आपल्या केसांना सुंदर, निरोगी , चमकदार आणि मुलायम ठेवण्यासाठी आपण शाम्पू, तेल आणि कंडीशनर वापरण्यावर खूप लक्ष देतो. पण आपण अनेकदा एक महत्त्वाची गोष्ट विसरतो ती म्हणजे आपण वापरत असलेला कंगवा. केसांना निरोगी ठेवण्यात कंगव्याचा खूप मोठा वाटा असतो.
वेगवेगळ्या प्रकारच्या केसांना वेगवेगळ्या कंगव्यांची गरज असते. योग्य कंगवा वापरल्याने केस तुटत नाहीत, गळत नाहीत आणि डोकेदुखीचा त्रासही कमी होतो. आणि केस विंचरणं सोपं होतं. तुमचे केस कुरळे असोत, लाटा असलेले असोत किंवा सरळ असोत, योग्य कंगवा वापरल्याने केसांची योग्य काळजी घेतली जाते.आज आपण तुमच्या केसांच्या प्रकारानुसार कोणता कंगवा चांगला आहे, या बद्दल सोप्या टिप्स जाणून घेणार आहोत.
तुमच्या केसांसाठी योग्य कंगवा कसा निवडाल?
केसांच्या आरोग्यासाठी योग्य कंगवा निवडणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग, बघूया कोणत्या प्रकारच्या केसांसाठी कोणता कंगवा उत्तम आहे
1.जास्त रुंद दातांचा कंगवा
जर तुमचे केस कुरळे किंवा लाटांसारखे म्हणजेच वेव्ही असतील तर तुमच्या केसांना जास्त रुंद दातांचा कंगवा सर्वात चांगला. या कंगव्याने कुरळे केस विंचरणं सोपं होतं. यामुळे केस तुटत नाहीत आणि कुरळे केस फ्रीजी देखील होत नाहीत.
2.बारीक दातांचा कंगवा
ज्यांचे केस सरळ , पातळ किंवा कमी आहेत त्यांच्यासाठी बारीक दातांचा कंगवा खूप उपयुक्त ठरतो. या कंगव्यामुळे केस खूप व्यवस्थित विंचरले जातात. केस सेट करणंही सोपं जातं.
3. गुंता काढणारा कंगवा
जेव्हा तुमचे केस ओले असतात, तेव्हा ते सर्वात कमकुवत असतात आणि अशावेळी केस तुटण्याची शक्यता जास्त असते. म्हणून यावेळी गुंता काढणारा कंगवा वापरावा. हा कंगवा ओल्या केसांमधील गुंता सहजासहजी काढतो. केसांना ओढून न घेता किंवा त्यांना नुकसान न पोहोचवता गुंता सोडवतो.
4.लाकडी कंगवा
लाकडी कंगवा हा खरंतर सर्व प्रकारच्या केसांसाठी चांगला असतो. हा कंगवा वापरल्याने तुमच्या टाळूला मसाज मिळतो, ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो.
लाकडी कंगव्यामुळे केसांमध्ये येणारी स्टॅटिक वीज कमी होते. त्यामुळे केस उभे राहत नाहीत. तसंच केसांमधील नैसर्गिक तेल संपूर्ण केसांमध्ये पसरवण्यास मदत करतो, याने केसांना चमक येते आणि केस अधिक चमकदार दिसतात.
5. शेपटीचा कंगवा
शेपटीचा कंगवा तुम्हाला केसांमध्ये भांग पाडण्यासाठी किंवा वेगवेगळे हेअर स्टाईल करण्यासाठी मदत करतो. या कंगव्याच्या टोकामुळे केसांना सहजपणे भांग पाडता येतो. केसांचे छोटे भाग करून वेगवेगळ्या हेअर स्टाईल करण्यासाठी हा कंगवा खूप उपयोगी पडतो, कारण यामुळे रेषा खूप व्यवस्थित येतात.
जसं त्वचेची काळजी घेण्यासाठी योग्य गोष्टी लागतात, तसंच केसांची काळजी घेण्यासाठीही योग्य साधनांची गरज असते. तुमच्या केसांच्या टेक्सचरनुसार योग्य कंगवा वापरल्याने केस तुटण्यापासून, गळण्यापासून टाळता येतात आणि केसांचे आरोग्य सुधारते.
म्हणून, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कंगवा घ्याल, तेव्हा तो तुमच्या केसांसाठी योग्य आहे ना, हे नक्की तपासा.