आपलं हृदय आपल्या शरीरात अतिशय महत्त्वाचं काम करतं, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. हृदय सतत धडधडत राहतं आणि आपल्या शरीरात रक्त पोहोचवतं. पण तुम्हाला माहितीये का, आपल्या पायांमध्येही एक असं ‘हृदय’ आहे. या हृदयाचं नाव आहे सोलियस स्नायू (Soleus Muscle). हा स्नायू आपल्या पायात खोलवर असतो आणि अनेकदा त्याला आपण विसरून जातो. हा स्नायू आपल्या हालचालींवर काम करतो.
सोलियस स्नायू काय काम करतात?
आपल्या शरीरातून रक्त गुरुत्वाकर्षणामुळे खाली खेचलं जातं, पण आपल्या हृदयाला सतत रक्ताची गरज असतेच. इथेच सोलियस स्नायू महत्वाची भूमिका बजावतो. आपण जेव्हा चालतो, धावतो, पायऱ्या चढतो किंवा अगदी पायांच्या बोटांवर उभे राहतो, तेव्हा हा सोलियस स्नायू सक्रिय होतो. आणि हा सोलियस स्नायू सक्रिय झाल्यावर पायातील शिरांमधील (Veins) अशुद्ध रक्त गुरुत्वाकर्षणाविरुद्ध आपल्या हृदयाकडे ढकलतो. त्यानंतर हे रक्त शुद्ध करून पुन्हा शरीरात सगळीकडे पुरवले जाते. हा स्नायू रक्ताला वरच्या दिशेने पंप करतो, म्हणूनच त्याला ‘दुसरं हृदय’ असं म्हणतात.
सोलियस स्नायू कुठे असतो?
सोलियस स्नायू आपल्या पायाच्या मागच्या बाजूला म्हणजेच पोटरीच्या इथे असतो. तो फार वेगाने काम करत नाही. इतर स्नायूंच्या तुलनेत, सोलियस स्नायूमध्ये स्लो-ट्विच फायबर्स (Slow-Twitch Fibers) जास्त असतात. म्हणजेच तो थकल्याशिवाय दीर्घकाळ काम करू शकतो. म्हणूनच आपण तासंतास उभे राहू शकता किंवा चालू शकतो. कारण हा स्नायू आपलं रक्त योग्य दिशेने पाठवण्याचं काम करत असतो.
हेही वाचा: दर 10 मिनिटांनी शरीरात होतात बदल!
हा स्नायू महत्त्वाचा का आहे?
सोलियस स्नायूमुळे आपल्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं. यामुळे शरीराच्या प्रत्येक भागाला पुरेसा ऑक्सिजन आणि पोषक तत्वं मिळतात.
बऱ्याचदा एकाच जागी बसून राहिल्याने किंवा उभे राहिल्याने पायांमध्ये रक्त साचून रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका असतो. पण सोलियस स्नायूने रक्ताभिसरण चांगलं ठेवल्यामुळे हा धोका कमी होतो.
जर तुमच्या पायांना सूज येत असेल, विशेषतः दिवसभर बसून किंवा उभं राहिल्यावर, तर सोलियस स्नायू सक्रिय ठेवल्याने ते कमी होते.
या स्नायूमुळे आपल्या हृदयाला पायातून रक्त वर खेचण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही. यामुळे हृदयावरील ताण कमी होतो आणि आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. तसेच हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.
शरीरात रक्ताभिसरण चांगलं असल्यामुळे, पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळतो, ज्यामुळे आपल्या एकूण ऊर्जेची पातळी सुधारते आणि जास्त उत्साही वाटतं.
आणि यातली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा स्नायू आपण नुसते उभे असतानाही काम करतो.
सोलियस स्नायू सक्रिय ठेवण्यासाठी काय करू शकतो?
जर तुम्ही खूप तास बसून किंवा उभे राहून काम करत असाल, तर दर एक ते दोन तासांनी उठून 5-10 मिनिटे चाला, यामुळे सोलियस स्नायू सक्रिय होतो. तसेच खुर्चीवर बसून किंवा उभे असतानाही तुम्ही हे करू शकता. तुमच्या टाचा वर उचलून पायांच्या बोटांवर उभे रहा असे तुम्ही 10-15 वेळा करा.
तुमचे पाय सरळ ठेवून, तुमच्या पायाचे घोटे (Ankles) वर आणि खाली वाकवा. यामुळेही सोलियस स्नायूंना चांगला व्यायाम मिळतो. खुर्चीवर बसून किंवा झोपूनही तुम्ही तुमच्या पायांना गोल फिरवू शकता. यामुळे पायांमधील रक्ताभिसरण सुधारतं. पायाच्या पोटरीचे आणि सोलियस स्नायूचे स्ट्रेचिंग करा. भिंतीचा आधार घेऊन पुढे झुकून तुम्ही हा स्नायू स्ट्रेच करू शकता.