ई-कचऱ्यातून सोनं

Gold : इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरून खराब झाल्या की त्या निकामी होतात. याच निकामी वस्तूंना ई-कचरा म्हणतात. आपले जुने कॉम्प्युटर, टीव्ही, मोबाईल फोन, लॅपटॉप, टॅब यांसारख्या वस्तू खराब झाल्या की, आपण त्या सर्रासपणे उघड्यावर फेकून देतो.
[gspeech type=button]

तुम्हांला माहितेय का, आपल्या जुन्या मोबाईल आणि लॅपटॉपमधून सोनं काढता येऊ शकतं? ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण हे खरं आहे. वैज्ञानिक आता या ई-कचऱ्यातून सोनं काढण्याचे नवीन आणि सुरक्षित असे वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. हा कचरा म्हणजे खरंतर आपल्यासाठी एक खजिनाच आहे.

ई-कचरा म्हणजे काय ?

कचऱ्याचे अनेक प्रकार आपल्याला माहीत आहेत. आपल्या घरातला ओला-सुका कचरा, बांधकामाच्या जागी तयार होणारा कचरा, दवाखान्यांमधला जैविक कचरा अशा अनेक प्रकारचा कचरा आपण पाहतो, यातलाच एक म्हणजे ई-कचरा.

ई-कचऱ्याबद्दल अजूनही अनेकांना पूर्णपणे माहित नाही. इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरून खराब झाल्या की त्या निकामी होतात. याच निकामी वस्तूंना ई-कचरा म्हणतात. आपले जुने कॉम्प्युटर, टीव्ही, मोबाईल फोन, लॅपटॉप, टॅब यांसारख्या वस्तू खराब झाल्या की, आपण त्या सर्रासपणे उघड्यावर फेकून देतो. पण या ई-कचऱ्यात सोनं आणि चांदी हे मौल्यवान धातू असतात. आणि ते वेगळे करण्यासाठी वैज्ञानिकांनी एक नवीन युक्ती शोधली आहे. याच युक्तीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

ई-कचऱ्याचा डोंगर

2022 मध्ये, जगभरात अंदाजे 6 कोटी 20 लाख टन ई-कचरा तयार झाला. हा कचरा 15 लाखांहून अधिक ट्रक्समध्ये मावेल इतका होता. 2010 पासून या कचऱ्यात तब्बल 82 टक्के वाढ झाली आहे. 2030 पर्यंत या कचऱ्याच्या ढिगाचा आकडा 82 दशलक्ष टनांवर पोहोचेल असा अंदाज आहे.

या ई-कचऱ्यामध्ये आपले जुने लॅपटॉप, मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू येतात. ज्यात सोन्यासारखे मौल्यवान धातू लपलेले असतात. या कचऱ्यापैकी एक चतुर्थांशपेक्षा कमी कचराच योग्य प्रकारे गोळा केला जातो आणि त्यावर प्रक्रिया केली जाते. पण आता वैज्ञानिकांनी एक नवी पद्धत शोधली आहे, ज्यामुळे या ई-कचऱ्यातून सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने सोनं काढता येईल.

Nature Sustainability’ या प्रसिद्ध विज्ञान मासिकात प्रकाशित झालेल्या एका लेखात या नवीन तंत्रज्ञानाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. ही नवीन प्रक्रिया पारंपरिक सोन्याच्या खाणकामासाठीही सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पर्याय ठरू शकते, असा दावा केला जात आहे.

सोन्याची वाढती मागणी आणि खाणकामाचे दुष्परिणाम

सोनं खरेदी करणे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग आहे. पण आजकाल, इलेक्ट्रॉनिक्स, रासायनिक उत्पादनं आणि एरोस्पेस यांसारख्या आधुनिक उद्योगांमध्येही सोन्याची खूप गरज लागत आहे. सोन्याची जागतिक मागणी वाढत असली तरी, ते खाणीतून काढणे पर्यावरणासाठी खूप हानिकारक आहे.

