आईस हॉकी. भारतात तसा हा खेळ अजूनही बाल्यावस्थेतच आहे. भारतीयांना मुळाताच या खेळाची ओळख उशिराने झाली. कॅनडात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या या खेळाचा भारतात प्रसार व्हायला बराच कालावधी लागला. या खेळासाठी आवश्यक पोषक वातावरण आणि सरावासाठी सोयी-सुविधा उपलब्ध नसल्यामुळे या खेळाकडे तरुणाईचा फारसा कल दिसून येत नाही.
1970 च्या दशकात लडाखमध्ये भारतीय सैन्यामुळे आईस हॉकी या खेळाची सर्वसामन्यांना ओळख झाली. लडाखमध्ये नैसर्गिकरित्या बर्फवृष्टी होत असते त्यामुळे या खेळाला पोषक वातावरण मिळतं. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय महिला आईस हॉकी संघाने भीमपराक्रम केला आहे. भारतीय महिला आईस हॉकी संघांने आयआयएचएफ महिला आशिया चषक स्पर्धेत कांस्य पदक पटकावत नवा इतिहास रचला आहे.
महिला आईस हॉकी खेळातलं पहिलं पदक
भारतीय महिला आईस हॉकिच्या इतिहासातील हे पहिलं पदक असल्याने या विजयाला विशेष महत्त्व प्राप्त होतं. युएईमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघ पाच देशांच्या विरोधात खेळला. या सामन्यात भारतीय संघाने तीन सामने जिंकले तर दोन सामने गमावले. या कामगिरीच्या जोरावर संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला आणि पहिल्यांदा महिला आईस हॉकीच्या इतिहासात आपलं नाव सुवर्णक्षरांनी कोरलं.
या 20 सदस्यीय संघात आयटीबीपी म्हणजचे इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिसमधील 10, लेहमधील नऊ आणि हिमाचल प्रदेशातील एका हॉकीपटूचा समावेश आहे. देशातील सर्वात दुर्गम आणि आव्हानात्मक भागातून येत महिला संघाने आपला यशस्वी प्रवास सुरू केला. त्यांच्यासाठी ही कामगिरी एक महत्त्वाचा क्षण आहे. लडाख आणि स्पिती व्हॅलीसारख्या प्रदेशातून आलेल्या या महिला आहेत. त्यांना हिवाळ्यातील बर्फवृष्टीदरम्यान नैसर्गिक रिंक्सवर प्रशिक्षण दिलं जातं.
हे ही वाचा : नेमबाजीत सुवर्णवेध घेणारी फोगटकन्या!
असा सुरु झाला पहिल्या महिला आईस हॉकी पदकाचा प्रवास…
लडाखच्या उंच पर्वतांमध्ये भारताचा पहिला महिला आइस हॉकी संघ पुरुषी मानसिकता झुगारत आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत होता. पाऊस असो, ऊन असो, तुफान बर्फवृष्टी असो… लडाखमधील या महिला आईस हॉकीपटूंनी आपली हॉकी स्टिक खाली न ठेवण्याचा चंग मनाशी बांधला. सुरुवातीच्या काळात, महिला खेळाडूंना रिंकवर फक्त प्रशिक्षणासाठी वेळ दिला जात असे. त्यातही पुरुष खेळाडूंचं प्रशिक्षण आणि सामने झाल्यावर त्यांना ती उपकरणे वापरण्यासाठी दिली जात. थोडक्यात या खेळात पुरुषांना पहिलं प्राधान्य दिलं जायचं. महिला खेळाडूसाठी आवश्यक त्या साधनांची उपलब्धता करुन दिली गेली नव्हती. काहिक वेळेला पुरुष खेळाडूकडून लिंगभेदावर आधारित टीकेचा सामानाही करावा लागला. ‘घरी जा, आई व्हा’ अशी टीका त्यांना ऐकावी लागली आहे. मात्र, या महिलांनी आपली आईस हॉकी खेळण्याची जिद्द सोडली नाही.
भारतीय महिला आईस हॉकीमध्ये नव्या युगाची सुरुवात
साधारण दोन हजारच्या दशकात लडाखमधील तरुणींच्या एका गटाने सामाजिक नियमांना आव्हान देत या खेळात सहभागी होण्याचं ठरवलं. त्यानंतर परिस्थिती हळूहळू बदलू लागली. त्यांच्या निश्चयामुळे 2016 मध्ये भारताचा पहिला राष्ट्रीय महिला आईस हॉकी संघ स्थापन झाला. भारतीय आईस हॉकीच्या इतिहासात हा एक मैलाचा दगड मानला जातो.
