इन्कम टॅक्स विभागाने आयटीआर फाईल करण्यासाठी आवश्यक असलेले फॉर्म्स त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेले आहेत. आर्थिक वर्ष 2023-2024 मध्येही खूप लवकर फॉर्म दिले होते. त्यानुसार यंदाही एप्रिल महिन्याच्या अखेरीस फॉर्म उपलब्ध करुन दिलेले आहे. पण या फॉर्मसोबत आवश्यक असलेले ऑनलाईन सॉफ्टवेअर/ फॉर्म अजूनही दिलेले नाही. त्यामुळे 15 जूनपूर्वी आयटीआर भरण्याची घाई न करण्याचा सल्ला दिला जातो.
टीडीएस सर्टिफिकेट – फॉर्म 16 ए अत्यावश्यक
मागच्या लेखात पाहिल्यानुसार, कंपनीकडून आपल्याला अजून फॉर्म 16 म्हणजे टिडीएस सर्टिफिकेट अजून मिळालेलं नाही. हे सर्टिफिकेट आपल्याला 15 जूनपर्यंत मिळणं अपेक्षित आहे. इन्कम टॅक्सच्या नियमांनुसार या सर्टिफिकेटमध्ये आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीपर्यंतची कर कपात कंपनीला नमूद करायची असते. त्यासाठी 31 मे पर्यंतचा अवधी असतो.
कंपनीने ई-टिडीएस भरल्यावर त्यातील विविध बाबीं फॉर्म 26 एएस (Form 26 AS) मध्ये दिसण्यासाठी तीन ते चार दिवसाचा वेळ लागतो. त्यामुळे जर कंपनीने 31 मे रोजी तुमचं ई – टिडीएस रिटर्न केलं असेल तर जूनच्या पहिल्या आठवड्या अखेर तुमच्या कर कपातीविषयीची माहिती फॉर्म 26 एएस मध्ये दिसू लागते. त्यानंतर कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना टिडीएस सर्टिफिकेट वितरीत करायचं असते.
टिडीएस सर्टिफिकेट मिळाल्यावर आयटीआर फाईल करणं सोपं जातं. कारण डिजिटलायझेशनमुळे टिडीएसमध्ये दिलेली माहिती ही आयटीआर फॉर्ममध्ये तांत्रिक पद्धतीने (ऑटोमेटिक) दिलेली असते. त्यामुळे तुम्हाला फक्त टिडीएस सर्टिफिकेट, आयटीआर फॉर्म आणि वार्षिक माहिती पत्र ( Annual Information Statement) वरची माहिती बरोबर आहे की नाही हे तपासायचं असतं.
जूनच्या दुसऱ्या आठवड्यात SFT अपडेट होतो
स्पेसिफाईड फायनान्शियल ट्रान्जेक्शन (SFT) म्हणजे तुमचे विशिष्ट वित्तीय व्यवहार. जर तुमचा पगार कमी असेल तुमच्या पगारातून टिडीएस कापला जात नसेल तरीही तुम्ही काही गुंतवणूक करत असाल तर त्याची माहिती दाखवावी लागते. इन्कम टॅक्सच्या नियमांमध्ये अलिकडे केलेल्या बदलांनुसार जर तुमच्या पगारातून बँकांमधल्या ठेवी, म्युच्युअल फंडमधली गुंतवणूक, तुम्ही शेअर्स घेतले असतील तर त्याची माहिती, तुमच्या क्रेडिट कार्डची माहिती, तुमच्या अन्य आर्थिक व्यवहाराची माहिती 31 मे पर्यंत नोंदवावी लागते. ही सर्व माहिती जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तुमच्या AIS फॉर्ममध्ये नमूद होऊन इन्कम टॅक्सच्या पोर्टलवर दिसू लागते.
हे ही वाचा : आयटीआर भरायचा आहे.. पण फॉर्म 16 घेतला का?
तांत्रिक अडचणी
इन्कम टॅक्स भरण्यासाठी इन्कम टॅक्स विभागाकडून आयटीआर युटिलिटी म्हणजे विशेष असं सॉफ्टवेअर दिलं जातं. अनेकदा या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचणी येतात, त्यामुळे हिशोब चुकला जातो. तर काही वेळेला डेटा व्हेलिडेशन किंवा अन्य अडचणी येतात. त्यामुळे सॉफ्टवेअर आल्यानंतर थोडे दिवस त्याचं परिक्षण करुन त्यात काही त्रुटी असल्यास त्या दूर केल्यानंतर आयटीआर भरणं उचित असतं.
15 जून पूर्वी आयटीआर फाईल केला तर काय अडचणी येऊ शकतात
जर तुम्ही 15 जूनपूर्वी म्हणजे तुमच्याकडे टिडीएस सर्टिफिकेट, फॉर्म 26 एएस आणि वार्षिक माहिती पत्र (AIS ) येण्यापूर्वी आयटीआर फाईल करण्याची घाई केली तर तुमचे उत्पन्न आणि त्यातून होणारी कपात याविषयीची चुकीची माहिती भरली जाण्याची शक्यता असते. कारण पुन्हा एकदा टिडीएस सर्टिफिकेटवर अचूक माहिती असते जी या इन्कम टॅक्सच्या पोर्टलवर जमा झालेली असते. त्यामुळे इन्कम टॅक्स विभागाकडूनचं जोपर्यंत तुम्हाला टिडीएस सर्टिफिकेट, फॉर्म 26 एएस आणि वार्षिक माहिती पत्र (AIS ) कागदपत्रं मिळत नाहीत तोपर्यंत आयटीआर फाईल करण्याची घाई न केलेली उत्तम.
जेव्हा तुम्ही आवश्यक ती कागदपत्रं मिळण्याआधी आयटीआर फाईल करता तेव्हा, तुमच्या फॉर्म 26 एएस आणि एआयएसमधली माहिती बहुतांशी वेळेला जुळत नाही. वर सांगितल्यानुसार, शेवटच्या तिमाहीतला टिडीएस कर कपात, अन्य गुंतवणूक अशी सगळी माहिती एआयएसमध्ये आणि फॉर्म 26 एएसमध्ये प्रतिबिंबीत होण्यासाठी जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंतचा वेळ लागतोच.
त्यामुळे जेव्हा सेंट्रलाईज्ड प्रोसेसिंग सेंटर कडून इन्कम टॅक्स रिटर्नची प्रक्रिया केली जाते, तेव्हा फॉर्म 26 एएस मध्ये दाखवलेल्या नोंदी प्रमाण मानून त्यानुसार परतावा दिला जातो. त्यामुळे एकतर तुम्हाला कर भरावा लागू शकतो किंवा तुम्ही कर भरायला पात्र नसाल तर तुम्हाला मिळणारा परतावा कमी येऊ शकतो. तुमचा पूर्ण परतावा मिळवण्यासाठी मग तुम्हाला योग्य त्या माहितीसह सुधारित रिटर्न करावा लागतो. यासाठी सरकारने 31 डिसेंबरपर्यंतची मुभा दिलेली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पुन्हा करण्याऐवजी आठवडाभर धीर धरुन सगळी कागदपत्रं मिळाल्यावर व्यवस्थित आयटीआर फाईल करावा.



