आपल्या सगळ्यांच्या कपाटात अनेक वेगवेगळे टी-शर्ट असतातच. आरामदायी, कुठेही सहज घालता येणारा आणि दिसायलाही मस्त. सकाळी उठल्यावर काय घालावं, हा प्रश्न पडला की, अनेकदा आपला हात आपोआप टी-शर्टकडेच जातो. पण तुम्हाला माहीत आहे का, हा साधा दिसणारा टी-शर्ट गेल्या 70 वर्षांपासून फक्त एक कपडा म्हणून राहिला नाहीये, तर तो लोकांच्या मनातले विचार, भावना, विरोध आणि बंडखोरी बोलून दाखवण्याचं एक महत्वाचं माध्यम बनला आहे. आणि 2025 मध्येही ‘स्लोगन टी-शर्ट’ची क्रेझ कमी झालेली नाही, ती आजही तशीच आहे.
आधी टी-शर्ट फक्त अंतर्वस्त्र म्हणून वापरले जायचे. पण दुसऱ्या महायुद्धानंतर हेच टी-शर्ट सामान्य कपड्यांप्रमाणे वापरले जाऊ लागले. मग हळूहळू बाईकर्स आणि गाड्यांचे शौकिन या लोकांनी टी-शर्टला आपलंस केलं. मार्लन ब्रँडो आणि जेम्स डीन सारख्या हॉलीवूडच्या हिरोंनी त्याला खूप प्रसिद्धी दिली. 1950 च्या दशकापर्यंत तर टी-शर्ट बंडखोरीचं आणि कूल दिसण्याचं एक खास चिन्ह बनलं होतं.
टी-शर्टवरचे विचार
1960 च्या दशकापासून अमेरिका आणि ब्रिटनमध्ये स्लोगन टी-शर्ट खूप लोकप्रिय झाले. त्यानंतर फॅशन आणखी कॅज्युअल होत गेली आणि स्त्रियाही टी-शर्ट घालू लागल्या. त्या काळात लोकांना फक्त गोष्टी सांगण्यापेक्षा आपल्या भावना आणि विचार मोकळेपणाने व्यक्त करायला जास्त आवडायला लागलं होतं. शब्दांशी खेळणं, छान डिझाइन करणं आणि समाजाबद्दल काहीतरी बोलणं, या सगळ्यामुळे टी-शर्टला आपले वैयक्तिक विचार मांडण्यासाठी एक कॅनव्हास बनवले. त्याकाळी आजच्यासारखा सोशल मिडिया नव्हता. कदाचित त्यामुळं तेव्हा मोकळेपणानं व्यक्त व्हायला टी-शर्ट हे सोयीचं माध्यम होतं.
व्हिएतनाममध्ये युद्ध सुरू असताना आणि अणूबॉम्बच्या धोक्याची भीती वाढत असताना, अमेरिकेत टी-शर्टवर युद्धाला विरोध करणारे संदेश जास्त दिसायचे. जॉन लेनन आणि योको ओनो यांनी 1969 मध्ये “वॉर इज ओव्हर” नावाची मोहीम चालवली. त्या मोहिमेतील डिझाइन असलेला टी-शर्ट तर आजही खूप प्रसिद्ध आहे आणि याचे कॉपी टी-शर्ट आजही बाजारात मिळतात. तेव्हापासून कपड्यांवर शांततेचे संदेश, मग ते नुसते शब्द असोत किंवा काही चिन्हं आपल्या सगळ्यांच्या फॅशनमध्ये अजूनही आहेत. मोठ्या फॅशन ब्रँड्सच्या दुकानापासून ते साध्या दुकानांपर्यंत स्लोगन लिहिलेली टी-शर्ट सगळीकडे दिसतात.
बोल्ड संदेश आणि ‘पंक’ लोक
1970 च्या दशकात ‘न्यूयॉर्क टाइम्स’ वृत्तपत्राने टी-शर्टला “संदेश देणारं माध्यम” असं म्हटलं होतं. त्या काळात टी-शर्टवरचे संदेश आणखीच बोल्ड आणि विचार करायला लावणारे असायचे. टी-शर्टवर लिहिलेले स्लोगन्स लोकांना कधी हसवायचे, तर कधी वाद निर्माण करून चिथावण्याचा प्रयत्न करायचे.
‘पंक’ (Punks) नावाचे लोक यात खूपच हुशार होते. डिक हेबडिगे नावाच्या एका विचारवंताने 1979 मध्ये केलेल्या एका अभ्यासात याला “गटरस्नाइप रॅटोरिक” म्हणजे रस्त्यावरची किंवा धाडसी भाषा असं म्हटलं आहे. डिझायनर व्हिव्हिएन वेस्टवुड आणि माल्कम मॅक्लारेन यांनी ‘डीआयवाय’ (DIY – Do It Yourself) पद्धत आणली. यामधील स्लोगन्स हाताने लिहिलेले, भावना व्यक्त करणारे आणि समाजाचे नियम मोडणारे असायचे.
हेही वाचा:पारंपरिक कपड्यांना नवीन ट्विस्ट!
LGBTQ हक्कांसाठी टी-शर्टचा वापर
या काळात छपाईचे तंत्रज्ञान खूपच प्रगत झाले होते त्यामुळे एकाच वेळी खूप डिझाईनचे टी-शर्ट छापायला सोपं झालं. याचा फायदा LGBTQ समुदायाने आणि त्यांच्या समर्थकांनी करून घेतला.
