पाऊस सुरू झाला की, कपड्यांची मोठी अडचणच होते नाही का? बाहेर पडलं की कपडे भिजण्याची भीती, दमट हवामान, घाम आणि मग अस्वस्थ वाटणं… अशा कितीतरी गोष्टी असतात. अशावेळी कपडे कोणते घालायचे? कपडे भिजले तर काय? असे अनेक प्रश्न समोर उभे राहतात. पण काळजी करू नका, आज आपण काही खास प्रकाराच्या कपड्यांबद्दल जाणून घेणार आहोत. जे तुम्हाला पावसाळ्यातही एकदम ‘फॅशनेबल’, आरामदायक आणि कोरडे ठेवतील. चला तर मग, पाहुया पावसाळ्यासाठी कोण कोणत्या प्रकारचे कपडे तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत!
1.कॉटन
कॉटन म्हणजेच मऊ सूती आणि हलकंफुलकं कापड. कॉटनचे कपडे सर्वांचीच पहिली चॉइस असते. दमट हवामानात कॉटनचे कपडे मस्त हवेशीर वाटतात आणि घामही लगेच शोषून घेतात. भिजलात तरी ते पटकन सुकतात. कॉलेजला जाताना, ऑफिसला, किंवा रोजच्या घरी वापरासाठी कॉटनचे टी-शर्ट, कुर्ती, शर्ट एकदम बेस्ट आहेत.
2. लिनन
लिनन हा थोडा ट्रेंडी कापडाचा प्रकार आहे, पण खूपच आरामदायक आहे. लिनन कापडही हलके असते आणि हवा आत-बाहेर जाऊ देतो. त्यामुळे पावसात थोडे भिजलात तरी तुम्ही लगेच कोरडे होतात. या कपड्यांची विण थोडी सैलसर असल्याने हवा आत-बाहेर खेळती राहते. लिननचे ट्राउझर्स, शर्ट्स किंवा स्कर्ट पावसाळ्यात खूपच छान दिसतात.
3. रेयॉन
रेयॉन चे कपडे थोडे ग्लॉसी असतात आणि अंगावर मस्त बसतात. रेयॉन हा ‘सेमी-सिंथेटिक’ कापड आहे. याचा स्पर्श खूप मऊ असतो. पावसाळ्यात घाम नको असतो, ना चिकटपणा. आणि हे सगळं टाळायचं असेल, तर रेयॉनचे ड्रेसेस, टॉप्स किंवा कुर्ती नक्कीचा उत्तम पर्याय आहे. यामध्ये तुम्ही स्टायलिशही दिसता आणि तुम्हाला कम्फर्टेबलही वाटते.
4. चेंब्रे
तुम्हाला डेनिम म्हणजेच जीन्सचा कपडा खूप आवडतं असेल, पण पावसाळ्यात भिजल्यावर डेनिमचे कपडे जड होतात आणि मग त्याचं ओझं वाटतं. तर मग चेंब्रे कपड्यांचा पर्याय तुमच्यासाठीच आहे. चेंब्रेचा कपडा दिसायला डेनिमसारखाच दिसतो, पण तो डेनिमपेक्षा खूप हलका असतो आणि हवेशीर असतो. चेंब्रे कापडाचे शर्ट्स आणि ड्रेसेस एकदम मस्त वाटतात.
5.नायलॉन
पावसाळ्यात घराबाहेर पडताना थोडी भीती वाटते ना, की कपडे भिजतील? अशावेळी नायलॉनचे कपडे नेहमीच उत्तम पर्याय असतो. नायलॉन जास्त पाणी शोषून घेत नाही. तो ‘वॉटर-रेसिस्टंट’ असतो आणि खूप लवकर सुकतो. पावसाळ्यात तुम्ही जर कुठे फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर अशावेळी नायलॉनचे कपडे घालणं हा उत्तम पर्याय असू शकतो.
6. पॉलिस्टर
पॉलिस्टर हा एक पूर्णपणे सिंथेटिक धागा आहे. नायलॉनप्रमाणेच, पॉलिस्टर कपडे पण जास्त पाणी शोषून घेत नाहीत आणि कपडे लवकर सुकतात.याची खासियत म्हणजे पॉलिस्टरचे कपडे आकसून लहान होत नाहीत किंवा ताणले जात नाहीत. त्यामुळे त्याची फिटिंग कायम राहते. व्यायाम करताना, धावताना किंवा इतर कोणत्याही ‘ॲक्टिव्हवेअर’साठी पॉलिस्टर खूप चांगला आहे.
7. क्रेप
क्रेपचे कपडे मऊ आणि थोडे सैलसर असतात. त्यामुळे ते अंगाला चिकटत नाहीत आणि लवकर सुकतात. क्रेपचे ड्रेसेस, साड्या किंवा टॉप्स दिसायलाही छान आणि वापरायलाही सोईस्कर आहेत.
8.जॉर्जेट
जॉर्जेट कपडा पातळ आणि दिसायला अगदी फ्लोई असतो. तो थोडा पारदर्शक असतो पण पावसात तो लवकर सुकतो. तुम्हाला जर ग्लॅम लूक हवा असेल तर जॉर्जेटच्या कुर्ती किंवा साड्या ट्राय करा.
9. ब्लेंड्स
ब्लेंड्स म्हणजे दोन किंवा अधिक प्रकारचे धागे एकत्र करून बनवलेले कपडे. कॉटन-पॉलिस्टर असे दोन वेगळ्या प्रकारचे धागे एकत्र वापरून कपडा तयार केला जातो. ब्लेंड्सचे कपडे खूप दिवस टिकतात आणि पावसाळ्यात कधी ऊन, कधी पाऊस या सतत बदलत असणाऱ्या हवामानात हे कपडे खूप सोयीचे ठरतात.
10. टेन्सेल
टेन्सेलचा कापड पर्यावरणासाठी चांगला आहे कारण तो ‘इको-फ्रेंडली’ कापड आहे. टेन्सेल खूपच मऊ, हवेशीर आणि लवकर सुकणारा कपडा आहे. टेन्सेलचे कपडे दमट हवेतही अंगाला चिकटत नाही आणि एकदम ट्रेंडी लुक देतात.
पावसाळ्यात कपड्यांची निवड जरा विचारपूर्वक केली की,फॅशन आणि कम्फर्ट दोन्ही साधता येऊ शकतं.