भारतासह जगभरातच 23 जून हा दिवस ऑलिम्पिक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना आणि आधुनिक ऑलिम्पिक खेळांच्या जन्माच्या स्मरणार्थ दरवर्षी 23 जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन’ साजरा केला जातो. जागतिक ऑलिम्पिक दिन हा एक जागतिक उपक्रम आहे. जो सर्व वयोगटातील, पार्श्वभूमीच्या आणि क्षमता असलेल्या खेळाडूंना पुढे जाण्यासाठी आणि ऑलिम्पिक मूल्ये स्वीकारण्यासाठी प्रेरित करतो. गेल्या काही वर्षांत शालेय कार्यक्रम, व्हर्च्युअल फिटनेस सत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडाभावना आणि समावेशकतेवर केंद्रित संभाषणे यासह जगभरातील उत्सवात विकसित झाला आहे.
ऑलिम्पिक खेळांचा इतिहास
ऑलिम्पिक खेळांचा इतिहास खूप प्राचीन आहे. ऑलिम्पिक खेळ हे ग्रीसमधील ऑलिंपिया येथे झ्यूस देवाच्या सन्मानार्थ आयोजित केले जात होते. हे खेळ दर चार वर्षांनी आयोजित केले जात होते आणि ते धार्मिक आणि क्रीडा महोत्सवांचा एक महत्त्वाचा भाग होते. प्राचीन ऑलिम्पिक खेळांचा इतिहास इ.स.पूर्व 776 पासून ते इ.स.च्या चौथ्या शतकापर्यंत पसरलेला आहे. यानंतर 19 व्या शतकाच्या शेवटी फ्रेंच बॅरन पियरे डी बर्टिन यांनी प्राचीन ऑलिंपिक खेळांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला. पहिले आधुनिक ऑलिम्पिक खेळ 1896 मध्ये अथेन्स येथे आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये 14 देशांतील 241 खेळाडूंनी भाग घेतला होता. आधुनिक ऑलिम्पिक खेळ दर चार वर्षांनी आयोजित केले जातात. तर 1916, 1940 आणि 1944 मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांमुळे त्यावेळी या खेळांचं आयोजन होऊ शकलं नाही. ऑलिम्पिक मशाल रिलेची सुरुवात 1936 च्या बर्लिन ऑलिंपिकमध्ये झाली. मशाल ऑलिंपियामध्ये प्रज्वलित करून बर्लिनला पायी नेण्यात आली. ही परंपरा आजही सुरू आहे. आणि खेळांच्या उद्घाटन समारंभाच्या आधी मशाल यजमान शहरात नेली जाते. ऑलिम्पिक ध्वजात पाच रंगीत कड्या आहेत. त्या पाच खंडांचे प्रतिनिधित्व करतात.
ऑलिम्पिकमधील भारताचा प्रवास
1900 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा केवळ एकच खेळाडू सहभागी झाला होता. आणि आता 124 वर्षांनंतर त्याच शहरात झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताने 117 खेळाडूंना या स्पर्धांकरता पाठवले. भारताने ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक 1900 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नॉर्मन प्रिचर्ड यांनी पटकावून दिलं होतं. त्यांनी 200 मीटर स्प्रिंट आणि 200 मीटर अडथळा शर्यतीत दोन रौप्य पदके जिंकली. भारताने ऑलिम्पिकच्या इतिहासात अनेक चढ-उतार पाहिले आहे. जसे की हॉकीमध्ये विक्रमी आठ सुवर्णपदके पटकावली आहेत. त्यापैकी सहा सलग सहावेळा सुवर्णपदक जिंकण्याचा विक्रम भारताने केला आहे. स्वतंत्र भारतासाठी खाशाबा जाधव यांनी पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक जिंकले होते. 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राचे ऐतिहासिक सुवर्ण आणि 2020 च्या टोकियोमध्ये नीरज चोप्राचे पहिले ट्रॅक-अँड फील्ड सुवर्ण असा भारताचा आजवरचा ऑलिम्पिकचा इतिहास आहे.
