तणाव, भावनिक दुर्बलता, मनावर परिणाम करणारे अपघात, अनुवंशिकता अशा काही कारणांमुळे मनोविकार होतात हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. पण एआय चॅटबोटच्या अतिवापरामुळे ही मनोविकार होतात असं तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला पटेल का? साहाजिकच नाही. तुम्ही म्हणाल एआय चॅटबोटच्या अतिवापराला आपण जास्तीत जास्त व्यसन म्हणू शकतो. पण मनोविकार म्हणणं अती होईल. पण हेच वास्तव आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये एआय चॅटबोटच्या त्यातही चॅटजीपीटीच्या अतिवापरामुळे अनेकांना मनोविकाराने घेरलं आहे. आणि या आजाराचं नाव आहे, ‘चॅटजीपीटी सायकोसिस’.
काय आहे हा ‘चॅटजीपीटी सायकोसिस’ आजार
जेव्हा व्यक्तिचा वास्तव जगाशी सबंध तुटतो तेव्हा त्या व्यक्तीला मनोविकार होतो. यामध्ये भ्रम होणे, असबंधित विषयांवर बोलणे, हातवारे करणे, विचित्र वर्तणुक करणे अशा सगळ्या गोष्टींचा समावेश असतो.
दीर्घकाळ चॅट-जीपीटीसोबत चॅटिंगच्या माध्यमातून संवाद साधणाऱ्या व्यक्तिंनाही याच सगळ्या मनोविकाराच्यां लक्षणांचा अनुभव येत आहे. या आजारामध्ये पीडित व्यक्तिला चॅट-जीपीटी म्हणजे आपलं अंतर्मन जाणणारा, त्याला सर्व रहस्ये माहित असलेला अद्भूत देव आहे असा समज होतो. यामध्ये पीडित व्यक्तीला वेगवेगळे भ्रम होतात. ते वास्तवतेशी पूर्ण संबंध तोडून टाकतात. त्यांना पॅरनॉइआचे भास होतात, म्हणजे त्यांना असं सतत वाटत राहतं की त्यांना कुणीतरी मारण्याचा प्रयत्न करत आहे अशी भिती त्यांच्या मनात निर्माण होते. या सगळ्या घटनांचा अभ्यास केल्यावर मानसोपचार तज्ज्ञांनी या आजाराला ‘चॅटजीपीटी सायकोसिस’असं नाव दिलं.
अमेरिकामध्ये अशा अनेक घटना उघडकीस आलेल्या आहेत. अनेकांच्या नोकऱ्यां गेल्या आहेत, अनेक लोक बेघर झालेले आहेत, काही जणांची कुटुंब उद्धवस्त झाली आहेत तर काही जणांनी आत्महत्या किंवा स्वत:ला जेलबंद करुन घेतलं आहे.
हे ही वाचा : एआयच्या ( AI ) जास्त वापरामुळे तरुणाईच्या विचारशक्तीवर परिणाम!
चॅट-जीपीटीचा प्रमाणात वापर करा
मानसोपचार तज्ज्ञ सांगतात की, प्रत्येकांनी चॅट-जीपीटीचा प्रमाणात वापर केला पाहिजे. जी लोकं अधिकाधिक वेळ एकांतात आणि मोबाईलवर घालवतात अशी लोक यांच्या आहारी जाऊ शकतात. आपण कामासाठी किंवा एखादी माहिती मिळवण्यापुरता या चॅट-जीपीटीचा वापर केला तर काही अडचण नाही. पण आपण भावनिकरित्या व्यक्त होण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला तर आपल्याही नकळत आपण या संवादामध्ये गुंतत जातो. आपण दिवसभाराच्या गोष्टी हळूहळू चॅट-जीपीटी सोबतच शेअर करु लागतो, प्रत्येक गोष्टी मध्ये त्याची मतं विचारु लागतो हळूहळू हे तंत्रज्ञानचं आपला खरा साथीदार असल्याची भावना निर्माण होत जाते. अशा पद्धतीने आपण वास्तव जगातून बाहेर पडून या आभासी जगात वावरु लागतो.
