‘रक्तदान श्रेष्ठदान’, ‘रक्तदानाने आपण अनेकांना जीवदान देत असतो’ असे अनेक घोषवाक्य आपण ऐकत असतो.. या माध्यमातून अनेकांनी रक्तदान करावं हेच अपेक्षित असते. सुदृढ व्यक्तीला दर तीन महिन्यांनी रक्तदान करता येते. आपल्या शरीराला त्याचे अनेक फायदे मिळतात. मात्र, रक्तदान करताना आणि रक्तपेढीतून रक्त विकत घेण्यासंबंधित अनेक नियम आहेत. आंतरराष्ट्रीय रक्तदाना दिना निमित्ताने याविषयाची आपण माहिती घेणार आहोत.
रक्तदान म्हणजे काय?
रक्तदान म्हणजे आपल्या शरीरात तयार झालेलं रक्त हे इतर रुग्णांच्या वा अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी स्व-इच्छेने दान करणं. हे रक्त ज्या रुग्णांची शस्त्रक्रिया केली जाणार आहे अशा रुग्णासाठी, प्रसुतीच्या वेळी गर्भवती महिलेचा जास्त रक्तस्त्राव झाला तर तिच्यासाठी, अपघातामध्ये एखाद्या व्यक्तिचा खूप जास्त रक्तस्त्राव झाला तर त्याच्यासाठी आणि रक्तासंबंधित आजार असलेल्या व्यक्तिंसाठी या दान केलेल्या रक्ताचा वापर केला जातो. आपल्या शरीरामध्ये 5 ते 6 लीटर रक्त असतं. यापैकी 300 मिली रक्त हे काढून घेतलं जातं. काही दिवसात हे रक्त पुन्हा तयार होतं. त्यानंतर पुन्हा 3 महिन्यानंतर आपल्याला पुन्हा रक्तदान करता येते.
पण रक्तदान हे सहजासहजी कोणालाही करता येत नाही. रक्तदानासाठी वयोवर्षे 18 ते 60 अशी वयाची मर्यादा ठरवून दिलेली आहे. तुमचं वजन हे कमीतकमी 45 किलो तरी असायला हवं. या दोन गोष्टींशिवाय तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनचं प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या मानकाप्रमाणे 12.5 g/Dl इतकं असणं आवश्यक असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रक्तदान करणाऱ्या व्यक्तिला कोणताही गंभीर आजार नसला पाहिजे. कारण रक्तातून अनेक आजारांचं संक्रमण होत असतं. त्यामुळे हा नियम कटाक्षाने पाळला जातो. त्याचबरोबर रक्तदान करण्याच्या 24 तासापूर्वीपासून तुम्ही कोणत्याही प्रकारचं मद्य सेवन करु नये.
रक्तदान केल्यामुळे रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. शरीरात नवीन रक्त निर्माण होतं. धमन्यांमधील अडथळे दूर होतात. त्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो. लोहाची पातळी नियंत्रणात राहते. वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. कारण जेव्हा आपण वर्षातून एकदा रक्तदान करतो तेव्हा शरीरातील साधारण: 600 कॅलरीज जाळले जातात.
हे ही वाचा : थॅलेसेमिया: एक गंभीर आरोग्य समस्या
रक्तदान करताना काय काळजी घ्यावी
रक्तदानाला जाताना खूप जास्त पाणी पिणं गरजेचं असतं. रक्तदान केल्यावर लगेच बाहेर न पडता त्याचठिकाणी डॉक्टरांनी दिलेल्या वेळेपर्यंत विश्रांती केली पाहिजे. या विश्रांतीच्या काळात पाणी प्यावं आणि फळ खावीत. जेणेकरुन तुमच्या शरीरात पुन्हा एकदा तात्काळ ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते. जर रक्तदान केल्यावर लगेच कॅम्पच्या किंवा हॉस्पिटलच्या बाहेर पडलात तर चक्कर येण्याची शक्यता जास्त असते.