खाणीतून सोनं काढण्यासाठी सायनाइड नावाचं अत्यंत विषारी रसायन मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. सायनाइड जरी काही काळानंतर नष्ट होत असलं तरी, त्याचा वन्यजीवांवर खूप वाईट परिणाम होतो. लहान आणि पारंपरिक खाणींमध्ये तर सोनं शोधताना पाऱ्याचा (Mercury) मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यात सोनं पाऱ्यासोबत मिसळून एक घट्ट मिश्रण तयार होतं. ते मिश्रण सहज वेगळं करता येतं. नंतर हे मिश्रण गरम करून पाऱ्याची वाफ केली जाते आणि सोनं त्यातून वेगळं होतं.

हेही वाचा: प्लास्टिकचा पुनर्वापर करत आहात, पण जरा सांभाळून!

खाणकामामुळे होणारे दुष्परिणाम

1.या खाणकामामुळे मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होते, ज्यामुळे पर्यावरणाचं मोठं नुकसान होतं.

2.खाणकाम करताना तयार होणारा विषारी कचरा साठवण्यासाठी बांधलेली टेलिंग्स डॅम्स पर्यावरणासाठी मोठा धोका निर्माण करतात.

3.लहान प्रमाणात आणि पारंपरिक खाणकाम हे पृथ्वीवरील पाऱ्याच्या प्रदूषणाचे सर्वात मोठे स्त्रोत आहे.

4.पाऱ्याच्या उत्सर्जनामुळे खाणकाम करणाऱ्या लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो आणि पर्यावरणातही प्रदूषण पसरतं.

यामुळे सोन्याच्या खाणकामाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी नवीन पद्धतींची खूप गरज आहे.

ई-कचऱ्यात सोनं कुठे लपलेलं असतं?

मोबाईल फोन, लॅपटॉप, टीव्ही, प्रिंटर अशा अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये सोन्याचा वापर केलेला असतो.

प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उपकरणात एक सर्किट बोर्ड असतो आणि त्यावर सोन्याचा पातळ थर असतो.

कॉम्प्युटरला लावला जाणाऱ्या CPU मधील पिन्स आणि कनेक्टरमध्ये देखील सोनं वापरलं जातं.

कॉम्प्युटरच्या RAM मध्ये वापरल्या जाणाऱ्या पिन्स आणि चिप्समध्येही सोनं वापरलेलं असतं.

मदरबोर्ड्स, सॉकेट्स, पोर्ट्स यामध्येही सोन्याचा थर असतो. खासकरून USB, HDMI, LAN पोर्ट्सच्या कनेक्टरमध्ये सोन्याचं कोटिंग असतं.

मोबाईलचे सर्किट बोर्ड, सिम कार्ड स्लॉट, चार्जिंग पोर्ट, इअरफोन जॅक आणि बॅटरी कनेक्टरमध्ये सोन्याचा वापर केला जातो.

सोनं हे विजेचा उत्तम वाहक असल्यामुळे हे ट्रॅक जलद आणि स्थिर सिग्नल देण्यासाठी उपयुक्त ठरतात.

एका स्मार्टफोनमध्ये साधारणतः 0.034 ग्रॅम सोने वापरलेले असते.

एक टन मोबाईल फोन ई-कचऱ्यातून सुमारे 300 ते 350 ग्रॅम सोनं मिळू शकतं, जे काही वेळा खाणीतून मिळणाऱ्या सोन्यापेक्षा जास्त असतं.

ई-कचऱ्यातून सोनं कसं काढतात?

ऑस्ट्रेलियातील फ्लिंडर्स विद्यापीठातील रसायनशास्त्र विषयाचे प्राध्यापक जस्टिन एम. चॉकर यांनी सांगितलं आहे की, सोनं वेगळं करताना वापरल्या जाणाऱ्या सायनाइड आणि पाऱ्याचे घातक परिणाम टाळण्यासाठी शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर यांच्या एका टीमने सोनं वेगळं करण्याची एक नवीन, सुरक्षित आणि शाश्वत पद्धत निर्माण केली आहे. ही पद्धत सोन्याच्या खनिजांमधून, तसेच इलेक्ट्रॉनिक कचऱ्यातून सोनं बाहेर काढण्यासाठी वापरता येऊ शकते.