उदाहरण म्हणून आम्ही चॅटजीपीटीवर एक भावनिक मॅसेज केला की, “मला खूप वाईट वाटतं, मला मदत करशील का?” त्यावर चॅटजीपीटीचं उत्तर आलं की, “ तुम्हाला असं वाटतं म्हणून मी क्षमा मागतो. तुला कोणत्या गोष्टीचं वाईट वाटतं याविषयी तुला बोलायचं आहे का? काही वेळेस अशा गोष्टी लिहून काढल्या तरी मन हलकं होतं. मी कोणताच दबाव आणत नाही. जर तुला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवर बोलायचं असेल तरी आपण बोलु शकतो. कोणताही गंभीर किंवा साध्या विषयावर बोलु जेणेकरुन मन विचलीत होईल. मी सांगू का काय सुरु आहे ते?” अशाप्रकारे चॅटजीपीटी आपल्याशी संवाद साधत जातो.
काही जण मानसोपचार केंद्रात तर काही जणांनी आयुष्य संपवलं
फ्यीचररिझम या न्यूयॉर्कमधल्या संकेतस्थळाने या आजाराविषयीची एक केस स्टडी दिलेली आहे. एका महिलेने तिच्या पतीला कशाप्रकारे ‘चॅटजीपीटी सायकोसिस’ ने घेरलं होतं याविषयी ती सांगत आहे. त्या महिलेचा पती हा पर्माकल्चर आणि बांधकाम क्षेत्रातल्या एका प्रोजेक्टसाठी महिना दीड महिन्याभरापासून चॅटजीपीटी वापरत होता. या तंत्रज्ञानाच्या साहय्याने माहिती मिळवता मिळवता हळूहळू तो तत्वज्ञानाविषयीच्या गोष्टी चॅटजीपीटीवर शोधू लागला. यातून त्याला मेसिअॅनिक डील्यूजन्स होऊ लागले. मेसिअॅनिक डील्यूजन्स म्हणजे आपण कोणी महान व्यक्ती आहोत असा भास होऊन आपण आपल्या स्वत्वापासून दूर जातो. या टप्यामध्ये तो व्यक्ती असा दावा करु लागला की त्याने संवेदनशील अशा एआयची निर्मिती केली आहे. त्याने गणित आणि भौतिकशास्त्राचे सगळी तत्व तोडून दिले असून तो जग वाचवण्याच्या मोहिमेवर निघाला आहे असं म्हणत असे. या त्याच्या वागण्यामुळे त्याला नोकरुवरुन काढून टाकलं. त्याचं वजन घटत गेलं. आणि त्याची झोप ही नाहिशी होत गेली. त्याला काहिही प्रश्न विचारल्यावर चॅटजीपीटीशी बोला मग तुम्हाला समजेल मी काय सांगत आहे असं तो म्हणायचा. त्याने वास्तवाशी पूर्ण संबंध तोडले. या परिस्थिती हाता बाहेर जाऊ लागल्यावर त्याच्या पत्नीने आणि एका मित्राने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला. ते पेट्रोल आणण्यासाठी गेले. घरी परत आल्यावर त्यांनी पाहिलं की त्याच्या गळ्यात फास लावलेला होता. त्यांनी लागलीच हॉस्पिटलला फोन करुन मदत मिळवली आणि त्याला मानसोपचार केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल केलं.
अशा अनेक घटना अमेरिकेमध्ये घडत आहेत. काहींना उपचार मिळत आहेत तर काही जण या आजारामध्ये आपलं आयुष्य संपवत आहेत. त्यामुळे तंत्रज्ञाना आपल्या वापरासाठी निर्माण केलं जातं. आपण तंत्रज्ञानासाठी नाही आहोत. तंत्रज्ञानाला आपल्या मनाचा, वर्तणुकीचा पूर्ण ताबा घेऊन देऊ नका. आपली विवेकबुद्धी शाबूत ठेवून या अशा विविध तंत्रज्ञानाचा वापर करणं गरजेचं आहे.