यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार असाल तर त्याच खराब रस्त्यावरुन तुम्हाला जावं लागणार आहे. पण पुढच्या गणेशोत्सवात मात्र चांगल्या रस्त्यावरुन तुम्हाला गावी जाता येईल. कोकणवासीयांनी गेली अनेक वर्ष ‘यंदा नाही पुढच्या वर्षी’ असं करत करत खराब मुंबई – गोवा महामार्गावरुन प्रवास केला आहे. त्यामुळे आता मार्च 2026 पर्यंत नक्की चांगला महामार्ग तयार होईल असं जरी सांगितलं जात असलं तरी, ‘झाल्यावरच विश्वास ठेवू’ अशी गत आहे. पण आता मार्च 2026 पर्यंत नक्की हा महामार्ग पूर्ण तयार असेल असा विश्वास आहे. कारण केंद्रीय रस्तेमंत्री यांनी ठेकेदारांना जर महामार्गाचं काम विहीत वेळेत पूर्ण केलं नाही तर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
रखडलेला मुंबई – गोवा महामार्ग
मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम गेल्या अठरा वर्षापासून रखडलेलं आहे. संपूर्ण महामार्ग तयार होण्यापूर्वीच जो महामार्ग तयार होता तोही आता काही सखल भागात खराब होत चालला आहे. म्हणजे बांधलेला रस्ता खराब होण्याच्या मार्गावर आहे तोपर्यंत संपूर्ण महामार्ग हा बांधलाच गेलेला नाही. त्यात सर्वाधिक काम हे रत्नागिरी जिल्ह्यातील दोन टप्प्याचं रखडलं आहे. आरवली ते कांटे – 39 कि.मी. आणि कांटे ते वाकेड 49 कि.मी. या दोन टप्प्याचं काम अजूनही बाकी आहे.
गेल्या 18 वर्षापासून हे काम सुरु आहे. आणि या कामासाठी ठेकेदारांनी आणखीन मुदतवाढ मागितली आहे. मात्र, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट नकार दिला आहे. त्याऐवजी आता जी नवीन मुदतवाढ दिली आहे. मार्च 2026 पर्यंत हे काम पूर्ण झालं नाही तर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
काय म्हणाले नितीन गडकरी?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम करणाऱ्या ठेकेदारांची नुकतीच दिल्लीत बैठक घेतली. या बैठकीमध्ये गडकरी यांनी ठेकेदारांची कान उघडणी केली आहे. मुंबई-गोवा हा महामार्ग पूर्ण करण्याकडे आपलं अधिक लक्ष असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
दरम्यान रखडलेल्या दोन्ही टप्प्यांना पुन्हा मुदतवाढ मिळावी, अशी मागणी ठेकेदरांनी दिल्लीतील बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. पण गडकरी यांनी मागणी फेटाळून लावली आणि आहे त्या मुदतीत काम पूर्ण करण्याचे कंपन्यांना आदेश दिले आहेत. ही मुदत आता ‘अंतिम मुदत’ आहे. जर या मुदतीत महामार्गाचं काम पूर्ण झालं नाही तर संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करु असा इशारा त्यांनी दिला आहे.
हे ही वाचा : सिंधुदुर्ग जिल्हा आता ‘स्मार्ट जिल्हा’; एआय (AI) प्रणाली वापरणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा!
काम रखडल्यामुळे खर्चात वाढ
मुंबई – गोवा महामार्गावर या दोन टप्प्याचं काम रखडल्यामुळे खर्चात मोठी वाढ होत आहे. आरवली ते कांटे हा 39 किमीचा टप्पा आहे. सुमारे 692 कोटीचं हे काम असणार आहे. तर दुसरा टप्पा कांटे ते वाकेड हा 49 किमीचा असून त्याचे अंदाजपत्र 800 कोटीचं आहे. या दोन्ही टप्याचं काम लांबल्यामुळे खर्चात 30 टक्क्याची वाढ होणार आहे. त्यामुळे या दोन्ही टप्प्यांना प्रत्येकी 250 ते 300 कोटी वाढीव निधी लागण्याची शक्यता आहे. म्हणून याहून जास्त खर्च होऊ नये म्हणून आता हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे सरकारचा प्रयत्न आहे.
महामार्गावरील त्रूटी
मुंबई – गोवा महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग आहे. तरिही, या महामार्गाचं काम संथगतीने सुरु आहे. गेल्या 18 वर्षापासून हे काम सुरु आहे. त्याऐवजी देशातले अनेक असे रस्ते, बोगदे प्रकल्प आहेत जे नव्याने सुरु करुन पूर्णही झाले आहेत. मात्र, हा महामार्ग अजूनही प्रतिक्षा यादीतच आहे.
हा महामार्ग एकाच कंपनीला बांधण्यासाठी दिलेला नाहीये. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या ठेकेदारांकडून बांधला जात आहे. त्यामुळे महामार्गाच्या कामात अनेक तांत्रिक त्रूटी असल्याचे समोर आलं आहे. महामार्गाचा जो रस्ता बांधून झालेला आहे तिथे काही ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचलं, तर वळण घेण्याच्या मार्गावर तांत्रिकदृष्ट्या ते वळण बांधलं न गेल्यामुळे वाहन हे रस्त्यावरून निसटलं जातं. त्यामुळे अपघात होण्याची खूप शक्यता असते. शिवाय या महामार्गावर स्वच्छतागृह, अत्यावश्यक सुविधा, वैद्यकीय सेवांचीही वानवा आहे.
अशा सगळ्या परिस्थितीत गेल्या 18 वर्षापासून रखडलेले दोन टप्पे एका वर्षात पूर्ण करण्याचं आव्हान ठेकेदारांसमोर आहे. त्यांना आणखीन मुदतवाढ हवी होती जी की दिली नाही. याचा सकारात्मक परिणाम होऊन हे महामार्गाचं काम पूर्ण होईल की दबावाखाली येऊन तकलादू पद्धतीने हे काम केलं जाईल याबाबत आता महामार्ग पूर्ण झाल्यावरच कळू शकतं.