याआधीही सायनाइड किंवा पाऱ्याशिवाय सोनं वेगळं करण्याच्या अनेक पद्धती होत्या, पण त्यातील बहुतेक प्रक्रिया या खूप खर्चिक होत्या. याउलट, वैज्ञानिकांनी विकसित केलेल्या या नवीन पद्धतीमध्ये सोन्याचे उत्पादन, आणि शुद्धीकरण यामध्ये संपूर्ण प्रक्रियेत टिकाऊपणा विचारात घेतला आहे. या नवीन तंत्रज्ञानात ‘ट्रायक्लोरोइसोसायन्युरिक ॲसिड’ नावाचं रसायन वापरलं आहे. हे रसायन पाणी स्वच्छ करण्यासाठी आणि स्विमिंग पूलमध्ये क्लोरीन टाकण्यासाठी वापरलं जातं.

त्यानंतर, विरघळलेल्या सोन्याला रसायनातून बाहेर काढण्यासाठी, वैज्ञानिकांनी सल्फर-रिच पॉलिमर सॉर्बेंट’  नावाचे एक नवीन रसायन तयार केले आहे. पॉलिमर सॉर्बेंट्स म्हणजे अशी रसायने जी द्रव किंवा वायूपासून विशिष्ट पदार्थ वेगळे करतात. हे नवीन सॉर्बेंट मूलभूत सल्फर पासून बनवले आहे, जे स्वस्त आहे आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.

या पॉलिमरमध्ये एक खास गोष्ट आहे, या द्रावणात इतर अनेक प्रकारचे धातू असले तरी, ते फक्त सोन्यालाच निवडकपणे बांधू शकतं आणि द्रावणातून वेगळं करू शकतं. ही सोपी प्रक्रिया खाणकाम केलेल्या मातीवर, जुन्या कॉम्प्युटरमधील सर्किट बोर्डवर आणि वैज्ञानिक कचऱ्यावर यशस्वीरित्या दाखवण्यात आली आहे.

महत्त्वाचं म्हणजे, वैज्ञानिकांनी रसायन आणि पॉलिमर सॉर्बेंट या दोघांनाही पुन्हा वापरता येईल अशा पद्धतीने तयार करण्याच्या पद्धतीही विकसित केल्या आहेत. तसेच, या प्रक्रियेत वापरलेलं पाणी शुद्ध करून ते पुन्हा कसं वापरता येईल, याच्या पद्धतीही त्यांनी शोधल्या आहेत.

पुढील कामात वैज्ञानिक उद्योग, सरकारी आणि स्वयंसेवी संस्थांसोबत काम करून, लहान प्रमाणात खाणकाम करणाऱ्या ऑपरेशन्समध्ये ही पद्धत वापरता येते का याची तपासणी करण्यात येणार आहे. सोनं काढण्यासाठी एक मजबूत आणि सुरक्षित पद्धत असावी. ज्यामुळे सायनाइड आणि पारा यांसारख्या अत्यंत विषारी रसायनांची गरजच लागणार नाही, या उद्दिष्टाने हे काम करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे, ई-कचऱ्यातून सोनं मिळवण्यात यश मिळाल्यास, प्राथमिक खाणकामाची गरज कमी होईल आणि त्यामुळे पर्यावरणावर होणारा परिणामही कमी होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Writing Habits : हातात पेन-पेन्सिल धरुन लिहिणं ही केवळ एक क्रिया नाही तर यामुळे मेंदूचा आपल्या मेमरी पॉवरचा विकास होत
युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (USFDA) ने सरस्वती स्ट्रिप्स प्रायव्हेट लिमिटेड द्वारे उत्पादित टायगर व्हाईट ब्रँड अंतर्गत अॅल्युमिनियम कुकवेअर
Healthocide Attacks on healthcare facilities : ‘हेल्थॉसाइड’ याचा अर्थ लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाऊ नये यासाठी आरोग्य व्यवस्थांवर हल्ला केला

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