तीसेक वर्षापूर्वी ‘स्टीलच्या बशी’ ऐवजी ‘प्लास्टिकच्या प्लेट’ मध्ये जेवायला मिळणं हे खूप अप्रुप वाटायचं.. प्लास्टिकने बाजारावर इतका कब्जा केला की, स्वयंपाकघरामध्ये स्टील आणि अन्य पारंपारिक भांड्यामध्ये प्लास्टिकची कटलरी जास्त दिसू लागली. पण प्लास्टिक प्रदुषणाचा विळखा आणि त्याच्या वापरातली असुरक्षितला समजू लागल्यापासून लोक पुन्हा एकदा पारंपारिक भांड्याचा वापर वाढवत आहेत.
याशिवाय पर्यावरणाला पूरक अशा कृषी उत्पादनापासून भांडी वा अन्य वस्तू निर्माण करुन त्याचा वापर करण्यावर भर देत आहेत. यामध्ये बांबूपासून बनवलेली भांडी, शोभेच्या वस्तू, फर्निचर यांचा समावेश आहे. कागदापासून बनवलेले तात्पुरत्या वापरायच्या बश्या, वापरलेल्या ऊसाच्या कचऱ्यापासून आणि गव्हाच्या पेंढ्यापासून बनवलेल्या वस्तूही आता वापरात आहेत. या सगळ्या कृषी उत्पादनांच्या कचऱ्यापासून बनवलेल्या वस्तूंमध्ये आणखीन एका वस्तूची वाढ झाली आहे ती म्हणजे ‘भाताचे तूस’. शेतात तांदूळ तयार झाल्यावर तो गिरणीत दळला जातो. त्यावेळी त्याच्याभोवती जे तपकिरी आवरण असतं ते वेगळं होतं आणि आत पांढरा तांदूळ असतो. या तपकिरी आवरणाला ‘भाताचं तूस’ म्हणतात. आता याच भाताच्या तूसापासून तयार केलेल्या वस्तू तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरातल्या कटलरी मध्ये वापरता येणार आहेत.
बेंगळुरूमध्ये टर्टल टेल्स, एहा आणि रामेन अशा तीन उत्पादन कंपन्या या तांदळाच्या तूश्यापासून स्वयंपाक घरात आणि गृहपयोगी वस्तूंची निर्मिती करतात. जाणून घेऊयात या उत्पादनांबद्दल आणि या तीन कंपन्याच्या प्रवासाबद्दल.
टर्टल टेल्स
भाताच्या तूसापासून वस्तू बनवणारी पहिली कंपनी आहे टर्टल टेल्स. निपून जैन या पूर्वाश्रमीच्या बिझनेस डेव्हलपरनी साधारण वर्षभरापूर्वी टर्टल टेल्स नावाची कंपनी सुरु केली. प्लास्टिकच्या काही वस्तू ह्या फक्त एकदाच वापरल्या जातात. त्यानंतर त्या फेकून दिल्या जातात. यामुळे प्लास्टिक प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याशी त्यांना जाणीव झाली. दैनंदिन वापरात लागणाऱ्या या प्लास्टिक वस्तूंना शाश्वत पर्याय म्हणून त्यांनी ‘टर्टल टेल्स’ या ब्रँन्डची निर्मिती केली. या ब्रँडद्वारे त्यांनी भाताच्या तूसापासून दीर्घकाळ टिकतील अशा वस्तू निर्माण करायला सुरुवात केली. यासाठी ते कर्नाटकमधल्या गिरण्यांमधून भात दळल्यानंतर तूस घेऊ लागले. त्यावर संशोधन करुन हळूहळू उत्पादनं निर्माण होऊ लागली.
टर्टल टेल्स कंपनीचे चहा पिण्याचे कप्स, कॉफीसाठी वापरले जाणारे मग्ज, पाण्याच्या बाटल्या, सीपर्स ही उत्पादनं उपलब्ध आहेत. पुढच्या आठ ते दहा महिन्यात शेतकऱ्यांशी थेट संपर्क करुन त्यांच्याकडून तांदळाचं तूस मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जेणेकरुन शेतकऱ्यांना तांदळासोबत आणखी एक उत्पादन स्त्रोत निर्माण होईल.
