कबुतराच्या विष्ठेमुळे आणि पिसांमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे शहरातले सर्व कबुतरखाने बंद करण्याचे आदेश राज्य सरकारने मुंबई महानगरपालिकेला दिले होते. या अंतर्गत पालिकेने कारवाईला सुरुवात केली होती. पण मुंबई उच्च न्यायालयाने पुढील आदेश देईपर्यंत जुन्या कबुतर खान्यांवर कारवाई न करण्याचे निर्देश पालिकेला दिले आहेत.
नेमकं काय घडलं?
राज्य सरकारच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेने शहरात ठिकठिकाणी असलेल्या कबुतर खान्यांवर कारवाई सुरु केली होती. मात्र, ॲड. पल्लवी सचिन पाटील यांनी, पालिकेच्या या कारवाईवर स्थगिती देण्याची मागणी करत, कबुतरांना वाचवण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयात केली. या याचिकेवर दिनांक 16 जुलै 2025 रोजी न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांनी केलेली मागणी मान्य केली आणि पालिकेला पुढील आदेश देईपर्यंत जुना वारसा असलेले कबुतरखाना तोडू नका, असे आदेश दिले आहेत.
याचिकाकर्त्यांनी काय मागण्या केल्या होत्या?
याचिकाकर्त्यांनी याचिकेमध्ये पालिकेच्या कारवाईला स्थगिती देण्याची मुख्य मागणी केली होती. याचिकेत म्हटलं आहे की, पक्ष्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. त्यांना खायला देणं गरजेचं आहे. त्यामुळे दिवसातून निदान दोनदा तरी कबुतरांना खायला घालण्याची परवानगी मिळावी. त्यामुळे पालिकेला कबुतरखाने तोडण्यापासून थांबवा. तसेच जे कबुतर खाने या कारवाई अंतर्गत तोडले आहेत ते पुन्हा उभारण्याचे निर्देश द्या, अशा मागण्या या याचिकेत केल्या होत्या.
हे ही वाचा : वृद्धांना आरोग्यविम्याचा आधार
न्यायालयाने काय उत्तर दिलं?
न्यायालयाने पालिकेला जुने, वारसा असलेले कबुतरखाने पाडण्यास सध्या थांबायला सांगितलं आहे. याचा अर्थ शहरात ज्या- ज्या ठिकाणी अलीकडे कबुतरखाने निर्माण केले आहेत, अशा कबुतरखान्यांवर पालिकेला कारवाई करता येईल.
दरम्यान, न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारलं आहे. न्यायालयाने आपल्या सुनावणीत म्हटलं आहे की, कबुतरांच्या विष्ठेचा आणि पिसांचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. याचे वैद्यकीय पुरावे आपल्या हातात आहेत. वैद्यकीय क्षेत्राने प्रगती केली आहे. इंग्लंडमध्येही वृद्ध माणसांचा या कारणांमुळे मृत्यू झाल्याच्या घटना ऐकिवात आहेत. ज्या – ज्या ठिकाणी कबुतर असतात तिथे साथीच्या रोगाचा झपाट्याने प्रसार होतो. केईएम रुग्णालय, पालिकेच्या अन्य रुग्णालयांमध्ये कबुतराच्या विष्ठेमुळे बाधित झालेले रुग्ण पाहायला मिळतात.
मुंबईप्रमाणे इतर राज्यांमध्ये किंवा देशांमध्ये आता कबुतरखाने पाहायला मिळत नाहीत. माणसांप्रमाणे प्राण्याचे हक्क – अधिकारही महत्त्वाचे आहेत. प्राणी-पक्षी आणि माणसांचे हक्क संतुलित असले पाहिजेत. पण जर कबुतरांच्या घाणीमुळे माणसांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत असेल तर मानवाच्या हिताला प्राधान्य देणं गरजेचं आहे, असं स्पष्ट करत न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या मागण्यांपैकी कबुतरखाने बंद करण्याविषयीची मागणीला पूर्ण स्थगिती दिली नाही. तर, फक्त जुने, वारसा स्वरुपात असलेल्या कबुतरखान्यांवर कारवाई करण्याविषयी तात्पुरती स्थगिती दिलेली आहे. यासंबंधात न्यायालयाकडून पुढील आदेश दिल्यावर असे कबुतर खाने बंद करायचे की काय हे स्पष्ट होईल. याशिवाय याचिकाकर्त्यांच्या अन्य मागण्या अमान्य केल्या आहेत.
पावसाळी अधिवेशनात कबुतरखाने बंद करण्याचा विषय
मुंबई शहरातली कबुतरखाने बंद करण्याचा विषय विधानपरिषदेतून सुरु झाला. पावसाळी अधिवेशनादरम्यान, आमदार मनिषा कायंदे यांनी कबुतराची विष्ठा आणि पिसांमुळे होणाऱ्या फुफ्फुसांचा संसर्ग आणि श्वसनाच्या आजारांशी संबंध असलेल्या संशोधनात्मक अभ्यास सभागृहापुढे मांडला.
