आजकाल पार्टी करणं म्हणजे फक्त क्लबमध्ये जाऊन दारू पिणं, मोठ्या आवाजात गाणी ऐकणं आणि नाचणं, एवढंच राहिलेलं नाही. आजची पिढी, म्हणजे Gen Z, आता पार्ट्यांना एकदम वेगळाच ट्विस्ट देत आहे. ‘खोटं लग्न’ (Mock Wedding) आणि ‘कॉफी रेव्ह’ (Coffee Rave) यांसारखे पार्टीचे नवे ट्रेंड सध्या खूपच हिट झाले आहेत. हे दोन्ही प्रकार एकदम धमाल आणि हटके आहेत. चला, तर मग पाहूया काय आहेत हे नवीन ट्रेंड आणि ते कसे चालले आहेत.
खोट्या संगीत संध्या
‘खोटं लग्न’ किंवा ‘खोटी संगीत संध्या’ म्हणजे खरंतर एक खूप मोठी आणि मजेदार पार्टी. इथे ना नवरा नसतो , ना नवरी , पण लग्नात जेवढी मजा-मस्ती असते, ते सगळे प्रकार या पार्टीत असतात. लोक एकदम भारी देसी कपडे घालून येतात. ढोल-ताशे, डीजे, बॉलिवूड गाणी, मेहंदी, फोटो बूथ असं सगळं काही या पार्टीत असतं.
या सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे इथे कुठलाही ताणतणाव नाही, लग्नाचं जबाबदारीचं ओझं नाही, “लग्न कधी करणारं?” असं विचारणारं ही कोणी नाही, किंवा कोणी जज करणारंही नाही. इथे फक्त नाचायचं, फोटो काढायचे आणि एन्जॉय करायचं.
हा ट्रेंड का आवडतोय?
खरंतर, लग्न म्हटलं की टेन्शन, खूप कामं, अफाट खर्च आणि त्यात नातेवाईकांचे लग्नाबद्दलचे प्रश्न असतातच. पण या ‘खोट्या संगीत संध्या’मध्ये हे असं काहीच नसतं. इथे फक्त मजा असते, डान्स असतो, सुंदर कपडे घालण्याचा आनंद असतो आणि तुम्ही तुमच्या बेस्टीसोबत तुम्हाला आवडेल तसा डान्स करू शकता. त्यामुळे हा ट्रेंड तरुणाईमध्ये खूप लोकप्रिय होत आहे.
हे सर्व इव्हेंट आयोजित करणाऱ्या कंपन्यांनासुद्धा खूप आवडतंय. ‘जुम्मा’ नावाच्या एका इव्हेंट कंपनीचे सह-संस्थापक अयान वैद यांनी अशीच एक ‘खोटी संगीत संध्या’ आयोजित केली होती. ते म्हणतात, “मला इव्हेंट्स आणि कॉन्सर्टमध्ये जायला खूप आवडायचं. मला वाटायचं की मी हे काम खूप चांगलं करू शकेन. ‘खोट्या संगीत संध्या’ची कल्पना मला एका तीन दिवसांच्या लग्न-थीमच्या इव्हेंटचं प्लॅनिंग करताना सुचली. सगळ्यांना लग्न, चांगले कपडे घालणे आणि बॉलिवूड संगीत आवडतं, त्यामुळे मला खात्री होती की ही आयडिया नक्की काम करेल.”
या पार्टीसाठी त्यांनी पूर्ण तयारी केली होती. झेंडूच्या फुलांची सजावट, मेहंदी आर्टिस्ट, फोटो बूथ, बॉलिवूड संगीत आणि ढोल असं सगळं काही एका खऱ्या भारतीय लग्नासारखं होतं. 500 ते 3 हजार रुपयांपर्यंत या इव्हेंटची तिकिटं होती, जी सगळ्यांना परवडणारी होती.