अनेकदा पीक घेतल्यानंतर शेत कचरा हा जाळला जातो. त्यामुळे हवा प्रदूषित होऊन मोठ्या प्रमाणावर कार्बन उत्सर्जन होतं. तसंच एखाद्या उत्पादन निर्मितीमध्ये पूर्णपणे नवीन कच्चा माल वापरण्याऐवजी आधीच उत्पादित असलेल्या वस्तूचा वापर करणं उत्तम असतं. यामुळे कचऱ्याचं प्रमाण कमी होतं. शिवाय उत्पादन खर्चही कमी होतो. पण ही उत्पादने पूर्ण बायोडिग्रेडेबल, कंपोस्टेबल उत्पादने म्हणून विकली जात नाहीत. दरम्यान, ही उत्पादनं पूर्ण कंपोस्ट करु शकतो का, यावर संशोधन सुरु असल्याचं निपून जैन यांनी स्पष्ट केलं.
या नाविन्यपूर्ण उत्पादनांसह टर्टल टेल्समध्ये नोटबुक, डायरी आणि स्टेशनरी ही उत्पादनंही झाडापासून कागद निर्मिती न करता बनवली जातात. तसंच पॉलिस्टर आणि कापसाचा पुनर्वापर करुन टीशर्ट आणि हुडीज बनवले जातात.
एहा ब्रँन्ड
कोरोनाचा काळ हा सगळ्यासाठीच वाईट काळ असला तरी या काळात अनेक नवीन उद्योग उदयास आले. अनेक छोटे उद्योजकही या काळात घडले. याचचं एक उदाहरण म्हणजे एहा ब्रँन्ड. महादेव चिक्कण्णा हे या कंपनीचे संस्थापक आहेत.
कोरोनापासून बचावासाठी अत्यावश्यक असलेलं बायो-कंपोझिट फेस शिल्डच्या निर्मितीतून एहा ही कंपनी ब्रॅन्ड म्हणून उदयास आली. बायो कंपोझिट म्हणजे जैव-संमिश्र. यात नैसर्गिक तंतूंचा पुनर्वापर करत नैसर्गिक धागे आणि पॉलिमरचा वापर करुन उत्पादन निर्मिती केली जाते. मात्र, मोठ-मोठ्या उद्योगामध्ये बायो कंपोझिट घटकांचा वापर करुन उत्पादन निर्मितीला वेळ लागतो म्हणून अशा पद्धतीचे उत्पादने बनवले जात नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मात्र, अलिकडे अनेकजण शाश्वत, आणि पर्यावरणपूरक उत्पादनांच्या वापराचा ध्यास धरतात हेही त्यांनी हेरलं. त्यामुळे मग त्यांनी तांदळाचे तूस, बांबूचे फायबर आणि पाईन वृक्षापासून उत्पादनं तयार करायला सुरुवात केली.
एहा ब्रँन्डने तांदळाच्या तूसापासून कॉफी मग्ज, ग्लासेस, चहा पिण्याचे कप, पाण्याच्या बाटल्या, जेवण वाढण्याचे बोल्स, सुका खाऊ ठेवायचे डबे, लहान मुलांच्या बश्या, त्यांना खाण्यासाठी लागणाऱ्या वाट्या अशी कटलरीही तयार केली आहे. बायो कंपोझिट उत्पादनं असल्यामुळे या कंपनीतून कार्बन उत्सर्जन हे अन्य कंपनीपेक्षा कमी होतं. तसंच ही कंपनी लूप्ड रिसायकलींग प्रकल्प सुद्धा सांभाळते. जिथे कंपनीच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या वस्तू गोळा करुन त्याचा पुर्नवापर केला जातो. त्यामुळे या उत्पादन निर्मितीतून कोणत्याच प्रकारचा कचरा निर्माण होत नाही असा दावा महादेव यांनी केला आहे.
