ठाणे शहराला एक दीर्घ आणि समृध्द साहित्य परंपरा लाभलेली आहे. ‘काव्येतिहास संग्रह’चे संपादक जनार्दन बाळाजी मोडक,’प्राचीन भारतीय भू वर्णन’चे लेखक शं.बा. दिक्षीत, ‘संगीत संभाजी’, ‘राधाराधन’ अशा नाटकांचे कर्ते आत्माराम पाठारे, ‘महाराष्ट्र सारस्वतकार’ वि.ल. भावे अशा दमदार साहित्यिकांनी ठाण्याच्या साहित्य परंपरेचा पाया घातला आहे. त्यामुळे ठाणे हे कवींचे, लेखकांचे, संपादकांचे गाव म्हणूनच पूर्वीपासून ओळखले जाते. साहजिकच अशा शहरात मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन तीन वेळा व्हावे यात नवल नाही. भावे यांनी 1893 मध्ये स्थापन केलेल्या मराठी ग्रंथ संग्रहालयाने या संमेलनाच्या आयोजनात कायम महत्वाची भूमिका बजावली आहे. 1960,1988 आणि 2010 असं तीन वेळा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाण्यात साजरं झालं आहे. यातील 1960 आणि 2010 या दोन संमेलनाचे यजमानपद मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणेने भूषवले होते तर 1988 मधील साहित्य संमेलन हे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ठाणे जिल्हा शाखेच्या पुढाकाराने भरले होते.
स्वागत समितीमध्येच बाराशे सभासद
ठाण्यात 1960 मध्ये भरलेल्या मराठी साहित्य संमेलनासाठी ( तेंव्हा ते अखिल भारतीय नव्हतं!) मराठी ग्रंथ संग्रहालयाचे उपाध्यक्ष परशुराम त्र्यंबक पटवर्धन हे 1946 सालापासून प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि 1960 सालचं मराठी साहित्य संमेलन ठाण्याला मिळालं. संमेलनाच्या आधी काही वर्षे संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाने पेट घेतला होता आणि महाराष्ट्राचं राजकीय-सांस्कृतिक वातावरण ढवळून निघालं. 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. आणि संयुक्त महाराष्ट्रातील पहिलं मराठी साहित्य संमेलन भरवण्याचा मान ठाणे शहराला मिळाला. 7,8,9,10 मे 1960 असे चार दिवस ठाण्यात हे मराठी साहित्य संमेलन भरले. संयुक्त महाराष्ट्राची मराठी भाषिक राज्याची स्थापना झाल्यामुळे ठाणे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आणि स्वागत समितीमध्ये 1278 सभासदांची नोंदणी झाली. हा तो पर्यंतचा विक्रम होता.
प्रा. जोग संमेलनाध्यक्ष
ठाणे येथे भरणाऱ्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष अॅडव्होकेट वामनराव ओक यांची निवड करण्यात आली. त्यानंतर तेव्हाच्या पध्दतीनुसार संमेलनाध्यपदासाठी जी निवडणूक झाली त्यात दोन विद्वान लेखक एकमेकांसमोर उभे राहिले होते. प्रा.रा.श्री.जोग आणि प्रा.चि.वि.जोशी यांच्यात निवडणूक झाली. जोग म्हणजे काव्यसमिक्षा आणि साहित्यशास्त्र या विषयातील भारदस्त नाव तर चि.वि. जोशी म्हणजे निर्मळ, निखळ विनोदी लेखनातील लोकप्रिय नाव. मात्र या निवडणुकीत जोगांनी बाजी मारली आणि ठाण्यात भरलेल्या 42 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले.
संमेलनाचे उद्घाटक ठरवण्यावरून वाद
1960 साली ठाण्यात भरलेल्या साहित्य संमेलनासाठी आर्य क्रिडा मंडळासमोरच्या गावदेवी मैदानावर भव्य मंडप उभारण्यात आला होता. या संमेलनासाठी उभारलेल्या मंडपाला महाराष्ट्र सारस्वतकार वि.ल. भावे नगर असे नाव देण्यात आले होते. या भावे नगराचे जे मुख्य प्रवेशद्वार होते त्याला भारताचार्य चिंतामणीराव वैद्य यांचे नाव देण्यात आले होते. अन्य द्वारांना महर्षी अण्णासाहेब कर्वे राम गणेश गडकरी आणि होराशास्त्री शं. वा. दिक्षित यांचे नाव देण्यात आले होते. साहित्य संमेलन म्हटले की वाद आलाच. ठाण्यात 65 वर्षांपूर्वी भरलेल्या संमेलनाच्या वेळीही वादाच धुरळा उडालाच होता. निमित्त झाले ते संमेलनाचे उद्घाटक ठरवण्यावरुन. संमेलनाच्या कार्यकारी मंडळाने संमेलनाध्यक्षांप्रमाणेच उद्घाटक ही निवडणुकीने ठरवावेत असा प्रस्ताव मांडला मात्र स्वागत मंडळाने त्याला विरोध केला. त्यावरुन वातावरण जरा गढूळ झालं. अखेर ठाणे जिल्ह्यातील बदलापूरचे ज्येष्ट लेखक नानासाहेब चापेकर यांच्या नावावर उद्घाटक म्हणून एकमत झालं आणि वादावर पडदा पडला.
