खतांची जाहिरात व विक्री

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेतील खत उद्योगावरील हा चौथा लेख. खत उद्योगामध्ये प्रचलित असलेल्या विक्री व्यवस्थापनविषयक पद्धतींची माहिती या लेखात मिळेल.
[gspeech type=button]

खतांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून विक्री वाढविण्यासाठी खत उद्योग अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. यामध्ये शेतकरी समूहांना गोळा करून माहितीपर कार्यक्रम आयोजित करणे, त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करणं इत्यादी उपक्रम केले जातात. यासाठी रेडियो, टीव्ही, वृत्तपत्रे, कृषीविषयक मासिके इत्यादी माध्यमे पारंपरिकरित्या वापरली गेली आहेतच. शिवाय सध्याच्या काळात खत उत्पादक मोबाइल, स्मार्टफोनमार्फत अधिक परिणामकारकरित्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहेत. त्यासाठी आकर्षक ऑडिओ आणि व्हिडियो बनवले जातात. तसच शेतकऱ्यांसाठी आकर्षक बक्षिसे असलेल्या विविध स्पर्धांचं आयोजन केलं जाते. प्रगतीशील शेतकऱ्यांना शेतीमधील त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल बक्षिसे आणि पुरस्कार देतात. गेल्या अनेक दशकांपासून खत उद्योगांनी खत विक्री व्यवस्थापनात अतिशय परिणामकारक वापरलेले तंत्र म्हणजे माती परीक्षण हे होय.

माती परीक्षण: खत विक्रीचे प्रभावी साधन

माती परीक्षण हे मुळात एक शास्त्रीय तंत्र असलं तरी खत उद्योगांनी ते विक्री व्यवस्थापन तंत्र म्हणून प्रभावीपणे वापरलं आहे. शेतातील मातीचा नमुना गोळा करून त्याचे प्रयोगशाळेत परीक्षण करून त्यातील पिकांना उपलब्ध अन्नद्रव्यांची पातळी किती आहे ते शोधायचे आणि त्यानुसार एखाद्या विशिष्ट पिकाला आवश्यक असलेल्या घटकांपैकी कोणते घटक किती प्रमाणात खतांच्या मार्फत पुरवायचे याचं अचूक मार्गदर्शन करायचे हे माती परीक्षणाचं कार्य असतं. आधुनिक रासायनिक खते वापरताना पिकांची गरज आणि शेतातील मातीची सुपीकता यांचा अभ्यास करणं आवश्यक आहे आणि तसा अभ्यास करून खत व्यवस्थापन केल्यास शेतीचा किफायतशीरपणा तर वाढतोच, पण त्याचबरोबर खतांची नासाडी थांबते आणि पर्यावरणाचे प्रदूषण कमी होतं, अशी धारणा शेतकऱ्याच्या मनात तयार झाली की त्याचा माती परीक्षण आणि एकंदरीतच खतांच्या वापरावर असलेला विश्वास दृढ होतो. त्यामुळे ग्राहक म्हणून तो खत उद्योगांशी कायमचा जोडला जातो. अशा प्रकारचा दृढ विश्वास एकदा निर्माण झाला की त्याच उद्योगाने तयार केलेल्या नवीन उत्पादनांवरदेखील शेतकरी सहजपणे विश्वास ठेवतो. याचा फायदा विक्रीसाठी होतो. माती परीक्षणाचे हे महत्त्व लक्षात घेऊन अनेक खत उद्योगांनी शेतकऱ्यांसाठी विनामूल्य किंवा अगदी कमी खर्चात माती परीक्षण सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. 

हे ही वाचा : कृषी निविष्ठा उद्योगांसमोर असलेली आव्हाने 

मृदा आरोग्य कार्ड योजना 

माती परीक्षणाचा एक दूरगामी फायदा असा आहे की, गेल्या अनेक दशकांमध्ये माती परीक्षण करून प्रचंड प्रमाणात जी माहिती गोळा झाली, त्याचा वापर करून काही खत उद्योगांनी नवीन खत उत्पादने तयार केली. अशी उत्पादने एखाद्या विशिष्ट मोठ्या भूभागासाठी सुयोग्य प्रमाणात अन्नद्रव्ये असलेली असतात, जेणेकरून त्या भूभागात अगोदर केलेल्या माती परीक्षणानुसार या अन्नद्रव्यांच्या मात्रा ठरवलेल्या असल्यामुळे पुन्हा नव्याने माती परीक्षण न करताही नव्या खतांचा वापर करता येतो. असे फायदे लक्षात घेऊन भारत सरकारने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी माती परीक्षण करावं यासाठी मृदा आरोग्य कार्ड योजना (soil health card scheme) राबविली आहे. आपल्या शेतातील मातीच्या परीक्षणानुसार वेगवेगळ्या पिकांसाठी कोणती खतं किती प्रमाणात वापरावी, याचं गणित सोप्या पद्धतीने करता यावं यासाठी ऑनलाइन fertilizer dose calculator सुद्धा संबंधित सरकारी विभागाच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली आहे.