महादेव हे भाताचा आणि गव्हाचा पेंढा आणि भूसा हा कच्चा माल शेतकरी उत्पादक संघटनेकडून मिळवतात. यामुळे शेतकऱ्यांना थेट पैसा मिळतो. महादेव यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक एकर भात किंवा गव्हाच्या लागवडीतून सुमारे 1.5 टन धान्य मिळतं आणि 4.5 टन पीक कचरा मिळतो. शेतकऱ्यांना प्रति किलो धान्याच्या मागे सुमारे 30 रूपये मिळतात. तर जो पेंढा पूर्वी असाच टाकला जायचा किंवा जाळला जायचा तो आता आम्हाला विकला जातो. त्यातून त्यांना प्रति किलो 5 रुपये मिळतात. दैनंदिन जीवनामध्ये अधिकाधिक बायो-कंपोझिट उत्पादनांचा वापर वाढवा यासाठी एहा कंपनीचं संशोधन सुरु आहे. यामध्ये पॅकेजिंग, बांधकाम, औद्योगिक वस्तू आणि ऑटोमोटिव्ह सोल्यूशन्स या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केलं आहे. सुरुवातीला प्लास्टिकची जागा घेणाऱ्या वस्तूंची आम्ही निर्मिती केली. मात्र आता स्टील, सीरामिक्स आणि काच अशा ज्या कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणावर करतात अशा वस्तूंना पर्यायी उत्पादनं विकसीत करायची आहेत अशी माहिती महादेव यांनी दिली.
रामेन बॉल्स अँन्ड ब्रशेस
शाश्वत टिकणाऱ्या वस्तू ही लक्झरी न राहता दैनंदिन जीवनात वापरता येतील, सर्वसामान्यांना परवडतील अशा वस्तूंची निर्मिती करत पर्यावरण जपलं पाहिजे, या विचारसरणीला अनुसरुन संजना इभट्टा आणि सूरज इभट्टा या दोन भावंडांनी 2021 मध्ये ‘ईरिदा नॅचरल्स’ या कंपनीची स्थापना केली.
दीर्घकाळ टिकतील आणि पर्यावरणपूरक अशा उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी त्यांनी तांदळाचा आणि गव्हाच्या पेंढ्याचा आणि भूश्यांचा वापर केला. जेवणाची ताटं, सूप बोल्स, रामेन बोल्स अशी कटलरी तयार केली जाते. या उत्पादन निर्मितीमुळे शेतकचऱ्याचा पुनर्वापर केला जातो. तसंच कार्बन उत्सर्जन कमी केलं जातं.
ही उत्पादने बायो – डिग्रेडेबल म्हणजे जैव – विघटनशील नाहीत. पण उष्णता (हीट) आणि वॉटर रेझिसटन्ट आहेत. जेव्हा त्याचा वापर थांबवला जाईल तेव्हा ही उत्पादने प्लास्टिक पुनर्वापरच्या मार्गाने रिसायकल करुन यातले घटक पुन्हा वापरात आणले जातील.
या उत्पादन प्रक्रियामध्ये सर्वप्रथम हा कृषी कचरा स्वच्छ धुतला जातो. त्यानंतर त्याचं बारीक पावडरमध्ये रुपांतर केलं जातं. मग ते वनस्पतींपासून बनवलेल्या बाइंडरमध्ये किंवा अन्नासाठी सुरक्षित असलेल्या पॉलिमरमध्ये मिसळलं जातं. यातून टिकाऊ साचा तयार होतो. याला इंजेक्शन मोल्डिंग पद्धत म्हटलं जातं. या प्रक्रियेतून उत्पादन कचरा खूप कमी निर्माण होतो. शिवाय अतिरिक्त सामग्रीचा पुनर्वापर करता येतो. प्लास्टिक उत्पादनाच्या किंमतीपेक्षा ही प्रक्रिया काही प्रमाणात महाग आहे. तरी लाकडी वस्तूंच्या तुलनेत या उत्पादनांच्या किंमती परवडण्याजोग्या आहेत.
 
				 
											 
								 
								 
								