1980 च्या दशकात एड्स (AIDS) रोगाची साथ आली होती, त्यावेळी काही खूप महत्त्वाचे स्लोगन टी-शर्ट तयार करण्यात आले. त्यातला एक टी-शर्ट खूपच मार्मिक होता, ज्यावर फक्त “सायलेन्स = डेथ” असं लिहिलं होतं. हे खरंतर आधी एक पोस्टर होतं, पण ‘ऍक्ट अप’ (Act Up) नावाच्या संस्थेने ते आंदोलकांसाठी टी-शर्टवर छापलं.
एड्सने बाधित झालेल्या लोकांकडे दुर्लक्ष केलं जात होतं आणि त्यांना वाईट वागणूक मिळत होती. त्यामुळे या लोकांना सरकारकडून आणि इतर नागरिकांकडून मदत मिळवण्यासाठी स्वतःच पुढाकार घ्यावा लागला.
‘आफ्टर सायलेन्स: अ हिस्टरी ऑफ एड्स थ्रू इट्स इमेजेस’ या पुस्तकात, लेखक एव्हराम फिनकेलस्टीन यांनी त्यावेळच्या आंदोलनाला “act of call and response, a request for participation” असं म्हटलं आहे. इंटरनेट नसलेल्या काळात, टी-शर्टने हा लढा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक व्यासपीठ दिलं. 1980 च्या दशकात स्लोगन टी-शर्ट फक्त राजकारणातच नाही, तर गाणी, चित्रपट, फॅशन यांसारख्या पॉप कल्चरमध्येही आले.
आजही टी-शर्ट आपले विचार व्यक्त करतो
आपण स्लोगन टी-शर्ट घालतो, तेव्हा आपण आपल्या मनातल्या गोष्टी जगाला दाखवतो. जणू काही आपण आपलंच एक वेगळं रूप बाहेर आणतो. यामुळे नवीन ओळखी होतात, लोकं एकत्र येतात पण कधीकधी यामुळे वाद किंवा अडचणीही येऊ शकतात. खासकरून जे लोक समाजात थोडे दुबळे आहेत, त्यांच्यासाठी हे धोकादायक ठरू शकतं.
2023 मध्ये, ‘जस्ट स्टॉप ऑइल’ (Just Stop Oil) नावाचे टी-शर्ट घातलेल्या काही शांतताप्रिय आंदोलकांना अटक झाली. यावरून लक्षात येतं की, स्लोगन टी-शर्ट घालणं किती असुरक्षित आणि कायद्याच्या दृष्टीने कठीण असू शकतं. कधीकधी आपल्या एका साध्या टी-शर्टमुळेही आपण अडचणीत येऊ शकतो. तरीही, LGBTQ समुदाय आजही स्लोगन टी-शर्ट वापरत आहेत. कायद्यात बदल होत असले, तरी ते अजूनही आपले विचार टी-शर्टवर छापून लोकांपर्यंत पोहोचवत आहेत.
मराठी स्लोगन टी-शर्टची क्रेझ
आजकाल तर या स्लोगन टी-शर्टवर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे संदेश, चारोळ्या, म्हणी, आपल्या रोजच्या बोलण्यात येणारे काही मजेशीर शब्द, वाक्य देखील छापली जातात. ही आता एक फॅशनच झाली आहे.
मुंबईत साधारण नव्वदच्या दशकात दहीहंडीच्या वेळी प्रत्येक मंडळाचे वेगळे टी-शर्टची क्रेझ सुरू झाली. जी आता आणखी जोमात आहे. या टी-शर्टवर मंडळाचे नाव, स्वतःचे नाव तसेच जाहिरातदारांची नावे असतात. खरंतर या आधी असं काही नसायचं पण आता स्लोगन टी-शर्ट स्टाईलची क्रेझ वाढली आहे आणि त्यामध्ये नवीन प्रकार देखील दिसत आहेत. निवडणुकीच्या वेळी मतांसाठी प्रत्येक राजकीय पक्ष वेगवेगळी कॅम्पेन राबवतो. उमेदवार म्हणून उभी असलेली व्यक्ती घरोघरी पोहोचावी लोकांना ती व्यक्ती ओळखीची व्हावी म्हणून प्रचारासाठी त्या व्यक्तीचा फोटो किंवा निशाणी टी-शर्टवर छापली जाते. नेत्याला घरोघरी पोहचवण्यासाठी टी-शर्ट हे वस्त्यांमधलं एक प्रभावी माध्यम बनले आहे. वेगवेगळ्या स्पर्धा, सण यांच्या माध्यमातूनही नेत्याच्या, गटाच्या छबीचे टी-शर्ट दिले जातात.
गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सवातही टी-शर्ट लोकप्रिय होत आहेत. मंडळाचे टी-शर्ट तर असताततच पण गणपतीचा जयजयकार असणारे स्लोगन असलेले टी-शर्ट किंवा गणपती बाप्पाचे बालरूपातील फोटो टी-शर्टवर छापून घेतले जातात. काही लोक त्यांच्या कुटुंबापुरते त्यांच्या नावाने किंवा गणपतीच्या फोटोचे 10-15 टी-शर्ट खास तयार करून घेतात. यामुळे हे टी-शर्ट आता सण-समारंभांमध्येही एक वेगळी ओळख निर्माण करत आहेत. मराठीतल्या म्हणींपासून ते आईच्या ओरड्यापर्यंत अनेक मराठी शब्द टी-शर्टवर अवतरू लागली आहेत. आणि याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
आजच्या जगात अनेकांसाठी हा साधा टी-शर्ट आजही अशी एक जागा आहे जिथे आपण आपल्या खऱ्या भावना मोकळेपणाने व्यक्त करू शकतो.