रक्तदान करण्याचा निर्णय घेतल्यावर त्याविषयी तुमच्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे. जर तुम्हाला एखाद्या आजारा संबंधित औषधं सुरु असतील तर अशावेळी तुम्ही रक्तदान करणं योग्य की नाही याची माहिती फॅमिली डॉक्टरकडून घ्यावी. रक्तदान केल्यावर रक्तपेढीकडून रक्ताची तपासणी केली जाते. पण त्यापूर्वी तुम्ही एकदा रक्ताची तपासणी करणं अत्यावश्यक आहे. यामध्ये तुमचं रक्त दूषित नाही याची निदान माहिती मिळेल. पण ही तपासणी ते प्रत्येक्ष रक्तदानाच्या दिवसापर्यंतच्या कालावधीत जर का तुम्हाला कोणता ताप, सर्दी-खोकल्या सारखं इन्फेक्शन झालं तर त्याची माहिती ही रक्त संकलीत करणाऱ्या संस्थाकडून केल्या जाणाऱ्या तपासणीत येतं.
रक्तदान कुठे करावं याची ही काळजी घेतली पाहिजे. मुळात रक्तपेढ्यांमध्ये, हॉस्पिटल्समध्ये किंवा एखाद्या विश्वासार्ह संस्थेने कॉलेज वा राजकीय उपक्रम म्हणून आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन रक्तदान करावं. रक्तदान शिबिराच्या ठिकाणी स्वच्छता असणं गरजेचं आहे. त्याठिकाणी रक्तदान करु इच्छिणाऱ्या व्यक्तिचं वजन आणि हिमोग्लोबिन तपासलं गेलं पाहिजे. रक्त संकलन करणारा स्टाफ प्रशिक्षित असावा. रक्तदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर विश्रांतीसाठी जागा, पिण्याचं पाणी आणि खाण्यासाठी फळं किंवा चहा-बिस्किटांची व्यवस्था असावी.
रक्तदानावेळी रक्तदात्याचं आरोग्य कसं असावं
रक्तदान करतेवेळी तुमचं वय, वजन आणि शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण हे घालून दिलेल्या नियमांप्रमाणे असणं अत्यावश्यक आहे. मात्र, रक्तदान करताना अन्य आरोग्य विषयक काळजी घ्यावी लागते. ते पुढीलप्रमाणे :
- गेल्या एक वर्षाच्या काळात जर रेबिजची लागण झाली असेल तर अशा व्यक्तिला रक्तदान करता येत नाही. हिपॅटायटिस बी आजार पूर्वी होता किंवा असेल आणि वर्षभरापूर्वी त्याचं इम्यून ग्लोब्युलिन उपचार घेतला असेल तर, त्याही व्यक्तिला रक्तदान करता येत नाही.
- गेल्या सहा महिन्यापूर्वीपासून शरीरावर टॅटू, कान, शरीराच्या इतर कोणत्याही ठिकाणी पिअर्सिंग केलेलं नसावं. कोणत्याही प्रकारचे रक्ताशी संबंधित उपचार घेतलेले नसावेत. मोठ्या सर्जरी किंवा कोणत्याही गंभीर आजारावर उपचार घेतलेले नसावेत. तसंच कावीळ वा हेपटायटिस व्यक्तिच्या संपर्कात आलेलं नसावं.
- गेल्या तीन महिन्यात रक्तदान केलेलं नसावं. तसंच मलेरिया झाला असेल आणि त्यावर उपचार घेतलेले असतील तरी रक्तदान करता येत नाही.
- महिन्याभरात कोणतंही लसीकरण झालं असेल तरी रक्तदान करता येत नाही.
- रक्तदान करण्याच्या 48 तासात जर कोणती औषधं घेतली असतील तरी रक्तदान करता येत नाही. (यामध्ये आयुर्वेदिक, होमिओपॅथीक, अॅलोपॅथी अशा औषधांचा समावेश होतो.)
- रक्तदानाच्या 24 तासा पूर्वी मद्यप्राशन करता येत नाही.