डिसेंबर ते फेब्रुवारी या हिवाळ्याच्या महिन्यांत खेळल्या जाणाऱ्या आईस हॉकीच्या लीगमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये महिलांना हा खेळ खेळण्यासाठी अधिक संधी दिल्या आहेत.. हे शक्य झालं आहे ते, महिलांच्या चिकाटी, स्थानिक पुढाकार आणि वाढत्या संस्थात्मक पाठिंब्यामुळे… या फाऊंडेशनला सरकारकडून पाठिंबा मिळू लागला आहे. संघाने आता नवीन टप्पे गाठले आहेत. भारताची पहिली कर्णधार रिंचेन डोल्मा तर बाळंतपणाच्या पाच महिन्यांनंतरच रिंकवर उतरली होती. त्यावेळी, ‘त्या म्हाताऱ्या झाल्या आहेत’ किंवा ‘खूप धाडसी’ आहेत अशी दोन्ही स्वरुपाच्या टीपण्ण्या लोकांकडून केल्या गेल्या. यावेळी डोल्मा यांनी आपल्या मुलीबरोबर एकत्र सराव करुन रिंकवर घेऊन गेली आणि टीकाकारांची तोंडं बंद केली.
हे ही वाचा : गोल्डन गर्ल ते बॉस लेडी
आणखी पाठबळाची आवश्यकता
आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यासाठी सुरुवातीला महिलांना पुरूषांकडून गणवेश मागावे लागत होते. मात्र, लडाख सरकारने महिला खेळाडूना खेळाच्या साहित्यावर आणि किटवर जवळजवळ 70 टक्के अनुदान देण्यास सुरुवात केली. असं असलं तरी, या महिला हॉकी संघाला एक योग्य आईस हॉकी रिंकची आवश्यकता आहे. जिथे त्या वर्षभर सराव करू शकतात. त्यांना न्यूट्रीशनिस्ट, फिजिओथेरपिस्ट आणि पूर्णवेळ प्रशिक्षकाचीही आवश्यकता आहे. क्लब असोत किंवा प्रशासन असो, सर्वांकडून पाठिंबा हवा आहे जेणेकरून हा खेळ पुढे जाऊ शकतो.
खऱ्या प्रवासाची ही तर सुरुवात…
महिला आईस हॉकी संघाला मिळालेलं हे यश भारतीय हिवाळी क्रीडा स्पर्धांसाठी, विशेषतः कमी प्रसिद्ध असलेल्या मैदानांमध्ये सीमा ओलांडणाऱ्या महिला हॉकीपटूंसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. सरकारकडून वाढत्या पाठिंब्यासह आणि वाढत्या सार्वजनिक ओळखीसह संघाचा आंतराराष्ट्रीय स्तरावरचा प्रवास येणाऱ्या पिढ्यांसाठी आशेचा आणि प्रेरणेचा किरण ठरणार आहे. महिला आईस हॉकी संघानं पटकावलेलं हे कांस्य पदक या खेळातील महिलांसाठी एक मैलाचा दगड तर ठरलाच आहे. मात्र, अजून त्यांना बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे.
आईस हॉकीला अधिकृतपणे लडाखचा राज्य खेळ म्हणून मान्यता मिळाली आहे. लहानपणापासूनच स्थानिक लोक आणि भारतीय सैन्य गोठलेल्या तलावांवर हा खेळ खेळायचे. पण आज हा एक आंतरराष्ट्रीय खेळ बनला आहे. आणि या पातळीवर खेळणे हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे वाटतंय. या महिलांना पदक जिंकणं महत्त्वाचं होतं कारण आईस हॉकी अजूनही संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात खेळली जात नाही. ती बहुतेक उत्तर भारतीय प्रदेशांपुरतीच मर्यादित आहे. पण हळूहळू इतर राज्यांमध्येही हा खेळ लक्ष वेधून घेत आहे. या विजयामुळे देशभरात या खेळाबद्दल जागरूकता निर्माण होईल आणि सर्व राज्यांतील खेळाडूंना सहभागी होण्यास प्रोत्साहन मिळेल. त्यामुळेच हे कांस्य पदक तर केवळ सुरुवात आहे. कारण या महिलांना आता स्वप्न पडू लागलंय ते ऑलिम्पिकमध्ये महिला आईस हॉकीमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करण्याचं.
1 Comment
खुप छान माहिती पूर्ण लेख आहे.