेहनत
वि का राजवाड्यांच्या मते तत्पूर्वी इसवी सन 1659 मध्ये अफजलखानाच्या स्वारीच्या वेळेसच कठिण प्रसंग टाळण्यासाठी मूर्ती माढे येते हलविली होती.
Andropause : एंड्रोपॉज हा शब्द पुरुषांमधील वयानुसार येणाऱ्या हार्मोनल बदलांसाठी वापरला जातो. वयोमानानुसार किंवा काही आजारांमध्ये टेस्टोस्टेरॉन (Testosterone) या पुरुष

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