जून 2025 मध्ये मिलान स्प्रिंग 2025 मेन्सवेअर हा फॅशन शो झाला. या फॅशन शोमध्ये एका पुरुष मॉडलने पायामध्ये चक्क ‘कोल्हापूर चप्पल’ घालून रँम्प वॉक केला. कोल्हापूरच्या पारंपारिक चपला थेट इटलीतल्या फॅशन शो मध्ये वापरल्या गेल्या. हा एक अभिमानाचा क्षण होता. पण, इटलीतल्या ‘प्राडा’ या फॅशन कंपनीने या चपलाचं श्रेय कोल्हापूर वा भारताला न देता स्वत:चं डिझाईन असल्याचं सांगितलं. आणि तिथून कोल्हापूर चपलांच्या मूळावरून वाद सुरु झाला. या वादानंतर कंपनीने या चपला भारतीय हस्तकला चपलांपासून ‘प्रेरित’ असल्याचं मान्य केलं. त्यात आता हा वाद शमण्याची शक्यता आहे. कारण प्राडा कंपनीची एक टीम कोल्हापूर दौऱ्यावर आली आहे.
प्राडा थेट कोल्हापूरात
कोल्हापूर चपलांवरुन कायदेशीर कारवाई संदर्भात हालचाल सुरु केल्यावर प्राडा कंपनीने या चपलांचं मूळ शोधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्राडा कंपनीच्या तांत्रिक विभागातील चार सदस्यीय टीम 15 – 16 जुलै असा दोन दिवसीय दौरा करत आहेत. या दौऱ्यात त्यांनी कोल्हापूरमधल्या वेगवेगळ्या कारखानदाऱ्यांना आणि कारागिरांना भेटून कोल्हापूर चपलां विषयीची माहिती, त्याच्याशी संबंधित असलेली संस्कृती आणि कोणत्याही मशिनचा वापर न करता संपूर्णरित्या हाताने या चपला कशा तयार केल्या जातात ही प्रक्रिया समजून घेतली आहे.
प्राडा कोल्हापूरातून चपला घेणार का?
या सर्व वादविवादादरम्यान, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने प्राडा या कंपनीशी ईमेल द्वारे संपर्क साधला होता. या संवादावेळी प्राडा कंपनीने त्यांच्या चपला या कोल्हापूर चपलांपासूनच प्रेरित असल्याचं मान्य केलं होतं. तसेच या चपलांचं उत्पादन अजून प्राडाने सुरु केलं नसल्याचं ही स्पष्ट केलं होतं. त्यावेळी प्राडा कंपनीने या चपला कोल्हापूरातून घ्याव्यात असा प्रस्ताव महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सकडून केला होता अशी माहिती, महाराष्ट्र कॉमर्स चेंबर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
आपल्या कोल्हापूरी चपला या हस्तनिर्मित आहेत. त्यामुळे त्या कशा तयार केल्या जातात याची संपूर्ण माहिती घेतली जाईल. त्यानंतर कंपनीला कशा पद्धतीच्या चपला हव्या आहेत, त्यांची गरज काय आहे याची चर्चा कारागिरांशी केली जाईल. त्यांनंतर या संपूर्ण भेटीचा एक अहवाल ही टीम त्यांच्या कॉर्पोरेट ऑफिसला देईल. जर हे सगळं पुढे जाणार असेल ही कंपनी कोल्हापूरातून चपला घेणार असेल तर पुढच्या टप्प्यात प्राडाचे वरिष्ठ अधिकारी कोल्हापूरला भेट देऊ शकतात.
जर हा करार यशस्वी झाला तर कोल्हापूर चपलांना जागतिक बाजारपेठेत एक ग्लॅमर मिळेल. इथल्या स्थानिक कारागिरांना त्याचा खूप जास्त फायदा मिळेल. स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण होईल. महत्त्वाचं म्हणजे प्राडाने कोल्हापूरला एक तांत्रिक टीम पाठवली यातूनच त्यांना या चपलांमध्ये रस असल्याचं दिसून येतं, अशी प्रतिक्रिया ललित गांधी यांनी दिली.