आता मोठमोठ्या क्लबमध्ये पण हे ट्रेंड सुरू झाले आहेत. मध्य प्रदेशमधील ‘लॉर्ड्स ऑफ ड्रिंक्स’ या क्लबमध्ये तर ‘खोट्या संगीत संध्या’चे पूर्ण थीम नाइट्स व्हायला लागले आहेत.
हेही वाचा : आयुष्यभराच्या नात्याची तयारी
कॉलेजातही हाच जल्लोष
फक्त क्लबमध्येच नाही, तर कॉलेजेसमध्ये पण हा ट्रेंड पोहोचला आहे. Cornell University मधील साउथ एशियन कौन्सिलने ‘मॉक शादी’ नावाचं एक दोन दिवसांचं मोठं लग्न आयोजित केलं होतं. यात हळदीपासून मेहंदीपर्यंत आणि फेऱ्यांपर्यंत सगळ्या विधींचा देखावा केला होता. परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे घरच्या आठवणींसारखं होतं. फक्त इव्हेंट कंपन्याच नाही, तर तरुण मुलं-मुली आपल्या वाढदिवसासाठी पण ‘लग्न थीम’ वापरत आहेत.
‘कॉफी रेव्ह’ : दारू नाही, पण डान्स जोरात
हा पण एक नवीन आणि खूप चांगला ट्रेंड आहे. ‘कॉफी रेव्ह’ म्हणजे काय? तर हे असे इव्हेंट्स आहेत जिथे दारू नसते, पण डीजेच्या तालावर लोक कॉफी किंवा प्रोटीन शेक पित नाचतात. हे इव्हेंट, क्लबच्या ऐवजी सकाळी-सकाळी कॅफेमध्ये होतात.
कशी असते ही ‘कॉफी रेव्ह’?
बंगळूरु, मुंबई, सुरत, इंदूरपर्यंत आता कॅफे सगळीकडेच सकाळी-सकाळी डान्स फ्लोअर बनू लागले आहेत. यामागे काय कल्पना आहे? तर दारूच्या जागी कॉफी, रात्रीच्या डिम लाईट्सच्या जागी दिवसाचा प्रकाश आणि मध्यरात्रीपर्यंत पार्टी करण्याऐवजी दुपारच्या जेवणाआधीच डान्स करून फ्रेश होणे. डीजे मस्त गाणी लावतो आणि बारिस्टा कॉफी देत राहतो.
मिड-डे च्या रिपोर्टनुसार, डीजे तनिष्क नावाचा एक लोकप्रिय डीजे ‘मोर कॉफी मोर रेव्ह’ (More Coffee More Rave) नावाचे टूर करत आहे. त्याने इंदूर आणि गुरुग्राममध्ये अशा पार्ट्या केल्या आहेत.
या पार्ट्या नेहमीच्या डार्क क्लबमध्ये नसतात, तर साध्या, सुंदर कॉफी शॉप्समध्ये होतात. कॉफी बारच डीजे बुथ बनतो. इथे दारू नाही, त्यामुळे कसलाही ड्रामा नाही. फक्त कॉफी पिऊन नाचणे, मोठ्या आवाजात संगीत आणि लोकांसोबत मजा करणे.
हा ट्रेंड लंडन आणि ॲमस्टरडॅममधील कॅफे आणि बेकऱ्यांमधून सुरू झाला, मग न्युयॉर्कला पोहोचला आणि आता लखनऊ, हैदराबाद आणि नागपूरसारख्या शहरांमध्ये पण हा ट्रेंड पोचला आहे.
‘कॉफी रेव्ह’ म्हणजे फक्त सकाळी नाचणे नाही. ही एक नवी पिढीची मजा करण्याची पद्धत आहे.आणि ही Gen Z मध्ये खूप लोकप्रिय होत आहे. आजकाल बरेच लोक दारू पिण्यापासून दूर राहायचं म्हणतात ,अशा लोकांसाठी ‘कॉफी रेव्ह’ सारख्या पार्ट्या खूप चांगल्या आहेत, कारण इथे मजा पण होते आणि दारूची गरज पण नसते.