मायक्रो प्लास्टिक हे पर्यावरणासाठी अतिशय घातक आहे. प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जातात. पण संपूर्ण प्लास्टिक बंदी ही शक्य होत नाही. अशावेळी साचत जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांच्या बाटल्यांच्या ढीगाचं करायचं काय? हा प्रश्न सगळ्यांसमोरचं आहे. आणि याचं उत्तर शोधलं आहे ते कर्नाटकमधील कलबुर्गी जिल्ह्यातल्या वाडी नगरपालिकेने.
प्लास्टिकचा कल्पक पूनर्वापर
वाडी नगरपालिकेने प्लास्टिक पिशव्या आणि बाटल्याचं रुपांतर पेव्हर ब्लॉक्स आणि लाद्या (टाईल्स) मध्ये केलं आहे. प्लास्टिकची समस्या ही अनेक शतकापासून भेडसावत होती. पालिकेकडून जो कचरा गोळा केला जायचा त्यातून प्लास्टिक कचरा वेगळा न काढताच घनकचरा व्यवस्थापनाकडे पाठवला जात असे. या कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं. त्यामुळे याचा पुनर्वापर कसा करता येईल यावर संशोधन सुरु होतं. यातूनच या प्लास्टिक कचऱ्यापासून पेव्हर ब्लॉक्स आणि लाद्या तयार करण्याची संकल्पना समोर आली.
त्यानंतर वाडी नगरपालिकेने कलबुर्गीमधल्या रिवाइव्ह वेस्ट मॅनेजमेंट या स्वयंसेवी संस्थे (NGO) सोबत भागीदारी केली आणि एक संयुक्त प्रकल्प उभा केला, अशी माहिती वाडी नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी फकरुद्दीन यांनी दिली.
पालिका 23 वॉर्डमधली दुकानं आणि घरातून दररोज 14.5 टन कचरा गोळा करतात. यामध्ये 350 किलो प्लास्टिक असतं. हे सगळं प्लास्टिक या कचऱ्यातून वेगळं काढलं जातं. त्यानंतर एका धूळ काढून टाकणाऱ्या मशीनमध्ये टाकून हे प्लास्टिक पूर्ण स्वच्छ केलं जातं. पुढे हे प्लास्टिक हैदराबादमधल्या एका कारखान्यात पाठवलं जातं. तिथे या प्लास्टिकपासून पेव्हर ब्लॉक्स आणि टाइल्स तयार करुन ते वाडी नगरपालिकेला दिले जातात.
या पेव्हर ब्लॉक्स आणि टाइल्सचा वापर ड्राईव्हवे, वॉकवे, पॅटिओ आणि रस्ते बांधण्यासाठी करता येऊ शकतो. ते टिकाऊ असतात, रस्त्यावर लावण्यासाठी सोपं असतात आणि ते रंगबेरंगी असल्यामुळे दिसायला ही खूप सुंदर दिसतात.
हे ही वाचा : नेल्स आर्टच्या कलाकुसरीसाठी प्लास्टिकचा पुनर्वापर
नवीन प्रकल्प उभारणार
या कल्पक उपक्रमाचं कौतुक करत, जिल्हा प्रशासनाकडून लवकरच वाडी इथे घनकचरा व्यवस्थापन कारखाना सुरु करण्यासाठी नगरपालिकेला मदत करणार असल्याची माहिती उपायुक्त फौजिया तरनुम यांनी दिली.
वाडी इथे जर हा कारखाना उभा केला तर आसपासच्या इतर पालिकेतूनही अशाप्रकारे प्लास्टिक कचरा गोळा करुन तिथे पेव्हर ब्लॉक्स आणि टाइल्स तयार केल्या जातील.
प्लास्टिकपासून तयार केलेल्या पेव्हर ब्लॉकचा वापर
हैदराबाद मधली ही स्वयंसेवी संस्था त्यांना पाठवल्या जाणाऱ्या प्रत्येक टन प्रक्रिया केलेल्या प्लास्टिकच्या बदल्यात 125 पेव्हर ब्लॉक किंवा टाइल्स पुरवते. हे पेव्हर ब्लॉक आणि टाइल्स वाडी इथल्या नागरी कामगार विश्रामगृहासमोरील पदपथ बांधण्यासाठी वापरली आहेत.
रिवाइव्ह वेस्ट मॅनेजमेंटचे प्रमुख नवीनचंद्र म्हणाले की, जर त्यांना मोफत भूखंड मिळाला तर त्यांची एजन्सी वाडीमध्ये कारखाना उभारण्यास तयार आहे. वाडी इथे कारखाना उभा करण्याचा अंदाजे खर्च 75 लाख रुपये आहे. जर परवानगी मिळाली तर पुढच्या तीन महिन्यात हा कारखाना उभारता येईल. पारंपारिक सिमेंट पेव्हर ब्लॉक्स आणि टाइल्सपेक्षा हे ब्लॉक्स आणि टाइल्स खूप वेगळे आणि मजबूत आहेत. यामध्ये 80 टक्के प्लास्टिक आणि 20 टक्के वाळू किंवा काचेची पावडर असते. हे पेव्हर ब्लॉक्स आणि टाइल्स 50 वर्षापेक्षा दीर्घकाळ टिकतात. आणि ते 60 टनांपर्यंतचं वजन सहन करु शकतात, अशी माहिती रिवाइव्ह वेस्ट मॅनेजमेंटचे प्रमुख नवीनचंद्र यांनी दिली.