नाटक, काव्य, ग्रामीण साहित्याची मेजवानी
7,8,9,10 मे 1960 या काळात ठाण्यात 42 वे मराठी साहित्य संमेलन मोठ्या उल्हासात, उत्साहात साजरे आले. या संमेलनात ‘महाराष्ट्राचे ‘स्वागत आणि स्वगत’ या वर परिसंवाद झाला. तसेच ‘महाराष्ट्राचे साहित्यास आव्हान आणि आवाहन’ या विषयावर झालेला परिसंवादही गाजला. संमेलनासाठी म्हणून खास ठाण्यातील नाट्यकलावंतानी ‘भावबंधन’ या नाटकाचा रंगतदार प्रयोग सादर केला. त्याचप्रमाणे संस्कृत नाट्यस्पर्धेत पारितोषिक मिळवणाऱ्या ‘वेणी संहारम’ या नाटकाचा प्रयोगही सादर करण्यात आला. संमेलनाध्यक्ष रा.श्री. जोग यांनी आपल्या छोटेखानी भाषणात लेखन शुचिता, मराठी साहित्याच्या इतिहासाची आवश्यकता, कलाकृती व प्रेरणा अशा विषयांचा आढावा घेतला. काव्य गायनापासून ते ग्रामीण साहित्य संमेलनापर्यंत अनेक कार्यक्रम या संमेलनात सादर झाले.
हेही वाचा : ठाणे जिल्ह्यातील पहिले सार्वजनिक मराठी ग्रंथालय!
तीन हजार रुपये शिल्लकीचं संमेलन
गेल्या काही वर्षामधली साहित्य संमेलने त्यावर होणान्या वारेमाप खर्चासाठीही गाजताना दिसतात. पण ठाण्यात मराठी ग्रंथ संग्रहालयाने आयोजित केलेल्या 42 व्या संमेलनाच्या खर्चाचा अंदाज साधारण 24 हजार रुपयांच्या आसपास काढण्यात आला होता आणि प्रत्यक्षात ही फक्त तेव्हढाच खर्च करुन वरती साधारण तीन हजार रुपये शिल्लक ठेवण्यात संयोजकांना यश आलं.
नैरोबी ते अमेरिका सगळीकडच्या मराठी भाषिकांना आवताण
या संमेलनाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे संयुक्त महाराष्ट्रातील या पहिल्या मराठी साहित्य संमेलनाचं आमंत्रण जगभरातील मराठी लोकांना पाठवण्यात आलं होतं. न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, लंडन, रोम, मॉस्को, पेकिंग पासून ते काबूल, कोलंबो, बगदाद, नैरोबी पर्यंत जगभरातील मराठी लोकांना आवतण देण्यात आलं होतं आणि यातील काही जणांनी संमेलनासाठी देणगी पाठवून आपला पाठिंबाही दर्शविला होता. 65 वर्षांपूर्वी ठाण्यात मराठी ग्रंथ संग्रहालयाने आयोजित केलेल्या 42 व्या मराठी साहित्य संमेलनाची ही कथा जरी आजच्या सुंदर्भात एखादी परिकथा वाटली तरी खरी कथा आहे आणि आपल्या ठाण्याने संयुक्त महाराष्ट्रातील पहिल्या मराठी साहित्य संमेलनाचे अतिशय नेटकं आयोजन केले होते हा इतिहास आहे, ज्याचा प्रत्येक ठाणेकराला सार्थ अभिमान वाटला पाहिजे.
यानंतर 1988 मध्ये ठाण्यात भरलेल्या 61 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची कथाही अशीच रोचक आणि रंजक आहे. आज मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला असताना आणि दुसरीकडे मराठीवर अन्य भाषांचे आक्रमण होत असताना, भूतकाळातल्या या संमेलनाच्या आठवणी मराठीचा लढा जीवंत ठेवायला मदत करतील यात शंका नाही.