- गेल्या 72 तासाच्या कालावधीत दातासंबंधित काही उपचार किंवा अॅस्पीरिनची गोळी घेतली असेल तरी रक्तदान टाळावं लागतं.
- रक्तदानाच्या वेळी सर्दी, खोकला, घसा खवखवणे, कफ असा आजार नसावा.
- गरोदर किंवा बाळाला दूध पाजणाऱ्या आणि मासिक पाळी आलेल्या स्त्रिला रक्तदान करता येत नाही.
- डायबिटीज असणारे रुग्ण, हृदयाशी आणि रक्ताशी संबंधित आजार असलेले रुग्ण, उच्च रक्तदाब, वारंवार ताप येत असेल, वजन झपाट्याने घटत असेल, रात्री खूप घाम येत असेल, तोंडात पांढरे डाग असतील काखेखाली, मानेत किंवा मांडीवर लिम्फ वाढलेल्या व्यक्ती रक्तदान करु शकत नाहीत.
- ज्यांना टिबीचा आजार झाला होता, अस्थमा किंवा अन्य संसर्गजन्य डिसऑर्डर झालेले रुग्ण, लिव्हर किंवा किडनीचा आजार असलेले रुग्ण, फिट्स येणारे रुग्ण, त्वचेवर निळे किंवा जांभळे डाग असलेले रुग्ण सुद्धा रक्तदान करु शकत नाहीत.
रक्ताची तपासणी ही अत्यावश्यक प्रक्रिया
1970-1980 च्या सुमारास ब्रिटनमध्ये परदेशातून रक्त मागवण्यात आलं होतं. या रक्ताची तपासणी न करता तसंच वापरलं गेलं होतं. यामध्ये काही रक्त हे संक्रमित रक्त होतं. ज्यामुळे ब्रिटनमधल्या जवळपास 3 हजारहून जास्त लोकांचा एचआयव्ही, हेपटायटिस आणि अन्य रक्ता संबंधित आजारामुळे मृत्यू झाल्याचं उघड झालं आहे. या घटनेशी संबंधित आजही ब्रिटिश सरकारविरोधात खटला सुरु आहे. यावरुन रक्ताची तपासणी हा किती अत्यावश्यक घटक आहे याची आपल्याला कल्पना आली असेल.
दरम्यान, रक्ताची तपासणी, त्यातले विविध घटक, रक्त पिशव्यांची किंमत याविषयी श्रेष्ठ महाराष्ट्राने रक्त संक्रमण अधिकारी डॉ. वर्षा पांचोली यांच्याशी बातचीत केली.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्त गोळा केल्यानंतर प्रत्येक युनिट (रक्ताची पिशवी) तपासलं जातं. जर ते संक्रमित (दूषित) नसेल तर सरकारच्या निर्देशानुसार प्रत्येक युनिटमधून प्लाझ्मा, प्लेटलेट्स, लाल आणि पांढऱ्या ब्लड सेल्स असे घटक वेगवेगळे केले जातात. त्यानंतर ते सीलबंद करुन प्रत्येक युनिटवर कोणत्या रक्त तपासण्या केल्या आहेत, रक्ताची एक्सापयरी डेट काय आहे?, अशी सगळी अत्यावश्यक माहिती दिली जाते.
जर एखादं युनिट (रक्त पिशवी) हे दूषित संक्रमित असेल तर लागलीच त्या रक्तदात्याला त्यासंदर्भातली माहिती देऊन सूचित केलं जातं. जेणेकरुन त्यांना योग्य ते उपचार घेता येतील. तसंच ते पूर्ण युनिट हे बाद केलं जातं.
हे ही वाचा : ऑटिझम म्हणजे नेमकं काय?
रक्त तर शरीरात मोफत आहे मग ते रक्तपेढीत विकत का घ्यावं लागतं?
