कडक उन्हाळ्यात गरमी पासून वाचण्यासाठी तसचं, घराला थंड ठेवण्यासाठी एअर कंडिशनर (AC) चा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पण आता लवकरच AC वापरण्याबाबत काही नवीन नियम येणार आहेत. केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी नुकतीच घोषणा केली आहे की, देशात लवकरच एअर कंडिशनरसाठी तापमान मर्यादा लागू केली जाणार आहे. त्यांनी असंही सांगितले की, भारतात पहिल्यांदाच असा नियम लागू होणार आहे. यामध्ये एअर कंडिशनर किती थंड करता येईल, याची एक मर्यादा ठरवली जाईल. हा नियम फक्त घरांसाठी नाही, तर हॉटेल, ऑफिस आणि अगदी गाड्यांमधील AC साठी सुद्धा लागू होऊ शकतो.
नवीन नियम काय आहेत?
सरकारने एअर कंडिशनरसाठी तापमान मर्यादा 20°C ते 28°C दरम्यान निश्चित केली आहे. म्हणजेच, 20°C हून कमी किंवा 28°C पेक्षा जास्त तापमानावर एसी चालवता येणार नाही. हे नियम नवीन एसी मॉडेल्ससाठी लागू होतील. यामुळे ऊर्जा बचत होईल आणि पर्यावरणावर होणारा ताण कमी होईल.
या नियमांची आवश्यकता का?
सध्या, अनेक लोक एसी 16°C किंवा 18°C पर्यंत सेट करतात. यामुळे वीजेचा वापर खूप जास्त होतो. आपल्या देशात वीजेची मागणी खूप वाढली आहे आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी खूप वीज तयार करावी लागते. जर आपण कमी तापमानावर एसी चालवले, तर वीजेचा वापर खूप वाढतो आणि त्याचा भार वीज निर्मितीवर येतो. भारत सरकार वीज वाचवण्याबरोबरच, पर्यावरणाची काळजी घेत आहे. म्हणूनच ऊर्जा तज्ञांच्या मते, एसीचे तापमान 1°C वाढवल्याने वीजेची 6% बचत होऊ शकते. जर हे नियम लागू झाले, तर तीन वर्षांत 20,000 ते 30,000 कोटी रुपयांची वीज बचत होऊ शकते.
याशिवाय, या नियमामुळे वीज ग्रिडवरचा ताण कमी होईल आणि एसीच्या लाइफमध्येही वाढ होईल, कारण कॉम्प्रेसरला वारंवार सुरू करण्याची आवश्यकता कमी होईल.
हेही वाचा : SMS कोड आणि TRAI चे नवीन नियम तुम्हाला माहितेय का ?
पर्यावरण आणि आरोग्यासाठी फायद्याचं
एसीचे तापमान कमी ठेवल्याने वीजेचा वापर वाढतो, ज्यामुळे कार्बन उत्सर्जन वाढते आणि पर्यावरणावर ताण येतो. नवीन नियमामुळे वीजेचा वापर कमी होईल, यामुळे प्रदूषण कमी होईल आणि पर्यावरणाचे रक्षण होईल.
त्याचप्रमाणे, ऊर्जा मंत्रालयाच्या मते, 24°C ते 26°C तापमान शरीरासाठी योग्य आणि आरामदायक असते. खूप कमी तापमानावर एसी चालवल्याने गळ्यात खवखव, सर्दी आणि त्वचा कोरडी होणं किंवा इतर श्वसनाच्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे,हे नवीन नियम आरोग्याच्या दृष्टीनेही फायदेशीर असतील.
जपान, सिंगापूर आणि दक्षिण कोरिया यांसारख्या देशांमध्ये एसीचे तापमान मर्यादा आधीच लागू करण्यात आल्या आहेत. यामध्ये आता भारतानेही जागतिक पातळीवर ऊर्जा बचतीसाठी हे पाऊल उचलले आहे.