हे ही वाचा : गोल्डन गर्ल ते बॉस लेडी
भारतीय हॉकीचा सुवर्ण काळ
भाररतीय हॉकी संघाने आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये एकूण 13 पदकांची कमाई केली आहे. यामध्ये 8 सुवर्ण, 1 रौप्य आणि 4 कास्यंपदकांचा समावेश आहे. 1928 ते 1856 या काळात सलग सहा ऑलिम्पिक सुवर्णपदकांची कमाई केली होती. 1928 मध्ये भारताने पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले. आणि 1960 पर्यंत भारतीय पुरुष संघाने ऑलिम्पिकमध्ये अपराजित राहत सलग सहा सुवर्णपदके जिंकण्याचा पराक्रम केला होता. मात्र, 1980 ऑलिम्पिकनंतर भारतीय हॉकीला घरघर लागलेली पाहायला मिळाली. 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने जर्मनीला 5-4 ने हरवून कांस्यपदक जिंकले. हा एक ऐतिहासिक विजय होता. कारण भारतीय हॉकी संघाने तब्बल 41 वर्षांच्या अंतरानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले. यानंतर 2024 च्या पॅरिसमधील ऑलिंपिकमध्ये स्पेनला हरवून सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक आपल्या नावावर केले.
ऑलिम्पिकमध्ये भारताकडे एकूण 41 मेडल्स
1900 च्या ऑलिम्पिकपासून ते 2024 पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत भारताने 41 पदके जिंकली आहेत. पदार्पणातच दोन पदके जिंकून भारताने ऑलिम्पिकमध्ये दिमाखात प्रवेश केला होता. त्यानंतर भारताने 25 ऑलिंपिक स्पर्धा खेळत 41 पदके जिंकली आहेत. यात 10 सुवर्ण, 10 रौप्य आणि 21 कास्यंपदकांचा समावेश आहे. 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी एक ऐतिहासिक क्षण आला. कुस्तीगीर खाशाबा जाधव हे वैयक्तिक ऑलिंपिक पदक कांस्यपदक जिंकणारे पहिले भारतीय ठरले. यानंतर जवळपास 44 वर्षांनी भारताला वैयक्तिक प्रकारात पदक जिंकण्यात यश आले होते. 1996 च्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये लिअँडर पेसने टेनिसमध्ये भारताला कास्यंपदक मिळवून दिले होते. सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरीने वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदक जिंकत इतिहास रचला होता. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक प्रकारात पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती. यानंतर 2008 मध्ये भारतासाठी एक सुवर्णक्षण आला. तो म्हणजे बीजिंग ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीच्या 10 मीटर एअर रायफल या प्रकारात अभिनव बिंद्राने भारतासाठी पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकत आपलं नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलं होतं. जे आजवर कुणालाही शक्य झालं नाही ते अभिनवने शक्य करुन दाखवलं होतं. अभिनव बिंद्रानंतर भालाफेकपटू नीरज चोप्राने 2020 च्या टोकीया ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी दुसरे सुवर्णपदक पटकावत भारतीयांची मान आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानाने उंचावली होती.
हे ही वाचा : पिक्चर अभी बाकी है…
ऑलिम्पिकध्ये भारताचे भविष्य
भारतासाठी 2020 ऑलिम्पिक हे सर्वात यशस्वी ऑलिम्पिक ठरल्याचे दिसत आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारताने 7 ऑलिम्पिक मेडल्सची कमाई केली होती. 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कास्यंपदकं या ऑलिम्पिकमध्ये भारताने जिंकली होती. तर गेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने 6 ऑलिम्पिक मेडल्स पटकावली आहेत. 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने 71 वे स्थान पटकावले होते. आता 2028 मध्ये लॉज एंजेलिसमध्ये ऑलिम्पिक होणार आहे. या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सुधारणा करण्यास भारत निश्चितच प्रयत्नशील असेल. त्यातच 2036 ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवण्याची तयारी भारताकडून सुरु झाली आहे. भारताचं ऑलिम्पिक आयोजनाचं स्वप्न सत्यात उतरण्याची शक्यता आहे. मात्र, त्याबरोबरच भारताच्या पदकांच्या संख्येतही उत्तरोत्तर वाढ व्हावी आणि भारताने ऑलिम्पिकमध्ये पहिल्या 50 देशांमध्ये स्थान पटकावत हे स्वप्नही साकारावे…..