रक्तात कोणतंही संक्रमण नाही हे तपासणं अत्यावश्यक असतं. रक्ताच्या एका पिशवीची रक्कम ही सरकारने ठरवलेल्या दरानुसार खाजगी रक्तपेढीमध्ये 1550 रुपये असते. त्या युनिटमधील रक्त तपासण्याकरता करण्यात आलेल्या चाचण्यांकरता ही रक्कम द्यावी लागते. सरकारी रुग्णालयामध्ये मोफत उपचाराअंतर्गत त्याची रक्कम 500 रुपये पर्यंत आकारली जाते. काही वेळेला रुग्णांची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट असेल तर हे दर कमी केले जातात. जर एखाद्या रक्त युनिटवर आणखीन वेगवेगळ्या तपासण्या केल्या असतील तर त्यानुसार त्या युनिटची रक्कम साधारण 2 हजार रुपयांपर्यंत वाढते.
रक्तपेढीतून रक्त विकत घेताना डॉक्टराचं प्रिस्क्रिप्शन द्यावं लागतं. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार तितकेच युनिट दिलं जाते. रक्ताशिवाय जर एखादा घटक प्लाझ्मा, प्लेटलेट्स, लाल किंवा पांढऱ्या पेशी यापैकी काही हवं असेल तर त्यानुसार ठरलेल्या दराने ते रुग्णाला दिलं जाते.
रक्ताची एक्सपायरी डेट
रक्त आणि त्यातले जे विविध घटक असतात त्यांना सुद्धा एक्सपायरी डेट असते. रक्ताची एक्सपायरी डेट 42 दिवस असते. प्लाझ्माचा एक्सपायरी कालावधी 1 वर्ष असतो. क्लोटिंग फॅक्टर्सची (रक्त गोठवणारे घटक) एक्सापायरी सुद्धा 1 वर्ष असते. तर प्लेटलेट्सची एक्सपायरी 5 दिवस असते.
ई-रक्तकोष व्यवस्था
अनेकदा रक्ताची तात्काळ गरज लागते आणि रक्ताची उपलब्धता कुठे आहे, विरळ असलेल्या रक्तगटातलं रक्त कुठे मिळेल यासाठी धावपळ सुरु होते. यामध्ये अनेकदा रुग्णाचे प्राण जाण्याची शक्यता असते. त्यामुळे केंद्र सरकारने 2016 साली ई-रक्तकोष पोर्टल सुरु केलं आहे. यामध्ये देशातल्या रक्तपेढ्याची माहिती, रक्तदान शिबिर, रक्तासंबंधित आजार असलेल्या रुग्णांसाठी रक्ताची व्यवस्था अशी सगळी ऑनलाईन माहिती उपलब्ध करुन दिली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने मार्च 2025 मध्ये राज्यातील रक्तपेढ्या या योजनेशी जोडून घेतल्या. त्यामुळे https://eraktkosh.mohfw.gov.in/eraktkoshPortal/#/ या पोर्टलवर आता गरजूंना रक्ताच्या उपलब्धतेविषयी संपूर्ण माहिती मिळू शकते.
रक्तदानाची कास धरा
अनेकदा आपण रक्तदान करण्याविषयी गैरसमज असतात, कधी कानाडोळा करतो तर कधी कधी रक्तदानातून मला काय मिळणार असा प्रश्न मनात डोकावतो. पण आपल्या 300 मिली रक्ताने एखाद्या गरजूचा जीव वाचू शकतो याचं समाधान आपल्याला यातूनच मिळू शकतं.
रक्तदान केल्याने आपल्या शरीरात नवीन रक्ताची निर्मिती होते. काही वेळेला बॉडी डिटोक्स करायला खूप सारं डाएट प्लॅन आणि कष्ट घेतले जातात. या ऐवजी वर्षातून निदान दोनदा तरी रक्तदान केलं तर तुमचं शरीर खऱ्या अर्थाने डिटॉक्स होईल. तुम्हाला रक्तदाब, हृदयविकार अशा आजाराची बाधा होणार नाही.
त्यामुळे रक्तदानाच्या माध्यमातून तुम्ही तुमचे आरोग्य सांभाळू शकता शिवाय अन्य एकाचे प्राण वाचवू शकता हे ध्यानात ठेवून रक्तदानाची कास धरा.