किरकोळ विक्री केंद्र: माहितीचा स्रोत  

जसा माती परीक्षण हा खतांच्या विक्रीसाठी उपयुक्त माहितीचा स्रोत आहे, तसाच दुसरा महत्त्वाचा स्रोत म्हणजे खतांची किरकोळ विक्री केंद्र. खतांची वितरण व्यवस्था कशी असते ते आपण आधीच्या भागात थोडक्यात समजावून घेतलं आहे. खते ही साधारणपणे घाऊक किंवा ठोक प्रमाणात वितरित केली जाणारी कृषी निविष्ठा असली, तरीही या वितरण व्यवस्थेच्या शेवटच्या टोकाला असलेले किरकोळ विक्री केंद्रसुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे. कारण शेतकरी ग्राहकांशी त्याचा थेट संपर्क येतो. त्यामुळे तिथून एकंदरीत व्यावसायिक पद्धतीने खत विक्री व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक असलेली ग्राहकांची माहिती उपलब्ध होत असते. ग्राहकांच्या गरजा कोणत्या, कोणत्या खत उत्पादनाची गरज त्यांना केव्हा असते, किती प्रमाणात असते, त्यांना खत वापराबद्दल काही शंका आहेत का, कोणते खत केव्हा आणि किती प्रमाणात वापरायचं याचे निर्णय ग्राहक कशा प्रकारे घेतात, त्यांना नवीन खत उत्पादनांची माहिती कुठून मिळते, कोणाच्या सांगण्याचा प्रभाव त्यांच्यावर असतो, खते विकत घेण्यासाठी त्यांना लागणाऱ्या पैशाची व्यवस्था ते कुठून करतात इत्यादी अनेक प्रकारची माहिती किरकोळ विक्रेत्याला ग्राहकांशी थेट संपर्क साधून मिळवता येते. या सर्व माहितीचा वापर करून विक्री अधिक प्रभावीपणे करता येते. किरकोळ विक्री केंद्रात ग्राहकांच्या खते विकत घेण्याच्या वर्तनाचा (Consumer behavior) अभ्यास करून पुढील हंगामातील विक्री व्यवस्थापनासाठी उपयुक्त असलेले अंदाज (Sales forecast) बांधता येतात, ही एक अतिशय महत्त्वाची बाब आहे. अशा प्रकारची माहिती गोळा करून ती संबंधित खत उद्योगांच्या विक्री व्यवस्थापकांना पुरविल्यास त्यांना पुढील हंगामातील विक्रीचे व्यवस्थापन करण्यासाठी त्याचा खूप उपयोग होऊ शकतो. 

हे ही वाचा : कृषी निविष्ठा उत्पादनांची विक्री व्यवस्था

किरकोळ विक्री केंद्राचे कार्य 

किरकोळ विक्री केंद्राचे एक महत्त्वाचे कार्य शेतकऱ्यांना योग्य माहिती पुरवणे हेही असते. जेणेकरून उत्तम दर्जाची उत्पादने कोणती आणि ती वापरुन आपली शेती किफायतशीर कशी करावी, हे त्यांना समजेल. नवीन उत्पादनांची तांत्रिक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकरी प्रशिक्षण, कृषी सल्ला केंद्र यांचे आयोजन केले जाते. तसेच कृषी विभागाशी संलग्न असे कृषी विस्तार (Agricultural Extension) कार्यक्रम आयोजित करण्यासाठी एक मोक्याची जागा आणि एक महत्त्वाचा भागीदार म्हणून किरकोळ विक्री केंद्र महत्त्वाची भूमिका बजावू शकते. तसेच शेतकऱ्यांना खताची योग्य मात्रा वापरण्याची शास्त्रीय पद्धत समजावून सांगणे, त्यासाठी त्यांच्या शेतातील मातीचे माती व पाणी परीक्षण करून घेणे, त्याचे निकाल त्यांना समजावून सांगणे व त्यानुसार योग्य प्रमाणात खतांची निवड करणे इत्यादी मध्ये शेतकरी आणि संबंधित तांत्रिक विभाग किंवा माती / पाणी परीक्षण प्रयोगशाळा यांच्यामधील एक महत्त्वाचा दुवा म्हणून किरकोळ विक्री केंद्राचे महत्त्व आहे. तसेच बाजारात उपलब्ध असलेल्या खतांमध्ये होत असलेली भेसळ ओळखून त्यानुसार उत्तम खतेच विकत घेऊन शेती किफायतशीर कशी करावी, बोगस किंवा भेसळयुक्त उत्पादने काशी टाळावीत याचेही प्रबोधन याच किरकोळ विक्री केंद्रमार्फत होऊ शकते. तसेच, अल्पभूधारक शेतकऱ्यांनी खतांचा प्रत्यक्ष वापर करेपर्यंत खतांची साठवणूक योग्य प्रकारे कोरड्या व स्वच्छ ठिकाणी करण्यात किरकोळ विक्री केंद्र शेतकऱ्याला मदत करू शकते.

सारांश 

अशा प्रकारे खत विक्री व्यवस्थापनातील चार प्रमुख घटक म्हणजेच खत उत्पादनांचे गुणधर्म (Product), खतांच्या किंमती (Price), खतांचे वितरण (Place) आणि खतांची जाहिरात (Promotion) या घटकांचे योग्य व्यवस्थापन करून विक्री केली जाते. व्यावसायिक  व्यवस्थापनाचे शिक्षण-प्रशिक्षण घेतलेल्या युवकांना खत उद्योगांमध्ये करियरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.     

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

sports nutrition : पूर्वीच्या काळी सर्वांच्या घरी महागडं कोचिंग, ब्रँडेड बूट्स, बॅट्स किंवा जिमसारखी उपकरणं उपलब्ध नव्हती पण तरीही मेहनत
वि का राजवाड्यांच्या मते तत्पूर्वी इसवी सन 1659 मध्ये अफजलखानाच्या स्वारीच्या वेळेसच कठिण प्रसंग टाळण्यासाठी मूर्ती माढे येते हलविली होती.
Andropause : एंड्रोपॉज हा शब्द पुरुषांमधील वयानुसार येणाऱ्या हार्मोनल बदलांसाठी वापरला जातो. वयोमानानुसार किंवा काही आजारांमध्ये टेस्टोस्टेरॉन (Testosterone) या पुरुष

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