3 जुलै 2025 रोजी आमदार चित्रा वाघ यांनीही हा विषय विधानपरिषदेत मांडला. अंधेरी के वेस्ट वॉर्ड, वडारवाडी इथे राहणाऱ्या शीतल सटाणेकर या महिलेचा मृत्यू हा कबुतरांच्या विष्ठेपासून झालेल्या संसर्गामुळे झाल्याचं त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. दोन वर्षांपासून त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. या आजाराचं निदान करताना डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना हायपर सेन्सिटिव्ह न्यूमोनिटिस हा दुर्धर आजार झालेला आहे. या आजारामध्ये फुफ्फुसांना फायब्रोसिस येतात. या फायब्रोसिस बऱ्या होत नाहीत. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. कृत्रिम ऑक्सिजन लावावा लागतो. हे उपचार सुरु असतानाच दीड वर्षात त्यांचा मृत्यू झाला. त्याच परिसरातल्या आणखीन 2-3 महिलांना हाच आजार झालेला आहे. शहरात अनेक ठिकाणी कबुतरांना धान्य टाकून त्याठिकाणी त्यांची अनावश्यक गर्दी जमवली जाते. त्यामुळे परिसरातील लोकांना आजारांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे यातली गांभीर्यता ध्यानात घेऊन केवळ दादर कबुतरखानाच नाही तर, मुंबई शहरातले आणि राज्यातही जिथे कबुतरखाना आहेत ते बंद करण्याची कारवाई करावी.
या सर्व प्रश्नांना उत्तर देताना उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की, मुंबईत एकूण 51 ‘पिजन फीडिंग’ ठिकाणे आहेत आणि सरकार बीएमसीला ही ठिकाणे त्वरित बंद करण्यास सांगेल.
राज्य सरकारकडून हे आदेश लेखी स्वरुपात येण्याआधीपासूनच पालिका त्वरित कामाला लागली आणि आपल्या धडक कारवाईला सुरुवात केली.
हे ही वाचा : तुम्हाला चंचल बनवणारा ‘ब्रेन फॉग’ हा आजार नेमका काय आहे?
पालिकेची कारवाई
पालिकेने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दादर इथून कारवाईला सुरुवात केली. पालिकेच्या जी-उत्तर वॉर्डने दादरच्या कबुतरखान्यात बेकायदेशीरपणे बांधलेले गोदाम पाडले आणि कबुतरांना खायला घालण्यासाठी साठवलेले प्रत्येकी 50 किलो वजनाच्या सुमारे 25 गोणी धान्य जप्त केलं.
कबुतरखान्यांविरुद्ध कारवाई दादर इथून सुरू करण्यात आली कारण तिथे कबुतरांना खाण्याचे सर्वात मोठे ठिकाण आहे. हळूहळू शहरातील उर्वरित 51 कबुतर खान्यांवर कारवाई केली जाईल. घटनास्थळी खाद्य पूर्णपणे बंद होईपर्यंत पक्षी परत येत राहतील. नागरिकांनी पक्ष्यांना खाद्य देणे बंद केल्यानंतरच कबुतरखाना पूर्णपणे बंद करणे शक्य आहे. त्यामुळे जनजागृती करण्यासाठी पालिकेकडून मोहीम राबवली जाईल, अशी माहिती जी-नॉर्थ वॉर्ड ऑफिसर विनायक विसपुते यांनी माध्यमांना दिली.
कबुतर खाने हटवण्यासंबंधित पहिलं पाऊल कोणी उचललं राज्य सरकारने की मनसेने?
दरम्यान, दादर इथला कबुतरखाना हा गेल्या अनेक दशकांपासूनचं एक प्रतिष्ठित ठिकाण आहे. गेल्या काही महिन्यांपासून कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसनाचे आजार आणि पिसांमुळे होणारे वायू प्रदूषण अशा अनेक तक्रारी रहिवाशांकडून येत आहेत. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये मनसेच्या पर्यावरण शाखेने दादर इथला कबुतरखाना बंद करण्याची मोहीम सुरू केली होती, असा दावा केला आहे.
“फुफ्फुसांच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांचे जीव वाचवू शकलो हा आमचा विजय आहे. कबुतरांना जास्त प्रमाणात खायला दिल्यामुळे आणि त्यांच्या मोठ्या थव्यांमुळे श्वसनाच्या समस्या येत असल्याच्या अनेक तक्रारी आम्हाला मिळाल्या होत्या. अनेकजण या कबुतर खान्याजवळ येऊन कबुतरांना खायला द्यायचे आणि निघून जायचे. कबुतरांना अतिप्रमाणात खायला दिलं जायचं. याचा त्रास जवळच्या इमारतींमधील रहिवाशांना व्हायचा, अशी प्रतिक्रिया मनसेचे जय श्रृंगारपुरे यांनी दिली.
कबुतराची विष्ठा किती धोकादायक असते?
कबुतराच्या विष्ठेमध्ये हिस्टोप्लाज्मोसिस, क्रिप्टोकोकोसिस, सिटाकोसिस यांसारखे रोगजंतू असतात, जे हवेतून श्वसनामार्फत मानवी शरीरात प्रवेश करतात. या विष्ठेतली बुरशी आणि धूळ (विशेषत: सुकलेली विष्ठा) श्वासावाटे शरीरात जाऊन ऍलर्जी, अस्थमा आणि इतर श्वसनाचे आजार होतात. याशिवाय त्वचेवरील उघड्या जखमा किंवा त्वचेच्या संपर्कात आल्यास संसर्ग होऊ शकतो.
अनेकदा एकाच ठिकाणी दररोज कबुतरांना खायला द्यायला सुरुवात केल्यावर त्याठिकाणी दररोज ठरलेल्या वेळी हे पक्षी यायला सुरुवात होते. जितकं जास्त धान्य खाण्यासाठी टाकलं जातं तितक्या जास्त प्रमाणात कबुतरांचा वावर सुरू होतो. यामुळे तिथल्या पक्ष्यांच्या अधिवासातही बदल घडतात. इतर पक्ष्यांचा वावर कमी होऊन फक्त कबुतराचचं अस्तित्व ठळकपणे दिसू लागतं.